भारताच्या कानाकोपऱ्यांत ‘हवामानबदल’ हा विषय कायमच चच्रेत असतो. अपवाद फक्त- भारतीय हवामान विभाग! तापमान असो वा पाऊस, अवर्षण असो वा गारपीट, अतिवृष्टी असो वा चक्रीवादळ; हवामान खात्यातील अधिकाऱ्यांचे (ज्यांना ‘संशोधक’ म्हटले जाते!) एकसाची उत्तर ठरलेले आहे- ‘अशा घटना घडतच असतात. त्यांना ‘विपरीत’ म्हणता येत नाही.’ मग त्यापुढे आकडेवारी टाकली जाते. हेच वास्तव असे मानावे, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इशारा देते, ‘भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका व इंडोनेशिया या देशांतील तापमानवाढ एक अंश सेल्सियसपर्यंत गेली असून त्यामुळे दरडोई उत्पन्नात १.३३ टक्क्यांनी घट होणार आहे.’ ‘इंटरनॅशनल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ ही संयुक्त राष्ट्रांशी संलग्न संस्था १८ वर्षांपासून ‘अवर्षण व अतिवृष्टीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होईल. आपण चरम हवामानकाळात जगत आहोत. हवामान-बदलाचा धोका जगात सर्वाना सारखाच आहे. त्यापासून कोणाचीही सुटका नाही,’ असा कंठशोष करीत आहे.

२०१७ च्या पावसाळ्यात देशातील ४० टक्के जिल्ह्यंना अवर्षण सोसावे लागले, तर एका तासात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस होऊन २५ टक्के जिल्ह्यंना अतिवृष्टी सहन करावी लागली. १६ ठिकाणी २४४ मिमीहून अधिक पावसाने तडाखा दिला. माऊंट अबूमध्ये वार्षिक  एकूण सरासरीपैकी निम्मा पाऊस एकाच दिवसात पडला. मुंबईत एका दिवसात ३०० मिमी, बेंगरूळुमध्ये एका दिवसात १५० मिमी, चंदिगडमध्ये २४ तासांत ११५ मिमी पाऊस पडला. हवामानबदलातील या विविधतेमध्ये हवामान खात्याचा ‘अंदाज’ हीच एक विलक्षण एकता आहे! भारतीय हवामान खात्याने हवामान संकटाचे अचूक भाकीत करून व्यवस्थापक आणि नागरिकांना वेळीच सावध केले आणि सुनियोजन घडून आले, जोखीम व हानीचे प्रमाण कमी करण्यात यश आले- असा सुदिन भारतात येण्याची शक्यता अद्यापि दिसत नाही. त्यामुळेच माजलगावातील (जि. बीड) गंगाभीषण तावरे यांनी २०१७ च्या जुलै महिन्यात पोलीस ठाण्यात जाऊन भारतीय हवामान विभागावर चक्क फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. ‘पुणे आणि मुंबई येथील हवामान खात्याने जून महिन्यात उत्तम पाऊस पडेल असं भाकीत वर्तवलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि ती सपशेल वाया गेली. शेतकऱ्यांना बियाणी, खतं यांचा नाहक भुर्दंड बसला व लाखोंचा तोटा झाला. त्याची भरपाई हवामान खात्याने करावी,’ असा अर्ज तावरे यांनी केला होता. त्यांच्या या कृतीतून देशातील कोटय़वधी शेतकऱ्यांच्या मनातील संताप व्यक्त झाला होता. ‘मान्सून हाच खरा भरतखंडाचा अर्थमंत्री!’ अशी ख्याती असलेल्या देशातील समस्त शेतकऱ्यांकरिता संपूर्ण मान्सूनकाळ हा कमालीच्या तणावाचा असतो. ‘पाऊस कधी येईल?’ यासाठी हवामान खाते ते कुडमुडय़ा ज्योतिषांपर्यंत सर्वाच्या अंदाजांची चाचपणी केली जाते. मग पिके हातात येताना ‘अवकाळी’ मारणार नाही ना? ही धास्ती! अशातही भारतीय हवामान विभागातील हवा आणि मानभावीपणा पूर्वापार आहे तसाच जपला जात आहे.

पूर्वी ‘भविष्य पाहणार, ज्योतिष बघणार’ अशी हाळी देत गावोगावी ज्योतिषी दारोदार हिंडायचे. कोणी विरंगुळा म्हणून, तर काही भाबडेपणाने भविष्य बघत. कित्येकजण त्यांची चेष्टाही करत. सद्य:काळात आश्चर्य, खेद, मनोरंजन आणि संताप हे भाव एकत्रितरीत्या उभे करणारी केवलप्रयोगी अव्यये आपल्या मनात आणण्याची क्षमता केवळ आपल्या हवामान विभागाकडे आहे! कुतूहल वाटून अधिक खोलात गेल्यास अतिशय अद्भुत व चित्तथरारक कहाण्या सापडतात. भारतीय हवामान विभाग (पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत) आणि भारतीय अवकाश संशोधन केंद्र (अवकाश मंत्रालयांतर्गत) या दोन भिन्न विभागांकडे हवामानाचा अंदाज करण्याची जबाबदारी आहे. भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरीऑलॉजी), नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज फोरकास्टिंग, नॅशनल सेंटर फॉर अंटाक्र्टिक अ‍ॅण्ड ओशन रिसर्च या सरकारी संस्थाही हवामान संशोधन करीत असतात. शिवाय ‘स्कायमेट’ व ‘अ‍ॅक्युवेदर’ या खासगी कंपन्याही हवामानाचा अंदाज व्यक्त करत असतात. आणि या सर्वच यंत्रणा त्यांचे भाकीत अचूक असल्याचा दावाही करत असतात. परंतु त्यांच्या अंदाजामुळे कुठल्याही आपत्तीची हानी कमी करता आल्याचा अनुभव कुठेही सापडत नाही. या संस्था (व जनता) वेगवेगळ्या ग्रहांवर असून त्यांच्यात अजिबात संपर्क नसावा (समन्वयाचा तर प्रश्नच नाही!) असे जाणवत राहते.

दुष्काळ व अतिवृष्टी अनुभवल्यावर ब्रिटिशांनी १८७५ साली कोलकाता येथे भारतीय हवामान विभागाची स्थापना केली होती. १४२ वर्षांची ही अनुभवी, सुसज्ज संस्था असूनही अंदाज का तोकडे पडतात, याची माहिती घेताना लक्षात आले की, भारतीय लोकसेवा आयोगामार्फत हवामान खात्याच्या ‘अ’ वर्गातील अधिकाऱ्यांची निवड केली जाते. ही भरती श्रेणी-२ मध्ये केली जाते व कालांतराने हे अधिकारी पदोन्नतीने वरिष्ठ पदावर जातात. त्याकरता शैक्षणिक पात्रता ही कृषी, कृषी हवामान, स्थापत्य, संगणक विज्ञान, गणित,  संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, भूभौतिकशास्त्र या ज्ञानशाखांमधील पदव्युत्तर शिक्षण असण्याची अट आहे. कुठलेही संशोधन केलेले असावे ही अट नसताना ते ‘संशोधक’पदाचा ‘भार’ स्वीकारतात. त्यानंतर पुण्यातील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत त्यांचे प्रशिक्षण होते. ते प्रत्यक्षात भाकीत करण्याचे (फोरकास्टर) तांत्रिक व प्रशासकीय कार्य करत असतात. भौतिक अथवा नैसर्गिक विज्ञानाचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तीस ‘संशोधक’ म्हटले जाते. त्यांनी ज्ञात असलेल्या घटना व प्रक्रियांच्या खोलात जाऊन विशेष ज्ञान प्राप्त केलेले असते. दैनंदिन उपयोगितेकरिता विज्ञानाचा वापर करणाऱ्यांना ‘उपयोजित संशोधक’ (अप्लाइड सायंटिस्ट) असे संबोधन लाभते. भाकीतकार (फोरकास्टर) हा पृथ्वीच्या वातावरणाचा शास्त्रीय अभ्यास करून, हवामानाचा वेध घेऊन आडाखे बांधतो. हवामानशास्त्रीय माहिती व निरीक्षण यांच्या आधारे विश्लेषण व हवामान कसे असेल याचे अंदाज सादर करतो. (दीर्घ कालावधीतील वातावरणाच्या (वेदर) सरासरीला हवामान (क्लायमेट) असे म्हटले जाते. मराठीत मात्र ‘वेदर’ व ‘क्लायमेट’ या दोन्हीला ‘हवामान’ हेच संबोधन लावले जाते.) भारतीय हवामान विभागातील अधिकारी उपकरणे विकत घेऊन ती उभी करतात. संख्याशास्त्रीय आकडेवारीनुसार अनुमान बांधतात. वातावरणातील विविध घटनांचा अन्वय लावतात. ही कामे करणाऱ्यांना ‘संशोधक’ कसे म्हणता येईल? जागतिक पातळीवरील अलीकडचे उदाहरण घ्यायचे तर भारतीय हवामान विभागाने डिसेंबर महिन्यातील ‘ओखी’ या चक्रीवादळाचा वेध घेऊन त्याच्या तीव्रतेचा आणि वाटचालीचा अंदाज व्यक्त केला होता. चक्रीवादळ ओसरल्यावर त्याचा उगम ते अस्त व आलेली आपत्ती यांची सविस्तर माहिती नोंदवली जाईल. कोणत्या घटकांचा प्रभाव पडून चक्रीवादळ आले, भाकिताची अचूकता किती प्रमाणात होती, यांचे सखोल विश्लेषण ‘मोसम’, ‘वायुमंडळ’ यांसारख्या हवामान विभागाच्या नियतकालिकांमधून मांडले जाईल. चक्रीवादळ धडकत असताना अनेक उच्चपदस्थ अधिकारी हे शिलाँग येथील राष्ट्रभाषा प्रसार परिषदेत गुंतून गेले होते, अशा किरकोळ माहितीचा उल्लेख त्यात असण्याचे कारण नाही! राष्ट्रभाषेचा प्रसार हे निश्चितच महत्त्वाचे कार्य आहे. चक्रीवादळ येत असल्याची ‘हवा’ लागल्यानंतरही प्रादेशिक विभागाच्या प्रमुख ‘संशोधकां’चे माप हवापालटाकरिता ‘शिलाँग’कडे झुकते, यावरून त्यांचे अग्रक्रम स्पष्ट होतात.

जागतिक हवामानशास्त्रीय संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जगातील इतर सर्व राष्ट्रांत ‘भाकीतकार’ हेच संबोधन आहे. २०१२ साली केंद्र सरकारातील प्रशासन प्रक्रियेमधील सूक्ष्म व स्थूल बारकावे जाणणाऱ्या हवामान अधिकाऱ्यांनी विलक्षण कौशल्याने संशोधन कार्यास विशेष प्रोत्साहन देणारी ‘मॉडिफाइड फ्लेक्सिबल  कॉम्प्लीमेंटिंग स्कीम’ लागू करवून घेतली. या नव्या फतव्यानुसार हवामान विभागातील ‘भाकीतकार’ हे तात्काळ ‘संशोधक’ (कागदावरील) झाले. ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी केलेल्या सुनियोजित कल्पक कार्यास संशोधन असे म्हटले जाते. भारतीय विज्ञान संस्था, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद अशा संस्थांमधील संशोधकांची निवड करताना संशोधनाची कसून चिकित्सा केली जाते. तशी तसदी न घेताच ‘संशोधक’ म्हणून मिरवणे, हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे! इतर कसलेही कष्ट न करता अनेक विशेष ‘पॅकेज’, सवलती मिळतात. उदा. जागा रिक्त नसली तरीही आपसूक पदोन्नती होते. ‘वैज्ञानिकांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन संशोधन वृत्तीस चालना मिळावी यासाठी त्यांनी ६० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करावेत. पुनरुक्ती नसणारे नावीन्यपूर्ण संशोधन असावे आणि याची खातरजमा करण्याकरिता संशोधनांचे मूल्यमापन करणारे मंडळ असावे’ अशा अटी या विशेष योजनेत आहेत. भारतीय हवामान विभागाने या सर्व अटी धाब्यावर बसवून सरसकट पदोन्नती करवून दरमहा घसघशीत दीड ते अडीच लाख रुपयांची वेतनवाढ पदरात पाडून घेतली. ‘एफ’ श्रेणीत ११ संशोधकांना मान्यता असताना ४२, तर ‘इ’ श्रेणीत ३० संशोधकांना मान्यता असताना ५१ व्यक्ती कार्यरत आहेत. यांपैकी बहुसंख्यांना ६० टक्क्यांपेक्षा कमी गुण आहेत, हा भाग वेगळाच.

२९ ऑगस्ट २०१७ रोजी ३०० मिमी मुसळधार पावसाने झोडपून मुंबई तुंबली. तेव्हा महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि महानगरपालिका यांनी हवामान विभागाने अतिवृष्टीचे भाकीतच केले नसल्याची तक्रार केली, तर हवामान विभागाने राज्य यंत्रणा सक्षम नसल्याचे सांगितले. प्रत्येक यंत्रणेने दुसऱ्याकडे बोट दाखवून मोकळे होण्याचे कार्य केले. (दरम्यान, अतोनात वित्तहानी आणि सामान्य जनतेचे बळी गेले. पण ‘दोष ना कुणाचा’!) दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट २०१७ ला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला. त्यानुसार मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला गेला आणि प्रत्यक्षात तसा पाऊस पडलाच नाही. मात्र त्याने काही बिघडत नाही. कारण अतिवृष्टी झाली नाही तर रहिवाशांना त्रास नसतो, उलट सुटकेचा आनंदच असतो. त्यामुळे असा ‘अंदाज’ वर्तवण्यात कुठलीही जोखीम नसते. (कुडमुडे ज्योतिषी असेच भविष्यकथन करतात. योग्य ठरल्यास विक्री यंत्रणा प्रसिद्धी मिळवते. चुकल्यास सगळेच दुर्लक्ष करतात.) ‘अनुभवी’ संशोधकांना जनता, अधिकारी व नेते यांच्या मानसिकतेचा ‘अंदाज’ आलेला असल्यामुळे त्यांची शक्कल हमखास यश देतेच! हवामानाचा अंदाज चुकल्यास भरतखंडाची तीन बाजूंनी समुद्र असल्याची भौगोलिक परिस्थिती आणि उष्ण कटिबंध ही कारणे आहेतच! ‘हवामानशास्त्रीय भाकिते अचूक असूच शकत नाहीत. विज्ञान अंतिम नसते,’ अशा चोख सबबी पुढे कराव्यात आणि ‘संशोधक’पदातून पुरेपूर आनंद मिळवावा अशी मजा मजा चालू आहे.

बदलत्या हवामानाचे आणि त्यामुळे येणाऱ्या आपत्तींचे तडाखे सर्वानाच सहन करावे लागत आहेत. अशा प्रक्षुब्ध हवामान- काळात भारतीय हवामान खात्याची जबाबदारी नेमकी काय? त्यांचे संशोधन कोणते? ते कधी काळानुरूप होणार? संशोधनाच्या नावावर सामान्य जनतेचा कोटय़वधींचा निधी लाटणे, ही पद्धतशीर लूट नाही काय?  पण हे प्रश्न विचारायचे कुणाला? ‘इंटरनॅशनल मिटिऑरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन पुरस्कारा’ने सन्मानित प्रो. जगदीश शुक्ला नेहमी सांगतात, ‘‘भारतीय हवामान विभागाचे संख्याशास्त्रीय मॉडेल हे अमेरिका व युरोपीय संस्थांकडील माहितीवर आधारित असते. हा नमुना कुचकामी असून त्याला कुठलेही कौशल्य लागत नाही. गेल्या वीस वर्षांत जगातील हवामान संशोधनात कमालीची सुधारणा झाली आहे, पण त्याचा भारतात मागमूसही जाणवत नाही. भारतीय उपखंडाचा कसून अभ्यास करून भारताने स्वत:चा गतिमान (डायनॅमिक) नमुना तयार करणे आवश्यक आहे. त्याशिवाय लघु काळासाठी व अतिशय छोटय़ा क्षेत्रावरील हवामानाचे भाकीत अजूनही जमणार नाही.’’

ऑक्सफर्ड विद्यापीठातील हवामान प्रेरकशक्ती विभागप्रमुख प्रो. माइल्स अ‍ॅलन यांनी २००३ साली लिहिलेल्या ‘हवामानबदलाचे दायित्व’ या निबंधामुळे हवामानबदलाच्या अभ्यासाला कलाटणी मिळाली आहे. हवामानबदलाचा उगम शोधण्यासाठी अनेक विख्यात संशोधन संस्था आणि वैज्ञानिक यांचे जाळे तयार झाले आहे. युरोप, चीन, जपान व कोरिया या राष्ट्रांमध्ये २०१३ साली आलेल्या उष्णतेच्या लाटेचा अभ्यास केला गेला. हवामानबदलामुळे कमाल तापमानात वाढ होत असल्याचा निष्कर्ष त्यातूनही समोर आला आहे. आपल्याकडे असे संशोधन व्हावे यासाठी हवामान संशोधन करणाऱ्या संस्थांना खडसावून विचारणे, त्यांना जबाबदार करणे निकडीचे आहे.

यासंदर्भात मुंबईतील दोन जागरूक नागरिकांनी माहितीच्या अधिकारानुसार भारतीय हवामान विभागाकडे २०१४ पासून अनेक वेळा विचारणा केली आहे. त्यांचे समाधान न झाल्यामुळे केंद्रीय सतर्कता आयोगाकडे दादही मागितली आहे. काहीजण न्यायपालिकेकडे धाव घेत आहेत. जनतेच्या या क्रियाशीलतेमुळे हवामान विभागातील हवा बदलली तर नव्या वर्षांत वैज्ञानिक जगतात नवे संक्रमण येऊ शकेल.

अतुल देऊळगावकर 

atul.deulgaonkar@gmail.com