अभिजित बेल्हेकर

महाराष्ट्र हा गडकोटांचा प्रदेश आहे. या प्रदेशात असतील एवढय़ा संख्येने आणि विविधतेने गडकोट अन्यत्र कुठेही नसावेत. या दुर्गाना वैशिष्टय़पूर्ण असा भूगोल आहे. लोभस आणि तितकाच धाक दाखवणारा निसर्ग आहे. पराक्रमाचा मोठा इतिहास आहे. या साऱ्यांमुळेच महाराष्ट्रीय संस्कृतीत गडकोटांना अनन्यसाधारण स्थान आहे. मराठी मातीतील त्यांच्या या पाऊलखुणांचा शोध आजवर सामान्य भटक्यांपासून ते संशोधक-अभ्यासकांपर्यंत अनेकांनी घेतला, घेत आहेत. या दुर्गभ्रमणातूनच आपल्याकडे दुर्गसाहित्याचीही मोठी परंपरा जन्मास आली, विकसित झाली. या परंपरेतील एक विलक्षण निराळे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे- ‘श्रीमद् रायगिरौ’! गोपाळ चांदोरकर या हाडाच्या ज्येष्ठ दुर्गभटक्या, अभ्यासक, संशोधक, लेखकाने घडवलेली ही रायगड यात्रा एका निराळ्या विश्वात घेऊन जाते. इतिहासाच्याही पल्याड जात स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने रायगडाचा घेतलेला हा वेध थक्क करून सोडतो.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
the Meteorological Department has predicted unseasonal rain with gale force winds in Maharashtra Pune news
राज्यात दोन दिवस पावसाचे; विदर्भाला गारपिटीपासून दिलासा ?
Drought in the state but plenty of water in Koyna dam
राज्याला दुष्काळाचा झळा, कोयना धरणात मात्र मुबलक पाणी

आपल्याकडील सर्व गडकोटांमध्ये रायगडाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. गुलामी, अत्याचाराचा भवताल भेदून स्वातंत्र्याची पहाट घडवणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची ही राजधानी. त्यांच्या कल्पनेतूनच या गडाने आकार घेतला. अनेक वास्तू उभ्या राहिल्या. शिवकाळाचा जिवंत इतिहास आणि त्याचा साक्षीदार असलेला हा रायगड. यामुळेच या गडाचे, त्यावरील वास्तूंचे सर्वानाच आकर्षण. या आकर्षणातून आजवर अनेक अभ्यासकांनी रायगडाचा वेध घेतला. त्यावर अनेक पुस्तकेदेखील आली. चांदोरकरदेखील याच परंपरेतील; फक्त त्यांची दृष्टी थोडी निराळी, आजवरच्या मांडणीपेक्षा भिन्न! त्यामुळे हे पुस्तक वाचताना सतत नवा विचार गवसल्यासारखे वाटते.

मूळ स्थापत्यविशारद असलेले चांदोरकर १९५७ साली प्रथम रायगडावर गेले. पुढे मग त्याच्या ओढीने दरवर्षी ते रायगडावर जाऊ लागले. सततच्या पाहण्या-फि रण्यातून हळूहळू त्यांच्याकडून रायगडाचे सखोल दर्शन आणि निरीक्षणे घडू लागली. त्यातून त्यांना काही प्रश्न पडू लागले. गडावरच्या आज दिसणाऱ्या-सांगितल्या जाणाऱ्या वास्तू, त्यांचे प्रयोजन आणि सद्य:स्थिती या साऱ्याचा अंदाज घेतला तर अनेक ठिकाणी ही वहिवाट त्यांना मान्य होत नव्हती. यातूनच त्यांनी १९८० च्या सुमारास रायगडाचा नव्या दृष्टीने शोध घेण्यास सुरुवात केली. या शोधाचेच दर्शन म्हणजे हे पुस्तक!

अगदी सुरुवातीलाच चांदोरकर प्रांजळपणे सांगतात, ‘मी इतिहास संशोधक नाही. इतिहासतज्ज्ञदेखील नाही. तर गडांच्या स्थापत्याचा एक अभ्यासक आहे. माझ्या अभ्यासातून मी काही निष्कर्ष मांडले आहेत. जुनी मोडून नवी ओळख मांडली आहे. कदाचित माझे हे निष्कर्ष यापुढेही बदलण्याची वेळ येईल. कारण ऐतिहासिक वास्तूंच्या अभ्यासात असे होतच असते. मात्र ते प्रामाणिकपणे मान्य करणे महत्त्वाचे असते.’

रायगडाची नवी ओळख सांगताना चांदोरकर यांचे हे सुरुवातीचे निवेदन खूप महत्त्वाचे वाटते. ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करताना त्या वास्तूभोवती घडून गेलेला इतिहास, तो काळ या अंगानेच आपल्याकडे अभ्यास केला जातो. यामुळे यातील स्थापत्य वा अन्य विषयांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. हे पुस्तक वाचल्यानंतर ही बाब अधिक प्रकर्षांने जाणवते.

‘रायगड : नगररचना आणि वास्तू अभ्यास’ अशी संकल्पना असलेल्या या पुस्तकात गडावरील वास्तूंची रचना, मांडणी, बांधकाम वैशिष्टय़े, त्यामागचा विचार, शैली, बांधकामातील बदल, गडावरील दोन बांधकामांतील साम्य अशा अनेक बाबींचा विचार केलेला आहे. एखाद्या ऐतिहासिक स्थळाचा वेध घेताना ‘नगररचना’ ही संकल्पना आपल्याकडे प्रथमच वापरल्याचे दिसते. यामुळे यातील दृष्टी, विचार आणि माहिती हे सगळेच नवे भासते.

स्वराज्याची राजधानी असल्यामुळे रायगडावरील प्रत्येकच वास्तूला विशेष ओळख मिळालेली आहे. महाराजांचा राजदरबार, नगारखाना, सिंहासनाची जागा, सदर, महाराजांचा राहता वाडा, राणीवसा, अष्टप्रधान मंडळाचे वाडे, गडावरील स्तंभ, जगदीश्वरासह गडावरील मंदिरे-देवता, बाजारपेठ, महाद्वार, वाघ दरवाजा, गंगासागर-कुशावर्तसह असंख्य तलाव, खोदीव टाक्या, धान्य-दारूगोळय़ाची कोठारे, शिबंदीची घरटी.. अशा अनेक वास्तूंनी हा गड जिवंत केलेला आहे. आजवर अनेक अभ्यासकांनी या वास्तूंचा शोध आणि बोध घेत रायगडाची मांडणी केली आहे. परंतु यातील काही सन्माननीय अपवाद वगळता बहुतांश लेखन हे परंपरागत वाटेवरचे किंवा मूळ लेखनाची दिशा पकडून त्यात भर घालणारे आहे. ‘श्रीमद् रायगिरौ’ हे पुस्तक मात्र या साऱ्याच परंपरांना छेद देत नवी मांडणी करणारे आहे.

आजवर आपण रायगड आणि त्यावर दिसणाऱ्या बहुतांश वास्तू या शिवकाळात बांधून झाल्याचे वाचले-ऐकलेले असते. आपल्या या गृहीतकालाच या पुस्तकात सुरुवातीलाच सुरुंग लागतो. रायगडावरील अनेक वास्तू या शिवकाळाच्याही आधीपासून अस्तित्वात असल्याचे चांदोरकर यांचे मत आहे. हे नाते ते अगदी विजयनगर साम्राज्यापर्यंत मागे नेतात. यासाठी ते रायगडाच्या नावापासून स्थापत्यशैलीपर्यंत अनेक संदर्भ देतात. रायगिरी, रायरी, रायगड ही या गडाची अनेक नावे. या प्रत्येकातील ‘राय’ हा शब्द विजयनगर साम्राज्याशी नाते सांगतो. तिथल्या सर्व राजांच्या नावात हा ‘राय’ शब्द आलेला असल्याने विजयनगरशी रायगडाचे नाते असल्याचे चांदोरकर सांगतात. यादवांच्या ‘देवां’चा देवगिरी तर विजयनगरच्या ‘रायां’चा रायगिरी!

यासाठी चांदोरकर यांनी गोव्यातील नागेशीच्या मंदिरातील विजयनगरच्या पहिल्या देवरायांच्या शिलालेखाचा संदर्भही दिला आहे. यात विजयनगरचे साम्राज्य दक्षिणेत गोव्याच्या सीमेपासून उत्तरेत गुजरातच्या सीमेपर्यंत संपूर्ण कोकणात प्रस्थापित झालेले होते, असा उल्लेख आला आहे. रायगड हा या परिघातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. दुसरे असे की, विजयनगर साम्राज्याशी नाते सांगणारा ‘श्रीमद् रायगिरौ’ हा शब्द पुढे शिवाजीमहाराजांनीसुद्धा जगदीश्वर मंदिरातील शिलालेखात तसाच वापरल्याचे ते निदर्शनास आणून देतात.

हीच बाब स्थापत्यशैलीचीही! चांदोरकरांच्या मते, जगदीश्वर मंदिरांसमोरील नंदी, गडावरच्या मारुतीच्या मूर्ती, बालेकिल्ल्यातील इमारती, त्यांची रचना, त्यावरील दाक्षिणात्य पद्धतीची शरभ, गंडभेरुंडाची शिल्पं, नृत्य गणेशासारखी शिल्पं हे सारे दक्षिणेकडील विजयनगर शैलीशी नाते सांगणारे आहे. यामुळे गडावरील काही इमारती या शिवपूर्वकालीन असाव्यात, असा निष्कर्ष ते काढतात. त्यांचा या निष्कर्षांबद्दल दुमत होऊ शकते. परंतु त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे मात्र दखल घ्यायला लावतात.

गडावरची ठळकपणे दिसणारी काही बांधकामे, त्यांचे प्रयोजन आणि आजची त्यांची ओळख या बाबतीतही चांदोरकरांची मते धक्का देणारी आहेत. आजवर ‘राणीवसा’ म्हणून ओळखले जाणारे बालेकिल्ल्यातील सहा वाडे हे त्यांच्या मते, राहते वाडे नसून कार्यालयीन कचेऱ्या आहेत. भलीमोठी बाजारपेठदेखील अशी कचेऱ्यांचीच जागा आहे, ‘खलबतखाना’ नावाची वास्तू ही रत्नशाळा आहे, नगारखान्याची इमारत ही शिवपूर्वकालीन आहे, आज दिसणाऱ्या दरबाराची जागा ही प्रत्यक्षात शिवकाळात नव्हती. गडावरचा हत्ती तलाव ही पाणी साठवण्याची योजना नसून ती रायगडावरची तत्कालीन वेधशाळा आहे.. ही आणि अशी अनेक निरीक्षणे-निष्कर्ष चांदोरकर यांनी नोंदवलेली आहेत. या प्रत्येकावर पुस्तकात एकेक प्रकरण आहे.

रायगडाचा, त्यावरील प्रत्येक वास्तूचा चांदोरकरांनी केलेला सखोल अभ्यास आणि त्यातून पुढे आलेली माहिती चक्रावून टाकणारी आहे. वानगीदाखल काही निरीक्षणे पाहू या : (१) रायगडावरील अनेक वास्तूंच्या आतील भिंती या पाया न खोदताच केवळ भारावर उभ्या केल्या होत्या. त्यामुळे जोराचा हादरा बसल्यावर यातील बहुतांश इमारती ढासळल्या. (२) रायगडावर बालेकिल्ला वगळता अन्यत्र बांधलेली सर्व घरे ही एकाच रचनेतील आहेत. त्यांच्या उभारणीत एक समान नगरनियोजन आहे. (३) रायगडाचा पृष्ठभाग हा छोटय़ा छोटय़ा टेकडय़ांचा असल्याने इथल्या प्रत्येक इमारतीच्या भिंतींची आतील-बाहेरील उंची निराळी आहे. (४) बालेकिल्ल्याच्या परिसरात सर्वत्र भूमीअंतर्गत जलवाहिनीने पाणीपुरवठा केला जात होता. बालेकिल्ल्यातील विविध इमारतींमधून निघणारे सांडपाणी पुन्हा एका नाल्याद्वारे वाहून जाण्याची व्यवस्था करत त्यावर इथे एक खासबाग फुलवलेली होती. (५) बोरूसारख्या साधनासाठी गडावर विशिष्ट जातीच्या वेताची लागवड केलेली होती. (६) गडावरचा एक मोठा भाग लष्करी छावणीचा असून तिथेच छत्रपतींच्या सेनापतींचा वाडा, सैन्याच्या बराकी, दारूगोळय़ांची कोठारे अशी रचना केलेली होती.

पुस्तकातील अशी अनेक निरीक्षणे गडाविषयी नवे आकर्षण निर्माण करतात. खरे तर यातील अनेक गुणवैशिष्टय़े ही शिवकाळातीलच आहेत. ती प्रथमच आपल्यापुढे आल्याने शिवरायांची दुर्ग स्थापत्यकलेतील उंचीसुद्धा नव्याने वाढली आहे.

इथल्या बांधकामांबद्दल सांगताना चांदोरकर यांनी बांधकामासाठी वापरलेले साहित्य, प्रत्यक्ष बांधकाम, त्याची रचना, बदल, वैशिष्टय़े अशा अनेक गोष्टींचे तपशील पुरवले आहेत. त्यातही बांधकामासाठी वापरलेले दगड, लाकूड, चुना, तळखडे, पाया, भिंती, गिलावा, ओटा, पायऱ्या, जिने, खिडक्या, कमानी, दरवाजे, छत, त्याची शाकारणी, कौलांचे प्रकार, गवताचा वापर, स्वयंपाकघराची-चुलीची रचना, पाण्याची व सांडपाण्याची व्यवस्था, शौचकूप.. अशा अनेक छोटय़ा-छोटय़ा गोष्टींची इथे दखल घेतलेली आहे. तब्बल पाच दशकांतील चांदोरकरांच्या सूक्ष्म, प्रदीर्घ निरीक्षणांचा हा परिपाठ आहे. त्यांनी घडवलेले हे रायगड दर्शन खूपच निराळे आहे.

हे सारे तपशील छायाचित्रे, माहिती, नकाशे, रेखांकने (आर्किटेक्चरल ड्रॉइंग्ज), तलविन्यास (प्लॅन) अशा शास्त्रीय पद्धतीने मांडले आहेत. इथे इतिहासाची वर्णने नाहीत, सनावळय़ांची जंत्री नाही, प्रसंगांचे दाखले नाहीत, की उगाचच भावनांचे उमाळेही नाहीत. जे आहे ते केवळ समोर दिसणाऱ्या वास्तू आणि तिच्या वास्तवावरची तार्किक चर्चा!

रायगडावर आजवर अनेक लेखकांनी सविस्तरपणे लेखन केलेले आहे. पण त्या लेखनात नगररचनेच्या अंगाने घेतलेला शोध कुठेही वाचण्यास मिळत नाही. ही अशी स्थापत्यविषयक माहिती आणि दृष्टी त्यात दिसत नाही. इथे साधे गडाचे मार्ग, तटबंदीबद्दल लिहितानाही चांदोरकर शिवपूर्वकाळ आणि शिवकाळ असे दोन भाग करतात. गडाचा प्राचीन खोदीव मार्ग याच पुस्तकातून प्रथम चर्चेला आला आहे. हिरकणी बुरुजाच्या खालून गडावर येणारी ही प्राचीन वाट चांदोरकरांनी प्रकाशात आणली आहे. गडाच्या तटबंदीच्या बांधकामातही काळाचा फरक आहे. तो सांगतानाही चांदोरकर स्थापत्यशास्त्राची दृष्टी वापरतात. ज्या तटाच्या उभारणीत छिन्नी-हातोडा आणि सुरुंग यांचा वापर केलाय ते बांधकाम नि:संशय प्राचीन. तोफा-बंदुकांचा वापर प्राचीन काळी नसल्याने या तटाच्या उभारणीत या आयुधांसाठी खिडक्या ठेवण्याचे काही कारणच नव्हते. त्यामुळे हा असा विनाखिडकी-जंग्यांचा तटही रायगडावर कुठे कुठे दिसतो. तो त्या प्राचीन रायगडाचाच सांगावा आहे. दुर्गाचे महत्त्व, त्यांची रचना, संरक्षण सिद्धता या साऱ्यांचे भान असलेल्या अभ्यासकाने याचे दुर्गस्थापत्यावर वेळोवेळी झालेले परिणामही यात मांडले आहेत.

चांदोरकरांचा हा सारा अभ्यास प्रत्यक्ष स्थळभेटीनंतरचा आहे. या एका गडाला त्यांनी दोनशेहून अधिक वेळा भेट दिली आहे. एकेका भेटीत आठ-आठ दिवस राहून त्यांनी या गडाचा शोध घेतला आहे. आपल्याकडील बहुतांश स्थळ-वास्तूंसंदर्भातील पुस्तकांत माहिती आणि छायाचित्रांचाच वापर मुख्यत्वे दिसतो. पण इथे चांदोरकरांनी रायगडावरील प्रत्येक वास्तू ही मोजून काढली आहे. त्याचे उभे-आडवे छेद घेत रेखांकने तयार केली आहेत. आवश्यक तिथे नकाशांची जोड दिली आहे.

हा सारा अभ्यास अतिशय डोळस वृत्ती आणि शास्त्रीय धाटणीचा आहे. यामुळे अनेकवार रायगड पाहिलेल्यांनाही हे गडदर्शन थक्क करणारे आहे. अभ्यास व निरीक्षणांवरून चांदोरकरांनी काढलेले निष्कर्ष जरी सर्वमान्य होऊ शकले नाही, तरी त्यासाठीची त्यांची संशोधन पूर्वपीठिका खूप मोलाची आणि प्रामाणिक आहे. कदाचित यामुळेच डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्त्याने प्रस्तावना लिहून या पुस्तकाचा पुरस्कार केला असावा. या पुस्तकाने एक प्रकारे रायगडाचे नव्याने उत्खनन केले आहे व गडकोटविषयक संशोधनासाठी एक नवी दृष्टी बहाल केली आहे.

‘श्रीमद् रायगिरौ’- गोपाळ चांदोरकर,

बुकमार्क पब्लिकेशन,

पृष्ठे- १२०, मूल्य- ३२५ रुपये.

abhijit.belhekar@expressindia.com