हेन्री मिलरच्या The Time of the Assassins’ या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार आणि लेखक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला अनुवाद..
‘विनाशवेळा’ पुढील आठवडय़ापासून ‘लोकरंग’ पुरवणीत प्रसिद्ध होत आहे..  तत्पूर्वी या अनुवादाबद्दल आपले मनोगत मांडणारा त्यांचा लेख..

ज्यां निकोलस ऑर्थर रँबो हा फ्रेंच कवी (१८५४-१८९१) मराठीत फारसा कोणाला माहीत नाही. ह्य प्रतिभावंताच्या कवितांचे भाषांतर मराठीत नाही आणि भाषांतराला तो अती दुष्करही आहे. त्याच्या नावाचा उच्चारही नक्की कसा, तो आपल्याला कळत नाही. अ‍ॅनेट् ह्य माझ्या फ्रेंच मत्रिणीला मी नक्की उच्चार काय, म्हणून विचारले तेव्हा तिने ‘रँ’ हा उच्चार घशातून काढला व हा ‘रँ’ही ‘रं’ व ‘रँ’ ह्यंच्यामधला कुठलातरी आहे. मी सोयीसाठी त्याला रँबो म्हणतो. फ्रेंच जाणणाऱ्यांनी क्षमा करावी.
माझी ह्य कवीशी ओळख मी एम. ए. करत असताना झाली व ती अगदी धूसर होती. कवी म्हणण्यापेक्षा ओळख झाली ती आधी त्याच्या कवितांशी. आधी त्या मला कळल्याच नव्हत्या. मी त्या वाचल्या त्याही इंग्लिश भाषांतरातून. १९६० चे दशक फ्रेंच लेखकांनी- सात्र्, कामू, बेकेट ह्यंनी व्यापून टाकले होते. त्यांची पुस्तके वाचताना त्या अनुषंगाने कुठेतरी रँबोचीही कविता वाचून पाहिली. पण तेवढेच. पुन्हा आम्ही भेटू असे वाटले नव्हते.
पण फार पुढे ह्य कवीबद्दल हेन्री मिलर (१८९१-१९८०) ह्य अमेरिकन लेखकाचे ‘The Time of the Assassins’ हे पुस्तक मी वाचले व त्याने फटकाच बसला. मिलरच्या साहित्याशी मी परिचित होतो. पण त्याचे हे पुस्तक त्याच्या इतर साहित्यात त्याच्या वेगळेपणाने उठून दिसते. त्याची इतर पुस्तके मनातून मावळली एक-एक करून; पण ह्य पुस्तकाने मात्र माझ्या मनाचा कब्जा घेतला आहे तो आजतागायत.
मी गेली पस्तीस वष्रे, वर्षांतून निदान एकदा तरी, हे पुस्तक वाचत आहे. दरवेळी नवीन त्यात काहीतरी सापडते. त्याला कुठल्या वर्गातही टाकता येत नाही. ते समीक्षा नाही, चरित्र नाही, आत्मनिवेदन नाही, अभ्यास नाही; पण ते मनाचा ताबा घेते एखाद्या संकीर्ण व अनेकार्थ कवितेने घ्यावा तसा. म्हणूनच वाचक वारंवार ह्य पुस्तकाकडे वळतो. त्यात त्याला कधी स्वत:चे प्रतिबिंब दिसते, कधी विश्लेषण, त्याला त्यातून कधी पाठबळ मिळते.
रँबो वारला त्याच वर्षी मिलर जन्मला. त्यानंतर पन्नास वर्षांनी त्याने हे पुस्तक लिहिले. त्याला ही निकड का वाटली, त्याचे उत्तर हे पुस्तक वाचता वाचताच कळते. दोघेही प्रतिभावंत, दोघेही तिरपागडे, दोघांनीही लोकाचाराच्या चौकटीत जगणे नाकारले, दोघांनीही भाषेचे, तंत्राचे, रूपाकाराचे प्रयोग केले व त्याचा परिणाम नंतरच्याही लेखकांच्या पिढय़ांवर होत राहिला. विसाव्या शतकातलीही फ्रेंच कविता रँबोच्या प्रभावातून मुक्त होऊ शकली नाही व अमेरिकन वाङ्मयात मिलरचे घराणेच निर्माण झाले.
रँबो हा सुरिआलिझमचा उद्गाता. त्याच्या कवितेत स्वत:चे स्वतंत्र तर्कशास्त्र असलेला स्वप्नलोक थरथरत असतो. आन्द्रे ब्रेताँपासून आन्द्रे फ्रनोपर्यंतच्या कवींनी त्याचा प्रभाव मान्य केला आहे. रँबो हा वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर फ्रेंच साहित्यातही enfant terrible म्हणून गाजत राहिला. त्याचे जगणे जसे प्रमाथी, अफाट तशीच त्याची भाषा. त्याने कवितेची भाषा नव्याने घडवली. ती घडवताना त्याने तिची मोडतोड केली व सुस्थित लोकांना हादरवील असे अभद्र शब्दही त्याने बिनदिक्कत वापरले. नामदेव ढसाळांच्या कवितांनी आपल्याकडचा भद्र वाचक कसा हादरला होता त्याची आठवण करून पाहा. म्हटले तर नामदेव व रँबोमध्ये बरेच साम्य होते. दोघेही विप्लवी होते व दोघांनीही कवितेतली सांकेतिकता, शिष्टाचार लक्तरासारखे करून स्वत:चे निशाण उंच फडफडवले. नामदेवने विस्थापितांच्या नावाने द्वाही फिरवली व प्रस्थापितांच्या आसनांखाली सुरुंग पेरले. ह्य बाबतीतले त्याचे रँबोशी असलेले साम्य विलक्षण आहे. पण नामदेवने पायाखालची जमीन सोडली नाही की दारुण वास्तव. त्यात तो धगधगत राहिला. पण रँबो ह्यपलीकडेही गेला. बंडखोरपणा हे एक अंग त्याच्याही कवितेचे होते. पण त्याला ह्य सर्वाना उल्लंघून पलीकडे जायचे होते, अज्ञाताच्या प्रदेशात पाऊल टाकायचे होते. ह्य अथक आत्मशोधाबरोबरच रँबोची डेथविश जबर आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी कविता लिहायला सुरुवात करून एकोणिसाव्या वर्षी त्याने कवितेपासून फारकत घेतली ती कायमची. त्यानंतर मग नुसती फरपट व वणवण. त्याचे आयुष्य म्हणजे एक प्रदीर्घ आत्महत्या आहे असे वाटते. मिलरने त्याच्या ह्य व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचा अनेक अंगांनी वेध घेण्याचा ह्य पुस्तकात प्रयत्न केला आहे; व तो करता करता रँबोच्या व स्वत:च्या जीवनातली, प्रेरणांमधली, जगण्याच्या शैलीमधली साम्ये व विरोध मिलर अतीव उत्कटतेने व्यक्त करतो. हे सर्वच निवेदन कविता म्हणावे इतके काव्यात्म आहे व इतके वैयक्तिक आहे, की हळूहळू प्रत्येक वाचकाला ते आपलेच निवेदन आहेसे वाटू लागते.
हे सर्वच निवेदन आत्मपर असले तरी वैयक्तिकतेच्या पलीकडे मात्र ते कायम जाते. कारण रँबोबद्दल व स्वत:बद्दल बोलता बोलता मिलर काही मूलभूत गोष्टींबद्दल बोलतो. त्या मूलभूत गोष्टी पूर्वीही होत्या, आज आहेत व उद्याही राहतील. कवी (किंवा कुठलाही कलावंत) ह्यचे स्वत:शी असलेले नाते, समष्टीशी असलेले नाते, अवतीभवतीच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरणाशी असलेले त्याचे नाते, त्याचे तुटलेपण व एकाकीपण, संवादासाठी चाललेली त्याची धडपड अशा अनेक सार्वकालिक गोष्टींकडे मिलर स्वत:च्या वैयक्तिक िभगातून पाहतो. मिलरची दृष्टी इतकी तीक्ष्ण व तळमळ इतकी टोकाची, की ह्य सर्व चिरंतन प्रश्नांना तो खेचत आध्यात्मिकाच्या प्रदेशात नेतो.
मिलरचे हे निवेदन वाचताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे. १९४५ ला हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. दुसरे महायुद्ध नुकतेच lr03 संपून युरोपची पूर्ण होरपळ व वाताहत झालेली आहे व अमेरिकेने नागासाकी व हिरोशिमावर बाँबवर्षांव करून एका अतिभीषण संहारयुगाची सुरुवात केलेली आहे. ही पाश्र्वभूमी ह्य निवेदनाच्या पृष्ठभागाखाली नाडी थाडथाड उडावी त्याप्रमाणे कायम स्पंदन पावत आहे. त्या काळात सर्व जगच अणूच्या सर्वसंहारक सामर्थ्यांने व ते वापरणाऱ्या निर्मम शक्तींच्या व शासनांच्या निर्गल सत्तालोभाने भयभीत झालेले होते. उद्याची सकाळ तरी आपल्याला दिसते की नाही, ह्य भयाने सर्व जग ग्रासलेले होते. रशिया व अमेरिका ह्य दोन महाशक्तींचा अण्वत्रे निर्माण करण्याचा वेग व त्याबाबतीतली परस्परांशी स्पर्धा ही इतकी आंधळी होती, की भल्याभल्यांच्या काळजाचा ठाव तेव्हा सुटलेला होता. सर्वविनाशाची धमकी सगळ्या जगात दहशतीसारखी पसरलेली होती. मिलरसारख्या प्रतिभावंत, संवेदनशील, जीवनावर रसरसून प्रेम करणाऱ्या लेखकाचे मन तर कायम त्याने पछाडलेले असावे ह्यत आश्चर्य नाही. त्याच्या ह्य पुस्तकाचे नावच किती अन्वर्थक व बोलके आहे. ह्य काळ्याकुट्ट कालखंडातून कोणी प्रकाशवाट दाखवलीच तर ती फक्त द्रष्टा कवीच दाखवू शकतो अशी मिलरची श्रद्धा होती. अविवेकी, सत्ताकांक्षी शासन आणि त्याला सर्वसामान्यांचे नसलेले सोयरसुतक ह्यबद्दल मिलर आवेगीपणाने लिहितो. त्याचा पूर्णपणे भ्रमनिरास झालेला आहे व आजच्या काळाबद्दल लिहिताना तो म्हणतो, ‘everything we are taught is false.’ जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये, रणभूमीवर, प्रयोगशाळांमधून, कारखान्यांमधून, वर्तमानपत्रांमधून, शाळा, चच्रेस सगळीकडे तोच तो खोटेपणा, वांझ बरडपणा पसरलेला आहे व पुढे काही दिसत नाही म्हणून आपण मेलेल्या विचारांनी, मेलेल्या धर्मपंथांनी, मेलेल्या विज्ञानानी भरलेल्या भूतकाळात जगत आहोत असे मिलरला वाटते. ‘It is the past which is engulfing us, not the future’ असे तो म्हणतो व तिथेच तो ग्वाही देतो की, भविष्य नेहमीच कवीच्या हातात होते व आताही राहील.
शासन, शासक व सर्वसामान्य लोक ह्यंच्या नात्याचे मिलरने केलेले विश्लेषण व वर्णन इतके सार्वकालिक आहे की कोणालाही, कुठल्याही देशात, कुठल्याही काळात त्याची अनुभूती कधी ना कधी आलेली असते.
अमेरिकन शासन व समाज ऐहिकतेच्या व धनसत्तालोभाच्या गाळात इतका बुडाला आहे की त्याने कवीला ह्य भूमीवरून हद्दपारच केले आहे असे मिलरला वाटते व अशा समाजाचा ऱ्हास अनिवार्य आहे व त्याला काही भवितव्य नाही, हेही तो उच्चरवाने सांगतो. ‘Politics has become the business of gangsters’ असे तो नि:संदिग्ध शब्दात म्हणतो तेव्हा आजही- व आज तर नक्कीच- जगभरचे लोक त्याला मान हलवून तात्काळ अनुमोदन देतील.
*****
वरील विवेचन रँबोबद्दल व मिलरबद्दल अगदीच जुजबी माहिती देणारे आहे. त्यांच्याबद्दल विस्ताराने लिहायचे झाले तर पुस्तकेच लिहावी लागतील. तशी ती लिहिलीही गेलेली आहेत. जिज्ञासूंना ती इंटरनेटवर सहजच उपलब्ध होतील.
ह्य मजकुराच्या जोडीने मी ‘पश्चिमप्रभा’ ह्य माझ्या पुस्तकातले ह्यच पुस्तकावरचे टिपण जोडलेले आहे. त्याने ह्य जुजबी माहितीत भर पडेलसे वाटते म्हणून.
हा मराठी अनुवाद शब्दश: भाषांतर नव्हे. तो पूर्णपणे मराठीच वाटावा म्हणून मी काहीसे(च) स्वातंत्र्य घेतलेले आहे. क्वचित् एखाद् दोन वाक्येही- ती अनावश्यक वाटली म्हणून- मी गाळलेली आहेत. पण असे करताना मूळ ऐवजाला व निवेदनाला थोडाही धक्का लागणार नाही ह्यची माझ्यापरीने तरी काळजी घेतली आहे. ह्य मराठी अनुवादाच्या वाचनाने मिलरच्या मूळ पुस्तकाकडे वाचक वळले तर मला फारच आनंद होईल. मिलरचे हे लेखन आवेगी, उत्कट, प्रपातासारखे आहे. वाचताना दमछाक होते. अर्थ व संगती वारंवार हातातून निसटतात. भोवऱ्यात सापडल्यासारखे होते. पण मधूनच तो असे काही वाक्य/ वाक्ये लिहितो की वीज कडकडून आसमंत उजळावा तसे त्यांनी मन झगकन् प्रकाशित होऊन जाते. आणि काय त्याची इंग्रजी भाषा!
lr04हा अनुवाद हाती घेतला तेव्हा ह्यचे काय होणार, काही होईल का, हा विचार मनात नव्हता. तो झाल्यानंतरही तीन वष्रे पडूनच होता. पण नुकताच मी तो पुन्हा वाचला व वाटले की मराठी वाचकांच्या हाती तो सुपूर्द करावा. त्यानंतर मग सगळ्याच गोष्टी भराभर व सहजपणे घडत गेल्या. ‘मौजे’ने तो प्रकाशित करण्याची एका पायावर तयारी दाखवली. ‘लोकसत्ता’ स्तंभरूपाने तो छापायला उत्सुक होते. त्यांच्या सहकार्याने मन तृप्त झाले. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मिलर इस्टेटचे संचालक जॉर्ज हॉफमन ह्यंनी व New Directions Publishing Corporation, New York ह्यंनी काहीही खळखळ न करता अगदी जुजबी अटींवर हा अनुवाद प्रसिद्ध करण्यासाठी परवानगी दिली. त्यांचा मी मनापासून आभारी आहे.
***
वयाच्या एका टप्प्यावर ‘हेन्री मिलर’ ह्य अमेरिकन लेखकाने फार भुरळ पाडली होती. त्याची Nexus, Plexus आणि Sexus  ही कादंबरीत्रयी तर साठीच्या दशकात नव्या लेखकांचे बायबल होऊन बसली होती. मिलरच्या प्रतिभेबरोबरच त्याच्या अफाट जीवनशैलीचेही आम्हाला आकर्षण होतेच. भारतीय मध्यमवर्गीय चौकटीत करकचून जाणाऱ्या आम्हाला मिलरच्या मुक्त, बेबंद आयुष्याचा थोडा हेवा वाटत होता, बरेचसे आकर्षण. पण असे जगताना त्याची चोख किंमतही खणखण मोजावी लागते; दारिद्रय़ाच्या रूपाने, बदनामीच्या रूपाने, सामाजिक उपेक्षेच्या रूपाने- हे तेव्हा कळत नव्हते. अनुभव दूरच. त्याच काळात रँबो ह्य एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेल्या कवीच्या कवितांचा अनुवाद प्रथम वाचला व केशवसुतांनी सांगितलेला ‘हाती वीज धरण्याचा’ अनुभव आला. वयाच्या सोळाव्या वर्षी रँबोने कवितालेखन सुरू केले व एकोणिसाव्या वर्षी ते समारंभपूर्वक बंद करून मध्य-पूर्वेतल्या वाळवंटात वणवण सुरू केली. तेही कॅन्सरने एक पाय गमावलेल्या अवस्थेत. ही वणवण काही फक्त त्याच्या शरीराची नव्हती. कुठल्यातरी आंतरिक वणव्यात त्याचा आत्माही असाच तळमळत वणवणत होता. त्याचे अ रीं२ल्ल ्रल्ल ऌी’’ह्ण वाचून हादरून न जाणारा रसिक विरळा. पण असे हे दोन आवडीचे लेखक- हेन्री मिलर व रँबो- एकत्र येतील असे मला चुकूनही वाटले नव्हते. आणि अवचित १९७७ साली विजयवाडा रेल्वेस्टेशनवर मिलरचे ‘The Time of the Assassins’ मिळाले आणि आयुष्य पूर्ववत राहिले नाही. हे पुस्तक म्हणजे मिलरने रँबोच्या व्यक्तिमत्त्वाचा व काव्याचा अन्योन्य संबंध काय, रँबोच्या कवितेची प्रतिज्ञा काय व अखेर कवीच कसा प्रेषित असतो, ह्यची विलक्षण आस्वादक समीक्षा तर आहेच; पण त्याचवेळी हे पुस्तक खुद्द लेखकाचेही आध्यात्मिक आत्मवृत्त आहे. ह्य पुस्तकाने रँबो जितका कळतो त्यापेक्षा मिलर जास्त कळतो. मिलर रँबो ह्य आपल्या वण्र्यविषयाशी इतका एकरूप होतो, की दोघांच्याही आत्मिक प्रवासातल्या तडफडीचा आलेख काढता काढता आपल्या प्रतिभेच्या बळाने ती तडफड मिलर एका आध्यात्मिक उंचीला नेऊन ठेवतो व तिला सार्वकालिक करतो. कुठल्याही गंभीरपणे लेखन करणाऱ्या व्रतस्थ लेखकाला या निवेदनात आपलेच प्रतििबब दिसते. श्री. गिरीश कार्नाडांना हे पुस्तक मी दिले तेव्हा ते वाचून म्हणाले होते, ‘कुठल्याही लेखकाला हा आरसाच वाटेल.’ वाटतो खरा. सगळेच जातिवंत लेखक एका अर्थाने आतून वणवणतच असतात. ते ह्य जगात असतात, पण जगाचे नसतात. ते कायम कुठल्यातरी अज्ञात शक्तीविरुद्ध बंड करून उभे असतात व कायम नियती त्यांना फरफटत असते आणि ह्य सर्व व्यवहारात त्या कवीचा आत्मा अधिकाधिक तेजाळत जातो व त्याच्या प्रकाशात भवतीच्या अंधारातल्या भूतसावल्यांना थोडे आश्वासन मिळते.
मिलरला त्याच्या व रँबोच्या जीवनतृष्णेत व ठरवून केलेल्या दिशाहीन भटकंतीत कमालीचे साम्य दिसते. ‘He was a man for whom a thousand lives were not sufficient to explore the wonders of the earth, a man who broke with friends and relatives at an early age in order to experience life in its fullness…’
ही वणवण कशासाठी? आपणच सगळे बंध, सगळी नाती तोडून टाकण्याची घाई कशासाठी? जग आपल्याला धिक्कारील या भयापोटी आपणच ते आधी अव्हेरून आपला आत्मसन्मान टिकवावा, अशी तर भावना ह्यमागे नाही? मिलर लिहितो, ‘The fear which every creative artist knows : that he is unwanted, that he is of no use in the world.’ अवतीभवतीचे सुसंस्कृत नागर जग’ रँबो व मिलर दोघांनाही श्वापदांनी भरलेल्या अरण्यासारखे वाटते व त्यांच्यापासून आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून दोघेही त्या जगापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. ह्य दोघांचीही जीवने विचित्र विरोधाभासांनी भरलेली आहेत. जगापासून फटकून वागत असतानाच त्यांचा ‘The search for one’s true link with humanity’ मात्र संपतच नाही. हे करत असता माणसांनी भरलेल्या जगात नुसती पोकळी असण्याचा अनुभव दोघेही घेतात. ‘One longs to find his peer, but one is surrounded by vast empty spaces.’
कसला शोध घेत आहेत हे दोघेही? बंडखोरीचा वसा घेतलेले हे दोन लेखक अखेर जीवनाकडून कसली अपेक्षा करत आहेत? मिलरच सांगतो : ‘And for the rebel above all men it is necessary to know love, to give it even more than to receive it, and to be it even more than to give it.’
पण स्वत:च मूíतमंत प्रेम बनून राहण्याच्या टप्प्यापर्यंत येणे सोपे नाही. उलट, तिथपर्यंतचा प्रवास यातनामय आहे ह्यची जाणीव रँबोच्या आयुष्याबद्दल लिहिता लिहिता मिलरला प्रखरपणे होते. ह्य प्रवासात आपण केलेल्या चुकांनी व पापांनी तडफडणारे मन आहे. हे मन ईश्वरापासून तुटले आहे व त्या तुटलेपणातूनच त्याला सर्जनाची प्रेरणा मिळत असते. ‘Creation begins with a painful seperation from God.’ ह्यसाठी जी किंमत कलावंताला अटळपणे द्यावी लागते ती देण्याचीही रँबोप्रमाणेच मिलरचीही तयारी आहे. एका विचित्र गुर्मीत मिलर तर म्हणतो, ‘One thing is certain. God does not want us to come to him in innocence. We are to know sin and evil, we are to stray from the path, to get lost…’
ह्य हरवलेपणातून, तुटलेपणातूनच धर्य, नम्रता, संयम उमलू लागतात व स्वीकाराची तयारी होते. ‘Acceptance is the key word.’ पण स्वीकार म्हणजे शरण जाणे नाही, तर स्वीकार म्हणजे वाटय़ाला आलेल्या दु:खापेक्षा स्वत:च मोठे होणे व त्या दु:खाला क्षुद्र करून टाकणे. भारतीय मनाला तर ही कल्पना अतीव जवळची वाटेल. अवतीभवतीही प्रत्यक्षात आपण ही उदाहरणे पाहतोच. पण ज्ञानेश्वर हे ह्य स्वीकाराचे सर्वोत्तम उदाहरण व हे करत असताना एकही कडवट उच्चार त्यांच्या मुखातून निघत नाही. मिलरने सांगितलेली प्रेममयता ते मूíतमंत होतात व फक्त देण्याकरताच उरतात. पण हे उदाहरण विरळ. एरवी मिलर काय किंवा रँबो काय, ही तुमच्या-माझ्यासारखी विकारवासनांनी कुतरओढ होत असणारी, प्रकाशाची ओढ वाटत असता अंधारात हरवून जाणारी, श्रेयस शोधता शोधता ऐहिकतेच्या गाळात अधिकाधिक खोल रुतत जाणारी माणसे. म्हणूनच ती जवळची वाटतात. ज्ञानेश्वरांच्या सावलीला आपला थकलाभागला जीव आपण नेऊ. पण आपले सुखदु:ख भडाभडा वाटून घ्यायचे तर रँबो व मिलरकडेच आपण जाणार. ते सहोदरच वाटतात कुठल्याही कलावंताला.

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
ग्रामविकासाची कहाणी
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी