News Flash

सत्योत्तरी ‘विप्रलाप’..

आपल्याकडे उत्तरआधुनिक विचारांची प्रारंभिक मुहूर्तमेढ साठ आणि सत्तरच्या दशकांत रोवली गेली.

माध्यमविस्फोटानंतर सत्याशी फारकत घेऊन खोटय़ा माहितीवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढते आहे. आणि अशी खोटी माहिती पसरवून सत्तेत आलेल्या लोकांविरुद्ध जगभर निषेधाचे सूर आळवले जात आहेत. सत्तेविरुद्धचे हे सूर अधिक सशक्त होऊन एक दिवस खोटय़ा लोकांना सत्तेतून खाली खेचून काढतील, हा दुर्दम्य आशावाद काहींना वाटत असला तरी गणिताच्या नियमाने तूर्तास तरी हे शक्य नाही.

गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात अमेरिकेतल्या ‘सायन्स जर्नल’ने प्रसिद्ध केलेल्या एका संशोधनानुसार, समाजमाध्यमांमध्ये खोटी माहिती पसरण्याचा वेग हा खरी माहिती पसरण्याच्या वेगापेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून आले. ‘सर्व प्रकारच्या माहितीच्या क्षेत्रात असत्य हे सत्यापेक्षा जास्त जलद, जास्त सखोल आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचते आहे. दहशतवादासंबंधी वृत्तांकने, नैसर्गिक आपत्ती, विज्ञानविषयक माहिती, दंतकथा आणि अर्थव्यवहारासंबंधीच्या बातम्यांमध्ये खोटय़ा बातम्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून, त्याची परिणती शेवटी निखालस खोटय़ा राजकीय आणि प्रचारकी स्वरूपांच्या बातम्यांमध्ये होत आहे,’ असा निष्कर्ष या संशोधनाचे प्रमुख सिनान अराल यांनी काढला आहे. तंत्रज्ञानाच्या संशोधनात अग्रणी समजल्या जाणाऱ्या ‘एमआयटी’च्या मीडिया लॅबमध्ये केलेल्या या संशोधनात अराल यांच्यासमवेत सोराश वोसॉघी आणि मूळ भारतीय वंशाचे देब रॉय या दोन संशोधकांनी सहभाग घेतला होता. या संशोधनासाठी २००६ ते २०१६ या काळात ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग उपयोजन-स्थळावरच्या तीस लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी केलेल्या एक लाख पंचवीस हजार ट्वीट्सचे परीक्षण करण्यात आले. ट्विटरवर एखादी खोटी बातमी १५०० वापरकर्त्यांपर्यंत पसरण्यासाठी दहा तास लागत असतील, तर खरी बातमी तितक्याच वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी साठ तासांचा अवधी लागतो. थोडक्यात, खोटय़ाचा ट्विटरवरचा वेग हा सत्यापेक्षा सहापट अधिक आहे. ट्विटरवर असे सुरुवातीचे खोटे व्यवस्थित पोहोचल्यानंतर त्याच्या आधारे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यू टय़ूब या इतर समाजमाध्यमांमध्ये खोटे अधिक सविस्तरपणे सांगितले जाते. मूळ ट्विटरवरच्या खोटय़ा माहितीला अगोदरच भुललेले असल्याने फेसबुक आणि यू टय़ूबवर बनविलेली पूरक खोटी माहिती मूळ खोटय़ावरचा वापरकर्त्यांचा विश्वास अधिकच दृढ करते.

मुळात खोटी माहिती लोक इतक्या त्वरेने शेअर का करतात? हा महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो. याचे स्पष्ट उत्तर म्हणजे- या माहितीला दिलेले ‘नॉव्हेल्टी’चे.. नवलाईचे स्वरूप! भारतात इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या खोटय़ा माहितीची भाषाशैली तपासल्यास त्या बऱ्याचशा चटपटीत स्वरूपाच्या आणि नॉव्हेल्टीने म्हणजेच नवलाईने भरलेल्या असतात. नवलाईच्या या आकर्षणाने फक्त नवलपूर्ण तेच लिहिणाऱ्या अनेक संकेतस्थळांना आणि फक्त नवलपूर्ण तेच दाखविणाऱ्या दूरचित्रवाहिन्यांना जन्म दिला आहे. ३० मिनिटांत पिझ्झा घरपोच देण्याची खात्री देणाऱ्या कंपन्यांनी भारतात जसे आपले प्रस्थ बसविले आहे, त्याचप्रमाणे ३० मिनिटांत हवी तशी खोटी माहिती प्रसवून देणाऱ्या ऑनलाइन माध्यमांचा भारतात सुळसुळाट झालेला आहे. या ऑनलाइन माध्यमांना वृत्तपत्रांना लागू पडणारे कुठलेही नियम लागू पडत नाहीत आणि वृत्तांकनाची वा मजकुराच्या संपादनाची कुठलीही जबाबदारी न घेतल्याने, सत्यापासून पूर्णत: फारकत घेऊन ही संकेतस्थळे काय हवे ते लिहू शकतात आणि ट्विटरच्या माध्यमातून वेगाने लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. याला असलेली यू टय़ूब आणि फेसबुकची पूरकता मग अशी असत्य गोष्ट फक्त व्हायरलच करत नाही, तर मुख्य धारेतल्या ज्ञात वास्तवाच्या जागी प्रस्थापितही करते. सत्याच्या ठिकाणी असत्य प्रस्थापित झाल्यानंतर, ‘हे खोटे आहे’ असे सांगणारे काही लोक हिरिरीने पुढे येत असले तरी त्यांच्या म्हणण्याला नवलाईची जोड नसल्याने त्यांचा प्रतिवाद रटाळ वाटू शकतो. कित्येकदा खोटे पूर्णत: उघडे पडूनही त्याच्या अगोदरच्या नवलाईला भुललेल्या माणसाची त्या नवलाईतून बाहेर येण्याची तयारी नसते. कधीकाळी नासाने प्रसिद्ध केलेले तथाकथित दिवाळीचे छायाचित्र इंटरनेटवर नव्याने जोडले जाणारे लोक हिरिरीने शेअर करीत असतात. १४ जानेवारीला भगतसिंगांना फाशी दिले गेले होते, असे सांगत याच दिवशी येणारा व्हॅलेंटाइन डे साजरा न करण्याची माहिती या तारखेला दरवर्षी व्हायरल होतच राहते आणि अनेक वेळा या गोष्टी खऱ्या नसल्याचे सांगूनही त्याचा कुठलाही विशेष प्रभाव सामान्यजनांवर पडत नाही. एकूण सत्याची जगभर जी काही अवस्था आहे त्या परिस्थितीचे आकलन व त्याची कारणे आणि त्याचे भविष्यातील संभाव्य परिणाम, यासंबंधात समाजातल्या बुद्धिवाद्यांमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.

आपल्याकडे उत्तरआधुनिक विचारांची प्रारंभिक मुहूर्तमेढ साठ आणि सत्तरच्या दशकांत रोवली गेली. नवतत्त्वज्ञान, राजकारण, कला आणि साहित्यात उत्तरआधुनिकतेचे निरनिराळे प्रयोग केले गेले. हे प्रयोग तत्कालीन सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात एका मर्यादेतच फिरत राहिले. त्याची म्हणावी अशी समीक्षा अथवा बहुव्यापी आकलन केले गेले नाही. नव्वदच्या दशकात इंटरनेटच्या आगमनानंतर मात्र जागतिकतेचा व्याप आणि आवाका लक्षात आल्यानंतर कधीकाळी अडगळीत पडलेल्या या उत्तरआधुनिक विचारांची आणि तत्त्वांची टिंगल बंद करून त्याची समाजाशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला गेला. नंतरची काही वर्षे आपण आधुनिकतेच्या पुढच्या काळात खरोखरच पोहोचलो आहोत असे मान्य करणाराही एक वर्ग उदयास आला. उत्तरआधुनिकतेच्या परिप्रेक्ष्यात समाज पाहाणे काही काळ शक्य होत असतानाच स्मार्टफोन आणि समाजमाध्यमांचा उदय झाला. या तंत्रज्ञानाने लिखित साहित्याच्या अनेक गोष्टींची मूलभूत परिभाषा बदलून टाकली. यापूर्वी सर्जनाच्या निर्मितीसाठी लागणारा खर्च बराच कमी झाल्याने आणि लिखित साहित्य वाचण्यासाठी मोठा वाचकवर्ग व दृश्यकलेसाठी मोठा प्रेक्षकवर्ग सहजतेने उपलब्ध असल्याने, मोठय़ा प्रमाणावर मजकूर लिहिले गेले आणि व्हिडीओज् बनविले गेले. या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या लेखकांना वा व्हिडीओ निर्मात्यांना मुळात सर्जन म्हणजे काय हेच माहिती नव्हते! इतकेच काय, या शब्दाचा अर्थही त्यांना जाणून घ्यायचा नव्हता. बहुसंख्य लोकांना रुचेल, भावेल, मनोरंजन होईल असा कंटेन्ट मोठय़ा प्रमाणावर प्रसविला गेला. या कंटेन्टचे सामाजिक मूल्यांशी, नीतीशी वा सत्याशी कुठल्याही प्रकारे काही नाते असण्याची गरज नव्हती. नपेक्षा या मूल्यांवरती आधारित कंटेन्ट निर्मितीला लोकाश्रय मिळणे जास्त दुरापास्त असल्याने कामुक, भडक, भावनिक, चटपटीत आणि खपाऊ दर्जाचे संगीत, चित्रपट, चित्रे आणि बातम्यांनी अवघे इंटरनेट व्यापून गेले.

इंटरनेटशी जोडले गेल्यानंतर लोक अधिकाधिक शहाणे होतील ही आशा फोल ठरून नेमके त्याच्या उलटे झाले. सुमार दर्जाच्या मनोरंजनातून आणि मूल्यरहित बातम्यांच्या आकलनातून आपले सत्याशी असलेले मूलभूत नाते कुठे तरी तुटायला लागले. सत्यापासून फारकत घेत बातम्या आणि वृत्तांकने प्रसारित व्हायला लागल्यानंतर त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी या परिस्थितीला ‘सत्याचा अपलाप’ असे संबोधले. या सत्याच्या अपलापाचा फायदा घेत आणि समाजमाध्यमांचा मतदारांचे मत मिळविण्यासाठी प्रभावीपणे वापर करून अनेक देशांत सत्तांतर घडून आले. हे सत्तांतर झाल्यानंतर निवडून आलेल्या नव्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या प्रतिनिधींमार्फत प्रचलित माध्यमांना एक तर सरळसरळ विकत घेऊन टाकले किंवा मग त्यांच्या वस्तुनिष्ठतेवर थेट शंका घ्यायला सुरुवात केली. सत्तेच्या दावणीला बांधले न जाता प्रामाणिक राहिलेल्या माध्यमांनी सरकारच्या विरोधात मांडलेल्या सत्यकथनाकडे जनतेचे लक्ष जाऊ नये वा जनतेचा त्यावर विश्वास बसू नये म्हणून एका यशस्वी तंत्राची निर्मिती केली गेली; जिच्या प्रभावीपणामुळे सत्तेच्या विरोधातला प्रत्येक आवाज एक तर खोटा ठरविला गेला किंवा त्याच्या प्रामाणिकतेवरच शंका घेतली गेली. सत्याचा काहीही प्रभाव न उरलेल्या या परिस्थितीला मग ‘पोस्ट ट्रथ’ म्हणजेच ‘सत्योत्तर’ परिस्थिती म्हटले गेले. समाजशास्त्रज्ञ या सत्योत्तर-सत्यापार परिस्थितीशी जरा कुठे जुळवून घेत होते तोवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकने रशियाला करू दिलेला हस्तक्षेप आणि केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाची प्रकरणे बाहेर आली. जगभर ‘आर्टिफिशल इंटेलिजेन्स’च्या वाढत्या प्रभावाच्या पाश्र्वभूमीवर केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाने केलेला गैरप्रकार हा अतिशय भयंकर होता; पण फेसबुक आमची माहिती गोळा करीत असेल तर आम्हाला त्यावर काहीही आक्षेप नाही, असे म्हणणारे लोक स्वेच्छेने पुढे आल्याने केम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाचे विषयही येत्या दिवसांत विस्मृतीत जाणार आहे.

सत्योत्तर परिस्थितीच्या पुढे काही असू शकते का? याबाबत अभ्यासकांच्या मनात कुतूहल असताना या पुढच्या अवस्थेत समाज सत्य आणि असत्य या दोन्ही गोष्टींशी फारकत घेऊन ‘मेटा नॅरेटिव्ह’च्या युगात प्रवेश करेल असे भाकीत काहींनी वर्तविले आहे. मेटा नॅरेटिव्हमध्ये संपूर्ण वाक्यांचा वापर न करता फक्त कळीचे शब्द वापरले जातात, ज्याला इंग्रजीत ‘हॅशटॅग्ज’ म्हटले जाते. ट्विटर आणि फेसबुकवर हॅशटॅगची प्रणाली अगोदरपासूनच कार्यरत असून, तिचा सर्वात प्रभावी वापर इन्स्टाग्राम या उपयोजन-स्थळामध्ये केला जातो. हॅशटॅगच्या वापराने व्यक्त होताना मजकूर जितका लहान करता येईल तितका लहान करून क्रियापदे न वापरता त्यात फक्त कळीचे शब्द वापरण्याची सवय लोकांच्या अंगवळणी पडली आहे. फेसबुकवर ३५ ते ८० अक्षरांत व्यक्त झाल्यास असे स्टेटस फेसबुक मोठे करून दाखवीत असल्याने या सोयीचा फायदा करून घेण्यासाठी अनेक लोकांनी अतिशय कमी शब्दांत आपल्या भावना व्यक्त करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या मोठय़ा अक्षरांतल्या लहानशा स्टेटसचे वेगवेगळे अर्थ निघत असल्याने फेसबुकवर क्वचित गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. हळूहळू लिहिणाऱ्या आणि वाचणाऱ्या दोघांनाही या बहुविध अर्थाची सवय लागली म्हणजे ‘मेटा नॅरेटिव्ह’ रूढ होईल, ज्याला मराठीतून आपण ‘कळयुग’ म्हणू शकतो. नेमक्या या ‘कळयुग’ शब्दाचा संबंध ‘कलियुगा’शी लावता येईल का? असा काही भारतीय भाषाभिषकांना प्रश्न आहे. उत्तरआधुनिकता, सत्याचा अपलाप, सत्योत्तर, कळयुग या पारिभाषिक व्याख्यांनंतर पुढची व्याख्या काय असू शकेल आणि त्यासाठी कुठला भारतीय शब्द वापरला जाईल? हा प्रश्न आजकाल भारतीय बुद्धिवंतांना वरचेवर सतावत असतो.

‘कळयुगा’च्या स्थित्यंतराची पुढची अवस्था माणसाच्या संवादप्रक्रियेतून जन्माला येईल. कमीत कमी शब्दांत व्यक्त होण्यासाठी लोक हॅशटॅगचा जसा आधार घेत आहेत, तसेच ते इमोजींचाही आधार घेत असतात. अक्षरांऐवजी लोक केवळ चित्रांच्या साहाय्याने बोलू शकतील अशी शक्यता काही भाषेचे अभ्यासक व्यक्त करीत आहेत. मात्र एकास एक पातळीवर असलेली इमोजीची भाषा सध्याच्या अवस्थेत तरी सार्वजनिक होणे शक्य नाही. नजीकच्या भविष्यकाळात ही परिस्थिती बदलू शकते. त्या दिशेने काही लोक संशोधनही करीत आहेत. माणसे अक्षरांऐवजी चित्रभाषेत बोलू लागली तर त्याच्या पुढची अवस्था काय असेल, हा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ शकतो. उत्तर तसे सोपे आहे. जगाच्या इतिहासात ज्या ज्या काळात माणसे लिपी आणि लिखित शब्दांऐवजी चित्रभाषेत बोलत होती तो तो काळ त्या त्या संस्कृतीचा शेवटचा काळ होता. इतिहासात माणूस चित्रभाषेनंतरचे संवादमाध्यम कधीही शोधून काढू शकलेला नाही. सत्यापासून फारकत घेणे, सत्याचा अपलाप होणे आणि एकाच गोष्टीचे नानाविध अर्थ निघणे या भाषिक संक्रमणातून जगातल्या अनेक संस्कृत्या गेलेल्या आहेत. संस्कृती या शब्दाचे अनेकवचन ‘संस्कृत्या’ होऊ शकतो का, हा व्याकरणाच्या नियामकांसमोर असलेला अवघड प्रश्न आहे. पण त्याहूनही बिकट प्रश्न आहे तो ‘विप्रलाप’ या शब्दाचा.

विप्रलाप हा शब्द मूळचा संस्कृत भाषेतला असला तरी तो धार्मिक साहित्यात वा ग्रंथांमध्ये शक्यतो वापरला जात नाही. धार्मिक साहित्याशिवाय जिथे कुठे हा शब्द बोलला जातो त्यातल्या बऱ्याचशा लोकांना तो समजून घेता येत नाही. हा शब्द लिखित भाषेत वापरला जात असल्यास आजूबाजूची सामाजिक परिस्थिती ही प्रचंड विस्कळीत असू शकते. या विस्कळीतपणामुळे हा शब्द लिखित साहित्यात वापरला गेला तरी तो जिथे लिहिला गेला त्याचे दस्तावेज सापडून येतीलच असे नाही. सांस्कृतिकदृष्टय़ा ‘विप्रलाप’ हा सर्वात निषिद्ध शब्द ठरविला जाऊ शकतो. परंतु हा शब्द निषिद्ध नसून त्या शब्दाला जन्म देणारी सामाजिक परिस्थिती निषिद्ध असू शकते. निषिद्ध असण्यापेक्षा ती बुडायच्या मार्गावर असू शकते. या शब्दाचे मूळ संस्कृतात थोडय़ाफार वापरल्या जाणाऱ्या ‘प्रलाप’ या शब्दात असू शकते. ‘प्रलाप’ या शब्दाचा एक सरळ अर्थ ‘बरळणे’ असा आहे. एखादा माणूस तापात असंबद्ध बडबड करीत असला तर त्याला तो प्रलाप करतो आहे असे म्हटले जाते. याशिवाय अति मद्यसेवन करून केलेल्या बडबडीला वा मद्याचा तिटकारा उत्पन्न झाल्यानंतर आलेल्या व्रिडॉवलच्या परिस्थितीत केलेल्या बडबडीलाही प्रलाप म्हटले जाते. मृत्युशय्येवर असताना मेंदूचे कार्य क्षीण होतानाच्या अवस्थेत केलेले शेवटचे संभाषणही प्रलाप असू शकते. जीवनातून मृत्यूकडे वेगात परावर्तीत होताना जैविक प्रक्रियेतून आलेले हालचालींचे संभाषण प्रलाप असू शकते. शाब्दिक अर्थाशिवाय एक व्याख्या म्हणून प्रलापाचा अर्थ आणखी गहन आहे. सत्याचे पूर्ण आकलन झाल्यानंतर येणाऱ्या जाणिवेला जर ‘बोध’ म्हटले, तर असत्याला सत्य समजून त्या धारणेवर आलेल्या जाणिवेलाही प्रलाप म्हणता येईल. खऱ्या-खोटय़ात सर्व प्रयत्न करूनही फरक सांगता येणार नाही, अशी अवस्था प्रलापी असू शकते. ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ तंत्राची परिसीमा प्रलाप असू शकते.

प्रलापाच्या या थकवून टाकणाऱ्या अर्थाचे आणि व्याख्यांचे सार्वजनिक रूप म्हणजे विप्रलाप. विप्रलापाची प्रारंभिक अवस्था ही सत्याच्या सार्वजनिक अपलापापासून सुरू होते. जिथे कुठे सत्याचा सार्वजनिक अपलाप सुरू होतो तिथे सत्य आणि असत्य यांच्या दरम्यान असलेल्या धारणा वा संकल्पना कोसळायला सुरुवात झालेली असते. एकदा संकल्पनांचे फिक्शन कोसळायला लागले आणि त्याची जागा नवीन संकल्पना घेत नसतील तर तिथे सत्याचा अपलाप सुरू होतो. ज्ञात संकल्पना कोसळायच्या काळात सत्तेचे नेहमी हस्तांतरण होते. त्यातून मोठमोठे प्रकल्प उभे राहतात. या प्रकल्पांचे काम वेगाने सुरू होऊन ते पूर्ण झाल्यावर संस्कृतीचे सर्वोच्च टोक गाठले जाईल, हे सत्तेने सांगितलेले असते. सत्याच्या अपलापाची परिस्थिती पुढे सरकून ती बहुविध अर्थाकडे झुकू लागली असल्याने कित्येकांना सत्तेच्या आश्वासनांवर विश्वास बसतो, काहींचा त्याला विरोधही होतो. यानंतर पुढच्या काळात सत्याचे अस्तित्व पूर्णत: हरविले जाऊन सत्योत्तर परिस्थितीची निर्मिती होते. हाती घेतलेले सार्वजनिक प्रकल्प पूर्ण होत चालले असल्याने सत्य-असत्याची रस्सीखेच प्रकल्पांच्या बाह्य़ संरचनेवर प्रभाव टाकू लागते. हेही काही काळ चालते आणि त्यानंतर चित्रभाषेचा वापर करून संस्कृती आपली शेवटची अवस्था ‘डॉक्युमेंट’ करून मग कोसळायला सुरुवात होते. संस्कृती कोसळण्याच्या प्रक्रियेची गती संस्कृतीच्या आत राहून मोजता येत नाही. तिचा मुख्य घटक- नागरिक हा तिच्या कोसळण्याच्या प्रक्रियेबद्दल पूर्णत: अनभिज्ञ असतो. संस्कृती कोसळते म्हणजे तिच्यातले सर्व नागरिक मरतातच असे नाही. इतर प्राण्यांप्रमाणे केवळ एक प्राणी म्हणून नम्रतेने जगू शकणारे आणि जीवनाचे मूलभूत ज्ञान असणारे अनेक लोक संस्कृतीच्या पतनानंतरही जिवंत राहतात.

जगाच्या इतिहासात जिथे कुठे म्हणून महान संस्कृती अस्तित्वास येऊन लयास गेली तिच्या शेवटच्या कालखंडाची अवस्था ही विप्रलापाची असण्याची शक्यता जास्त होती. सतराशे पन्नास नंतर लागलेल्या विभिन्न शोधांमुळे आणि पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतींमुळे जगभरात पहिल्यांदाच एक जागतिक संस्कृती उदयास आली. ही संस्कृती एका प्रचंड गुंतागुंतीच्या समीकरणातून एकसंध जोडली गेलेली आहे. या संस्कृतीच्या आहारात प्रादेशिक विविधता असली तरी त्यात जागतिक घटकांचा हस्तक्षेप वाढत चालला आहे. या संस्कृतीचे तंत्र शोधून काढण्याची एकाधिकारशाही काही देशांकडे आहे, तर त्या तंत्रज्ञानापासून उत्पादन करण्याची एकाधिकारशाही काही दुसऱ्या राष्ट्रांकडे आणि हे तंत्रज्ञान वापरण्याचे शिक्षण देण्याची एकाधिकारशाही तिसऱ्या राष्ट्रांकडे आहे. जगभरात माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झाल्यानंतर जगभरातले प्रादेशिक सांस्कृतिक वैविध्य कमी होऊन त्याची जागा जागतिक सामायिक संस्कृती घेत आहे. थोडक्यात, हा आजपर्यंतच्या राष्ट्रसंस्कृतीचा लसावि असून एक ग्रह, एक भाषा, एक संस्कृती हे तिचे युटोपियन रूप असू शकते. या युटोपियन रूपापासून वास्तव फार दूर असून जागतिकीकरणाच्या काळात पृथ्वीवरचे अर्धे जीवन नष्ट झाले आहे, येत्या वीस वर्षांत या उरलेल्या अध्र्या जीवनातले अर्धे जीवन नष्ट होणार आहे. जैविकता अशी मरणात परावर्तित होत असल्याने या ग्रहावर लाखो वर्षे अविरत चालू असलेले जीवन-मृत्यूचे मूलभूत समीकरण बिघडले असून, हे समीकरण पूर्ववत करण्यासाठी निसर्ग माणसाला संपविण्याच्या निर्णयाजवळ येऊन पोहोचला आहे. पण निसर्गाने माणसाला विलुप्त करण्याआधी माणूस स्वत:च्याच प्रजातीचा घात करून घेण्याची शक्यता जास्त आहे.

पहिली जागतिक संस्कृती ‘विप्रलापा’च्या अवस्थेत असून तिची एका दीर्घ आणि शांत प्रलयाकडे वाटचाल सुरू आहे.

rahulbaba@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2018 5:34 am

Web Title: social media fake information twitter april fool article
Next Stories
1 सामाजिक बदलात उच्चशिक्षण नापासच!
2 देशसेवेच्या ‘सोवळ्या’ प्रयोगाची कहाणी
3 रहस्यमय स्त्रीप्रधान कथा
Just Now!
X