20 February 2019

News Flash

सीताराम मामा

त्या वर्कशॉपच्याच दरम्यान आम्ही हृषिकेश जोशीचं ‘लिट्ल प्रिन्स’ हे नाटक केलं होतं.

एक माणूस आणि कलाकार म्हणून आजवर निरनिराळ्या वाटांवर चालताना भेटलेली कितीएक माणसं.. बरी-वाईट, साधी, अनवट, विक्षिप्त, बुद्धिमान, कलासक्त, ध्येयवेडी, सर्जनशील वगैरे वगैरे.. अशांची शब्दचित्रं चितारणारं सदर..

त्याला पाहिलं की भल्याथोरल्या पारंब्यांचा वड डोळ्यासमोर येतो. जुना, पण खमका. माहीमच्या मियां मोहम्मद छोटानी मार्गावरच्या म्युनिसिपाल्टी शाळेत रंगकर्मीसाठी ‘आविष्कार’ नावाची एक वेगळी शाळा भरत असे. अगदी आता-आतापर्यंत भरत असे. त्या शाळेत पाऊल टाकलं की ऑफिसच्या बाहेर खुर्चीत दाढी कुरवाळत बसलेला सीताराम मामा भेटे. सीताराम कुंभार हा अभिनेता नाही. दिग्दर्शक नाही. लेखक नाही. त्याला नाटकातले ‘इझम्स्’ ठाऊक नसतील, किंवा परदेशी नाटय़चळवळींचा इतिहास मुखोद्गत नसेल; पण डोक्यावरच्या पांढऱ्या टोपीच्या टोकापासून पायघोळ लेंग्याखालच्या वहाणेपर्यंत सीताराम मामा नखशिखांत रंगकर्मी आहे. अनेक वर्षांपूर्वी एका अंकासाठी मी मामाचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्या मुलाखतीला नाव दिलं होतं.. ‘अंधारातला सुपरस्टार’! त्यानंतर आजूूबाजूचं जग अविश्वसनीय वेगानं बदलत गेलं, बदलतं आहे; पण सीताराम मामा तसाच आहे. ठाण मांडून उभ्या असलेल्या वडासारखा.. ‘अंधारातला सुपरस्टार’!

मी डिग्री कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला असताना माझा पहिल्यांदा ‘आविष्कार’शी संबंध आला. विनय पेशवे यांनी ‘आविष्कार’मध्ये एक वर्षांचं अ‍ॅक्टिंग वर्कशॉप घेतलं होतं. मी त्या वर्कशॉपमध्ये विद्यार्थी होतो. त्या कार्यशाळेच्या निमित्तानं ‘आविष्कार’च्या शाळेत येणं- जाणं सुरू झालं आणि तिथे सीताराम मामा भेटला. खरं तर सीताराम मामाला मी अरे-तुरे करणं जरा उद्धटपणाचंच आहे. तो जवळजवळ माझ्या आजोबांच्या वयाचा आहे. पण तो पहिला भेटला तोच मित्रासारखा; त्यामुळे तो ‘अहो’ मामा न होता ‘ए’ मामाच झाला. आजही भेटल्यावर बरगडय़ा मोडणारी मिठी तो मारतो. त्या मिठीवरून आणि पाठीवरच्या थापेवरून या माणसानं आयुष्यभर अंगमेहनतीची चिक्कार कामं केलीयत याचा सहज अंदाज येतो. मामा गावाहून मुंबईला आला तेव्हा आधी भाजीचा स्टॉल लावत असे. आणि नंतर अरविंद देशपांडेंचं बोट धरून तो ‘रंगायन’मार्गे ‘आविष्कार’मध्ये आला होता. मामा करतो काय? तर मामा बॅकस्टेज करतो. सेट लावणे, काढणे, प्रॉपटर्य़ा बनवणे. चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ आज तो हे काम करतो आहे. आणि तेही एका प्रायोगिक नाटय़संस्थेत. मामानं विजयाबाई, अरविंद देशपांडे, दुबेजींपासून चेतन दातार ते अगदी आजच्या माझ्या वयाच्या दिग्दर्शकांना नाटकं करताना पाहिलंय. अनेक नट-नटय़ा पाहिल्यात. त्यांना घडताना, बिघडताना पाहिलंय. नाटय़जंगलात तुम्ही कधी फेरफटका मारलात तर तुम्हाला अशी जुनी-जाणती खोडं अनेक कट्टय़ांवर भेटतात. मग हे लोक फावल्या वेळात (आणि बऱ्याचदा कामाच्या वेळातही) जुने किस्से-कहाण्यांमध्ये खूप रमतात. ‘अरे, आम्ही सत्त्याहत्तर साली ते हे नाटक केलं होतं..’ इथून सुरुवात होते. मग तेव्हाचे सगळेच कसे ग्रेट, आणि आताच्या लोकांना कशी कस्पटाइतकीही अक्कल नाही; अशी नेहमीचीच स्टेशनं घेत हा गप्पांचा सुरस प्रवास सुरू राहतो. बऱ्याच कहाण्या अनेकदा ऐकलेल्या असूनही मंडळी पुन:प्रत्ययाचा आनंद घेत राहतात. बरेच किस्से आपण ‘क्ष’च्या नावानं ऐकलेले असतात आणि इथे तोच किस्सा कास्टिंग बदलून आपल्याला ‘अ’च्या नावानं ऐकायला मिळतो. हे सगळं नेहमीचं, चिरपरिचित आहे. सीताराम मामा अनेक वर्षांचा ‘चष्मदीद गवाह’ आहे. पण मी त्याला या गप्पांमध्ये रमताना कधी पाहिलं नाही. अगदीच आपण हॅन्डल मारलं तर एखादा अनुभव सांगणार. पण भेटला की एक नेहमीचा ठरलेला प्रश्न- ‘काय नवीन?’ मग आपण आपल्या व्यस्ततेचं टाइमटेबल सांगायला लागलो की पाठीत तोच भक्कम गुद्दा.. आणि मग कातर स्वरात ‘आविष्कार’ला ये ना. कर ना परत काहीतरी..’ हा हुकूम!  लोकांनी येत राहावं, सतत काहीतरी नवं करत राहावं याचीच त्याला ओढ. हा साथीचा रोग त्याला बहुधा ‘आविष्कार’चे वन मॅन आर्मी काकडेकाका (माजी नाटय़संमेलनाध्यक्ष अरुण काकडे!) यांच्याकडून लागला असावा. सीताराम मामा आणि काकडेकाकांना पाहिलं की मला धर्मवीर भारतींच्या ‘अंधा युग’मधले दोन प्रहरी (पहारेकरी) आठवतात. महाभारताचं युद्धही त्यांनी पाहून संपवलं आणि आता आपल्याच विचारमंथनात अडकलेले. तरीही नव्याची आशेनं वाट पाहणारे ते दोन प्रहरी!

त्या वर्कशॉपच्याच दरम्यान आम्ही हृषिकेश जोशीचं ‘लिट्ल प्रिन्स’ हे नाटक केलं होतं. मी अगदीच बच्चा होतो. सतरा-अठरा वर्षांचा. त्या नाटकात माझी भूमिका छोटी होती, पण बॅकस्टेजचं काम खूप होतं. नाटकाचा संपूर्ण सेट हृषिकेशच्या पत्नीनं- वैशालीनं डिझाइन केला होता. आणि तो संपूर्ण सेट कलाकारांनीच जास्त वेळ थांबून आपल्या हातानं बनवला, रंगवला होता. मजेदार प्रक्रिया होती सगळी. सरतेशेवटी जेव्हा सेट तयार झाला तेव्हा तो संपूर्ण सेट तीन अजस्त्र खोक्यांमध्ये पॅक व्हायचा. आणि हृषिकेशनं ती खोकी वाहण्याची जबाबदारी माझ्यावर आणि आणखी एका कलाकारावर टाकली. कर्नाटक संघाला रंगीत तालीम. तिथे अक्षरश: जिन्यातून एक-एक पायरी सर करत सेट चढवावा लागतो. आपल्याही उंचीपेक्षा मोठी ती तीन खोकी दोन मजले चढवून वर न्यायची होती. मी आणि माझा मित्र पुंडलिक यानं लॉरेल-हार्डीसारखी कसरत करत ते ओझं वाहिलं. जरा चूक होऊन एखादा खोका सटकला असता तर नाटकाचा सेटच धोक्यात येणार होता. त्यामुळे ती तीन खोकी चढवण्यात आमचा जवळजवळ दीड तास गेला. ही सगळी कसरत करून झाल्यावर मी तसाच एका पायरीवर दमून बसलो. प्रत्येक नाटकाच्या तालमीत समस्त नटांच्या आयुष्यात असा एक क्षण येतोच, जेव्हा ‘आपण हा अट्टहास नेमका कशासाठी करतोय?’ असा प्रश्न त्यांना पडतोच. माझ्यासाठी तो ‘तो’ क्षण होता. मी तसाच बसलेला असताना सीताराम मामा माझ्या बाजूला येऊन बसला. पाठीवर तीच पलंगतोड थाप पडली. पोवाडा गाताना ‘जी जी रं जी’ करून झील देणारे जो सूर लावतात, ती मामाची नॉर्मल बोलायची पट्टी आहे. ‘जमलं की तुला!’ मी त्याच्याकडे वळलो. ‘अ‍ॅक्टर बनायला आलोय मी मामा. हे काय करतोय?’ काही सेकंदांचा पॉज गेला. मामा उठता उठता म्हणाला, ‘अशी ओझी वाहायला जमली तर फक्त अ‍ॅक्टर होऊन थांबणार नाहीस.’ दुसऱ्या क्षणाला मामा अदृश्य झाला होता. मामा फार मोठा फिलॉसॉफर आहे असं नाही; पण त्या क्षणी तो मला गीता सांगणाऱ्या कृष्णासारखा वाटला. आणि आज त्याची बत्तिशी खरी ठरलीय!

मामाच्या दाढीचे जवळजवळ सगळे केस आता पिकलेत. पण अजूनही तो आतून तितकाच दणकट आहे. अडगळीच्या खोलीसारख्या वाटणाऱ्या ‘आविष्कार’च्या ऑफिसमध्ये मामाला त्या पत्र्याच्या खुर्चीवर बसलेलं पाहिलं की वाटतं, झपाटय़ानं बदलणाऱ्या जगात काही गोष्टी अजिबात बदलत नाहीत, हे किती चांगलं आहे! वेगानं उडय़ा मारणाऱ्या माकडांना कधीतरी आधार घ्यायला भक्कम फांद्या लागतातच की!

चिन्मय मांडलेकर aquarian2279@gmail.com

First Published on January 1, 2016 1:15 am

Web Title: sitaram kumbhar of aawishkar theatres