प्रिय तातूस..
बघता बघता एकदम हवा बदलली आणि हवेहवेसे वाटणारे ऊन आता त्रासदायक वाटत आहे. या उन्हाळ्यात चार दिवस हवापालट म्हणून तुझ्याकडे यायचा विचार होता; पण पाणीकपात ऐकून मी तो रद्द केला. त्यामुळे रागावू नकोस. पूर्वी सगळीकडे इतके पाणी होते, की एकमेकांना पाण्यात बघणे सोयीचे होते. आमच्या इथे हॉटेलात तुम्ही घरून पाण्याची बाटली आणली तर वीस टक्के डिस्काऊंट देतात. हल्ली शाळेची सहल वगैरे काढायची असेल तर चाळीस मुलांमागे एक टँकर बरोबर द्यावा लागतो, तरच सहलीला परवानगी मिळते. असो. यंदा पावसाळा लवकर सुरू होणार आणि भरपूर पाऊस पडणार असे भविष्य आहे. मी नेहमीच चांगले भविष्य सांगितले तर त्यावर विश्वास ठेवतो. माणसाने नेहमी सकारात्मक गोष्टींच्या बाजूने राहावे.
आता ‘अच्छे दिन आनेवाले है’ याच्यावर मी तरी विश्वास ठेवतो. मला जेटलींचे बजेट आवडले. आमच्या बाजूच्या सोसायटीत एक सल्लागार आहेत, ते तुम्हाला हवा तसा सल्ला देतात. म्हणजे बजेट चांगलं कसं आहे यावरही ते लेक्चर देतात, आणि ते वाईट कसं आहे, हेही सांगतात. त्यामुळे त्यांच्याकडे टीव्हीवर चर्चेला बसणारे सगळ्या पक्षांचे विचारवंत येतात. म्हणजे आता साधं आपण ‘भयंकर उकडतंय!’ असा विषय घेतला तर निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये उकडणे कसे आवश्यक आहे, त्यामुळे पुढे पाऊस कसा जोरात पडतो, अथवा अगदी उन्हाळ्यातल्या वाळवणाच्या पदार्थासाठी हे किती आवश्यक आहे, हे ते समजावून सांगतात. अगदी पापड, कुरडया, शेवयांची आपली घरगुती उदाहरणे दिल्याने महिलावर्गही खूश होतो. आता विरोधात बोलताना सरकार कसे बेजबाबदार आहे आणि इकडे गरीबांना उकडत असताना मंत्री लोक कसे स्वित्र्झलड वगैरे युरोपात मजा करत फिरतायत..’ ‘आमचं सरकार असताना इतकं उकडत नव्हतं’ अथवा ‘आमचं सरकार असताना इतकी तहानदेखील लागत नव्हती’ असं ते ठासून सांगतात. इतकंच नव्हे, तर अशा वेळी चर्चा करताना समुद्राचं ओहोटीच्या वेळचं चित्र दाखवून तुमचं राज्य आल्यापासून समुद्राचं पाणीदेखील कसे आटत चालले आहे, हे मांडायला सांगतात. एखाद्या गोष्टीकडे अनेक अंशांनी कसे बघता येते हे मी त्यांच्याकडून शिकलो. मला एकदा हाफ पॅन्टच्या विरोधात बोलायचे होते तेव्हा त्यांनी ‘पाय उघडे पडतात, थंडी आत शिरते’ इथपासून अगदी दोन हाफ पॅन्टची कितीही टोटल केली तरी त्यापासून एक फुल पॅन्ट बनू शकत नाही वगैरे मुद्दे काढून दिले. आता माझ्याकडून त्यांनी कन्सल्टिंगचे फार पैसे घेतले नाहीत म्हणा. कारण मी बँकेत असताना त्यांचे लोनचे एक काम करून दिले होते. असो.
आठ मार्चला ‘महिला दिन’ होता. मी महिला दिनादिवशी फारसा घराबाहेर पडत नाही. अरे तातू, अलीकडे चालताना माझा शारीरिक तोल जातो. चुकून उगाच कुणाला धक्का लागायचा आणि भलतंच काहीतरी अंगलट यायचं. आमच्या हिची तर मला सक्त ताकीद आहे. यंदा मी महिला दिनाच्या आदल्या दिवशी हिच्या आवडीच्या सर्व भाज्या आणून दिल्या. त्यामुळे तिच्या पसंतीचा सगळा मेनू बनला होता. अनायासे महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायला माझे मित्रही आले होते; मग त्यांनाही जेवणाचा आग्रह झाला. सगळेजण वहिनींच्या हाताला काय चव आहे म्हणत होते. संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. एरवी आम्ही दत्ताला वगैरे जातो; पण महिला दिन असल्याने मुद्दाम देवीच्या दर्शनाला गेलो होतो. सर्व महिलांना चांगली बुद्धी दे, अशी प्रार्थनादेखील केली. बिचाऱ्यांना वर्षभर राबराब राबावं लागतं. निदान एक दिवस तरी कौतुकाचा पाहून बरं वाटतं. वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांपासून ते अगदी सगळ्या वाहिन्यांवर महिलांचे होणारे कौतुक बघून समाधान वाटले. सर्व चॅनेल्सवर त्या दिवशी महिला दिनाच्या खास रेसिपीज् दाखवत होते. या वर्षी बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी सगळ्या महिलांना अगदी अल्प किमतीत गॅस कनेक्शन देण्याचे जाहीर केले. काही महिला संघटनांनी याचा विपरीत अर्थ काढून ‘म्हणजे पुन्हा तुम्ही गॅस स्वस्तात देऊन आम्हाला रांधा! वाढा! उष्टी काढा! या चक्रातच अडकवणार..’ असा विपर्यास केला. खरे तर धुराच्या घुसमटीतून बाहेर काढण्याचे त्यांनी स्वागत करायला हवे होते.
मराठी लोक सबंध भारतात पुरोगामी आहेत असा अभिमान आणि शेखी मिरवत असतात; पण अजूनही महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री झालेली नाही. अरे तातू, राजस्थान, यूपी, बिहार, तामिळनाडू, ओरिसा, बंगाल आणि आता तर गुजरातसारख्या राज्याच्या मुख्यमंत्री महिला आहेत. मला आपलं असं वाटतं, निदान महिला दिनापुरते एक दिवस पायउतार होऊन देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना चार्ज द्यायला हवा होता. गोपीनाथरावांचे आणि आमचे खरे तर चांगले संबंध होते. अरे तातू, कुणाला सांगू नकोस; पण दरवर्षी दिवाळीत त्यांच्याकडून साखरेची पिशवी यायची. आम्ही डायबेटिसवाले- त्यामुळे त्या साखरेवर वर्ष निभावून जायचं. असो. तर त्यांचे-आमचे असे गोड संबंध होते. त्यामुळे आपल्या मित्राची मुलगी मुख्यमंत्री झाली तर मला तर आनंद होईलच; पण महिलांनाही न्याय दिल्यासारखे होईल. परवा मला कुणीतरी मुख्यमंत्री झाल्याशिवाय आपण मोकळे केस बांधणार नाही, असं त्या म्हणाल्याचं सांगितलं. असो. बाकी सर्व भेटीत बोलूच!
ashoknaigaonkar@gmail.com