28 November 2020

News Flash

संपुष्टात आलेल्या महायुगाचे महाकाव्य!

ही कादंबरी वाचताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. टॉल्कीन हे एक नामांकित भाषातज्ज्ञ होते.

‘‘..हे साहस करण्यासाठी ताकदवान कुणी तरी पुढे येऊ शकेल तसंच दुबळेही पुढे येऊ शकतील आणि अनेकदा असं होतं बरं का.. की जगाचं चालकत्व स्वीकारायला लहानसेच हात पुढे येतात, जेव्हा महान व्यक्ती कुठेतरी भलतीकडेच पाहत असतात.’’
(भाग पहिला- मुद्रिकेचे साथीदार)
‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या जे. आर. आर. टॉल्कीन लिखित महाकादंबरी त्रयीतील पहिल्या भागातील हे वाक्य या संपूर्ण काल्पनिक महाकाव्याचं सार म्हणून सांगता येईल. याबाबतीत अनेकांचे मतभेद होण्याची शक्यता आहेच ज्याची टॉल्कीन यांनाही जाणीव होतीच. म्हणूनच त्यांनी आपल्या या कादंबरीची मोकळ्या मनानं चिकित्सा करण्याचं आवाहन वाचकांना केलं होतं, कसल्याही पूर्वग्रहांशिवाय. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लिहिल्या गेलेल्या या कादंबरीला एकूणच या महायुद्धाची, अणुबॉम्बची, युद्धोत्तर नव्या जगाची कल्पना जोडली गेली असली तर नवल नाही. स्वत: टॉल्कीन मात्र हे मान्य करीत नाही. पण ही एक शक्यता बाजूला ठेवली तरी या महाकादंबरीतून इतर अनेक अर्थ काढता येतील, जे कोणत्याही सर्वश्रेष्ठ साहित्यकृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्टय़ असतं. १९५५ साली ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर आतापर्यंत तिच्या साधारण २० कोटी प्रती जगभर ३९ भाषांमध्ये विकल्या गेल्या आहेत. वाचकांना ती आवडली आहे. त्यावर आधारित चित्रपटांनीही इतिहास रचला आहे. आता मराठीतही तिचा अनुवाद तीन भागांमध्ये डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रसिद्ध झाला आहे. एखाद्या कादंबरीला जेव्हा इतकं यश मिळतं तेव्हा त्यात तीन घटकांचा समावेश असतो. प्रत्यक्षात कधीच अस्तित्वात येण्याची शक्यता नसणाऱ्या काल्पनिक जगाचं दर्शन, खिळवून ठेवणाऱ्या नाविण्यपूर्ण गोष्टी आणि मुख्य म्हणजे कादंबरीची सार्वकालिक-सार्वजनिक आकर्षण क्षमता. ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या तिन्ही कसोटय़ांवर खरी उतरते.
ही कादंबरी वाचताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. टॉल्कीन हे एक नामांकित भाषातज्ज्ञ होते. साहित्याशी त्यांचा संबंध अपघाताने आला; परंतु जेव्हा तो आला, तेव्हा त्यांची भाषातज्ज्ञ ही ओळख लपून राहिली नाही तर ती अधिक प्रकर्षांनं आणि मोठय़ा प्रमाणात लोकांपुढे आली. टॉल्कीन यांच्यासाठी हा संपूर्ण प्रकल्प एक भाषाविषयक साहस होतं. त्याची सुरुवात झाली ती ‘द हॉबिट’ या कादंबरीपासून. केवळ ज्यादा पैसे कमावण्यासाठी त्यांनी ही कादंबरी लिहिली. ती गाजलीही. त्यामुळे नंतर त्याच कथानकावर आधारित अन्य पुस्तके लिहिली. ती मात्र त्यांच्या प्रकाशकांना पसंत पडली नाहीत. शेवटी ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’चा जन्म झाला. या कादंबरीचं कथानक ‘द हॉबिट’च्या नंतरचं कथानक आहे. टॉल्कीन यांनी त्यातून प्राचीन पृथ्वीवरील एक काल्पनिक काळ जिवंत केला आहे. त्याला काही प्रमाणात लोककथांचा, दंतकथांचा आधार आहे, पण त्यांच्या प्रतिभेचा या काल्पनिक सृष्टीच्या सर्जनात अधिक वाटा आहे. तिचं एका वाक्यात कथानक सांगायचं, तर सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा संघर्ष आणि त्यात सुष्टांचा जय असं सांगता येईल. परंतु ते पूर्णत: सत्य ठरणार नाही, कारण ही काही सुखांतिका नाही. कदाचित हेच या कादंबरीचं प्रमुख आकर्षण आहे. माणसाने कायमच एका आदर्श परिपूर्ण अशा जगाची कल्पना केली आहे. निरनिराळ्या देशांत या कल्पना निरनिराळ्या काळी जन्माला आल्या आहेत. अशाच एका जगाची कल्पना टॉल्कीन यांनीही रंगवलेली आहे. पण हे संपत आलेलं जग आहे. ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ ही संपलेल्या एका आदर्श जगाची कथा आहे. त्यापुढे सुरू होणार आहे तो आपल्या सर्वाना माहीत असलेला कटू वास्तवाचा, कधी न संपणारा काळ. मग त्यात प्रत्येक जण हवे ते रंग भरण्यास मोकळा आहे. मनाला हुरहुर लावणारं हे कथानक आहे.
मध्य-वसुंधरेतल्या अनेकविध वंशांच्या सुखासमाधानाने चाललेल्या जीवनांत दुरात्मा, सर्वसत्ताकांक्षी सॉरॉन याच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे दु:खाची काळी सावली येत चालली आहे. अगदी प्रदीर्घ काळापासून सर्व सुजन त्याच्याशी संघर्ष करत आले आहेत. तो कधी जिंकला, कधी हरला; पण तो नष्ट मात्र झालेला नाही. त्याने सत्तेसाठी स्वत:चे बळ वाढवायला शक्तिमान अशा मुद्रिकांची निर्मिती करून घेतली. या मुद्रिकांच्या शक्तीच्या प्रभावाने तो साऱ्या जगावर स्वत:चं अधिराज्य गाजवू शकतो. त्यातली एक मुद्रिका म्हणजे जणू त्याच्या ताकदीचा कणा आहे. पण तीच मुद्रिका एका प्राचीन युद्धात त्याच्याकडून काढून घेण्यात आली होती. त्याचं वर्चस्व पुन्हा वाढत जात असताना त्याच्याकडे फक्त त्याच एका शक्तिमान मुद्रिकेची कमतरता आहे. शायर नावाच्या प्रांतातल्या एका सुस्त गावातला तरुण हॉबिट फ्रोडो बॅगिन्स अचानक या साऱ्या नाटय़ात ओढला जातो. ती शक्तिमान मुद्रिका त्याच्या हातात आली आहे. स्वत:चं घर आणि गाव सोडून तो मध्य-वसुंधरेच्या भूप्रदेशांमधून विपदांनी भरलेल्या वाटा धुंडाळत अंत:पर्वताच्या टोकावरील अग्निरसाच्या खाईपर्यंत जाण्यासाठी निघाला आहे. यात त्याच्यासोबत आहेत त्याचे जिवाला जीव देणारे साथीदार आणि विविध वंशांचे, विविध क्षमतांचे सुजन. वाटेत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मोरियाच्या खाणीत एका दुष्टात्म्याशी लढा देताना त्यांना त्यांचा मार्गदर्शक जादूगार गॅन्डॉल्फला गमवावं लागतं. मुद्रिकेचे साथीदार वेगवेगळ्या मोहिमांमध्ये गुंतले आहेत. मुद्रिकेच्या साथीदारांपैकी एक असणारा एरगॉर्न हा प्राचीन राजांचा वारस म्हणून पुढे आला आहे. रोहॅनच्या अश्वयोद्धय़ांच्या साथीने तो आयसेनगार्डच्या सैन्याशी लढाई करून हॉर्नबर्ग इथे विजय संपादित करतो. ऑर्क्‍सच्या ताब्यातून निसटून मेरी आणि पिपीन फॅनगॉर्नच्या जंगलात शिरतात आणि त्यांची वृक्षमानव एन्ट्सशी भेट होते. गॅन्डॉल्फ चमत्कारिकरीत्या परत येऊन दुष्ट जादूगार सारूमानचा पराभव करतो. इकडे सॅम आणि फ्रोडो मुद्रिका नष्ट करण्यासाठी मॉरडॉरच्या दिशेने वाट काढत आहेत. आता श्मीगल ऊर्फ गॉल्लम त्यांच्या सोबतीला आहे. अजूनही तो त्याच्या अनमोल सोनुलीमागे वेडापिसा आहे. दुसरीकडे सॉरॉन हा एरगॉर्नच्या अधिपत्याखालील सैन्याशी अखेरच्या लढाईसाठी सज्ज झाला आहे.
तीन भागांमध्ये विखुरलेलं हे कथानक वरवर पाहता एक भन्नाट, चमत्कृतीपूर्ण अशा घटनांनी भरलेलं वाटत असले, तरी प्रत्यक्षात त्यात याहून अधिक काही आहे जे आजवर वाचकांना मोहवत राहिलं आहे. ज्यात अनेक शक्तिमान, अतिमानवी आणि दैवी शक्ती असलेले मानवेतर वंश होते. शिवाय माणसांपेक्षाही खालच्या स्तरावरचे वंशही होते. पण त्यांनाही एक देदीप्यमान असा भूतकाळ होता, ज्याच्या खाणाखुणा आता संपत चालल्या आहेत. माणसाला स्वत:च्या श्रेष्ठत्वाबद्दल अनेक भ्रम कायमच राहिलेले आहेत. आपला इतिहास हा अधिकाधिक भव्यदिव्य करण्याची महत्त्वाकांक्षा त्यातूनच जन्माला येते. महाकाव्यांचा, दंतकथांचा जन्मही याच भावनेतून येतो. टॉल्कीन मात्र या भावनेलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत नाही ना अशी जाणीव या कथा वाचताना होते. अगदी सुरुवातीस उद्धृत केलेलं वाक्य याची साक्ष म्हणून देता येईल. सॉरॉनचं कृष्णसाम्राज्य संपविण्यासाठी अतिमानवी व मानवेतर शक्तिसोबतच हॉबिट्ससारख्या बुटक्यांचीही मदत घ्यावी लागते. किंबहुना त्यांच्यामुळेच सॉरॉनचा जीव असलेली शक्तिमुद्रिका नष्ट होते आणि सॉरॉनही. माणूस सर्वश्रेष्ठ आहे आणि त्यातही आपण ज्या वंशातले आहोत तोच वंश श्रेष्ठ आहे ही माणसांची भूमिका अगदी प्राचीन आहे. दोन महायुद्धांचा अनुभव घेतलेल्या टॉल्कीन यांना या सर्वश्रेष्ठत्वाची खिल्ली उडवावीशी वाटते का, अशी शंका येते.
सॉरॉन नष्ट झाल्यानंतरचा जो काळ टॉल्कीन रंगवतात तो मनन करण्यासारखा आहे. अतिमानवांची शक्ती नष्ट झाली आहे. हॉबिट्सचं वसतिस्थान असलेल्या शायरच्या प्रदेशात नवीन घडामोडी घडत आहेत. जुनं जग नष्ट होऊन नव्याची चाहूल लागत आहे, पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर आधारलेलं हे जग पुन्हा नष्ट करण्यात येतं. हॉबिट्स आपल्या जुन्या जगातच अधिक खूश आहेत. जुना काळच चांगला होता असं प्रत्येक पिढीला वाटतं. कोणतीही पिढी त्याला अपवाद नसते. टॉल्कीन हा तंत्रज्ञानाच्या विरोधात होता; जुन्या, रूढीबाज जगावर त्याचा जास्त विश्वास होता असा आरोप अनेकांनी त्याच्यावर केला आहे. ज्याला हॉबिट्सचं जग रंगवण्यात जास्त आनंद मिळतो, अशा टॉल्कीनबद्दल काही विधान करणं हे तसं धाडसाचं ठरतं. माणसांपेक्षा, मानवेतर वंशांपेक्षा दुबळे हॉबिट्स जग वाचवतील असं दाखवण्यामागचा त्याचा हेतू अनाकलनीय आहे. ही रूपककथा नाही असं त्यानं ठासून म्हटलंय, पण माणसांतीलच दुबळ्या घटकांचा तो पुरस्कार करतोय असं वाटण्याची शक्यता जास्त आहे. साम्राज्यपिपासू महासत्तांनी केलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या भीषण संहारानंतर सामान्य माणसांचं नष्ट झालेलं जग सामान्य माणसांनीच पुन्हा उभं केलं. त्या संदर्भात ही कथा वाचता येते.
या महाकादंबरीचा आणखी एक विशेष म्हणजे टॉल्कीनने वापरलेल्या भाषा. या भाषा त्याने स्वत: तयार केल्या होत्या. स्वत: भाषातज्ज्ञ असल्याने त्याने त्यावर विशेष मेहनत घेतली आहे. मूळ कादंबरीत त्यावर भरपूर परिशिष्टं लिहिण्यात आली आहेत. एखादी नवी भाषा तयार करण्यामागे केवळ वेगळेपणा जपण्याचा हेतू होता की त्याला आवडणाऱ्या वेल्श भाषेची महत्ता लोकांपुढे आणायची होती, हे टॉल्कीनच जाणो; पण अशी भाषा तयार करणं काही सोपं काम नाही. दुर्दैवानं या कादंबऱ्यांचे अनुवाद करताना या भाषेचं काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो. स्वत: टॉल्कीन हा या अनुवादांबाबत फारसा समाधानी नव्हता. मराठीचं उदाहरण घेतलं, तरीही हे स्पष्ट होतं. अनुवादाची रंगत वाढवण्यासाठी मूळ टॉल्कीनच्या भाषांसोबतच मराठीतील विविध बोलीभाषांचा वापर करता आला असता. मराठीतच पन्नासेक बोलीभाषा आहेत. त्यातील काहींचा उपयोग करून या कादंबरीतील विविध वंशांच्या लोकांना ठसठशीत भाषिक ओळख देता आली असती, पण ते झालेलं नाही.
टॉल्कीनची ही कादंबरी वांशिक दुजाभाव करते, असाही तिच्यावर आरोप करण्यात येतो. त्यातील सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींची बाळबोध वर्णनं, अनेक व्यक्तिरेखांची संक्षिप्त माहिती, लांबलचक, कंटाळवाणी वर्णनं यामुळे कादंबरी वाचताना कंटाळा येऊ शकतो, पण तसा तो येत नाही. कारण त्यात माणसांना जगण्यासाठी कायमच प्रेरित करणारं आशेचं अतूट सूत्र आहे. फ्रोडो बॅगिन्स हा छोटासा हॉबिट त्याचं प्रतीक आहे. त्याला मदत करणारे साथीदार हे मानवतेचे, या सृष्टीचे, मांगल्याचे साथीदार आहेत. ही गोष्ट आजही आपल्याला आकर्षित करण्यासाठी पुरेशी आहे.
मराठीत अशा प्रकारच्या महाकाय कादंबऱ्या नाहीत असं नाही. श्री. ना. पेंडसे यांची ‘तुंबाडचे खोत’, विश्वास पाटलांच्या ‘महानायक’, ‘लस्ट फॉर लालबाग’, रणजीत देसाई यांची ‘श्रीमान योगी’ ही काही उदाहरणं देता येतील, पण यांत काल्पनिक जगतावर आधारित फॅण्टसी मात्र नाही. त्यामागे अनेक कारणं आहेत. पण या निमित्ताने तरी त्याला चालना मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.
‘डायमंड पब्लिकेशन्स’ आपल्या प्रकल्पात्मक कामांसाठी प्रसिद्ध आहे. अशा कामांमध्ये एक मोठा व्यावसायिक धोका असतो. तो धोका पत्करून त्यांनी आजवर अनेक चांगले प्रकल्प सादर केले आहेत. टॉल्कीन यांचा हा अफाट ठेवा प्रसिद्ध करून त्यांनी मराठी वाचकांना पुन्हा एकदा एक चांगली भेट दिली आहे. या कादंबरीचा अनुवाद करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे अनुवादात अनेक त्रुटी असूनही मुग्धा कर्णिक यांचं अभिनंदन करावं लागेल. मोठय़ा जिद्दीनं त्यांनी हा अनुवाद पूर्ण केला. या कादंबरीसाठी डायमंडने लन ली यांची चित्रे वापरली आहेत. ली यांनीच ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्जच्या’ तिन्ही चित्रपटांसाठी संकल्पनात्मक कलाकृती निर्माण करण्याचं काम केलं. त्यातील ‘द रिटर्न ऑफ द किंग’ या सिनेमाच्या कामाबद्दल ‘बेस्ट आर्ट डायरेक्शन’साठी त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या चित्रांमुळे या कादंबरीचं निर्मितीमूल्य वाढलंय. एक देखणी निर्मिती केल्याबद्दल डायमंड पब्लिकेशन्सचं अभिनंदन! वाचकांनी या साहित्य मेजवानीचा पुरेपूर आनंद लुटावा.
‘स्वामी मुद्रिकांचा’ (भाग १ ते ३ संच)
मूळ लेखक – जे. आर. आर. टॉल्कीन,
अनुवाद – मुग्धा कर्णिक,
डायमंड पब्लिकेशन्स,
पृष्ठे – १६३०, मूल्य – १८०० रुपये
प्रतीक पुरी 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 1:01 am

Web Title: the lord of the rings part 123
Next Stories
1 एकल (सरोगसी) पिता
2 सरोगसी हवीच कशाला?
3 तो राह्यलाय अद्याप नामनिराळा
Just Now!
X