मोनिका गजेंद्रगडकर यांची ‘उगम’ ही कादंबरी मातृत्वाच्या विविध पलूंचा निरनिराळ्या स्त्रीपात्रांमार्फत शोध घेऊ पाहते. सरवणा नावाच्या एका लहान मुलाचा बदलत जाणारा जीवनप्रवास दाखवणारी ही कादंबरी आहे. पण ती तितकीच नाही. ‘उगम’ ही स्त्रीमधल्या मातृत्वाचे अनेक कंगोरे दाखवणारी कादंबरी आहे.

तामिळनाडूमधील एका लहान गावात एका दरिद्री कुटुंबात व्यंकटेश आणि लक्ष्मीच्या पोटी सरवणाचा जन्म होतो. अनेक वर्षांनी बऱ्याच नवसांनी झालेला हा सरवणा एकुलता एक मुलगा आहे. व्यंकटेशचं दुकान डबघाईला आलेलं आहे. त्यामुळे गाव सोडून धाकटय़ा भावाच्या सल्ल्यानुसार त्याला मुंबईला जावं लागतं.

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?

एरिका ही व्हिक्टरची आई सर्वात प्रथम या कादंबरीत दिसते. व्हिक्टर हा सरवणाचा घट्ट मित्र आहे. एरिका दारूडय़ा नवऱ्याला वैतागून सोडून देते. दुसरं लग्न करते. पण लहानग्या व्हिक्टरला आपण सोडलं या अपराधी भावनेने ती खचत जाते. एरिका कॅन्सर होऊन अपयशी मातृत्वाचं ओझं घेऊन मरते.

लक्ष्मी ही सरवणाची आई. मुंबईत गेल्यावर पोटासाठी ती ‘आया’ या नात्याने एक वर्षांच्या ईशानचीही आई होते. शेवटी परिस्थितीवश ही दोन्ही मुलं तिच्यापासून दुरावली जातात.

काजल ही एक वर्षांच्या ईशानची आई. काजल कथ्थक नृत्यांगना आहे. काजलवर ईशानचं मातृत्व लादलं गेलं आहे. त्या ओझ्याखाली तिच्यातली मनस्विनी गुदमरते आहे. काजलमधील कलाकार तडफडतो आहे. कोत्या मनाच्या नवऱ्याने काजलवर मातृत्व लादून अन्याय केला आहे. काजलनेही स्वतच्या शरीराला बेढब करून या अन्यायाला खतपाणीच घातलं आहे. कारण नृत्यकलावंतासाठी शरीर हे सर्वात महत्त्वाचं साधन असतं. काजलचं लग्न मनातून संपलेलं आहे. काजलला आता हे मातृत्व निभावता येत नाही आणि बेढब शरीरासह स्वतच्या कलेला न्यायही देता येत नाही.

कावेरी ही सरवणाची काकू. ती वांझपणाचा आरोप सहन करत झुरणारी स्त्री आहे. जेव्हा तिला आईपण येणार असतं तेव्हाच दुर्दैवाने तिच्यावर वैधव्याचा घाला पडतो. त्यामुळे तिला अचानक हे मातृत्व नकोसं वाटू लागतं.

सिस्टर क्लेरा ही मुंबईतील चर्चमध्ये नन् झालेली स्त्री. चर्चच्या अनाथालयात काम करताना तिला मातृत्वाची अनिवार ओढ लागते. परिणामी क्लेरा नन्पणाच्या जोखडातून मुक्त होते. मात्र आता तिचं नसर्गिक मातृत्व मिळवण्याचं वय उलटून गेलं आहे. तिला दत्तक मूल मिळू शकत नाही. आणि ते तिला नकोच आहे. चर्च सोडून परत आल्यानंतर क्लेराच्या घरचे लोक तिला नाकारत नाहीत; पण क्लेरालाच घर परकं वाटतं. आयुष्यातील अभावामुळे तडफडत ती शेवटी नराश्याच्या कडेलोटापर्यंत जाते. काही माणसं फार दुर्दैवी असतात. या दुर्दैवी माणसांना वेळीच आपल्याला काय हवं आहे याचा निर्णय घेता येत नाही. ते कळेपर्यंत आयुष्य हातातून निसटून गेलेलं असतं. क्लेरा ही अशीच एक अपयशी ‘न’-आई आहे.

मदर सिल्व्हिया या सगळ्या स्त्रियांमध्ये सर्वात यशस्वी मातृत्व लाभलेली स्त्री आहे. परंतु ती शारीरिकदृष्टय़ा कधीच आई झालेली नाही. तशा प्रकारचं मातृत्व तिला कधीच नको होतं. कदाचित ज्याला काहीच नको असतं त्यालाच सगळं काही मिळतं, याचं हे एक उदाहरण. मदर सिल्व्हियाला लहानपणापासूनच ‘नन्’ व्हायचं असतं. लहानपणीच आयुष्यात काय करायचं आहे हे  कळलेल्या सुदैवी लोकांपकी सिल्व्हिया एक आहे. सिल्व्हियाला पुरुषाची, शरीरसुखाची, संसाराची, मातृत्वाची आस कधी लागलीच नाही. सिल्व्हिया ही मूळची तामिळनाडूची. मुंबईतील चर्चमध्ये अनाथालय चालवताना सिल्व्हियाला खूप आनंद मिळतो आहे. अचानक तामिळनाडूहून आलेला सरवणा सिल्व्हियाच्या चर्चमध्ये येऊ लागतो. सरवणाला गावापासूनच येशूदेवाची ओढ आहे. हळूहळू त्याला मदर सिल्व्हियाची पण ओढ लागते. सरवणा अनाथ नसला तरी अतिशय दरिद्री कुटुंबातील आहे. चर्च अशा मुलांना आधार देते. सिल्व्हियाला सरवणाचं समृद्ध करणारं आईपण लाभतं.

तामिळनाडूतील सुंदर, इवल्याशा गावातून उखडून काढून मुंबईतील कुरूप वस्तीत आल्यावर सरवणाला व्हिक्टरची आभासी मत्री आणि मदर सिल्व्हियात रुजायला आधार सापडतो. अतिसंवेदनशील लहान मुलांना आभासी मत्रीची गरज भासते. सरवणाचा हा आभासी मित्र एकेकाळी वास्तवात असलेला त्याचा मित्र व्हिक्टर आहे. व्हिक्टर मरून गेल्यावरही सरवणाचा आधार आहे.

एका माणसाला दोन धर्म का असू शकत नाहीत? धर्मातराचा एक सहज पलू या कादंबरीत दिसतो. इथे धर्मातर बळजबरीने होत नाही. जो धर्म ऐहिक, मानसिकदृष्टय़ा माणसाच्या परोपरीने मदतीला येत असेल तर तो माणसाला आपणहून पत्करावासा वाटू शकतो. मुळातच सरवणाला व्हिक्टरमुळे येशू आणि चर्चची ओढ असतेच. नंतर मदर सिल्व्हियाच्या सहवासामुळे त्यात वाढ होत जाते. धर्मातराच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या एका लहानशा मुलाचं बदललेलं आयुष्य ‘उगम’ या कादंबरीत दिसतं.

या कादंबरीत अनेक पात्रं आहेत आणि अनेक घटना सतत घडत राहतात, तरी वाचताना कुठेही अडखळायला होत नाही. कादंबरीची भाषा प्रवाही आणि सुगम आहे. चवीसाठी अधेमधे वापरलेले तमीळ शब्द योग्य वाटतात. काजल हे पात्र लेखिकेनं विशेष आत्मीयतेनं रेखाटलं आहे. मदर सिल्व्हियाचं पात्र कादंबरीत सतत घडणाऱ्या नकारात्मक घटनांच्या ओघात खूप सकारात्मक वाटतं. कादंबरीचे मुखपृष्ठ धर्मातराची उंबरठय़ावरची अवस्था दाखवते. मुखपृष्ठात मातृत्वाचा संदर्भ असायला हवा होता.

‘सरवणा’ हे कार्तिकेयाचं नाव. कार्तिकेय देवाला सहा माता असतात. या कादंबरीतही प्रामुख्याने या सहा माता आहेत. हा कदाचित योगायोगाचा भाग असू शकतो, किंवा लेखिकेने योजलेले ते रूपक असू शकते.

‘उगम’ हे या कादंबरीचं नाव यासाठी असावं, की ती माणसाच्या धर्मश्रद्धांचे मूळ शोधायचा प्रयत्न करते. तसेच माणसाचा उगम असणाऱ्या मातृभावनेची अनेक रूपं यात दिसतात. या कादंबरीत आई होण्यासाठी तडफडणाऱ्या स्त्रिया आहेत. तसंच मातृत्व ओझं वाटणाऱ्याही स्त्रिया आहेत. त्याचबरोबर दुसऱ्याचं मूल स्वतचं समजून जोपासणाऱ्या स्त्रियासुद्धा आहेत. इथे बेजबाबदार आईदेखील आहे. सुखाचा त्याग करणारी आईही आहे. एकूण ‘उगम’ ही एक वाचनीय कादंबरी आहे.

उगम’- मोनिका गजेंद्रगडकर 

  • मौज प्रकाशन,
  • पृष्ठे- २२७ , मूल्य- २५० रुपये.