अमेरिकी इंग्रजी रहस्यकथा वाचणाऱ्यांमध्ये ‘पेरी मेसन’ हे पात्र परिचयाचे असेलच. अर्ल स्टॅन्ले गार्डनर या कादंबरीकाराने एक निष्णात फौजदारी वकील म्हणून रंगवलेले हे पात्र. गार्डनरने इतर विविध प्रकारचे लेखन केलेले असले, विशेषत: त्याने उत्तम प्रवासवर्णने लिहिली असली, तरी तो मुख्यत: ओळखला जातो ते पेरी मेसन मालिकेतील कादंबऱ्यांसाठीच. १९३० च्या दशकात गार्डनरने उदयास आणलेले पेरी मेसन हे पात्र मेसन मालिकेतील रहस्यमय कादंबऱ्या आणि त्यांवरील सिनेमांमुळे एके काळी अमेरिकी वाचक-प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. याच मेसन मालिकेतील ‘द केस ऑफ द क्रुकेड कँडल’ ही बाळ भागवत यांनी अनुवादित केलेली कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतीच प्रकाशित केली आहे.

निष्णात वकील असलेल्या पेरी मेसनची गुन्ह्य़ाचा शोध घेण्याची त्याची अशी खास शैली आहे. एका गुन्ह्य़ाबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्याशी निगडित दुसऱ्या मोठय़ा गुन्ह्य़ाचे धागे उसवत गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्याद्वारे शिक्षेपर्यंत पोहोचवणे ही मेसनची शोधशैली. ‘द केस ऑफ द क्रुकेड कँडल’ ही रहस्यमय चातुर्यकथाही मेसनच्या या शोधशैलीचा प्रत्यय देणारी आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

या कादंबरीची सुरुवात होते ती एका गृहस्थाच्या गाऱ्हाण्याने. मेसनच्या कार्यालयात सकाळीच एक गृहस्थ आलेला असतो. ट्रकने दिलेल्या धडकेत या गृहस्थाच्या गाडीचे नुकसान झालेले असते. गाडीला धडकलेला ट्रकचालक पळून गेला असला तरी त्याच्या ट्रकवरील काही नोंदी या गृहस्थाने ध्यानात ठेवलेल्या असतात. तो त्या मेसनला सांगतो. मेसन तो ट्रक कोणत्या कंपनीचा आहे हे शोधणार तोच त्याला त्या कंपनीच्या वकिलाकडून फोन येतो. तो वकील हे प्रकरण मिटविण्यासाठी मेसनकडे आलेल्या गृहस्थाला चांगला मोबदला देण्याची तयारी दाखवतो. त्याने सांगितलेली रक्कम मेसन नाकारतो आणि वाढीव रकमेची मागणी करतो. मेसनची मागणी नाकारली जाईल असे वाटत असतानाच कंपनी ती मागणी स्वीकारते आणि तितक्या रकमेचा धनादेश त्या गृहस्थाला देते. कंपनीच्या या तत्परतेमुळे मेसनला यात काही काळेबेरे असल्याचा संशय येतो आणि तो त्या कंपनीचे काम नेमके काय सुरू आहे, कुठे सुरू आहे हे तपासण्यास सुरुवात करतो.

नेमके त्याच वेळी मेसनला कळते, की एका असहाय अपघातग्रस्त महिलेला त्याच्या मदतीची गरज आहे. तिला झालेला अपघातही याच कंपनीतील एका व्यक्तीकडून झालेला असतो. त्याचीही भरपाई मिळवायची असे मेसन ठरवतो. त्याच वेळी मेसनचा साहाय्यक आणि खासगी गुप्तहेर पॉल ड्रेक त्याला येऊन भेटतो. ड्रेक मेसनला त्या कंपनीच्या विविध काळ्या कारवायांबद्दल सूचक माहिती देतो.

इथून मेसनच्या डोक्यातील विचारचक्र चालू लागते. मेसन त्या कंपनीच्या सर्व भागीदारांची माहिती काढू लागतो. त्यातील एक भागीदार गायब झाला असल्याचे त्याला कळते. हा भागीदार नेमका कुठे गायब झाला आहे, याचा तपास करताना मेसन दुसऱ्याच एका भानगडीत सापडतो. सुरुवातीला झालेला अपघात हा मामुली वाटावा असा वेगळाच प्रकार या कंपनीतील रहस्यमयरीत्या गायब झालेल्या भागीदाराच्या बाबतीत घडलेला असतो.

विदेशामध्ये खासगी बोटी घेऊन खासगी तलावांमध्ये सुट्टीच्या दिवशी मासेमारी करण्याचा छंद अनेक जण जोपासतात. मोठय़ा कंपन्यांतील बडी मंडळी हमखास आपले काही खासगी व्यवहार अशा वेळी या बोटींवर करीत असतात. मेसन शोधत असलेल्या कंपनीचा गायब झालेला भागीदारही असाच व्यवहार करायला गेलेला असताना त्याची हत्या झालेली असते. या खुनाचा आळ ज्या व्यक्तीवर आलेला असतो, त्याची मुलगी आपल्या वडिलांना वाचविण्यासाठी वेगळे पुरावे उभी करू लागते. मात्र असे करताना त्या शहरातील काही मान्यवरही त्यात अडकण्याची शक्यता निर्माण होतेच, पण तिच्या वडिलांबाबतही संशय निर्माण होतो. आपले वडील निरपराध आहेत, हे दाखविण्यासाठीचा तिचा आटापिटा आणखी गुंता वाढवत जातो. मात्र अखेर त्या कंपनीची कृष्णकृत्ये मेसन उघड करतो. एका क्षुल्लक गोष्टीच्या आधारे मेसन खुनाचा छडा लावतो, एका निरपराध व्यक्तीला त्या खुनाच्या आरोपातून सोडवतो आणि त्या जखमी असहाय महिलेला घसघशीत नुकसानभरपाई मिळवून देतो. मेसनचा हा सारा यशस्वी शोधप्रवास वाचकाला गुंग करून सोडणारा आहे.

डॅन ब्राऊन, ली चाइल्ड, फ्रेडरिक फॉर्सिथ, विल्बर स्मिथ यांसारख्या लेखकांच्या कादंबऱ्या अनुवादित करणाऱ्या बाळ भागवत यांनी गार्डनरची ही कादंबरी अनुवादित करून पेरी मेसनच्या सृष्टीचा परिचय करून घेण्याची संधी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे.

  • ‘द केस ऑफ द क्रुकेड कँडल’ – अर्ल स्टॅन्ले गार्डनर,
  • अनुवाद – बाळ भागवत
  • मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,
  • पृष्ठे- २०४, मूल्य- २२० रुपये.