25 April 2019

News Flash

निर्मितीशील शिक्षण

या सगळ्या घटना पाहताना थिटरमध्ये बसलेली व्यक्ती वा घरात बसलेली व्यक्ती नक्की कशाकडे पाहील, माहीत नाही.

(संग्रहित छायाचित्र)

रेणू दांडेकर

लेह-लडाखमधील मुलांच्या शिक्षणाला सर्जनशील वळण लावून त्यातून नवनिर्मितीचे असंख्य कोंब निर्माण करणारे सोनम वांगचुक यांना यंदाचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आणि आमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील फुंसुख वांगडू पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. वांगचुक यांच्या या आगळ्या शैक्षणिक प्रयोगाबद्दल..

..शेवटी आमीर खानला शोधत सगळे लेहला येतात आणि मुलं लहान लहान कामं करताना, इनोव्हेटिव्ह कामं करताना ते पाहतात. ती एक शाळा असते. नि तिथे ‘थ्री इडियटस्’मधला फुंसुख वांगडू सापडतो.

या सगळ्या घटना पाहताना थिटरमध्ये बसलेली व्यक्ती वा घरात बसलेली व्यक्ती नक्की कशाकडे पाहील, माहीत नाही. कुणाला करिना-आमिरला कधी भेटणार याची घाई झालेली असेल. कुणीतरी म्हणेल, ‘अशी शाळा असते?’ कुणी म्हणेल, ‘ही कसली शाळा? असलं मुलं शिकत बसली तर ती इंजिनीअर, डॉक्टर कशी होणार?’ विचारांची ही दोन टोकं आहेत.

खरं तर अशीच शाळा हवी! अशीच शाळा सोनम वांगचुक यांनी सुरू केली. जिथं मुलांना त्यांचं कौशल्य दाखवता येईल नि स्वत:च्या विचारातून, कल्पनेतून मुलं काहीतरी नवं निर्माण करतील. जिथे इयत्ता, पुस्तकं, परीक्षा, स्पर्धा, शिक्षा, जड दफ्तर, सूटबूट हे काहीच नसेल. त्यांची ही शाळा पाहायला बरेच जण जातात. ‘ग्रेट!’ म्हणून कौतुक करून परत येतात. आणि आपल्या इथे हे शक्य नाही म्हणून पुन्हा चाकोरीच्या लोंढय़ात वाहायला लागतात.

हेच तर खरं दुर्दैव आहे. ‘थ्री इडियट’ सिनेमामुळे ही शाळा प्रकाशात आली. आणि आता सोनम वांगचुकही प्रकाशात आले. त्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळाल्यामुळे आता एकदम सगळे तिकडे धावतील. सिनेमात होते ते थ्री इडियट्स! पण मुळात मुख्य एकच ‘इडियट’ आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.. पण त्यातलं वेगळ्या अर्थाने कुरूप पिल्लू (खरं तर.. राजहंस!) एकच!

कोण आहेत हे सोनम वांगचुक? १९६६ मध्ये जन्मलेला ५१ वर्षांचा एक माणूस. ज्याच्या  गावात शाळा नव्हती. वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत ज्यांना आईनं अनेक गोष्टी सांगून, गाणी शिकवून, गप्पा मारून घडवलं. त्यांना वाटलं, मी भाग्यवान आहे- की गावात शाळा नव्हती. लेहपासून ७० कि. मी.वर त्यांचं गाव. लेहपासून खूप दूर. तिथल्या ग्रामजीवनानं त्यांना बरंच काही शिकवलं. कदाचित या मुक्त शिक्षणानेच (ओपन लर्निग) त्यांच्यात वेगळ्या विचारांचं बीज रुजलं असावं. इथे त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी करणारी माणसं पाहिली असतील.

हा मुलगा पुढे श्रीनगरला आला नि हिंदी व इंग्रजी बोलता येत नसल्याने ‘मुका’ ठरला. ‘लाजराबुजरा’ म्हणून हिणवला जाऊ लागला. त्याला सतत अपमानित केलं गेलं. यामुळे मनातून तो पार खचला. त्याला वाटू लागलं, की या अशा जगण्यापेक्षा सरळ आत्महत्या करावी. या वयात मुलांच्या मनावर शाळा, समाज, यंत्रणा यांनी खोलवर ओरखडे ओढले की त्यांच्या मनात आयुष्य संपवण्याचे विचार येतात.

हा मुलगा सामान्य गुण मिळवून १० वी, १२ वी झाला. त्याला मेकॅनिकल इंजिनीअर व्हायचं होतं. वडील राजकारणात मंत्रिपदावर. सरकारी नोकरीत सिव्हिल इंजिनीअर होणं फायद्याचं. म्हणून मग मुलानं ते शिक्षण घ्यावं असं वडिलांनी बजावलं. मला काही करता येतं, बनवता येतं, घडवता येतं, हा आत्मविश्वास मनात घेऊन जगणाऱ्या या मुलानं वडिलांच्या या आग्रहाला  ठामपणे नकार देऊन आपली इच्छा सांगितली. तेव्हा वडिलांनी त्याकरता पैसे द्यायचं नाकारलं.

तेव्हा या मुलाच्या तीव्र इच्छेने आणि जिद्दीनेच या प्रतिकूलतेतून आपला मार्ग शोधला. त्याने संगीताचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. फीकरता लागणारे पैसे जमले तेव्हा हा माणूस आपल्याच आनंदात दंग न होता आपल्या जगण्यातलं दारुण वास्तव त्याला अंतर्मुख करून गेलं. नुसताच विचार करून गप्प न बसता, नोकरी न करता लेह-लडाखमधल्या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे- जे या मुलांमधला सर्जक, निर्मिक जिवंत ठेवेल, असा निर्धार त्यांनी केला. यातूनच उभं राहिलं ते मुलांच्या नवनिर्मितीला, सृजनशीलतेला मोकळं आकाश देणारं, हातांना काम देणारं, मनाला आनंद देणारं आणि जगण्याला विचार देणारं ‘कौशल्य विकास केंद्र’!

इथे हे सगळं काही परिच्छेदांत आटोपलं असलं तरी ते इतक्या सहजासहजी नाही घडलं. एक गंमत सांगायची राहून गेली. आकाशात झेपावणारं यंत्र बनवणारा मुलगा आठवतोय ‘थ्री इडियट्स’मधला? सोनम वांगचुकनेही कॉलेजला येताना पोर्टेबल टाईपरायटर, एक सायकल आणि एक वेगळी म्युझिक सिस्टीम आणली. ही सिस्टीम घडय़ाळाला जोडली होती. गजर होताना हे घडय़ाळ एक मगभर पाणी तोंडावर ओतायचं. कसलं भन्नाट ना! गजर बंद करायच्या आत उठलंच पाहिजे! एरवी कॉलेजला जाणारी आपली मंडळी कदाचित वेगवेगळ्या प्रेशरमुळे असेल, डाव्या हाताने गजर बंद करण्यात महापटाईत! पण हा अशांपैकी इंजिनीअरिंगचा मुलगा नव्हता. हेच तर त्याचं वेगळेपण! ‘रिन्युएबल एनर्जी’ हा विषय घेऊन १९८७ साली हा मुलगा पदवीधर झाला. आणि भाऊ व मित्रांच्या मदतीनं ‘एज्युकेशनल अ‍ॅन्ड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’ नावाची संस्था त्याने सुरू झाली. या संस्थेच्या माध्यमातून गावागावांतून काम करताना जी भीषण सत्ये नजरेसमोर आली, त्यातून त्यांना एका आगळ्यावेगळ्या कामाची दिशा सापडली.

इथली पाठय़पुस्तके हत्ती-सिंहाबद्दल बोलतात; याक आणि स्नो लेपर्ड्सबद्दल नाही. इथे मान्सूनवर धडे आहेत; बर्फ आणि ग्लेशिअरवर नाहीत. नारळ, उसावर धडे आहेत, पण बार्ली व गव्हावर नाही. अभ्यासात होळी-दिवाळीची वर्णने आहेत, पण इथल्या लोसार सणाची वर्णने नाहीत.

लडाखमध्ये फिरताना वांगचुक यांच्या लक्षात आलं की, शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांबद्दल लोकांच्या मनात आपलेपणाची भावना नाही. इथे शिक्षकांची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा अस्तित्वात नाही नि गुणवत्तेसंबंधात काम करणारी रचनाही नाही.

लडाखमध्ये १९५० मध्ये रस्ते झाले आणि प्रचंड प्रमाणात शाळा उघडल्या गेल्या. या शाळांमध्ये शिक्षकच नव्हते. तेव्हा शिक्षा म्हणून बऱ्याच शिक्षकांना लेह-लडाखला पाठवलं गेलं नि आपल्या शिक्षेचा राग मग त्यांनी मुलांना शिव्या देणं, मारझोड करणं यांतून व्यक्त केला. जे शिक्षक लेह-लडाखला पाठवले गेले, त्यांना पुरेसं प्रशिक्षण नव्हतं. ते फक्त १० वी- १२ वी झालेले होते. त्यामुळे मुलांना शिकतं कसं करायचं, याचंच काय; पण एकूणच शिकणं-शिकवणं याचं अजिबातच ज्ञान नव्हतं.

यास्तव मग वांगचुक यांच्या संस्थेने शिक्षक प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यातून खऱ्या अर्थाने मुलांना केंद्रबिंदू मानणारी आणि प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष करत करत शिकण्याची पद्धती गाणी, गोष्टी, खेळ यांतून त्यांनी विकसित केली. लडाखमध्ये शिक्षक ड्रायव्हरही असतात नि गाइडही. त्यामुळे मुळात शिक्षकांचा दृष्टिकोन बदलणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू होता. ‘नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन’चा अभ्यास करताना वांगचुक यांच्या लक्षात आलं, की ग्राम शिक्षा समिती किती कामं करू शकते! प्रत्यक्षात मात्र त्यापैकी काहीच घडत नव्हतं. या समितीच्या स्थापनेसाठी ते सासपोल गावात दारोदारी फिरले. शासनाने त्यांना आश्वासन दिलं की, तुम्ही ट्रेनिंग दिलेले शिक्षक नेमा, आम्ही पाच वर्षे त्यांची बदली करणार नाही. इंग्रजी भाषा शिकवणे हे लेह-लडाखी भाषा बोलणाऱ्यांना किती कठीण आहे, हे लक्षात आल्यावर त्यांच्या रएउटडछ या संस्थेने इंग्लिश शिकवण्यासाठी अतिशय सृजनशील पद्धती विकसित करून त्यांना इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. तीन वर्षांतच याचे परिणाम दिसले नि खासगी शाळा बंद कराव्या लागल्या. हळूहळू गावागावांतून ग्रामस्थांची मागणी येऊ लागली, की तुमच्यासारखीच शाळा आमच्याही गावात सुरू करून द्या. तेव्हा वांगचुक यांनी गावकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले, की शिक्षकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी ग्रामस्थांनीच घ्यावी. हे निवासी प्रशिक्षण असेल- ज्याचा खर्च गाव करेल. या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि शिक्षकांची गुणवत्ता वाढली.

१९९६ साली २६० शाळांतून ‘ऑपरेशन न्यू होप’ हा नवा प्रकल्प सुरू झाला. पण एवढय़ा शाळांवर लक्ष कसं ठेवणार? या निकडीतून ब्लॉक एज्युकेशन कमिटी आणि डिस्ट्रिक्ट एज्युकेशन कमिटी अस्तित्वात आली.

आणि इथूनच वेगळ्या कामाला सुरुवात झाली. या नव्या प्रकल्पाचे ध्येय काय असेल? थ्री एच- ए स्किल्ड हँड, अ ब्राइट हेड अ‍ॅन्ड अ काइंड हार्ट.

फे (phey)मधील वांगचुक यांचे ऑफिस कम् ट्रेनिंग केंद्र हे पूर्णपणे सौरशक्तीवर चालणारं केंद्र आहे. त्याद्वारे वीज, स्वयंपाक, पाणी काढणे नि खोल्या गरम करणे इत्यादी कामं होतात. हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून एम. एड्. झालेल्या रिबेका (सौ. वांगचुक) यांचा या कामात सहयोग सुरू झाला. गेली आठ वर्षे त्या शिकवणं, त्यासाठी आवश्यक ती अभ्यास पुस्तके आणि लहान मुलांसाठी गोष्टीची पुस्तके तयार करण्याचं काम करताहेत. फेमधील वांगचुक यांचे कार्यालय नि प्रशिक्षण केंद्र एकच आहे. अनेक लहान-मोठी कामं मुलं आपली आपण शिकतात. लेह-लडाखमधील शिक्षणाला वांगचुक यांच्या द्रष्टेपणाने एक नवी, वेगळी चालना मिळाली. शिकण्याची प्रक्रिया बदलली, स्वरूप बदलले. कधीही न पाहिलेल्या गोष्टी वांगचुक यांच्यामुळे त्यांच्या केंद्रात लोक पाहू लागले. कुणीतरी बाहेरून येऊन आपल्याला मदत करेल अशा प्रकारचं अवलंबित्व नष्ट होऊन पुढील पाच वर्षांत सर्व काही स्वयं- अर्थसाहाय्यावर चालेल अशी मनिषा ते बाळगून आहेत. सध्या डेन्मार्ककडून या प्रकल्पाला मदत मिळते. तेथील मुलं एक दिवस काम करून जे पैसे जमतील ते या प्रकल्पासाठी पाठवतात. आज समस्त लडाखी मुलांसाठी वांगचुक काम करत आहेत. त्यातून त्यांची पत्नी रिबेका आणि त्यांना वाटतं, की आपल्याला आपलं स्वत:चं मूल नकोच.. जे या कामातून आपल्याला काहीसं बाजूला काढेल.

सध्या वांगचुक पर्यायी विद्यापीठ स्थापनेचा विचार करताहेत. आपणा सगळ्यांची वाढच अशी झाली आहे, की आपण काही वेगळा विचार करूच शकत नाही. देशाची लोकसंख्या डोळ्यापुढे ठेवून आपली धोरणे निश्चित केली गेलेली नाहीत. त्यामुळो प्रश्नांच्या मुळाशी न जाता केवळ वरवरचीच मलमपट्टी केली जाते. आपले प्रश्न हे आपले आहेत, ते कुणाकडे पाहून वा दुसऱ्याला विचारून सुटणार नाहीत याची स्वच्छ जाणीव वांगचुक यांना आहे.

आता वांगचुक यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्याने वर्तमानपत्रे, सगळी संवादमाध्यमं सोनम वांगचुकमय होतील. त्यांच्यावर, त्यांच्या कार्यावर पुस्तकं येतील. अर्थात हे व्हायलाच हवं. लेह-लडाखमध्ये आपल्याला सहजी जाता येत नाही. पण प्रसार माध्यमांमुळे त्यांचं काम आपल्यासमोर येईल. मात्र, पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने शोधायला हवं. नवनिर्मिती म्हणजे काय? विद्यार्थीकेंद्रितता म्हणजे काय? निसर्गावर निर्भर राहून कसं जगता येतं.. किती सोपं आहे निसर्गाच्या कुशीत जगणं.. या गोष्टी लेह-लडाखला वांगचुक यांच्या संस्थेत गेल्यावर आपल्याला प्रत्यक्ष पाहता येतील. एक मेकॅनिकल इंजिनीअर समाजातल्या प्रश्नांच्या मुळाशी जातो आणि पुन्हा प्राथमिक शिक्षणाच्या नव्या बांधणीला सुरुवात करतो, ते का? ही सुरुवात का आहे? आज शालेय शिक्षण बळकट करण्यासाठी पर्यायी शाळा (प्रशिक्षण देणारी केंद्रे) भारतभर सी.एस.आर.च्या माध्यमातून काम करताहेत. पण पुन्हा तेही लिहिण्या-वाचण्याच्या मर्यादेतच. वांगचुक कॉलेजला जाताना तोंडावर पाणी मारणारे जे गजराचे घडय़ाळ तयार करतात, ती प्रेरणा कुठली? त्यांना प्राथमिक शिक्षणावर लक्ष का केंद्रित करावेसे वाटले? त्यांनी याचे उत्तर आपल्या परीने शोधले. त्याचा अभ्यास व्हायला हवा.

कृतियुक्त शिक्षण म्हणजे कृतिपत्रिका सोडवणं असा अर्थ रूढ होईल. मुलांना केंद्रिभूत ठेवणारं शिक्षण म्हणजे फक्त मुलांवर लक्ष ठेवणं, ती कुठे कमी पडतायत हे पाहणं असं होईल. आज परदेशांकडे आम्ही गुणवत्तेसाठी तोंड वेंगाडून पाहतो. औद्योगिकीकरणाच्या विचारातून शिक्षणाचा विचार झाल्याने एक ‘प्रॉडक्ट’ म्हणून यंत्रवत विचारातून ही मुले देशाबाहेर पडायचा केविलवाणा विचार करताहेत. आपण आपलं लोकजीवन आणि लोककौशल्यांपासून तोडण्याकडे मुलांना नेतोय. हीच मुले पुढे मोठी होणार ना?

वांगडूची शाळा पाहताना मी मनात म्हणाले, आपल्या शाळेतही असंच नि यापेक्षा जास्त मुलं करताहेत. त्यांच्या नावीन्यपूर्ण विचारांना नि त्यातून घडणाऱ्या कामांना आकार कसा द्यायचा, हे दाखवणारे चांगले वाटाडे त्यांना भेटलेत. ‘आम्ही आधी करून पाहतो. करताना चुकतो. त्यात नवीन काय भर टाकली पाहिजे हे ठरवतो. आम्ही एका जागी बसत नाही. करतो आणि मग लिहितो,’ असं मुलं सांगतात. एकच काडी.. पण किती दृष्टीने ती दिसते! तसं मूलभूत कौशल्य प्राप्त केलं की केवढी दुनिया उभी राहते, हे मुलांकडे पाहताना जाणवतं. नि हेही जाणवतं, की आम्हीच अजून खूप तोकडे आहोत, बांधले गेलो आहोत. मुलांना मराठी, गणित, समाजशास्त्रापेक्षा कौशल्यविकास शिक्षण आवडतं. कारण ते जगत जगत शिकता येतं. वर्गमूळ आणि घनमूळ जगण्यात कसं आणायचं, हे त्यांना कळत नाही. अनेक न कळणाऱ्या संकल्पनांवर पुढचं शिक्षण नुसतं आपण रचत जातोय असं वाटतं. वांगचुक यांना वाटतं : फक्त लाल गुलाब म्हणजेच फूल नाही, तर अनेक फुलांमुळे निसर्ग सुंदर दिसतो. तसं इंजिनीअरिंग म्हणजेच शिक्षण असं नाही. प्रत्येक मूल ही स्वतंत्र निर्मिती आहे. त्याची त्याची शिकण्याची एक पद्धत आहे, क्षेत्र आहे, आवड आहे. त्यात त्या मुलाला रस आहे. त्याच्यातली ही क्रियाशीलता, कृतिशीलता एका जागी बसून घडणार नाही. त्यासाठी त्याला अवकाश कसा उपलब्ध करून देता येईल, हे वांगचुक यांनी दाखवून दिलं. जगणं आणि शिकणं यांना जोडलं त्यांनी. या साऱ्याला लोकभाषेची जोड दिली. लोकांना लोकांच्याच कामाशी जोडलं. मुलं घडतात ती शाळेसारखी रचना लोकांनीच सक्षम केली पाहिजे. त्याचं स्वामित्व, मालकी स्वीकारली की आपोआप त्यात जबाबदारी आली, अधिकार आला, त्यातून काय घडतंय, हे पाहणं आलं. त्यात काही अयोग्य दिसलं, दर्जाहीन दिसलं तर सुधारणं आलं- हे त्यांनी जाणवून दिलं. म्हणूनच तिथल्या ग्रामस्थांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा खर्च उचलला. पाठय़पुस्तकांतल्या आशयापासून सुरुवात करून आपली संस्था आणि संपूर्ण रचनाच किती सर्वागाने नावीन्यपूर्ण करता येते, हेच ते शिक्षण. कारण त्यामुळे जगणं आनंददायी बनतं, हे वांगचुक यांनी दाखवून दिलंय.

renudandekar@gmail.com

First Published on August 5, 2018 1:42 am

Web Title: sonam wangchuk wins this year ramon magsaysay award