07 April 2020

News Flash

कलासक्त दाम्पत्याचा प्रेरक जीवनपट

मुंबई ही रोजगारासाठी जशी अनेकांसाठी अन्नदात्री ठरली, तशीच अनेक कलाकारांचंही माहेरघर ठरली.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक क्षेत्रांमध्ये प्रगतीचे ताजे वारे वाहू लागले. १९५० ते ६० हे दशक महाराष्ट्रातही अनेक क्षेत्रांतील कर्तृत्ववान दिग्गजांचा उदय घडवणारं ठरलं. कलेचं क्षेत्रही याला अपवाद नव्हतं. त्यादृष्टीने या दशकात मुंबई शहराने तर कूसच बदलली. मुंबई ही रोजगारासाठी जशी अनेकांसाठी अन्नदात्री ठरली, तशीच अनेक कलाकारांचंही माहेरघर ठरली. याच काळात कोकणातील जन्मगाव सोडून रोजगार शोधण्यासाठी एक माणूस मुंबईत आला नि चहाची टपरी चालवण्याचा व्यवसाय करता करता त्याला स्वत:मधल्या नृत्यनिपुणतेचा, नृत्याच्या विलक्षण ध्यासाचा शोध लागला आणि तो प्रख्यात नृत्यगुरू उदयशंकर यांच्या नृत्यनाटय़ शैलीचा पाईक झाला. १९५१ पासून सुरू केलेल्या स्वत:च्या नृत्यसंस्थेच्या माध्यमातून आजवर- वयाच्या ८८ व्या वर्षांपर्यंत अखंड नृत्यसाधना करीत राहिला. त्याने असंख्य विद्यार्थी तयार केले. नृत्याच्या क्षेत्रात खूप भ्रमंती केली. विशेष म्हणजे त्याची पत्नी कथक नृत्यांगना असल्यामुळे तीही या कार्याशी आपसूक जोडली गेली.

या दाम्पत्याचे नाव : श्रीधर पारकर व आशाताई पारकर. दोघांच्या आयुष्यातील अनेक आठवणींचा पट उलगडणारं ‘तपस्या’ हे पुस्तक डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. या आठवणींचं शब्दांकन करण्याचं काम मधुमती जोगळेकर-पवार यांनी केलं आहे.

पुस्तक वाचताना पहिल्या प्रकरणापासूनच एक एक गोष्ट लक्षात येते, ती पारकर दाम्पत्याच्या आयुष्यातील आठवणींमागची त्यांची संवेदना आणि लेखिकेच्या लेखणीची एकरूपता. लेखिकेला स्वत:ची शैली आहे; पण ती पारकरांच्या मनातील संवेदनांवर कुरघोडी करीत नाही. प्रत्यक्ष प्रसंग अतिरंजितपणे चित्रित करीत नाही किंवा प्रत्यक्षानुभवाला बेसूरही करून टाकत नाही.

आत्मकथनाच्या बाजानेच पुस्तक पुढे जाते असे नाही, तर कधी प्रसंगांचे त्रयस्थपणे केलेले निवेदन समोर येते, कधी एखादी रसाळ कथा सांगितली जात असल्याची जाणीव होते. हा शैलीचा प्रयोग आशयाला फारच पूरक आहे. यामुळे पुस्तक कुठेही कंटाळवाणे न होता वाचकाला लोभवून टाकते.

श्रीधर पारकर यांचा काळबादेवी या कोकणकिनाऱ्याच्या गावातला बालपणीचा तपशील त्यातल्या निरागसतेमुळे आवडून जातो. पारकरांची वाडी, त्यांची आजी सखूबाई नि तिचा दरारा, एकूणच गावातील रूढिबद्धता नि लहानग्या श्रीधरचा खटय़ाळपणा या साऱ्या गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवताना स्वत: पारकर व लेखिका दोघेही रंगून गेल्याचे जाणवते. आशाताईंच्या माहेरचे- म्हणजे वढावकरांचे मुंबईतील कष्टमय जीवन हे मुंबईत तग धरू पाहणाऱ्या त्यावेळच्या (१९५० सालातील) आर्थिकदृष्टय़ा दुबळ्या, पण संस्कारसंपन्न कुटुंबाचे प्रातिनिधिक चित्रणच वाटते.

या पुस्तकाचा गाभा मात्र पारकर दाम्पत्याचे कलाप्रेम आणि नृत्यसाधना हा आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्ये स्नेही मंडळींनी पुढे केलेला आपुलकीचा हात हातात घेऊन ज्या जिद्दीने या दाम्पत्याने स्वत:च्या आयुष्याला आकार देण्याची धडपड केली, त्याचा इतिहास ‘तपस्या’ या पुस्तकात प्रत्ययकारी रूपात मांडला गेला आहे.

उदयशंकरांच्या नृत्यशैलीचे शिक्षण प्रसारित करण्याचा व ती शैली वापरून असंख्य कलात्मक कार्यक्रम सादर करण्याचे मोठे काम या दाम्पत्याने केले आहे. श्रीधर पारकरांनी ‘आवारा’ या राज कपूरच्या सिनेमापासून समूहनृत्यात सहभागी होणे सुरू केले. त्यानंतर ५० च्या वर सिनेमे त्यांनी केले. अनेक नृत्यनाटिका केल्या. त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे नृत्यनाटिकेला लागणारे सेट आणि वेशभूषा ते स्वत: हाताने बनवीत. हे सारे करताना त्यांनी ‘कथा ही राम-जानकीची’ या गाजलेल्या नृत्यनाटिकेत जटायूची अविस्मरणीय भूमिका केली. राष्ट्र सेवादलातील अनेक दिग्गजांसोबत (लीलाधर हेगडे, वसंत बापट, सुधाताई वर्दे, इत्यादी) रंगमंचावर सादरीकरण केले. नृत्यासाठी गाणी रचली, त्याला चाली दिल्या, नृत्यरचना केल्या. अशा या अष्टगुणी कलाकारांच्या धडपडीची नोंद लेखिकेने या पुस्तकात सविस्तर घेतली आहे.

नृत्यक्षेत्रात झोकून देऊन आजपर्यंत अखंड  कार्यरत असलेल्या या कलाकार दाम्पत्याचा हा जीवनपट म्हणजे प्रसिद्धी पराङ्मुख राहून कलेचा दीप अखंड तेवत ठेवणाऱ्या अनेक मनस्वी कलाकारांसाठी एक आदर्श आहे.

‘बारा गावचे पाणी’ या स्वतंत्र प्रकरणामध्ये श्रीधर पारकरांच्या गीतरचना दिल्या आहेत. त्यात बालगीतापासून शिवस्तुतीपर्यंतच्या विविध प्रकारच्या गीतांचा समावेश आहे. ‘डोल डोलतंय वाऱ्यावर’सारखी गाजलेली कोळीगीतं हा तर पारकरांचा सवतासुभा म्हणायला हवा.

वाद्यवादन, संगीत दिग्दर्शन, गायन, नृत्यरचना, नेपथ्य, नृत्याचे सादरीकरण, नृत्य दिग्दर्शन अशा अनेकविध आघाडय़ांवर सफाईने वावरणाऱ्या श्रीधर पारकरांचा नि त्यांच्या पत्नीच्या वाटचालीचा परिचय कलाकारांच्या आजच्या पिढीला या पुस्तकातून नक्की होईल व तो त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

एखाद्या माणसाचा जीवनपट हा तसा फक्त ‘त्याची कहाणी’ एवढाच मर्यादित नसतो, तर तो माणूस जिथे वाढला, वावरला, मोठा झाला, त्या वातावरणाचा नि सांस्कृतिक पर्यावरणाचाही तो तत्कालीन इतिहास असतो. त्या अर्थाने बघितले तर कोकणातील तत्कालिन वातावरण नि मुंबईतील भोवतालाचे चित्रण या पुस्तकात आले आहे. शेवटी नृत्यसाधकांसाठी जी आचारसंहिता दिली आहे तीही अनुकरणीय अशीच आहे. दोन कलासक्त मनांची वाटचाल नि साधना अधोरेखित करणारी कहाणी म्हणून हे पुस्तक वाचल्यास एक वेगळा आनंद मिळू शकेल. पारकर दाम्पत्याचे नृत्याच्या आविर्भावातील सुंदर छायाचित्र असणारे मुखपृष्ठ आशयाला पूरक आहे. एकूणात समीप हृदयापाशी जाणारा असा हा जीवनप्रवास.. ‘तपस्या’!

या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्टय़ आहे. ज्या काळात- म्हणजे ५०-५५ वर्षांपूर्वी- महाराष्ट्रात नृत्यकलेला फारशी प्रतिष्ठा नव्हती, त्या काळात पारकरांनी नृत्य हाच ध्यास नि जीवितकार्य मानून आपली वाटचाल सुरू केली. त्या काळात पुरुष नृत्य करत असेल तर त्याला हेटाळणीच्या सुरात ‘नाच्या’ संबोधून त्याची अवहेलना नि संभावना करण्यात येत असे. अशा काळात कुटुंब व समाजातील या अपसमजाचा विरोध ठामपणे अंगावर झेलून आपले परमगुरू उदयशंकर यांच्या शैलीवर अपार श्रद्धा ठेवून पारकरांनी केलेली यशस्वी वाटचाल म्हणूनच महत्त्वाची ठरते. नृत्यकलेला प्रतिष्ठेचे व्यासपीठ देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांमध्ये पारकरांची आज गणना होते, हे निश्चित.

याच काळाच्या आसपास- म्हणजे १९६० साली पुण्यात पंडिता रोहिणी भाटे यांना नृत्य शिकवते, क्लास घेते म्हणून दगड मारणारे लोक होते. हे मी त्यांच्या तोंडून ऐकलं आहे. अशा वातावरणात ‘नृत्यकिरण’ या आपल्या संस्थेचे बीज रोवून त्याचा वटवृक्ष करणाऱ्या पारकरांचा हा जीवनपट आज नृत्यक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानं आवर्जून वाचावा असा आहे. रणांगणात धारातीर्थी पडणाऱ्यांची चरित्रं आपण अभिमानाने वाचतो. तसेच कलेच्या अग्निदिव्यात स्वत:ला झोकून देणाऱ्या कलाकारांची चरित्रंसुद्धा आपण तितक्याच अभिमानानं वाचावीत अशी भावना जागृत करणारी ही ‘तपस्या’ आहे!

तपस्या’- श्रीधर पारकर,

  • डिंपल पब्लिकेशन,
  • पृष्ठे- १८८, मूल्य- २०० रुपये.

hemalele@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2017 2:02 am

Web Title: tapasya book shridhar parkar
Next Stories
1 पाकुळीच्या स्वप्नाची करुण कथा
2 अंटार्क्टिकाकडे आगे‘क्रूझ’!
3 जंक फूडबंदीने काय साधणार?
Just Now!
X