या हेन्री मिलर यांच्या ललितबंधाचा ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद.. ‘विनाशवेळा’!
अगदी लहानपणापासून मी प्रचंड वाचणारा. ख्रिसमसला एकेका वेळी वीस-वीस, तीस-तीस पुस्तकं मागायचो मी. अगदी पंचविशी येईपर्यंत एखाद् दोन तरी पुस्तकं बरोबर घेतल्याशिवाय मी कधी घर सोडलं नाही. कामावर जातानाच काय, अगदी उभ्या उभ्याही मी वाचायचो; आवडत्या कवींच्या कवितांतले उतारे पाठ करायचो. मला आठवतंय, गोएटेचं ‘फाऊस्ट’ त्यातलं एक. पुस्तकांमध्ये सतत बुडून राहण्याचा एक महत्त्वाचा परिणाम माझ्यावर असा झाला की माझी बंडखोरी अधिकच भडकली. माझी प्रवास-भटकंतीची, अ‍ॅडव्हेंचरची सुप्त इच्छा चाळवली गेली. मी चक्क साहित्यविरोधी झालो. माझ्या अवतीभोवतीच्या सगळ्याबद्दल मला तुच्छता वाटायला लागली. त्यामुळे मग सगळ्या मित्रांपासून मी दुरावलो. परिणामत: एकांडेपणाचा, तिरिशगरावपणाचा शिक्का माझ्यावर बसून मी अगदी विक्षिप्त म्हणून गणला जाऊ लागलो. वयाच्या अठराव्या वर्षांपासून (रँबोचंही हेच वय अशा घालमेलीचं.) मी अगदी खात्रीपूर्वक अस्वस्थ, कमालीचा दुखी, तळमळणारा, नराश्यानं ग्रासलेला असा झालो. एकविसाव्या वर्षी मी सगळे बंध तोडले; पण फार काळासाठी नाही. रँबोप्रमाणेच माझ्याही सुरुवातीच्या उडय़ा फसल्या. मी, स्वखुशीनं किंवा नाखुशीनं, सारखा घरी परतायचो, आणि तेही अगदी टोकाच्या निराश अवस्थेत. काही सुटका दिसेना की मुक्तीचा मार्ग दिसेना. जे श्रम करण्याचा माझा वकूबही नव्हता असे निर्थक श्रम मी अंगावर ओढवून घेतले. सायप्रसच्या क्वारीमध्ये रँबोनं केलं त्याप्रमाणे मी कुदळ, फावडं हातात घेतलं, रोजगार केला, इथे-तिथे फिरलो, उनाडपणा केला. आणखी एक साम्य होतं आमच्यात. मी स्वत:ला घरापासून तोडून घेतलं ते उघडय़ावरचं जीवन जगायला. पुन्हा पुस्तक म्हणून वाचायचं नाही, दोन हातांनी श्रमून आपली रोजीरोटी कमवायची, खुल्या जगाचा माणूस व्हायचं, कुठल्याही गावाचा, शहराचा रहिवासी नागरिक व्हायचं नाही.
असं मारे ठरवलं तरी माझी भाषा आणि माझ्या कल्पना माझा कायम विश्वासघात करून मला उघडं पाडत होत्या. मला आवडो की नावडो; मी शंभर टक्के साहित्यिक झालो होतो. माझं कोणाशी म्हणून जमत नव्हतं. विशेषत: सामान्य माणसांशी तर नाहीच. माझे योगच तसे करंटे होते. म्हणजे माझं लायब्ररीमध्ये जे व्हायचं त्याचीच ही मोठी आवृत्ती. म्हणजे लायब्ररीत जाऊन मी कायम चुकीचं पुस्तक मागायचो. मग लायब्ररी केवढीही मोठी असो; मला हवं असलेलं पुस्तक एकतर तिथे नसायचं, किंवा ते नेण्याची मला परवानगी नसायची. असं वाटतं की त्या दिवसांमध्ये मला आयुष्यामध्ये आणि आयुष्याकडून जे जे हवं होतं त्यावर पाबंदीच घातली गेली होती. ह्यवर मग मी भयंकर आरडाओरडा करून थमान घालण्याचा गुन्हा करणं हे क्रमप्राप्त होतं. आधी एकतर लहानपणापासूनच माझी भाषा सभ्य लोकांना हादरवून टाकणारी होती. मला आठवतंय, वयाच्या सहाव्या वर्षीच घाणेरडी भाषा वापरली म्हणून मला पोलिस ठाण्यात फरफटत नेलं होतं. आता तर ती आणखीच हादरवणारी व अभद्र झाली होती.
आपल्या तरुणपणी पत्रांखाली सही करताना रँबो ‘तो हृदयशून्य राक्षस, रँबो’ अशी करीत असे, हे वाचून तर मी उडालोच जागच्या जागी. ‘हृदयशून्य’ हे विशेषण माझ्याबद्दल वापरलं जायचं आणि त्याची गोड सवय पण मला झाली होती. मला काहीही मूल्यं नव्हती, माझ्यात इमानदारी नव्हती, माझ्या वागण्याला धरबंद नव्हता; मला सोयीचं असेल तेव्हा कसलाही विधिनिषेध मी बाळगत नसे. मग ते मित्र असोत की शत्रू. म्हणजे साधारणपणे कोणी माझ्याशी प्रेमानं वागलं की त्याला मी अपमान करून, दुखवूनच उत्तर देत असे. मी उर्मट, उद्धट, असहिष्णु, कमालीचा पूर्वग्रहदूषित, निर्दय, हटवादी असा होतो. थोडक्यात, कोणालाही माझ्याशी जमवून घेता येणार नाही असं निश्चितपणे तापदायक असंच माझं व्यक्तिमत्त्व होतं. तरी मी आवडायचो बाबा लोकांना ! माझ्यातला गोडवा आणि उत्साह पाहून मला माफ करायला लोक उत्सुकच असायचे. त्यामुळे झालं असं, की त्याचा गरफायदा घेण्याची माझी हिंमत वाढली. माझं मलाच खूपदा आश्चर्य वाटायचं की, बरे हे लोक आपल्याला माफ करतात. जे लोक कुठल्याही प्रकारानी माझ्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत असं समजत, त्यांना दुखवणं, त्यांचा पाणउतारा करणं हा तर माझा आवडता खेळ. त्यांच्याशी तर माझी कायम हृदयशून्य लढाई. खरं तर माझा मूळ स्वभाव प्रेमळ, आनंदी, खुल्या दिलाचा असा. लहानपणी तर मला ‘एंजल’च म्हणायचे. पण बंडखोरीचं भूत माझ्यावर मी खूप लहान असतानाच स्वार झालं. आमच्या आईसाहेबांनी बसवलं होतं माझ्या मानेवर एकप्रकारे ते. तिच्याविरुद्ध मग माझी बेबंद ऊर्जा मी पणाला लावली. माझी पन्नाशी येईपर्यंत एकदाही मला तिच्याबद्दल प्रेमानं विचार करता आला नाही. तिनं मला कधी वसकावलं नाही हे खरं (त्याचं निव्वळ कारण- मी तिला पुरून उरणार, हे तिला ठाऊक होतं.); पण तिची सावली एकसारखी आपल्या पायात येतेय असं मला वाटायचं. एखादं विष संथपणे नसांमध्ये इंजेक्शननं उतरावं, तशी ती सावली होती; अबोल, पण नापसंती दाखवणारी, इनिसिडियस म्हणावी अशी.
आपली ‘सीझन ऑफ हेल’ची संहिता रँबोनं आपल्या आईला वाचू दिली हे वाचलं तेव्हा मी आश्चर्यानं थक्क झालो होतो. माझ्या आई-वडिलांना आपलं लिहिलेलं काही दाखवावं, त्यांच्याशी त्याबाबत बोलावं अशी कल्पना मी कधी स्वप्नातही केली नाही. मी लेखक व्हायचं ठरवलंय असं त्यांना मी सांगितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला; जणू काय मी गुन्हेगार व्हायची घोषणा केली होती. जरा काही शहाणपणाचं का नाही वागत हा? पोटापुरते चार पसे मिळतील असं काही का नाही करत? मी लिहिलेल्याची एक ओळसुद्धा त्यांनी कधी वाचली नाही. मी लिहितो हा त्यांच्या दृष्टीनं विनोदाचाच विषय होता. त्यांचे मित्र माझ्याबद्दल चौकशी करत तेव्हा ते म्हणायचे, ‘काय करतो? लिहितो!’ सूर असा, की काय करणार, ह्यला वेड लागलंय- दिवसभर मातीत खेळत असतो.
माझ्या डोळ्यांसमोर लहानगा रँबो येतो तो पोरीचे कपडे घालून नटवलेला असा आणि नंतर तरुणपणी छाकटे कपडे घातलेला. निदान माझं तरी तसं होतं. माझे वडील िशपी होते, त्यामुळे माझ्या कपडय़ांबाबत त्यांचा फारच कटाक्ष. मी मोठा झालो तेव्हा मला वडिलांचे ऐटबाज कपडे वारसा म्हणून भरपूर मिळाले. एकाच मापाचे होतो आम्ही. पण रँबोप्रमाणेच जेव्हा माझं स्वायत्त अस्तित्व सिद्ध करायला मी कमालीचा तडफडत होतो, तेव्हा माझ्या आतल्या तऱ्हेवाईकपणाशी तंतोतंत जुळणारे चित्रविचित्र कपडे मी घालायचो. शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये मी टिंगलीचाच विषय होतो. ह्य काळातला मी आठवतो मला. कुठल्याही ‘कल्चर्ड’ माणसाशी बोलताना मी खूप अवघडून जायचो, असुरक्षित वाटायचं मला स्वतबद्दल, शरमेनं कोळपून जायचो अगदी. ‘कसं बोलायचं मला कळत नाही!’ पॅरिसला बुद्धिवंतांच्या गराडय़ात सापडलेला रँबो म्हणाला होता. पण एकदा बोलायला लागला की त्याच्यापेक्षा अधिक चांगलं बोलणारा कोण होता? हा किती मोहक बोलतो, असं आफ्रिकेतसुद्धा बोललं जायचं. त्याचा तिढा मला इतका पोटातून समजतो म्हणून सांगू! ज्यांच्याशी संवाद साधता यावा म्हणून मी आसुसला असायचो, त्यांच्याशी बोलताना मी किती अडखळायचो, तोतरं बोलायचो, हय़ाच्या दुखद आठवणी माझ्याजवळ आहेत. सामान्य माणसांशी बोलताना मात्र माझ्या जिभेवर सरस्वती. लहानपणापासून शब्दांच्या नादावर माझं प्रेम होतं. त्यांची जादू, भुरळ पाडण्याची त्यांची शक्ती. सगळंच. खूपदा मी शाब्दिक कसरती करायचो. ऐकणारा कासावीस होईल अशा मिनिटामिनिटाला कसरती करायचो. रँबोच्या नुसत्या एका पानावर नजर टाकल्याबरोबर लक्षात आलं माझ्या, की त्याच्याहीमध्ये हाच गुण होता. मला फटकाच बसला. बीव्हर्ली लेनमध्ये राहत असताना मी त्याच्या आयुष्यात बुडून गेलो होतो व त्याचे शब्द मी सगळ्या िभतींवर लिहून ठेवले होते. स्वयंपाकघरात, बठकीत, संडासात. अगदी घराच्या बाहेरच्या िभतीवरसुद्धा. त्या शब्दांचं सामथ्र्य माझ्यासाठी कधीही हरवणार नाही. दरवेळी ते शब्द दिसले की दरवेळी मला तोच अंगभर शहारा, तोच अत्यानंद, त्याच्या शब्दांवर आपण फार रेंगाळलो तर वेडे होऊ अशी तीच भीती. किती लेखक तुमच्यावर असा परिणाम करतात? सगळेच चांगले लेखक आपला पाठलाग करणारी काही शब्दरचना करतात, स्मरणात राहावे असे काही उतारे लिहितात; पण रँबोच्या साहित्यात त्यांची गणतीच करता येत नाही. कपाट धांडोळताना सांडलेल्या रत्नांसारखे ते जागोजाग पानापानावर आहेत. त्याच्या ह्य दानामुळे त्याच्याशी असलेला दुवा तुटता तुटत नाही. एवढय़ासाठी मला त्याचा हेवा वाटतो. आजघडीला एवढं सगळं लिहिल्यावर माझी खोलात खोल इच्छा काय असेल, तर आपण लिहिलेली सगळी पुस्तकं कुठल्यातरी खड्डय़ात नेऊन टाकावी, आणि निव्वळ अर्थशून्य, निव्वळ भ्रामक असेल त्याला शरण जावं. त्याच्यासारखा कवी तर काही मला होता यायचं नाही. मला कल्पनाशक्तीचा खूपच मोठा पल्ला अजून गाठायचा राहिलेला आहे.
आणि आता ‘जांभळ्या डोळ्यांच्या मुलीबद्दल’! तिच्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही. एवढंच माहीत आहे की, त्याचा हा प्रेमाचा पहिला दारुण अनुभव होता. ‘३६,०००,००० नवजात कुत्र्यांच्या पिल्लांइतकी पवित्र’ हे त्याचे शब्द तिच्याबाबत आहेत की कारखानदाराच्या मुलीबद्दल, ते सांगता येत नाही; पण त्याच्या पहिल्यावहिल्या नवथर प्रेमाचीच त्याची ही प्रतिक्रिया असेल असं मला खात्रीपूर्वक वाटतं. निदान माझी तरी तशीच होती आणि तिचेही डोळे जांभळेच होते. आणि रँबोप्रमाणेच मीही मरणघटकेला कदाचित तिचाच विचार करत असेन. त्या पहिल्याच सर्वनाशी अनुभवानं पुढचं सगळं डागाळून टाकलंय. हेसुद्धा मला इथे सांगायला पाहिजे की, चमत्कारिक गोष्ट म्हणजे तिनं मला नाकारलं नव्हतं. मलाच तिच्याबद्दल इतका आदरभाव होता, जवळजवळ पूज्यभाव होता, की मीच तिच्यापासून दूर पळालो. रँबोबाबत असंच झालं असेलसं मला वाटतं. अर्थात त्याचं हे सगळं विश्वास बसणार नाही इतक्या कमी कालावधीत- त्याचं अठरावं लागण्याच्या आतच घडलं. तो जसा अगदी थोडय़ाच वेळात साहित्याच्या सर्व कळांमधून गेला तसाच ह्य सर्वसामान्य अनुभवातूनही अल्पावकाशातच गेला. वेगानं, थोडक्यात. एखादी गोष्ट नुसती जिभेला लागण्याचा अवकाश, की त्याला कळायचं, की ह्यत काय आहे आणि ह्यतून काय मिळू शकतं. स्त्रीपुरतं बोलायचं तर त्याचं प्रेमजीवन क्षणकाळाचंच होतं. अबिसिनियामध्ये त्यानं एक बाई ठेवली खरी, पण प्रेमाचा उल्लेख त्याच्याकडून झालेला सापडत नाही. हे काही प्रेम नाही असं वाटतं. असलंच तर त्यानं आपलं सगळं प्रेम त्याचा हरारी सेवक द्जामी ह्यच्याकडे वळवलं होतं आणि त्याच्यासाठी चार पसे मागे ठेवण्यासाठी तो धडपडत होता. ज्या प्रकारचं आयुष्य तो जगला त्यात त्यानं पुन्हा मनापासून प्रेम केलं असेल असं वाटत नाही.
व्हरलँ असं बोलल्याचं म्हटलं जातं की, रँबो कधीही कुणाचा झाला नाही; ईश्वराचा नाही की कोणा माणसाचा नाही. हे कितपत खरं, हे ज्याचं त्यानं ठरवावं. मला तर असं वाटतं की सर्वस्व द्यावं असं रँबोइतकं कधी कुणाला वाटलं नसेल. किशोरावस्थेत त्यानं देवाला सर्वस्व दिलं, तरुणपणी जगाला. दोन्ही वेळेला आपण फसवले गेलो, आपल्याशी प्रतारणा झाली असं त्याला वाटलं. घृणेनं झडझडून तो आटलाच गेला. त्यानंतर मात्र त्याचं अंतरंग दगडी, शरण न जाणारं, अभेद्य झालं. इथे मला डी. एच. लॉरेन्सची आठवण येते. ह्यबाबतीत बोलावं असं त्यांच्याकडे खूप होतं. म्हणजे स्वतचं अंतरंग अच्छिन्न ठेवण्याबाबत.
तो कमवायला लागला तेव्हापासून त्याच्या अडचणींना सुरुवात झाली. त्याच्यामधले सगळे गुण- आणि खूपच होते ते- अगदी निरुपयोगी वाटू लागले; पण अनेक वेळा पराभूत होऊनही तो स्वतला ढकलत राहतो. ‘पुढे, सतत पुढे !’ त्याची ऊर्जा अमर्याद आहे, इच्छाशक्ती दुर्दम्य, भूक कधी न शमणारी. ‘‘ज्या कधी ऐकल्या नाहीत, ज्यांना नाव देता येत नाही अशा गोष्टींच्या मागे धावताना कवीचा ऊर फुटून निघो!’ असं सगळं त्याचं. त्याच्या ह्य काळाचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा तेव्हा मला माझं तारुण्य पुन्हा पुन्हा आठवतं. जगात प्रवेश मिळवण्यासाठी केलेल्या कडोनिकडीच्या प्रयत्नांचा काळ, कुठेतरी पाय टेकवता येतील म्हणून धडपडण्याचा काळ. ह्य दिशेनं त्यानं केलेले प्रयत्न एखाद्या अभेद्य कोंडीत सापडलेल्या सन्यानं जिवाच्या आकांतानं ती फोडून बाहेर निघण्याची शर्थ करावी त्या जातीचे होते. त्याच्या अगदी किशोरावस्थेत तो ब्रसेल्सला तीनदा जातो, पॅरिसला जातो, दोनदा लंडनला पोचतो. स्टुटगार्टला पुरेसं जर्मन आल्यावर तो मग बुर्टेनबर्गला, तिथून स्विट्र्झलडहून इटलीला पायी जातो. मिलानहून पुन्हा पायीच िब्रदिसीहून सिक्लॅडसला जातो ते उष्माघात होण्यासाठीच. तिथून मग लेगहॉर्नवरून मास्रेयला. मग एका फिरत्या जत्रेबरोबर अँटवर्प, रॉटरडॅमला बोटीनी जातो. मग डच आर्मीत भरती होऊन आर्मीतून पळ काढतो. मग एका ब्रिटिश बोटीतून हेलेनापाशी बोट थांबत नसताना तो समुद्रात उडी घेतो; पण त्याला परत आणलं जातं ते तो बेटावर पोचण्याआधीच. त्याला उनाड समजून पोलीस त्याला व्हिएन्नामधून बव्हेरियन सीमेवर आणून सोडतात. मग तिथून लोरेनच्या सीमेवर. पुन्हा पोलीस बंदोबस्तात.
ह्य सगळ्या पायपिटीत त्याच्या खिशात छदाम नाही. आणि हे सतत पाय घासत चालणं बहुतेक वेळी उपाशीपोटीच. चिव्हिटा व्हेकियाला तर बरगडय़ा त्याच्या पोटाला घासून घासून त्याचं पोट भडकून उठून त्याला गॅस्ट्रिक फीवर झाला म्हणून किनाऱ्यावर आणून सोडतात.
अमानुष चालणं. अबिसिनियामध्ये अमानुष घुडसवारी. ह्य़ाचं सगळंच अतिरेकी. स्वत:ला अगदी अमानुषपणे वागवतो तो. फटकारे मारून पुढे ढकलत राहतो. तरी लक्ष्य आवाक्याबाहेरच राहतं.
त्याचा पागलपणा मला इतका चांगला कळतो! मी अमेरिकेतल्या माझ्या आधीच्या जगण्याकडे वळून पाहतो तेव्हा वाटतं, मी हजारो मल उपाशीपोटी तुडवले. कुठे चार पसे मिळतील, ब्रेडचा तुकडा मिळेल, नोकरी, हाडं टाकायला एखादा कोपरा. एखादा स्नेहशील चेहरा दिसावा म्हणून केलेली शोधाशोध. कधी कधी भुकेल्या पोटाने रस्ता तुडवत असताना मी जाणारी एखादी गाडी थांबवायचो आणि तो गडी मला जिथे उतरवेल तिथे उतरायचो. हे निव्वळ जागेचा बदल म्हणून. न्यूयॉर्कमधली हजारो रेस्तराँ मला माहीत आहेत. तिथे जेवायला गेलो म्हणून नाही, तर त्यांच्या काचेतून बाहेरून आत टेबलांवर जेवत बसलेल्यांकडे आशाळभूतपणे पाह्य़चो म्हणून. रस्त्यांच्या कडेला असलेल्या हॉट डॉग्ज विकणाऱ्या ठेल्यांचा गंध मला अजून आठवतो. पांढरेशुभ्र कपडे घातलेले स्वयंपाकी वॅफल्स सटासट पॅनमध्ये उलथवत असताना काचेतून दिसतं ते आठवतं. कधी कधी तर मला वाटतं, मी जन्मजात भुकेला असणार. आणि भुकेबरोबर चालणं, दिशाहीन भटकणं, शोधाशोध, इकडेतिकडे पिसाटासारखं धावणं हे सगळं संलग्न आहे. भीक मागून गरजेपेक्षा थोडं जास्त मिळालंच तर खाल्लं की मी ताबडतोब थिएटरमध्ये सिनेमाला जायचो. पोट भरलं की तेवढीच एक उबदार, आरामशीर जागा; जिथे सगळे व्यापताप कसे विसरता येतील एवढय़ाचीच मला फिकीर. बसप्रवासासाठी म्हणून मी त्या काळात कधी पसे साठवले नाहीत. थिएटरच्या उबदार कुशीतून बाहेर पडावं लागलं की मग थंडीत, पावसात मी चालत निघायचो- जिथे कुठे त्यावेळी मी राहत असेन त्या दिशेनं. ब्रुकलीनच्या मध्य भागातून मॅनहॅटनच्या अंतर्भागापर्यंत मी अगणित वेळा सगळ्या ऋतूंमध्ये उपासाच्या सगळ्या कळा सोसत अनेकदा चालत गेलेलो आहे. मग अतीव थकवा आला, एक पाऊलही पुढे टाकवेनासं झालं की मी वळायचो व परत फिरायचो. आता स्वच्छ कळतंय की दरुलघ्य अंतरांवर रिकाम्या पोटानं सक्तीनं चालण्याचं ट्रेिनग लष्करातल्या लोकांना कसं दिलं जातं ते.
पण तुमच्या जन्मगावी शत्रूसारखं तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांमधून चालणं वेगळं आणि शेजारच्या प्रांतात तिथला महामार्ग तुडवणं वेगळं. तुमच्या जन्मगावीचं शत्रुत्व म्हणजे फार तर तुटकपणा, पण परक्या गावात किंवा दोन गावं जोडणाऱ्या रस्त्यांवर मात्र अगदी ढळढळीत शत्रुत्वच तुमचं स्वागत करतं. पिसाळलेली कुत्री, बंदुकी, शेरिफसाहेब आणि पहारेकरी जणू तुमची वाटच पाहत असतात. त्या भागात तुम्ही नवीन असाल तर तिथल्या गारठल्या भूमीवर अंग टाकायचीसुद्धा सोय नाही. चालत राहा, चालत राहा, चालत राहा. वाटतं, आपल्या पाठीत रिव्हॉल्वरची थंडगार नळी खुपसलीय अन् सांगतेय- चालत राहा. वेगानं, अधिक वेगानं, अधिकाधिक वेगानं. आणि हे सगळं तुझ्या देशात घडतंय; कुणा परक्या देशात नाही. जपानी क्रूर असतील, हूण रानटी असतील, पण हे लोक आहेत तरी कोण- जे दिसतात तर तुझ्यासारखेच, बोलतात, खातात, पितात, कपडे घालतात तुझ्यासारखे आणि तरी शिकारी कुत्र्यांसारखा पाठलाग करतात तुझा. इतरांच्या अशा वागण्याला कारणं देता येतील; पण माझ्याच जातीच्या माणसांसाठी मला कारणं सुचत नाहीएत. रँबो खूपदा घरी लिहायचा, ‘मला तिथे फ्रान्समध्ये मित्र नाहीत.’ जून १८८१ मध्ये मास्रेयच्या इस्पितळातून तो पुन्हा हेच लिहितो.
‘नियती मला नेऊन टाकील तिथं माझं मरण. मला अबिसिनियाला परत जाता यावं असं वाटतं. तिथे माझे दहा वर्षांपासूनचे मित्र आहेत. त्यांना माझ्याबद्दल कणव वाटेल. त्यांच्यासोबत मी काम पाहीन. मी जमेल तसं जगत राहीन. कायम तिथंच राहीन. फ्रान्समध्ये तू सोडून मला मित्र नाहीत, नातेवाईक नाहीत, कोणी नाही.’
ह्य़ावेळी रँबो पॅरिसमध्ये तळपत होता खरं तर. त्याच्याभोवती त्याचे भक्तगण कितीतरी होते; पण त्याला ते काहीच माहीत नव्हतं. काय हे दुर्दैव!
काय हे दुर्दैव! माझं न्यूयॉर्कला दहा वर्षांच्या देशांतरानंतर जबरीचंच परतणं आठवतं. अमेरिका सोडली तेव्हा माझ्याजवळ दहा डॉलर्स होते. तेसुद्धा उसने आणलेले. परतलो तेव्हा खिशात दमडीही नव्हती. माझा बाडबिस्तरा पाहून हॉटेलचं बिल द्यायला माझ्याकडे पसे आहेतसं हॉटेलच्या कारकुनाला वाटलं होतं, त्याच्याकडून टॅक्सीला द्यायला पसे घेतले. ‘घरी’ परतल्यावर पहिली गोष्ट मला काय करावी लागली असेल, तर पशासाठी कोणालातरी फोन करणे! रँबोप्रमाणे माझ्या कमरेला काही सोन्यानं भरलेला कसा नव्हता, की जो मला गादीखाली लपवावा लागेल; पण म्हटलं, आपले दोन्ही पाय धड आहेत. रात्रभरात नाहीच काही मदत मिळाली तर निघू सकाळी उठून एखाद्या स्नेहाळ चेहऱ्याच्या शोधात. परदेशातली दहा वष्रे मी एखाद्या दैत्यासारखा कष्टलो होतो. आता निदान एखाद् दोन तरी र्वष आरामात राहण्याचा हक्क होता मला. पण मधेच युद्ध उपटलं. त्यानं सगळ्याचाच विध्वंस केला. रँबोच्या सोमालीलँडमधल्या संधी युरोपातल्या राजकीय सत्तांच्या षड्यंत्रात अशाच नष्ट झाल्या होत्या. जानेवारी १८८८ मध्ये एडनहून त्यानं एक पत्र पाठवलं आहे; त्यातली भाषा किती ओळखीची वाटते.
‘सगळी सरकारं ह्य़ा भयाण, विराण प्रदेशाला गिळंकृत करायला बसली आहेत. इथले लोक महिनोन् महिने अन्नपाण्याशिवाय वणवण फिरताहेत; भरीला जगातली सगळ्यात वाईट हवा इथे. ह्य़ांनी युद्ध, विनाश- सर्व प्रकारचा- ह्य़ाशिवाय इथे काही आणलेलं नाही.’
आपल्या शासनांचं किती प्रामाणिक चित्रण असावं हे. सगळे कुठल्यातरी दूरच्या ओसाडीत आपापला खुंटा घट्ट ठोकायला निघालेले; तिथल्या लोकांना एक तर दडपणारे किंवा त्यांना नष्टच करणारे, कुमार्गानं मिळवलेल्या धनसंपत्तीला चिकटून राहणारे, आपली जायदाद, लूट, मिळकत, आपापल्या वसाहती लष्कराच्या आणि नौदलाच्या साहाय्यानं संरक्षिणारे. हे करताना सर्वशक्तिमानांना जगही अपुरं पडतं आणि छोटय़ांना बदल्यात मिळतात मानभावी शब्द व गíभत धमक्या. ही दुनिया म्हणजे बळी तो कान पिळी हेच खरं. ज्यांच्याजवळ सर्वात मोठं लष्कर, सर्वात मोठं नौदल, ज्यांच्याजवळ तुमचं नाक दाबण्यासाठी आíथक दंडुकेशाही आहे, त्यांचंच हे जग. हा विरोधाभास पाहा. पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून एक एकाकी कवी जगाच्या अंतापर्यंत उरीपोटी धावतो, त्याला आपल्याच घरच्या परसबागेत ह्य़ा सर्वशक्तिमान सत्ता काय धिंगाणा घालताहेत ते हातावर हात टाकून पाहत बसावं लागतं. ‘चल, पुढे चल, जगबुडी आली चल.’ पण तुम्ही जितक्या वेगानं पुढे जाता एखाद्या सुरक्षित ठिकाणी- त्याच्या आधीच शासनं आपली बंधनं, बेडय़ा-शृंखला, विषारी वायू, रणगाडे आणि अणुबॉम्ब घेऊन तिथे पोचलेलीही असतात. हरारी मुलामुलींना कुराण त्यांच्याच भाषेत शिकवायला रँबो सुरुवात करतो. पुढे मग सरकार त्यांना गुलाम म्हणून विकणार! त्यानं (रँबोनं) एकदा लिहिलं, ‘थोडा विनाश आवश्यकच असतो.’ ह्य़ा साध्या वाक्यावर केवढा गहजब! निर्मितीच्या अनुषंगानं काही विनाश होतो त्याबद्दल तो बोलत होता; पण कुठलंही शासन विनाश करतं तेव्हा क्षुद्र निमित्तसुद्धा नसतं शासनाजवळ; आणि नवनिर्मितीचा विचार तर नसतोच नसतो. रँबोची इच्छा होती ती एवढीच, की जीवन काय किंवा साहित्य काय, त्यातले जुनाट साचे जावेत; पण शासनाची इच्छा मात्र सगळं जैसे थे ठेवण्याचीच असते; मग विध्वंस होवो की माणसं मारली जावोत. रँबोची चरित्रं लिहिणाऱ्या काहींनी त्याचं तरुणपणचं वागणं अगदी वाईट होतं असं म्हटलंय. त्यानं असं असं वाईट केलं, तुम्हाला माहीत नाही? असा सूर. पण आपल्या शासनाच्या वागण्याचा लेखाजोखा करण्याची वेळ आली- विशेषत: त्यांच्या संशयास्पद कटकारस्थानांबाबत, ज्याच्या रँबो कायम विरोधात होता- की मग मात्र सुरू ह्य़ांची रंगसफेदी अन् मध गाळणं. त्याला कलंदर म्हणून झोडपायचं असलं की तो किती छोटा कवी होता ते सांगायचं. त्याची कवी म्हणून लायकी कमी करायची असली की त्याच्या बंडखोरपणाबद्दल, उत्पातीपणाबद्दल बोलायचं. जेव्हा त्यांच्या लुटारू, शोषक शासनांसारखा तो वागतो तेव्हा ते हक्काबक्का होऊन जातात; आणि हाच रँबो जेव्हा त्याला पसा बिनमहत्त्वाचा वाटतो आणि सर्वसामान्यांचं रोजचं एकसुरी, तापदायक, कंटाळवाणं आयुष्य नाकारतो तेव्हाही हे वैतागलेलेच. कलंदर म्हटलं की ‘तो अतीच कलंदर आहे बाबा’, कवी म्हटलं तर ‘फारच कवी आहे बाबा’, नवा प्रयोगशील म्हटलं की ‘अतीच प्रयोगशील’, नाना उद्योग करतो म्हटलं तर ‘त्याला काही सुमार आहे का ?’, पिस्तुल चालवतो म्हटलं तर ‘फारच पिस्तुलबाजी बाबा ह्य़ाची’, असं. चाललंय चाललंय ह्य़ांचं. त्यानं काही बरं केलं तरी त्यानं अतीच चांगलं केलं अशी जणू तक्रारच करायचे हे लोक. तो राजकारणीच व्हायला हवा होता. चुकलंच त्याचं. झाला असता तर स्टालिन, हिटलर, मुसोलिनीच काय, चíचल व रुझवेल्टसुद्धा त्याच्यासमोर टेकाडासारखे दिसले असते. ह्य़ा सर्व प्रातस्मरणीय लोकांनी ह्य़ा जगाचा जो विध्वंस केला तसा त्यानं केला असतासा वाटत नाही. संकटाच्या वेळी उपयोगी पडेल अशी काही गोष्ट त्यानं हातची राखूनच ठेवली असती. त्यानं आपल्या महामेधावी नेत्यांप्रमाणे ईप्सिताकडे जाण्याचा मार्ग नक्कीच हरवला नसता. स्वतच्या आयुष्याचा काहीही घोळ त्यानं घालून ठेवलेला असो; पण त्याला संधी मिळाली असती तर त्यानं हे जग राहायला अधिक बरं केलं असतं असा एक विचित्र विश्वास मला त्याच्याबद्दल वाटतो.
सर्वसामान्यांना अगदी अव्यवहारी वाटला तरी मला वाटतं की स्वप्न पाहणारा माणूस हा कुठल्याही राजकारण्यापेक्षा जास्त सक्षम, हजार पटीनं जास्त कार्यक्षम असतो. रँबोच्या त्या एकाहून एक अफलातून योजना- ज्या कोणत्या ना कोणत्या कारणानं फसत गेल्या- त्या आता बऱ्याचशा प्रत्यक्षात आलेल्या आहेत. त्याला सगळं फार आधी सुचलं सगळ्यांच्या, एवढाच घोटाळा! सर्वसामान्यांच्या, मुत्सद्दय़ांच्या आशाआकांक्षांच्या फार पुढचं तो पाहू शकत होता. स्वप्नाळू म्हणून त्याची टिंगल करण्यात मौज वाटणाऱ्या लोकांची मदत त्याला कधी झाली नाहीच. ही माणसं फक्त झोपेत स्वप्नं पाहणारी. डोळे सतत उघडे ठेवून स्वप्न बघणं त्यांना जमायचंच नाही कधी. पण वास्तवानं वेढला गेलेला स्वप्नाळू जीव मात्र म्हणत असतो- फार सगळं हळू चाल्लंय, फार रडतकढत- अगदी विनाशसुद्धा. (क्रमश:) 1946-1949-1956 by New Directions Publishing Corporation
महेश एलकुंचवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The time of the assassins
First published on: 24-04-2016 at 02:24 IST