News Flash

शेरलॉक होम्सच्या थरारकथा

प्राथमिक शाळेचं रहस्य’ ही एका उच्चभ्रू शाळेतून बेपत्ता झालेल्या मुलाची कथा आहे.

शेरलॉक होम्सचं नाव न ऐकलेला माणूस शोधूनही सापडणार नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सर आर्थर कॉनन डॉयल या डॉक्टर-लेखकाने शेरलॉक होम्स या भन्नाट पात्राला जन्म दिला. शेरलॉक होम्स या डिटेक्टिव्हच्या रहस्यकथा आजही तितक्याच लोकप्रिय आहेत. वास्तविक १८९३ मध्ये ‘द फायनल प्रॉब्लेम’ या कथेत होम्स आणि प्रा. मोरिआर्टी या त्याच्या कट्टर शत्रूच्या दरम्यान जीवघेणं द्वंद्व होतं आणि दोघंही ऱ्हाईनबाक धबधब्यात खोल पडतात. या घटनेत दोघांचा मृत्यू झालेला दाखवलेला आहे. पण यामुळे नाराज झालेल्या होम्सच्या चाहत्यांच्या दबावामुळे डॉयलला होम्सचा ‘पुनर्जन्म’ साकारावा लागला! ‘शेरलॉक होम्सचं पुनरागमन’ या पुस्तकात ‘द रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स’ या मूळ संग्रहातल्या सात कथांचा मराठी अनुवाद आहे. होम्सचा मृत्यू झाला असल्याचा सर्वाचा ग्रह झालेला असतो, पण या संग्रहातल्या ‘रिकाम्या घराचं रहस्य’ या पहिल्याच कथेत अत्यंत नाटय़मयरीत्या होम्सचं पुनरागमन होतं. वॉटसन आणि होम्स पुन्हा एकदा एकत्र येऊन होम्सच्या जीवावर उठलेल्या आणि रोनाल्ड अडेअर नामक व्यक्तीचा खून करणाऱ्याला शोधून काढतात.
‘प्राथमिक शाळेचं रहस्य’ ही एका उच्चभ्रू शाळेतून बेपत्ता झालेल्या मुलाची कथा आहे. शाळेचे मुख्याधापक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी होम्स आणि वॉटसनला विनंती करतात आणि त्यादरम्यान काही अनपेक्षित आणि आश्चर्यकारक गोष्टी उघडकीस येतात. या दोन कथांखेरीज आणखी पाच कथा या पुस्तकात आहेत- ‘नॉरवूडच्या बांधकाम उद्योजकाचं रहस्य’, ‘नाचणाऱ्या आकृत्यांचं रहस्य’, ‘एकाकी सायकलस्वाराचं रहस्य’, ‘ब्लॅक पीटरचं रहस्य’ आणि ‘चार्ल्स ऑगस्टस मिल्वरटनचं रहस्य’!
‘शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा- गूढ रहस्याचा वाढता थरार’ या पुस्तकात ‘द रिटर्न ऑफ शेरलॉक होम्स’ या मूळ संग्रहातल्या पुढच्या सहा- म्हणजे कथा क्रमांक आठ ते तेराचा अनुवाद आहे. यामध्ये ‘सहा नेपोलियन्सचं रहस्य’, ‘तीन विद्यार्थ्यांचं रहस्य’, ‘सोनेरी चष्म्याचं रहस्य’, ‘फुटबॉलपटूचं रहस्य’, ‘अ‍ॅबी ग्रांजचं रहस्य’ आणि ‘दुसऱ्या डागाचं रहस्य’ या कथांचा समावेश आहे. होम्सच्या या सगळ्या कथा वॉटसनने प्रथमपुरुषी एकवचनात कथन केलेल्या आहेत. त्यांच्यात वॉटनसला होम्सविषयी वाटणारा अपरिमित आदर- नव्हे, भक्तीच पदोपदी आपल्याला जाणवते. होम्स वेळोवेळी वॉटसनचा बावळटपणा दाखवून देत असतो, तरी त्या दोघांमध्ये अतिशय गाढ मैत्रीही असते. जवळजवळ सर्व प्रकरणांमध्ये ते एकत्र काम करतात. वॉटसनखेरीज होम्सच्या कथांमध्ये नेहमी भेटणारं आणखी एक पात्र म्हणजे स्कॉटलंड यार्डचे इन्स्पेक्टर लेस्ट्रेड. हे सद्गृहस्थही होम्सचे चाहतेच आहेत आणि या अफलातून डिटेक्टिव्हची मदत घेण्यात त्यांना काहीही कमीपणा वाटत नाही. होम्सला प्रसिद्धीची मुळीच हौस नसते. पण वॉटसन किंवा लेस्ट्रेडने कौतुक केलं की काही क्षण का होईना, होम्सच्या एरवी निर्विकार असणाऱ्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो.
होम्सच्या या रहस्यकथांचं एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांत सनसनाटी वर्णनं नसतात, बीभत्सपणा नसतो. प्रत्येक कथेत खून असतोच असंही नाही. तरीही सर्व कथा अतिशय उत्कंठावर्धक असतात. पुस्तक एकदा हातात घेतलं की तुम्ही ते संपवल्याशिवाय खाली ठेवूच शकत नाही. होम्सची विलक्षण निरीक्षणक्षमता, तर्कशुद्ध विचार करण्याची हातोटी आणि मनुष्यस्वभावाचं सखोल ज्ञान या गुणांमुळेच तो एकापाठोपाठ एक गुन्ह्यंचा पाठपुरावा करून गुन्हेगाराला पकडू शकतो. या कथा वाचताना आपल्या डोळ्यांसमोर त्या काळातलं लंडन शहर आणि तिथलं समाजजीवन स्पष्टपणे तरळून जातं.
कोणत्याही अनुवादित लिखाणामध्ये मूळ कथेचं सार आणि भावार्थ जसाच्या तसा उतरवणं गरजेचं असतं. त्या भाषेतील खाचाखोचा आणि वैशिष्टय़ं माहिती असावी लागतात. दिलीप चावरे ही अवघड कसोटी उत्तम प्रकारे पार पाडतात. पुस्तकांची निर्मितीमूल्ये उत्तम आहेत. शाम भालेकरांची मुखपृष्ठं आशयाला पूरक आहेत. जगातल्या उत्तमोत्तम वाङ्मयाचे- म्हणजे ‘क्लासिक्स’चे अनुवाद करून डायमंड पब्लिकेशन्सने मराठी वाचकांसमोर दर्जेदार पुस्तकांचं दालनच खुलं केलं आहे!
‘शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा’, ‘शेरलॉक होम्सचं पुनरागमन’- सर आर्थर कॉनन डॉयल, अनुवाद- दिलीप चावरे, डायमंड पब्लिकेशन्स,
अनुक्रमे- पृष्ठे- १५२, किंमत- १५० रुपये, पृष्ठे- १७८, किंमत- १९५ रुपये.
रमा सखदेव

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 1:15 am

Web Title: sherlock holmes mystery stories
Next Stories
1 शेक्सपिअर.. आंतरिक नाते
2 विनाशवेळा- २
3 दर्यातला वाघ..
Just Now!
X