News Flash

ध्वनिमुद्रित शहनाईनवाझ बिस्मिल्लाह खान!

‘गूँज उठी शहनाई’ या बोलपटातल्या वादनानं तर खानसाहेबांना रसिकमनांत खास स्थान मिळवून दिलं.

सनईचा सूर भारतीयांच्या मनात अजरामर करणारे शहनाईनवाझ बिस्मिल्लाह खान यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या ध्वनिमुद्रिकांच्या आठवणी जागवणारा लेख..

बिस्मिल्लाह खान यांना जाऊनपण दहा वर्षे होत आली. पण त्यांच्या शहनाईचा आवाज रोज न चुकता रेडिओच्या सर्व केंद्रांवरून ‘मंगल प्रभात’मध्ये ऐकायला येतो. अजूनही मंगल कार्यात शहनाई वाजवणारे मिळाले नाहीत तर खानसाहेबांच्या वादनाची सीडी मिळवून वाजवली जाते. मजेची गोष्ट म्हणजे, बरंचसं वादन रागदारी संगीतावर आधारित आहे हे पुष्कळ श्रोत्यांना माहीतही नसतं.
१९३६-३७ सालच्या सुमारास बनारस येथे ‘स्टार हिंदुस्थान’ लेबलवर त्यांनी पहिली ध्वनिमुद्रण केली ती सगळी रागदारीची होती. बिहाग, भैरवी, तोडी, दुर्गा, बागेश्री व जोनपुरी असे राग असून लेबलवर ‘विलायतू बिस्मिल्ला ऑफ बनारस’ असं लिहिलं आहे. ऐन विशीतल्या ७८ गतीच्या या ध्वनिमुद्रिका फार गाजल्या नाहीत व आता दुर्मिळ झाल्या आहेत. पुढे १९४१ मध्ये ग्रामोफोन कंपनीनं लखनौ येथे तीन ध्वनिमुद्रिका केल्या, त्यात तोडी व मालकंस राग तसेच ठुमरी व दादरा हे सुगम संगीताचे प्रकार आहेत. लेबलवर ‘बिस्मिल्लाह अ‍ॅण्ड पार्टी’ असं छापलं असून त्यावर ‘सनई गत’ असं लिहिलं आहे. १९४८-४९ मध्ये यात आणखी तीन ध्वनिमुद्रिकांची भर पडली. ध्वनिमुद्रिकाप्रेमींच्या घरातून व सार्वजनिक उत्सव समारंभातून त्या रेकॉर्ड्स वाजवल्या जाऊ लागल्या. गुरूंचा रोष पत्करूनही सुगम संगीताच्या तीन मिनिटं वाजणाऱ्या रेकॉर्ड्स ते देतच राहिले. त्यांची लोकप्रियता पाहून जून १९५१ च्या दिल्लीतल्या ध्वनिमुद्रण सत्रात ‘बाबुल’ सिनेमातील दोन गाणी त्यांनी रेकॉर्ड केली- ‘छोडम् बाबुलका घर’ व ‘पंछी बनमे पिया पिया गाने लगा’. १९५७ पर्यंत रागदारी व सुगम संगीताच्या बरोबरीने ‘जीवन ज्योती’, ‘आवारा’, व ‘बसंत बहार’ सिनेमातली गाणी त्यांनी वाजवली.
१९५९ च्या प्रकाश पिक्चर्सच्या ‘गूँज उठी शहनाई’ या बोलपटातल्या वादनानं तर खानसाहेबांना रसिकमनांत खास स्थान मिळवून दिलं. त्यात एकल वादन तर आहेच, पण उस्ताद अमीर खान साहेब यांच्या गायनाबरोबर जुगलबंदी व उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांच्या सतार वादनाबरोबरची जुगलबंदीही आहे. पुढच्या काळात एल. पी. रेकॉर्ड्सवर सतार, बासरी, सरोद व व्हायोलिनबरोबरच्या जुगलबंदीची ही जणू पूर्वतयारी होती. ही सगळी ७८ गतीची ध्वनिमुद्रणं फक्त तीन-साडेतीन मिनिटांची होती. या बोलपटातील गाणी इतकी गाजली की ‘दिलका खिलौना हाये टूट गया’ व ‘जीवनमें पिया तेरा साथ रहे’ ही गाणी सनईवर वाजवून त्यांनी रेकॉर्डस दिल्या.
१९६० नंतर तंत्रज्ञान बदललं व अधिक काळ वाजणाऱ्या ध्वनिमुद्रिकांची निर्मिती सुरू झाली. त्यातही खानसाहेबांनी तीस तासांहून अधिक काळाचं ध्वनिमुद्रण करून ठेवलं आहे. ते बरंचसं पुन्हा पुन्हा वितरित झालं असून यू टय़ूबसारख्या सोशल मीडियावही ऐकायला मिळतं. पण १९३६ ते १९६० काळातल्या सुमारे पन्नास रेकॉर्ड्सपैकी फारच थोडं उपलब्ध आहे. खानसाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षभरात ही ध्वनिमुद्रणं शोधून काढण्याचं काम करण्यासारखं आहे.
२००१ ची गोष्ट. चोरबाजारात जुन्या दुर्मिळ रेकॉर्ड्सचे ढीग उपसत बसलो होतो. अचानक एक सनईची ध्वनिमुद्रिका हाती आली. लाखेची, फुटणारी ७८ गतीची. तिच्या रंगरूप व अवतारावरून ती खूप जुन्या काळातल्या कलाकाराची वाटत होतीच. कलाकाराचं नाव छापलं होतं- ‘अली बक्ष’. बाकी गावाचं वगैरे नाव नव्हतं. कारण सनईवादकांची घराणी गावावरूनच पडली आहेत. तसा उल्लेख असलेल्या ध्वनिमुद्रिका पूर्वीही माझ्या संग्रहात आलेल्या होत्या. उदा. तालीम हुसेन ऑफ लखनौ. किंवा शेख मुन्ना ऑफ कलकत्ता. अगदी बिस्मिल्ला खानसाहेबांच्या पूर्वीच्या ७८ गतीच्या काही ध्वनिमुद्रिकांच्या लेबलवरती ‘ऑफ बनारस’ असं लिहिलेलं आढळतं. त्यामुळेच अली बक्ष नावाचं वेगळेपण जाणवलं. या रेकॉर्डचं नवल वाटलं. खरेदी करून पिशवीत टाकून घरी आलो. हे नाव कुठंतरी वाचलंय असं अंधूकसं आठवायला लागलं. खानसाहेब अनेक वर्षांनंतर मुंबईला येणार होते. त्यांच्यावर लेख छापून येत होते. एके ठिकाणी त्यांचं शिक्षण मामांकडे म्हणजे अलीबक्ष यांच्याकडे झालंय असं छापून आलं होतं. म्हणजे माझ्या हाती लागलेली रेकॉर्ड त्यांच्या मामांची आहे की काय? कुतूहलापोटी खानसाहेबांच्या मुंबईतल्या शिष्याकडे चौकशी केली. तेचकितच झाले. म्हणाले, ‘‘अहो, त्यांचीच ती. अगदी जपून ठेवा बरं, कुणाला दाखवूही नका. खानसाहेबांशी मी बोलतो. त्यांना ऐकवू या. खूप आनंद होईल.’’
अन् खरोखरीच खानसाहेबांकडून निरोप आला की त्यांना ती रेकॉर्डस् पाहायची व ऐकायची आहे. षण्मुखानंदमधला कार्यक्रम आटोपला की दुसऱ्या दिवशी सकाळी ते उतरले होते त्या नागपाडय़ातल्या हॉटेल साहीलमध्ये भेटायचं ठरलं. हा असा योग येईल असं वाटलं नव्हतं. त्यामुळे खूप आनंद झाला. जुन्या काळचा पितळेचा कण्र्याचा चावीवाला ग्रामोफोन मिळवला. रेकॉर्ड नीट साफ केली. खानसाहेबांना त्यांच्या गुरूची रेकॉर्ड ऐकवायला मिळणार ही कल्पनाच केवढी सुखद होती. त्यात काही उणीव राहू नये म्हणून जुने रेकॉर्ड कॅटलॉग्ज्, मायकल किन्नरचं ध्वनिमुद्रिकांवरचं पॉप्युलरनं प्रकाशित केलेलं पुस्तक बघितलं. पण कुठंच काही माहिती मिळेना. अली बक्ष हे नाव कुठेच आढळेना.
खानसाहेबांच्या भेटीचा दिवस जवळ येऊ लागला. त्यांच्या काही दिवस अगोदर मायकल किन्नरनं पाठविलेल्या पुस्तकाची भेटप्रत मिळाली. ऑस्ट्रेलियाहून त्यानं भारतीय ध्वनिमुद्रिकावरचं त्याचं नवं कोरं पुस्तक स्वत:च प्रकाशित केलं होतं. त्यात १९०८ ते १९१० मध्ये वितरित झालेल्या रेकॉर्ड्सची सूची दिली होती. त्यात तरी काही सापडतंय का ते शोधू लागलो. अगदी शेवटच्या पानांवरील कलाकारांची सूची शोधू लागलो. त्यात अली बक्ष नाव सापडलं. माझ्याकडे एकच होती, पण इथं तर तीन रेकॉर्ड्सचा उल्लेख होता. पण अली बक्ष नावापुढं कंसात alias Talim Hussein (ऊर्फ तालीम हुसेन) असं छापलं होतं. म्हणजे टोपण नावानं या ध्वनिमुद्रिका केल्या होत्या की काय? पूर्वी बालगंधर्वाचं नाव वापरून महाराष्ट्रातही असा उद्योग करून त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा अनेकांनी घेतला होता त्याची आठवण झाली.
पण ही माहिती खोटी ठरो अशी अपेक्षा ठेवून कुणालाच याबाबत काहीही न बोलता ठरल्या वेळी हॉटेल साहीलवर दाखल झालो. खाली लाउंजमध्ये आमच्यासारखेच अनेक आमंत्रित, गायक, संगीतकार, पत्रकार व टीव्हीवाले येऊन बसले होते. आधीच खानसाहेब म्हणजे बडी हस्ती. त्यात नुकताच ‘भारतरत्न’ हा बहुमान मिळालेला. मुंबईत दहा वर्षांनी जाहीर कार्यक्रम. त्यामुळे भेटायला आलेल्यांची ही गर्दी. त्यांचा नमाज वगैरे झाल्यावर बोलावणं आलं.
छोटय़ाशा खोलीत सगळे गेलो. खोली पूर्ण भरून गेली. लुंगी बनियनवर खानसाहेब पलंगावरच मधोमध बसलेले. डोक्यावर नेहमीची टोपी नसल्याने ओळख पटायला क्षणभर वेळच लागला. ताटकळत राहायला लागल्याबद्दल त्यांनी आधी सर्वाची माफी मागितली. मग आमच्याकडे वळून विचारपूस केली. रेकॉर्ड पाहावयास मागितली. हाताळली व न्याहाळून बघितली. त्या काळाची आठवण झाली म्हणाले. शेजारच्या पत्रकार बाईंना दाखवून मजकूर वाचून दाखवायला सांगितला. त्यांनी लेबलावरचा मजकूर वाचून दाखवला. ‘Instrumental, Sanai- Pilu Gat/ Pilu Dadral – Played by Ali Bux.. काही नवख्यांनी कुतूहलानं विचारलं, ‘कोण हो हे?’ खानसाहेब उत्तरले, ‘मेरे मामूका नाम है. उनकी रिकार्ड दिखती है. उनसे ही बजाना सीखा. मेरे गुरू.’ सगळ्यांनीच आपापल्या कानांच्या पाळ्या पकडल्या. तोवर मित्रांनी ग्रामोफोन मांडून तयार ठेवला होता. तिकडे वळून ‘ऐकवा’ म्हणाले.
रेकॉर्ड ग्रामोफोनवर चढवली. वाजायला लागली. पितळेच्या कण्र्यातून खणखणीत आवाज खोलीभर पसरला. दार उघडंच होतं. कॉरिडॉरमधली मंडळीही लक्षपूर्वक ऐकायला लागली. शिष्यगण व चाहते दाद देऊ लागले. मी मात्र खानसाहेबांकडे नजर लावून होतो. ते शांतपणे डोळे मिटून एकाग्रतेने ऐकत होते. तीन मिनिटांची एक बाजू ऐकून झाली. खानसाहेबांनी डोळे उघडले. ‘दुसरी बाजू
सुनाइए’ म्हणाले. तिच्यावरचा पिलु रागातला
दादरा सर्वानाच मोहवून गेला. आपल्या उस्तादाच्या मामूचं वादन ऐकून शागीर्द व पार्टीतली सहकारी मंडळी हरखून गेली. खानसाहेब मात्र ही दुसरी बाजू अगदी शांतपणे ऐकत होते. दुसरी बाजू ऐकून झाल्यावर खोलीत शांतता पसरली. खानसाहेब आता काय बोलतात याकडेच सर्वाचं लक्ष
केंद्रित झालं.
..त्यांनी डोळे उघडले. क्षणभर माझ्याकडे रोखून बघितलं आणि नकारार्थी मान हलवत, पण ठामपणाने म्हणाले, ‘ये हमारे मामूकी रिकार्ड नहीं है. इसमें अगर एक भी जगह हमारे मामूकी कहीं पर भी मिलती तो मैं मानता. लेबल पर भलेही उनका नाम होता लेकिन ये बजाना उनका नहीं है.’ हे ऐकून मी मनोमनी खानसाहेबांना हात जोडले. ऑस्ट्रेलियातून प्रकाशित झालेलं पुस्तकातलं संशोधन अन् खानसाहेबांच्या कानात साठवून राहिलेले मामूच्या सनईचे सूर या दोन्ही गोष्टी
ठामपणे सत्याकडे नेणाऱ्या. पण भावी पिढय़ा
ज्या वेळी अली बक्ष यांच्या सनईवादनाच्या
रेकॉर्ड्स पाहतील व खानसाहेबांचं चरित्र
वाचतील त्या वेळी हे तर बिस्मिल्ला खानांचे गुरू असंच म्हणतील.
chandvankar.suresh@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2016 1:45 am

Web Title: ustad bismillah khan
Next Stories
1 होळी : विडंबनगीते
2 उद्याच्या नेत्याचा उदय?
3 ‘पडघम’ कन्हैयाचे!
Just Now!
X