News Flash

जगातील पहिली चित्रपट समीक्षा

चित्रपट समीक्षा ऑगस्त ल्युमिएच्या जन्मदिनाच्या (१९ऑक्टोबर) निमित्ताने..

तो अनुभव किती चमत्कारिक होता! ते एक ध्वनिविरहित, रंगविरहित असे जग होते.

जगातील पहिला चित्रपटसदृश प्रयोग ल्युमिए बंधूंनी पॅरिस येथे २९ डिसेंबर १८९५ रोजी सादर केला. हलत्या चित्रांचा हा एक अद्भुत प्रयोग होता! यानंतर ल्युमिए बंधूंनी असे प्रयोग वेगवेगळ्या देशांत केले. जुल १८९६ मध्ये हा प्रयोग मॉस्कोमध्ये करण्यात आला. या खेळाला मॅक्झिम गोर्की हा उपस्थित होता. त्याने केलेली जगातील पहिली चित्रपट समीक्षा ऑगस्त ल्युमिएच्या जन्मदिनाच्या (१९ऑक्टोबर) निमित्ताने..

चित्रपट समीक्षेला पाश्चिमात्य देशात कलासमीक्षेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून पाहिले जात असले तरी मराठीत अजूनही तिच्याकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्याकडे समीक्षेचा अभ्यास करणारा वर्ग हा सामान्यपणे मराठी प्राध्यापकांचा वर्ग आहे आणि (काही बोटांवर मोजण्याइतकी मंडळी सोडली तर) बहुसंख्य प्राध्यापक हे ‘सिने-साक्षर’ही नाहीत. मुळात सिनेमा ही कला अभ्यासाचा विषय होऊ शकते हेच त्यांना माहीत नाही, व जे माहीत नाही ते मान्य करण्याची गोष्ट दूरच. एकविसाव्या शतकातील या अत्यंत महत्त्वाच्या कलेकडे त्यांचे दुर्लक्ष तर आहेच, पण त्याबाबतीत एक तुच्छतेची भावनाही त्यांच्या मनात आहे. हे आठवण्याचे कारण म्हणजे जगातील पहिली ‘चित्रपट समीक्षा’ कोणी लिहिली याबद्दलची एक दुर्मीळ माहिती नुकतीच हाती आली आहे. पहिला चित्रपटसदृश प्रयोग ल्युमिए बंधूंनी पॅरिस येथे २९ डिसेंबर १८९५ रोजी सादर केला. हलत्या चित्रांचा हा एक अद्भुत प्रयोग होता आणि तो पाहणाऱ्यांच्या मनावर त्याने विलक्षण गारुड केले. यानंतर ल्युमिए बंधूंनी असे प्रयोग वेगवेगळ्या देशांत केले. जुल १८९६ मध्ये हा प्रयोग रशियात, मॉस्कोमधील एका ‘बदनाम’ प्रेक्षागृहामधील एका हॉलमध्ये करण्यात आला. या ‘खेळाला’ सुप्रसिद्ध रशियन लेखक मॅक्झीम गोर्की हा उपस्थित होता. हा प्रयोग पाहिल्यावर गोर्की एकाच वेळी खूप प्रभावित आणि अस्वस्थ झाला. त्याने लगेच या संदर्भात एक लेख लिहिला आणि तो ४ जुल १८९६ रोजी वर्तमानपत्रात प्रकाशित केला. जगातील ही पहिली चित्रपट समीक्षा म्हणावयास हरकत नाही.

गोर्की हा श्रेष्ठ कलावंत. साहित्य या कलेचे मर्म आणि सामथ्र्य जाणणारा आणि दर्जेदार साहित्याची निर्मिती करणारा. त्याला एका नव्या कलेचे हे बाळरूप कसे वाटले, तिचा प्रभाव आणि विशेष म्हणजे तिचे भविष्य यावर त्याने कशी टिप्पणी केली आहे हे पाहणे मनोरंजक ठरेल. अमाप शक्यता पोटात असणारा एक ‘उदयोन्मुख’ कलाप्रकार आणि दुसऱ्या कलेतील सामथ्र्यवान सर्जक यांची ही पहिली मुठभेड संस्मरणीय आहे. गोर्की लिहितो-‘काल रात्री मी सावल्यांच्या राज्यात होतो.

तो अनुभव किती चमत्कारिक होता! ते एक ध्वनिविरहित, रंगविरहित असे जग होते. तेथील प्रत्येक वस्तू-जमीन, झाडे, माणसे, पाणी आणि हवा-नीरस राखाडी रंगात बुडविलेली होती. राखाडी आकाशातून येणारे सूर्याचे राखाडी किरण. राखाडी चेहऱ्यावरील राखाडी डोळे, झाडांची पानेही राखाडीच. हे आयुष्य नव्हते तर त्याची सावली होती.

येथे थोडे स्पष्टीकरण देणे भाग आहे नाहीतर तुम्ही मला एकतर वेडा समजाल किंवा मी प्रतिमांच्या भाषेत बोलतो आहे, असा तुमचा ग्रह होईल. मी ‘ओमोंत’च्या नाटय़गृहात बसून ल्युमिए बंधूंचा ‘सिनेमाटोग्राफ’ पाहात होतो. या विलक्षण अनुभवाने माझ्यावर केलेला परिणाम एवढा अनन्यसाधारण आणि गुंतागुंतीचा आहे की मला तो नीटपणे व्यक्त करता येईल का याची शंका वाटते. तरी मी त्याची काही मूलतत्त्वे विशद करण्याचा प्रयत्न करतो.

हॉलमधील दिवे विझविले गेले आणि अचानक समोरच्या पडद्यावर ‘अ स्ट्रीट इन पॅरिस’ नावाचे एक भलेमोठे चित्र अवतरले. प्रथम पाहिल्यावर दिसले की घरे, वाहने, माणसे एका विशिष्ट स्थितीत येऊन थांबली आहेत. क्षणभर वाटले की यात काय नवीन आहे, अशी चित्रे तर आपण अनेकदा पाहिली आहेत. पण अचानक काहीतरी घडले आणि पडदा जिवंत झाला. वाहने कोठून तरी येऊन तुमच्या दिशेने, ज्या अंधारात तुम्ही बसला आहात त्या दिशेने धावू लागली. दुरून माणसे येताना लहान दिसत होती, जवळ आल्यावर ती मोठी दिसू लागली. मुले कुत्र्यांशी खेळत आहेत, सायकलस्वार पळत आहेत आणि पादचारी वाहनांच्या गर्दीतून वाट काढत चालले आहेत. हे सगळे सरकत सरकत पडद्याच्या टोकाला येतात आणि अदृश्य होतात.

आणि हे सारे घडते आहे ते नि:शब्दपणे, अतीव शांततेत. चाकांचा आवाज नाही, पावलांचा आवाज नाही की कसले संभाषण नाही. माणसांच्या हालचालीबरोबर नेहमी जी आवाजाची लय असते तीही नाही. झाडांची राखाडी पाने आवाज न करता हलतात. ज्यांचे रंग हिरावून घेऊन ज्यांना शिक्षा केली आहे आणि ज्यांना अनंत शांततेत ढकलले आहे अशा माणसांचे राखाडी आकार राखाडी जमिनीवरून सरकत जातात.

जरी या माणसांच्या हालचाली ‘जिवंत’ असल्या तरी त्यांचे हसणे निष्प्राण आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील स्नायू हलतात, पण त्यांचे हसणे ध्वनिशून्य आहे. सावल्यांच्या या हालचाली भीतीदायक वाटतात. एखाद्या जादूगाराने संपूर्ण जग, रस्ते, घरे जादूने लहान करून आपल्यासमोर ठेवली आहेत असे वाटते. अचानक काहीतरी होते. एक रेल्वे पडद्यावर दिसते आणि ती वेगाने तुमच्या अंगावर येऊ लागते. सावधान! असे वाटते की ज्या अंधारात आपण बसलो आहोत तेथे प्रवेश करून ती या हॉलमधील मद्याचा आस्वाद घेत बसलेल्या स्त्री-पुरुषांना चिरडून टाकेल. पण नाही, तीही फक्त सावल्यांचीच आगगाडी आहे!

हळूहळू, आवाज न करता, इंजिन पडद्याबाहेर सरकते. आगगाडी थांबते आणि माणसांच्या राखाडी प्रतिमा तिच्यातून बाहेर पडतात. दुसरे चित्र. तीन माणसे पत्ते खेळत बसली आहेत. त्यांचे हात सराईतपणे सरकतात पण त्यांचे चेहरे तणावाखाली आहेत. अचानक ती माणसे हसू लागतात, शेजारचा वेटरदेखील हसू लागतो. पण आवाज येत नाही. असे वाटते की ही माणसे  मेलेली आहेत आणि त्यांच्या सावल्यांना अनंत काळापर्यंत शांततेत खेळण्याची शिक्षा दिली आहे. आणखी एक चित्र समोर येते. बागेत एक माळी, रबरी पाइप घेऊन झाडांना राखाडी पाणी देतो आहे. एक मुलगा येऊन त्या पाइपवर पाय देतो. पाणी थांबते. माळी पाइपची तोटी आपल्याकडे करून आश्चर्याने पाहतो. मुलगा पाय काढून घेतो आणि पाण्याचा फवारा माळ्याच्या तोंडावर उडतो. आपल्याला असे वाटते की हा फवारा आपल्याही अंगावर उडेल आणि आपण मागे सरकतो. आपण  स्वत:ला विसरू लागतो, आपल्या संवेदना हळूहळू बधिर होत आहेत..

पण तेवढय़ात आपल्या जवळ कोठेतरी एका स्त्रीचा मादक आवाज आणि हास्य ऐकू येते व आपल्या ध्यानात येते की आपण ‘ओमोंत’च्या प्रेक्षागृहात आहोत. (गोर्कीच्या लेखांत स्पष्ट उल्लेख नाही पण ‘ओमोंत’ प्रेक्षागृह ही बहुधा वेश्या, त्यांची गिऱ्हाईके यांच्या भेटण्याची ‘बदनाम’ जागा असावी.) आता आपल्या मनात विचार येतो की ल्युमिए बंधूंचा हा अत्यंत महत्त्वाचा ‘शोध’, ज्याने पुन्हा एकदा माणसाचे कुतूहल आणि नवीन ज्ञान मिळवत राहण्याची लालसा व ऊर्जा सिद्ध केली आहे, जीवन रहस्याचा शोध घेण्याच्या मार्गावर नवे पाऊल टाकले आहे, ते तंत्रज्ञान ‘ओमोंत’चा धंदा वाढविण्याच्या कामी का खर्च केले जात आहे? मला अजून या शोधाचे शास्त्रीय महत्त्व नीटसे समजले नाही, पण ते निश्चितच आहे. त्याचा उपयोग माणसाचे जीवन चांगले बनविण्यासाठी आणि त्याच्या मनाच्या विकासासाठी केला जाऊ शकतो. दुष्प्रवृत्ती जोपासल्या जाणाऱ्या ‘ओमोंत’च्या प्रेक्षागृहामध्ये, ‘समाजाची गरज भागविण्यासाठी’ बळी दिल्या जाणाऱ्या स्त्रिया आणि त्यांची चुंबने विकत घेणारे बदमाश यांच्या गराडय़ात हे का दाखविले जात आहे?

तेवढय़ात आणखी एक दृश्य समोर येते. एक जोडपे आणि त्यांचे लहान मूल नाष्टा करते आहे. ती दोघे किती आकर्षक आहेत, एकमेकांवर किती प्रेम करताहेत, आणि त्यांचे ते मूल किती सुंदर आहे! पण या ‘कौटुंबिक नाटय़ाला’ या प्रेक्षागृहात जागा आहे का? आणखी एक दृश्य. एका कारखान्यातून कष्टकरी कामगार स्त्रियांचा घोळका बाहेर येतो आहे. पुन्हा माझ्या मनात विचार येतो की या दृश्यालाही येथे जागा नाही. शरीरविक्रय करणाऱ्या येथील दुर्दैवी स्त्रियांना ‘चांगल्या कामाची स्वप्ने’ दाखवून काय फायदा?

माझी तर खात्री आहे की, भविष्यात ‘अशा ठिकाणी’ दाखविण्यासाठी खास चित्रपट केले जातील. उदाहरणार्थ: ‘ती कपडे काढताना’, किंवा ‘तरुणी स्नान करताना’ वगरे वगरे.’

गॉर्कीची ही समीक्षा वाचताना तो किती विलक्षण बुद्धिमत्ता असणारा व द्रष्टा कलावंत होता हे पाहून थक्क व्हायला होते. एक म्हणजे चित्रपटसदृश पहिला प्रयत्न पाहूनच गोर्कीने या प्रयोगाचे मोल जाणले होते. ही कला जीवन रहस्याचा शोध घेऊ शकेल, तिचा उपयोग जीवन चांगले करण्यासाठी करता येऊ शकेल हे त्याने ओळखले होते. या कलेचा सामान्य माणसांवर केवढा प्रभाव पडेल हेही त्याने जाणले. आणखी महत्त्वाचे म्हणजे व्यवसाय करणारे लोक या कलेचा दुरूपयोग करून घेणार हेही त्याने ओळखले. गोर्की सामाजिक बांधिलकी मानणारा कलावंत आहे. कलेच्या संदर्भातील सामाजिक प्रश्न त्याला महत्त्वाचे वाटतात. दुर्दैवी स्त्रियांची दु:खे त्याला अस्वस्थ करतात, त्यामुळे या लेखापासून जीवनवादी समीक्षेची सुरुवात झाली असेदेखील म्हणता येते.

गॉर्की हा भविष्य जाणणारा देखील होता असे दिसते. कारण त्याने हा लेख लिहिल्यानंतर काही दिवसांतच, म्हणजे १८९७ साली, जॉर्ज मेलिए याने ‘आफ्टर द बॉल’ या नावाचा सिनेमा काढून त्यात एक स्त्री नग्नावस्थेत स्नान करताना दाखविली! आणि यानंतर उत्तान आणि अश्लील चित्रपटांची एक लाटच पडद्यावर आली.
vvpadalkar@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 12:59 am

Web Title: the worlds first movie review
Next Stories
1 माहिती अधिकार कायदा शस्त्र नव्हे, साधन!
2 लढाई अजूनही  अपूर्ण..
3 अहो, दुर्गाबाई..
Just Now!
X