ऑलिम्पिक म्हटलं की आपल्याला दर चार वर्षांनी भरणारा जागतिक क्रीडास्पर्धाचा भव्यदिव्य सोहोळा आठवतो. पंधरवडाभर असंख्य क्रीडाप्रकारांच्या अटीतटीच्या स्पर्धा आणि त्यांत मोडीत निघणारे किंवा रचले जाणारे नवे विक्रम, उदयाला येणारे वा अस्ताला जाणारे दिग्गज खेळाडू, त्यांच्या कटु-गोड आठवणी असा सगळा प्रचंड भारलेला माहोल असतो तेव्हा. याच धर्तीवर रंगभूमीच्या क्षेत्रातील ‘थिएटर ऑलिम्पिक्स’ हा महारंगउत्सव १९९५ पासून जगभरात निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये भरत असतो. क्रीडा ऑलिम्पिक्सला प्रदीर्घ परंपरा आहे. थिएटर ऑलिम्पिक्स मात्र त्यामानाने वयाने खूपच तरुण आहे. यंदाच्या आठव्या ‘थिएटर ऑलिम्पिक्स’चे यजमानपद भारताकडे आले आहे. येत्या १७ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत या महारंगसोहोळ्यास प्रारंभ होत असून, तब्बल ८ एप्रिलपर्यंत.. म्हणजे जवळजवळ पावणेदोन महिने संपूर्ण देशभर हा नाटय़जागर धूमधडाक्यात सादर होणार आहे.

‘थिएटर ऑलिम्पिक्स’ म्हणजे नक्की काय? जगभरातील नाटकांची ही स्पर्धा आहे का? तर- नाही! १९९३ साली ग्रीसमध्ये ख्यातनाम ग्रीक नाटय़-दिग्दर्शक थिओडोरस तेझरेपाऊलस यांच्या पुढाकाराने ‘थिएटर ऑलिम्पिक्स’ची संकल्पना पहिल्या प्रथम मांडण्यात आली. जगभरातील देशोदेशींच्या रंगकर्मीचे रंगाविष्कार यानिमित्ताने व्यापक लोकसमुदायासमोर पेश व्हावेत, ही ‘थिएटर ऑलिम्पिक्स’च्या स्थापनेमागची मूळ प्रेरणा. जगभरातील नाटय़कर्मीनी यानिमित्ताने एका व्यासपीठावर यावे, त्यांच्यात परस्परसंवाद घडावा, त्यांच्या सर्जनशील कार्याचे जगाला दर्शन घडवावे आणि एकूणच रंगकार्यासंबंधांत त्यांच्यात आपापसात आदानप्रदान व्हावे, रंगभूमीचे अभ्यासक, विद्यार्थी, रसिक आणि रंगभूमीवरील नाटय़कर्मीनी देश, भौगोलिक सीमा, तत्त्वप्रणाली आणि सांस्कृतिक भिन्नतेच्या सीमा लांघून परस्परांशी मैत्रभावाने निकट यावे, या सर्वसमावेशक हेतूने ही संकल्पना पुढे आली. ‘क्रॉसिंग मिलेनिया’ या थिएटर ऑलिम्पिक्सच्या बोधवाक्यात रंगभूमीचा भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ यांत समन्वय साधला जावा, हेही या संकल्पनेत अनुस्यूत आहे. रंगभूमी, संगीत, नृत्य, चित्र, शिल्प, दृश्यकला आदी कलांतील देवाणघेवाण, त्यांतील वैविध्यपूर्ण प्रयोग तसंच जागतिक रंगभूमीचा समृद्ध वारसा यांचे एकसमयावच्छेदेकरून दर्शन यानिमित्ताने घडावे, ही अपेक्षाही ‘थिएटर ऑलिम्पिक्स’ संकल्पनेत आहे. या सोहोळ्याच्या अनुषंगाने जगातील नाटय़कर्मी आणि त्यांचं रंगकार्य यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सहयोग व समन्वय घडावा आणि त्यातून अखिल विश्वातील रंगकर्मीचे नेटवर्क तयार व्हावे; तसंच जो यजमान देश थिएटर ऑलिम्पिक्स भरवीत असतो त्या देशातील रंगकार्यास उत्थान मिळून ते जगासमोर यावे, हा हेतूही यामागे आहे.

थिएटर ऑलिम्पिक्सच्या आंतरराष्ट्रीय समितीची पहिली अधिकृत बैठक ग्रीसमध्ये १९९४ साली झाली. या संस्थेच्या स्थापनेच्या वेळी जगातील आठ नामवंत नाटय़-दिग्दर्शक या समितीचे सदस्य होते. संस्थेचे प्रशासकीय कार्यालय अथेन्समध्ये आणि आशिया विभागाचे कार्यालय जपानच्या टोगामुरा येथे स्थापित करण्यात आले. समितीची वर्षांतून एकदा बैठक होते आणि तीत नव्या देशांना थिएटर ऑलिम्पिक्सचे सभासद करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, याकरता अट ही, की विद्यमान समितीच्या दोन-तृतीयांश सदस्यांनी त्या देशाला सभासद करून घेण्याकरता अनुमती द्यायला हवी. तसंच विद्यमान सदस्यांपैकी एकाने त्या देशास सभासद करून घेण्याची शिफारस करायला हवी. सध्याच्या समितीत ग्रीस, जपान, अमेरिका, नायजेरिया, रशिया, इंग्लंड, भारत, स्पेन, इटाली, फ्रान्स, ब्राझील, जर्मनी, द. कोरिया आणि चीन असे १४ देशांचे सदस्य आहेत. या समितीत भारताचे प्रतिनिधित्व मणिपूरचे विख्यात रंगकर्मी रतन थिय्याम हे करीत आहेत. त्यांच्या सक्रीय पुढाकारामुळेच यंदा भारतात थिएटर ऑलिम्पिक्स भरत आहेत.

आजवर ग्रीस, जपान, रशिया, टर्की, द. कोरिया, चीन, पोलंड या सात देशांमध्ये थिएटर ऑलिम्पिक्स भरवले गेले आहे. समितीच्या सदस्य राष्ट्रांमध्येच ते बहुश: भरवले जाते. आणि त्या देशाच्या समिती प्रतिनिधीला थिएटर ऑलिम्पिक्सच्या सृजनात्मक संचालकपदाचा बहुमान दिला जातो. यावर्षी भारताला आठव्या थिएटर ऑलिम्पिक्सचे यजमानपद मिळाले खरे; परंतु भारताचे या समितीतील प्रतिनिधी रतन थिय्याम ऑगस्टमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्याने पेचप्रसंग उभा राहिला. कारण थिय्याम यांच्यामुळेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेला थिएटर ऑलिम्पिक्सचे यजमानपद बहाल केले गेले होते. परंतु थिय्याम एनएसडीतून निवृत्त झाल्याने आंतरराष्ट्रीय समितीचे सदस्य असूनही ते थिएटर ऑलिम्पिक्सचे सृजन संचालक म्हणून कार्य करू शकणार नव्हते. आणि ते समितीस मान्य नसल्याने त्यांनी थिएटर ऑलिम्पिक्स भरविण्यास मनाई केली. पुढे हा वाद मिटून त्यांना हे पद देण्यात आले आणि आता प्रत्यक्ष थिएटर ऑलिम्पिक्सचे पडघम वाजू लागले आहेत. भारतात होणाऱ्या थिएटर ऑलिम्पिक्सचे बोधवाक्य आहे : ‘मैत्रीची पताका’ (Flag of Friendship)! नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासह देशभरातील अन्य काही संस्था दरवर्षी राष्ट्रीय नाटय़महोत्सव भरवीत असल्या तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील असा महारंगमहोत्सव भारतात प्रथमच होत आहे. साहजिकच जगभरातील रंगकर्मी आणि त्यांची नाटके आणि रंगाविष्कार पाहण्याची.. अनुभवण्याची संधी यानिमित्ताने भारतीय रसिकांना मिळणार आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे तत्कालीन अध्यक्ष रतन थिय्याम आणि संचालक प्रा. वामन केंद्रे यांचे थिएटर ऑलिम्पिक्स भरविण्याचे स्वप्न अशा तऱ्हेने प्रत्यक्षात अवतरते आहे. गेली तीन-चार वर्षे त्याकरता दोघे प्रयत्नशील होते. केन्द्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या अधिपत्याखाली होत असलेल्या या भव्य थिएटर ऑलिम्पिक्सचे बजेट तब्बल ५१ कोटी रुपयांचे आहे.

या महारंगउत्सवासाठी देशांतर्गत तसेच जगभरातून नाटकांच्या प्रवेशिका मागवण्यात आल्या होत्या. भारताच्या विविध प्रांतांतून या आवाहनास प्रचंड प्रतिसाद मिळून तब्बल ११०० नाटय़संस्थांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला. तर देशोदेशीची शंभरावर नाटकं निवडीसाठी आली होती. नाटय़क्षेत्रातील पन्नासहून अधिक तज्ज्ञ व्यक्तींनी या निवड प्रक्रियेत सामील होऊन दोन चाळण्यांद्वारे थिएटर ऑलिम्पिक्ससाठी नाटकांची निवड केली. पैकी देशातील सुमारे पावणेपाचशे नाटकांचा थिएटर ऑलिम्पिक्समध्ये समावेश करण्यात आला आहे. तर अन्य देशांमधील ४० ते ४५ ग्रुप्स या महारंगउत्सवात नव्वदच्या वर नाटय़प्रयोग सादर करणार आहेत. नवी दिल्लीसह देशातील १६ शहरांमध्ये थिएटर ऑलिम्पिक्स होणार आहे. त्यात मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगलोर या महानगरांसह जम्मू, चंदिगड, गुवाहाटी, इम्फाळ, आगरताळा, पाटणा, भुवनेश्वर, वाराणसी, भोपाळ, त्रिवेंद्रम, अहमदाबाद आणि जयपूर या शहरांचाही अंतर्भाव आहे. या भव्यदिव्य महारंगसोहोळ्याचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत लाल किल्ल्यावर होत असून त्यासाठी राष्ट्रपतींना पाचारण करण्यात आले आहे. संपूर्ण देशभर विविध शहरांत ५१ दिवस चालणाऱ्या या सोहोळ्याची सांगता मुंबईत ८ एप्रिलला होणार आहे. त्याकरता पंतप्रधानांना निमंत्रित करण्यात आले आहे. नवी दिल्ली हे थिएटर ऑलिम्पिक्सचे मुख्य केंद्र असेल. तिथे दीडशे ते पावणेदोनशे नाटय़प्रयोग सादर होतील. कोलकाता, बंगलोर आणि भोपाळमध्ये ३०, तर मुंबईत ४० नाटय़प्रयोग होणार आहेत. (मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिर आणि वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये थिएटर ऑलिम्पिक्सचे रंगाविष्कार सादर होणार असून, दोन्ही ठिकाणची नाटकं पाहू इच्छिणाऱ्यांसाठी त्यांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत.) इतर शहरांतून साधारणत: १५ प्रयोग सादर होतील. जम्मू आणि इम्फाळमध्ये ८ ते १० नाटके होतील. प्रेक्षक प्रतिसादाचा अदमास घेऊनच ही विभागणी करण्यात आली आहे. शक्यतो त्या- त्या प्रांतांतील नाटकं त्याच प्रांतात सादर न करता त्याच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये (जिथे ती भाषा समजू शकेल!) ठेवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. आपल्या भाषेतील नाटकं लोक कधीही पाहू शकतात. परंतु इतरभाषिक रंगभूमीशी त्यांना अवगत करण्याचा हेतू यामागे आहे.

थिएटर ऑलिम्पिक्स हे केवळ देशीविदेशी नाटकांच्यासादरीकरणापुरतेच सीमित नसून, त्यानिमित्ताने रंगभूमीशी संबंधित इतर अनेक उपक्रमही त्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. ज्यात देशोदेशींच्या मान्यवर रंगकर्मीशी संवाद, प्रयोगपश्चात किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी संबंधित प्रयोगाच्या दिग्दर्शकाशी प्रेक्षकांची बातचीत, जगभरातील महत्त्वाच्या रंगकर्मीची प्रात्यक्षिकांसह व्याख्याने, मुलाखती, परिसंवाद, रंगकार्याशी निगडित दोन आंतरराष्ट्रीय आणि सहा राष्ट्रीय चर्चासत्रे, रंगभूमीविषयक विविध कार्यशाळा, इतर प्रयोगक्षम कलांतील कलाकारांशी सर्जनशील देवाणघेवाण, रस्तानाटय़े, लोककला सादरीकरणे, एकल परफॉर्मन्सेस, कलाप्रदर्शने अशी अगणित कार्यक्रमांची रेलचेल थिएटर ऑलिम्पिक्समध्ये असेल. जागतिक रंगभूमीवरील ‘लिजंडरी’ व्यक्तिमत्त्वांशी संवाद साधण्याची संधीही यानिमित्ताने रसिकांना लाभणार आहे. ज्या ठिकाणी थिएटर ऑलिम्पिक्स होत आहे, त्या परिसरात सणासारखा उत्सवी, भारलेला माहोल निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. याकरता विविध उपयोजित कला आणि त्यांतील कलाकारांची मदत घेण्यात येणार आहे. थिएटर ऑलिम्पिक्समुळे देशभर सुमारे पावणेदोन महिने रंगभूमीचा सतत गजर होत राहील आणि या सर्जनात्मक घुसळणीतून एतद्देशीय रंगकार्यास नवी दिशा मिळून भारतीय रंगभूमी समृद्ध होण्यासाठी प्रेरक शक्ती निर्माण होईल अशी अपेक्षा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी व्यक्त केली आहे. जगभरचं थिएटर आपण समजून घ्यावं आणि त्याचवेळी भारतीय रंगभूमीस प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळावं आणि जागतिक परिप्रेक्ष्यात ती नेमकी कुठे आहे, हे आपणास आकळावं, हाही हेतू थिएटर ऑलिम्पिक्स भरवण्यामागे आहे. देशी रंगभूमीला नवी चेतना, नवी संवेदना प्राप्त करून देण्याबरोबरच देशभरातील लोकांना तिचं सम्यक दर्शन घडावं, हा उद्देश यानिमित्ताने साध्य होणार आहे. प्रांतोप्रांतीचे रंगकर्मी या योगे एका व्यासपीठावर येतील, त्यांच्यात सर्जनात्मक देवाणघेवाण होईल आणि त्यातून उद्याच्या भारतीय रंगभूमीचं नवं नाटक उत्क्रांत होईल अशी आशाही प्रा. केंद्रे यांना वाटते आहे. आणि त्यासाठीच आम्ही हा सगळा घाट घातला आहे असं ते सांगतात.

भारतीय रंगभूमी ही मुख्यत: मराठी, बंगाली, मणिपुरी, कन्नड आणि केरळची रंगभूमी इतपतच सीमित आहे. त्यातही मराठी आणि बंगाली रंगभूमी याच अधिक सक्रीय आहेत. अन्य प्रांतांतील रंगभूमी ही काहीशी हौशी किंवा थिएटर फेस्टिव्हल्सपुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे देशातील प्रांतोप्रांतीच्या रंगभूमीला चालना आणि प्रेरणा मिळण्याकरता अशा भव्यदिव्य ‘ग्रॅण्ड इव्हेन्ट’ची नितांत आवश्यकता होती आणि आहेच. जेणेकरून त्या- त्या प्रांतांतील नाटय़कर्मी मंडळी झडझडून सक्रीय होतील आणि आपल्या मातीतलं आपलं नाटक शोधण्यासाठी बाहेर पडतील. थिएटर ऑलिम्पिक्समधून हे साध्य झालं तर भरून पावलं असंच म्हणता येईल.

– रवींद्र पाथरे

ravindra.pathare@expressindia.com