News Flash

कोणी तरी आहे तिथं!

या लेखाची सुरुवात ९ नोव्हेंबर २०१६ या दिवशी होते. अमेरिकी निवडणूक निकालांचा दुसरा दिवस.

माहितीच्या महाजालाने करकचून आवळलेले आपण.. समाजमाध्यमांत सातत्याने प्रकट होणारे आपण.. आपल्या कुठल्याशा कोपऱ्यात बसून आपण हे सारे करीत असलो, तरी आपल्यावर सतत कुणी तरी लक्ष ठेवून आहे. कोण आहेत ते? आणि महत्त्वाचे म्हणजे कसे आणि कशासाठी केले जाते हे?.. समाजमाध्यमशरण समाजात सतत वावरणाऱ्या आपणास याची किमान माहिती हवीच..

ही दीडेक वर्षांपूर्वीची गोष्ट. टाटा मूलभूत संशोधन संस्थेतला एक शास्त्रज्ञ मित्र म्हणाला होता, ‘‘हे फेसबुक वगैरे प्रकरण मी बंद करून टाकलंय.’’ आश्चर्य वाटलं होतं त्या वेळी. त्याला कारणही विचारलं होतं. त्यानं दोन कारणं सांगितली होती तेव्हा.

एक म्हणजे, त्यानं सहा बिंदूंचा सिद्धांत मांडला. म्हणजे जगातली कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीशी फक्त सहा बिंदूंनी जोडली जाऊ शकते. हे सहा बिंदू व्यक्ती, संस्था वगैरे काहीही असू शकतात. त्याचं म्हणणं होतं, फेसबुक वगैरे माध्यमातनं आपण उगाचच एक बिंदू सहज पुरवतो. हे काहींसाठी फायद्याचं असलं तरी त्याचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापरही होऊ शकतो, हे त्यानं त्या वेळी सोदाहरण सिद्ध करून दाखवलं होतं. दुसरा मुद्दा जास्त महत्त्वाचा. तो आपल्या वर्तनाशी जोडला गेलेला आहे. या समाजमाध्यमांत आपण कसे वागतो, त्यातलाच शब्द वापरायचा तर कशाला ‘लाइक’ करतो, कशावर कशी प्रतिक्रिया नोंदवतो याचं पूर्णपणे विश्लेषण होत असतं. आणि व्यावसायिक, राजकीय कारणांसाठी या विश्लेषणाचा उपयोग करता येऊ शकतो; किंबहुना तो केला जातोय, हे तो आग्रहानं समजावून सांगत होता.

त्या वेळी तो जरा अतिच करतोय असं वाटलं होतं. पण गेल्या आठवडय़ात न्यूयॉर्कमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या नितीन जोशी या दुसऱ्या एका स्नेह्यनं मायकेल कोसिन्स्की या विख्यात मनोविश्लेषकाच्या संशोधनावर आधारित एक लेख पाठवला आणि ‘टीआयएफआर’ मधल्या या मित्राची आठवण झाली. ‘द डेटा दॅट टन्र्ड द वर्ल्ड अपसाइड डाउन’ असं या लेखाचं नाव. जगात उलथापालथ घडवणारा हा सर्व तपशील  समाजमाध्यमांतला आहे. या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता हा विषय समजावून घ्यायलाच हवा.

या लेखाची सुरुवात ९ नोव्हेंबर २०१६ या दिवशी होते. अमेरिकी निवडणूक निकालांचा दुसरा दिवस. मायकेल कोसिन्स्की झुरिकमधल्या एका हॉटेलमध्ये होता. सकाळी त्याला तिथल्या एका विद्यापीठात भाषण द्यायचं होतं. निघायच्या आधी सहज म्हणून त्यानं टीव्ही लावला अन् तो उडाला. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकांच्या निकालाची बातमी होती. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत विजयी झाले होते. सगळे राजकीय विश्लेषक, सांख्यिकी तज्ज्ञ आदींच्या नाकावर टिच्चून ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांना चीत केलं होतं. मायकेल थक्क होणं अनुभवत असताना, त्याच वेळी लंडनमधल्या तोपर्यंत अज्ञात अशा कंपनीनं एक प्रसिद्धीपत्र प्रसृत केलं. ‘‘माहिती आधारित शास्त्रीय पद्धतीनं विश्लेषण करण्याच्या आमच्या तंत्राचा वापर ट्रम्प यांनी प्रचारात केला, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. या विजयानं आम्ही आनंदलो आहोत.’’ असं हे पत्रक.

अलेक्झांडर जेम्ह अ‍ॅशबर्नर निक्स याची त्यावर स्वाक्षरी होती. हा त्या कंपनीचा प्रमुख. कंपनीचं नाव केंब्रिज अ‍ॅनालिटिका. हे सगळं झुरिकमध्ये मायकेल याला माहीत होतं. कारण या कंपनीचा प्रवर्तक अलेक्झांडर हा त्याचाच चेला होता. ही कंपनी स्थापन करण्यात त्याचाच वाटा होता, परत ब्रेग्झिटचा निकाल जसा लागला तसा तो लागावा यासाठी प्रयत्न करणाऱ्यांत हीच कंपनी होती. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे, माहिती विश्लेषण करण्याची ही नवी पद्धती मुदलात मायकेल कोसिन्स्की यानंच विकसित केली होती, केंब्रिजमध्ये असताना.

त्याच्या मुळाशी आहे २०१४ सालचा एक प्रसंग. स्थळ कोसिन्स्की याचं सायकोमेट्रिक्स सेंटर, केंब्रिज विद्यापीठ. या केंद्रात व्यक्तिमत्त्व म्हणजे काय, त्याचं मूल्यमापन कसं करावं यावर संशोधन सुरू होतं. त्याचा आधार होता ८०च्या दशकातला एक अभ्यास. त्या वर्षी दोन मनोव्यापारतज्ज्ञांनी एक प्रारूप तयार केलं. त्यात फक्त पाच निकषांच्या आधारे एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा तंतोतंत अंदाज कसा बांधता येईल याची मांडणी होती. मनाचा मोकळेपणा, सदसद्विवेकाची जाणीव, ती व्यक्ती अंतर्मुख आहे की बहिर्मुख, वृत्ती आणि मनाची ताकद, म्हणजे किती हिरमोडजन्य आहे- हे ते पाच निकष. या पाचांचा अभ्यास केला तर कोणत्याही व्यक्तीचं जवळपास अचूक म्हणता येईल असं चित्रं अभ्यासक तयार करू शकतात आणि त्यातून त्या व्यक्तीच्या गरजा, काळजी याचाही अंदाज येऊ शकतो. तसंच कोणत्या प्रसंगात ती व्यक्ती कशी वागेल याचंही भाकीत वर्तवता येऊ शकतं.

परंतु ही सर्व माहिती मिळवणं हे अत्यंत जिकिरीचं होतं. १९८० म्हणजे हा इंटरनेटच्या जन्माआधीचा काळ. त्या वेळी ही माहिती मिळवायची म्हणजे प्रत्येकाकडनं एक अर्ज भरून घ्यावा लागायचा. तो लिहा, त्यातल्या रकान्यांचं विकेंद्रीकरण करा, मग माहितीचं पृथक्करण असा मोठा व्याप होता. ते काही तितकं सहज नव्हतं. हे प्रारूप जेव्हा जन्माला आलं तेव्हा मायकेल पोलंडमधल्या वॉर्सात विद्यार्थी होता. पुढे उच्च शिक्षणासाठी तो केंब्रिजला आला. एव्हाना इंटरनेट जन्माला आलेलं. केंब्रिजमध्ये मायकेलचा सहाध्यायी होता डेव्हिड स्टिलवेल. त्यानं फेसबुकसाठी एक अ‍ॅप्लिकेशन तयार केलं. ‘माय पर्सनॅलिटी’ हे त्या अ‍ॅपचं नाव. त्यावर वर उल्लेखिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरं द्यायची सोय होती. वर स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचं एखादं वैशिष्टय़ असेल तर तेही नोंदवता येत होतं. म्हणजे मी फारच रागीट आहे किंवा मी लवकर निराश होतो.. वगैरे.

त्या माहितीचा वापर करून या अ‍ॅपवर प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्त्वाचं शब्दचित्र करून दिलं जाणार होतं. आणि ते दिलं गेल्यावर त्यांना सांगितलं जात होतं- हे योग्य, बरोबर किंवा वास्तवाच्या जवळ जाणारं आहे असं वाटलं तर तुम्ही तुमचं फेसबुक प्रोफाइलदेखील आम्हाला पाठवू शकता. मायकेल आणि डेव्हिड यांना वाटलं, विद्यापीठातले काही मोजके विद्यार्थी भरतील हा अर्ज. पण प्रत्यक्षात घडलं भलतंच. शेकडो, हजारो आणि नंतर लाखो जणांनी ‘माय पर्सनॅलिटी’ अ‍ॅपवर स्वत:विषयीचा तपशील भरत मन मोकळं केलं होतं. आणि त्याबरोबर आपापली फेसबुक प्रोफाइल्ससुद्धा या अर्ज भरणाऱ्यांनी पाठवून दिली.

पुढची काही र्वष मायकेल आणि डेव्हिड यांनी या प्रचंड माहितीसाठय़ाचं विश्लेषण करण्यात घालवली. या अर्ज पाठवणाऱ्यांनी जी माहिती दिली होती, त्याच्या बरोबरीनं त्यांच्या फेसबुक सफरींचा संपूर्ण तपशीलही त्यांनी या विश्लेषणात गोळा केला. ही माणसं कोणत्या गोष्टीला ‘लाइक’ म्हणतायत, कोणती पोस्ट पुढे पाठवतायत, स्वत:च्या फेसबुक पेजवर काय लिहितायत, त्याचं वय, लिंग, धर्म, प्रदेश असा सगळा सगळा तपशील या दोघांनी अभ्यासासाठी घेतला. त्यातनं त्यांचे निघालेले निष्कर्ष धक्कादायक म्हणता येतील असे आहेत.

उदाहरणार्थ, त्यांनी दाखवून दिलं की मॅक नावाच्या सौंदर्यप्रसाधनांना ‘लाइक’ करणारे पुरुष हे बव्हंश: समलिंगी असतात. लेडी गागा ही आवडणाऱ्या व्यक्ती या बहिर्मुख असतात किंवा वु टँग हा अमेरिकी हिपहॉप ग्रुप जे फॉलो करतात ते सगळेच्या सगळे लैंगिक मुद्दय़ांवर स्त्री-पुरुष संबंधांवर विश्वास ठेवणारे असतात.. असे बरेच मुद्दे त्यांनी दाखवून दिले. २०१२ पर्यंत मायकेल यानं या प्रतिरूपाचा असा आणि इतका काही अभ्यास केला की त्यानं आणखी एक गोष्ट सिद्ध केली. एखाद्या व्यक्तीच्या फेसबुकवरच्या फक्त ६८ लाइक्सवरनं ती व्यक्ती गोरी की काळी, स्त्री की पुरुष, धूम्रपान करणारी/ न करणारी, मद्यपान करणारी/ न करणारी आणि मुख्य म्हणजे त्यांची राजकीय आवडनिवड.. हे सगळं सगळं निश्चित करता येऊ शकतं. यातली अचूकता ९५ टक्के इतकी निघाली. म्हणजे अशा पद्धतीनं काढलेल्या शंभर निष्कर्षांतले फक्त पाचच अंदाज त्याचे तितकेसे बरोबर आले नाहीत. बाकी सगळे तंतोतंत तसे निघाले. पुढे पुढे या लाइक्सची संख्या आणखी कमी झाली. साधारण १० लाइक्सवरनंच त्याला हे सगळे अंदाज बांधता यायला लागले. यातला भयानक धक्कादायक भाग म्हणजे एखाद्याच्या ७० लाइक्सचा अभ्यास केला तर ती व्यक्ती तिच्या जवळच्या स्नेह्यलाही कळली नसेल इतकी कळते, १५० लाइक्सचा अभ्यास केला की त्या व्यक्तीच्या आई-वडिलांनाही कळलं नसेल इतकं काही कळून येतं. आणि ३०० लाइक्सचं विश्लेषण केलं तर त्या व्यक्तीच्या जोडीदाराला कळलं नसेल इतकं काही समजून येतं.

हा आपल्या पाहणीतला निष्कर्ष त्यांनी प्रसिद्ध केला. त्यानंतर त्यांना दोन फोन आले. एकानं त्यांना खटल्याची धमकी दिली आणि दुसऱ्या फोननं त्यांना नोकरी देऊ केली. गंमत म्हणजे दोन्ही फोनचा उगम एकच होता.

फेसबुक.

म्हणजे फेसबुकनंच त्यांना धमकी दिली आणि बधत नाहीयेत म्हटल्यावर प्रचंड आकाराच्या पगाराची नोकरीही दिली. यामागचं कारण शोधणं अवघड नाही. फेसबुकनं आणखी एक गोष्ट केली. मायकेलच्या संशोधनानंतर लाइक्स हा कक्ष फेसबुकनं खासगी केला. इतके दिवस फेसबुकवरच्या कोणालाही कोणाच्याही पेजवर लाइक्स वगैरे सहज बघता यायच्या. मायकेलच्या या उद्योगानं फेसबुकनं ते खासगी करून टाकलं. हेतू हा की- आता पुढे असं आणखी काही कोणी करू नये म्हणून.

पण मायकेल आता फेसबुकच्याही पुढे गेला. त्यानं आपल्या प्रारूपाचा असा काही विकास केला, की एखाद्याच्या फेसबुकवरच्या होमपेजवरनं त्यांचं व्यक्तिमत्त्व ओळखण्याची कला त्यानं विकसित केली. एव्हाना स्मार्टफोन्स आले होते. म्हणजे फेसबुकवर जाण्यासाठी संगणकासमोर बसायची गरज राहिली नाही. मायकेलनं मग या स्मार्टफोन वापरण्याच्या सवयींचंही विश्लेषण करायचं तंत्र विकसित केलं. स्मार्टफोनधारी व्यक्ती एकाच जागी किती वेळ बसते, दिवसाच्या कोणत्या प्रहरात जलद चालते, प्रवास किती करते, फोनमध्ये नंबर नसलेल्यांशी किती संपर्क साधते वगैरे.

या तंत्रातनं निघालेल्या माहितीचा उपयोग काय?

२०१४ च्या मध्यास मायकेलला भेटायला अलेक्झांडर कोगान नावाची व्यक्ती आली. आपण एका कंपनीच्या वतीनं आलोय असं त्यांनी सांगितलं. त्यांना कंपनीच्या वतीनं मायकेलची अनुमती हवी होती. हे तंत्रज्ञान त्या कंपनीला वापरायचं होतं. मायकेलला कळत नव्हतं काय करावं. हा म्हणावं की नाही? नाही म्हटलं तर हातनं चांगलं घबाड जायचा धोका. पण हो म्हणावं तर काय होईल ते माहीत नाही. त्यानं मग या अलेक्झांडरला विचारलं, ‘कंपनीचं नाव काय?’

‘स्ट्रेटेजिक कम्युनिकेशन लॅबोरेटरीज्,’ ते म्हणाले.

मायकेलनं गुगल केलं. या कंपनीचा तपशील मिळाला. निवडणूक प्रचार व्यवस्थापनातली आघाडीची कंपनी. व्यवसाय ध्येय- सेवा घेणाऱ्याच्या वतीनं मतदारांवर प्रभाव टाकणं, त्यांना आपल्याकडे वळवणं.

मायकेलला हे प्रकरण संशयास्पद वाटलं. ‘नंतर सांगतो तुम्हाला काय ते,’ असं म्हणून त्यानं वेळ मारून नेली. मुद्दा तसाच राहिला. २०१५ साली तो पुन्हा उपटला. त्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात ब्रिटननं युरोपीय युनियनमधून बाहेर पडावं या मताचे पुरस्कर्ते असलेल्या निगेल फराज यांनी घोषणा केली- ‘ब्रेग्झिट मोहिमेसाठी आम्ही एका कंपनीला भाडय़ानं घेतलंय. कंपनीचं नाव- केंब्रिज अ‍ॅनालिटिका. व्यवसाय- नावीन्यपूर्ण पोलिटिकल मार्केटिंग. म्हणजे व्यक्तिमत्त्वाधारित प्रचार.’

केंब्रिज, व्यक्तिमत्त्व विश्लेषण म्हणजे त्याच्याशी मायकेलचा संबंध नक्कीच असणार, असं अनेकांना वाटलं. कारण एव्हाना संबंधित क्षेत्रांत मायकेलचा दबदबा तयार झाला होता. त्याच्या कामाचं महत्त्व अनेकांना कळून आलं होतं. पण त्याच वेळी मायकेलला मात्र भीती वाटून गेली, आपल्या कामाचा हा असा राजकीय उपयोग होणार आहे की काय?

लवकरच त्याची भीती खरी ठरली. ब्रेग्झिटच्या बाजूनं जनमत वळवण्यासाठी इंटरनेट, समाजमाध्यमांचा मोठा वापर झालेला होता. केंब्रिज अ‍ॅनालिटिका या कंपनीनं हे कसं करता येतं ते दाखवून दिलं होतं. त्यामुळे ब्रेग्झिट घडलं आणि सगळे जण मायकेल कोसिन्स्की याला म्हणू लागले, ‘‘बघ, तुझ्यामुळे काय झालंय ते.’’ मायकेलला आईन्स्टाईनची आठवण झाली. हिरोशिमा, नागासाकीवर अणुबॉम्ब पडल्यानंतर जग आईन्स्टाईन यांना बोल लावू लागले.. तुमच्यामुळे हे घडलं, असं काही जण त्यांना म्हणाले. मायकेलचं तसंच झालं. तो सांगायचा प्रयत्न करत होता, माझा काही संबंध नाही याच्याशी म्हणून. पण कोणी ऐकायला तयार नव्हतं.

पण मायकेलसाठी खरा धक्का पुढेच होता. १९ सप्टेंबर २०१६ या दिवशी न्यूयॉर्कच्या ग्रँड हयातमधल्या झगझगीत कार्यक्रमात एका व्यक्तीची ओळख करून दिली गेली. अलेक्झांडर निक्स. तो कोण, काय वगैरे कोणालाही काहीही माहीत नव्हतं. त्यामुळे त्याच्या कंपनीचंही नाव सांगितलं गेलं- केंब्रिज अ‍ॅनालिटिका. तीच ती. निगेल फराज यांनी ब्रेग्झिटच्या बाजूनं जनमत वळवण्यासाठी वापरलेली कंपनी. या घटनेच्या आधी काही महिने डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रचारासाठी या कंपनीशी करार केला होता. निक्स याची ट्रम्प यांचा डिजिटल प्रचारप्रमुख अशी ओळख करून दिली गेली.

नंतर काय झालं तो इतिहास आहे. फराज हे जातीनं ट्रम्प यांच्या प्रचारासाठी कसे आले, उभयतांनी एकमेकांवर स्तुतिसुमनांचा वर्षांव कसा केला वगैरे सगळं काही जगानं पाहिलं. पण या जगाला हे माहीत नव्हतं.

ब्रेग्झिट आणि ट्रम्प यांच्या निवडणुकीत जनमत घडवणारं तंत्र एकाच कंपनीकडनं राबवलं गेलं. या कंपनीच्या नावाची निवड जेव्हा २०१६ सालच्या जून महिन्यात ट्रम्प यांनी केली, त्या वेळी अमेरिकेत कोणालाही ही कंपनी काय करते ते माहीत नव्हतं. अनेकांनी.. विशेषत: हिलरी क्लिंटन गटानं.. तुच्छतेची भावना व्यक्त करत या कंपनीकडून काहीही धोका नाही, अशी खूणगाठ बांधून टाकली. कारण आपल्या ऑनलाइन प्रचारावर हिलरी यांचा विश्वास होता. त्या आणि त्यांच्या पक्षानं मतदार याद्या पिंजून पिंजून आपले मतदार शोधले होते. त्यांचा सगळा प्रचार त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी होता.

याउलट ट्रम्प यांचा सगळा प्रचार या नव्या तंत्रानं सुरू होता. केंब्रिज अ‍ॅनालिटिका फेसबुक आदी समाजमाध्यमांच्या विश्लेषणातनं आपल्या गळाला लागतील असेच मतदार शोधून काढत होती. जे कुंपणावरचे आहेत त्यांनाही लक्ष्य कसं करायचं याचे आडाखे बांधले जात होते.

ट्रम्प यांनी सगळं काही त्याबरहुकूम केलं. याआधी २००८ साली आपल्या निवडणुकीत बराक ओबामा यांनी ऑनलाइन प्रचार मोठय़ा प्रमाणावर केला होता. हिलरी क्लिंटन त्याच मार्गानं निघालेल्या होत्या. पण ट्रम्प यांची पद्धत त्यापेक्षा चार पावलं पुढे होती. हिलरी यांच्या वतीनं महिला, पुरुष, पेशा वगैरे अशी मतदारांची विभागणी केली गेली होती. त्यामुळे महिला म्हटलं की त्यांच्याकडनं सगळ्याच महिलांना सरसकट एकच प्रचार संदेश पाठवला जात होता. याउलट ट्रम्प त्याच महिला मतदाराच्या व्यक्तिमत्त्वाची सगळी कुंडली घेऊन प्रचाराचा मार्ग ठरवायचे. हिलरी सगळ्याच अफ्रिकन अमेरिकन्सना एकाच मापात मोजून प्रचार संदेश पाठवायच्या. ट्रम्प यांच्याकडे या अफ्रिकन अमेरिकन्सच्या मानसिकतेचाही पूर्ण तपशील उपलब्ध होता. ट्रम्प त्यावरून प्रचार करत गेले. तो अधिक अचूक, अधिक परिणामकारक होता. हिलरी यांनी प्रचारात लोकसंख्याशास्त्र (डेमोग्राफी) मोठय़ा प्रमाणावर वापरलं. ट्रम्प यांनी या लोकसंख्याशास्त्राला नवीनच एका शास्त्राची जोड दिली. ते शास्त्र म्हणजे मनोमिती (सायकोमेट्रिक्स).

निकाल काय लागला या निवडणुकीचा ते आपण पाहिलंच.

नंतर हे आपण कसं केलं, याचा तपशील याच कंपनीनं जाहीर केला. या कंपनीनं मतदारांची ऑनलाइन प्रोफाइल्स- फेसबुक, ट्विटर वगैरे- मिळेल तिथून मिळवली. क्रेडिट कार्ड तपशील, क्लब मेंबरशिप्स, जमीन खरेदीचा तपशील, मासिकांचे वर्गणीदार, व्यक्तीच्या धर्मनिष्ठा वगैरे वगैरे असा मिळेल तो तपशील जमा केला. त्याचं विश्लेषण केलं आणि त्यातून त्याचं व्यक्तिमत्त्व उभं केलं. निक्स म्हणाले, ‘‘आम्ही विश्लेषण केलेलं नाही अशी अमेरिकेत एकही प्रौढ व्यक्ती नाही. किती व्यक्तींचा डेटा या कंपनीकडे असावा.. २२ कोटी.’’

तेव्हा ट्रम्प यांचं प्रत्येक विधान हे असा डेटा ड्रिव्हन होतं. ट्रम्प आणि हिलरी यांच्या जाहीर चर्चेच्या तिसऱ्या फेरीत ट्रम्प जे काही बोलले त्याच्या किती वेगवेगळ्या जाहिराती केंब्रिज अ‍ॅनालिटिकानं केल्या असाव्यात.. तर १ लाख ७५ हजार इतक्या. त्या सगळ्याच्या सगळ्या फेसबुकादी समाजमाध्यमांतनं पसरवल्या गेल्या. संभाव्य मतदारमनालाच लक्ष्य करून त्या जाहिराती केल्या गेल्यानं त्या योग्य ठिकाणी पोहोचल्या. त्यांचा योग्य तो परिणाम कसा आणि किती झाला तेही आपण पाहिलं.

त्याबदल्यात २०१६ च्या जुलै महिन्यात ट्रम्प यांनी या कंपनीला १ लाख डॉलर्स, ऑगस्ट महिन्यात २.५ लाख डॉलर्स आणि सप्टेंबर महिन्यात ५ लाख डॉलर्स उचलून दिल्याचं आढळलं. निवडणुकीनंतर उघड झालं, या एका देशातल्या एका निवडणुकीनं कंपनीला तब्बल १.५ कोटी डॉलर्स इतकी कमाई झाली. या कंपनीनं प्रचारात ट्रम्प यांच्या प्रचारकांसाठी वेगळं अ‍ॅपदेखील बनवलेलं होतं. हेही नंतर उघड झालं, की ब्रेग्झिटच्या प्रचारात फराज यांनी याच अ‍ॅपचा वापर केला होता. हेही कळलं की या प्रचारात केंब्रिजनं मतदारांची ३२ व्यक्तिमत्त्वांत विभागणी केली होती आणि त्यानुसार फक्त १७ राज्यांवरच लक्ष केंद्रित केलं होतं. यात असंही आढळून आलं की अमेरिकेतच बनलेल्या मोटारी वापरणारे ट्रम्प समर्थक आहेत.

यावरनं लक्षात येईल, ट्रम्प यांच्या प्रचारात अचानक स्वदेशीचा मुद्दा कसा आला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ट्रम्प यांनी मिशिगन आणि विस्कोन्सिन या राज्यांत अधिक प्रचार का केला, त्याचंही उत्तर या कंपनीच्या निष्कर्षांत आहे.

ट्रम्प यांना अर्थातच केंब्रिज अ‍ॅनालिटिकाचं महत्त्व पटलंय. म्हणून तर या कंपनीच्या संचालकातले एक स्टिव्ह बॅनन हे ट्रम्प यांचे धोरण सल्लागार म्हणून नेमले गेलेत. आता अशीही बातमी आहे, की इंग्लंडमध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांनी आगामी निवडणुकीसाठी या कंपनीशी बोलणी सुरू केलीयेत. निक्स हेही सूचित करतोय की स्वित्र्झलड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांतनं त्याला मागणी आहे.

यानंतर पुन्हा एकदा जगात अनेकांनी मायकेल कोसिन्स्की याला या पापाबद्दल दोष दिला. काही माध्यमं म्हणाली, काय करून ठेवलंय या कोसिन्स्की यानं. अशा सगळ्यांना या लेखाद्वारे त्यानं उत्तर दिलंय. तो म्हणतो- ‘‘नाही, माझा दोष नाही. मी काही हा डेटाबॉम्ब तयार केलेला नाही. मी फक्त दाखवून दिलंय तो तिथं आहे ते.’’

परवा अर्थसंकल्पोत्तर भाषण करताना आपले पंतप्रधान बोलून गेले. निश्चलनीकरणाच्या काळात आम्ही प्रचंड डेटा गोळा केलाय, त्याची छाननी सुरू आहे. पाठोपाठ कारवाईही होईल.

तो डेटाबॉम्ब आपणही अनुभवणार आहोत. आपण ऑनलाइन असू किंवा ऑफलाइन. आपल्यावर लक्ष ठेवलं जातंय.. कोणी तरी आहे तिथं!

गिरीश कुबेर girish.kuber@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2017 2:59 am

Web Title: social media facebook dr michal kosinski david stillwell
Next Stories
1 फ्रान्सची पिंक सिटी टय़ुलूस
2 शोध शिवछत्रपतींच्या डच पत्रांचा!
3 पाणीप्रश्नांचा परामर्श
Just Now!
X