वर्षां गजेंद्रगडकर    

क्रांतिकारक, पुरोगामी अभिव्यक्ती केवळ परखड, रोखठोक शब्दांतूनच प्रतीत होते असं नव्हे. शब्दांच्या वरच्या कवचाच्या आत दडलेला गाभा जो आशय व्यक्त करतो, तोच खरा लेखकाचा पिंड स्पष्ट करत असतो. शब्दांचं शस्त्र उपसण्यापेक्षा अरुणाताईची तरल, स्निग्ध अभिव्यक्ती तिच्या साऱ्या लेखनातून जगण्यातलं वास्तव ओल्या कंदासारखं अलगद सोलून दाखवताना दिसते.

Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा
Prepared primary textbooks in 52 vernacular languages of 17 states so that students have access to all study materials in their mother tongues
आपल्या बोलीतून शिकता यावे म्हणून..

मी मराठी साहित्याची अभ्यासक नाही. माझी शैक्षणिक पाश्र्वभूमी कला शाखेतली नाही. मी कवयित्री किंवा समीक्षकही नाही. तरीही ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्याविषयी मी लिहिते आहे, ते केवळ तिची बहीण असल्यामुळे! खरं तर मी धाकटी बहीण असल्याने तिच्या आजवरच्या प्रवासाबद्दल लिहिण्याचाही अधिकार मला नाही. मराठी साहित्य क्षेत्रातल्या एखाद्या मान्यवराने लिहिलं असतं तर कदाचित तिच्या कवितेविषयी, कवितेवरच्या प्रेमाविषयी लिहिलं असतं, तिच्या बहुपदरी लेखनाची मर्मस्थळं उलगडून दाखवली असती, किंवा मराठी वाङ्मयाला तिने दिलेल्या योगदानाचा मागोवा घेतला असता. परंतु ताईला मिळालेल्या या सन्मानाच्या निमित्ताने मला लिहावंसं वाटतं आहे- अण्णांकडून (रा. चिं. ढेरे) तिला मिळालेल्या वारशाविषयी, तिच्या जीवनधारणांविषयी, तिच्या निखळ वाङ्मयीन प्रेरणांविषयी, तिच्या सगळ्याच लेखनातून उमटलेल्या स्त्रीबद्दलच्या समजुतीविषयी आणि शब्दाच्या सामर्थ्यांवर असलेल्या तिच्या गाढ विश्वासाविषयी!

प्राचीन मराठी वाङ्मय आणि संस्कृतीच्या क्षेत्रात अण्णांनी जे काम केलं ते खरोखर डोंगराएवढं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जवळपास सहा दशकांत शंभराहून अधिक पुस्तकांचं त्यांनी केलेलं लेखन-संपादन हे त्यांच्या ज्ञानावरच्या अपार निष्ठेची प्रचीती देणारं आहे. त्यांची ही ज्ञानसाधना मुळात पोसली ती महाराष्ट्रातल्या एका समृद्ध ग्रामसंस्कृतीने, तिथल्या लोकपरंपरेने आणि या संचिताचा अन्वय लावण्याच्या त्यांच्या बुद्धीने व विशुद्ध संशोधनदृष्टीने! आम्ही भावंडं शहरात वाढलो असलो तरी आमचं सगळं लहानपण शनिवार पेठेत नदीकाठच्या एका वाडय़ात गेलं. एकीकडे श्रावणातले पंचमीचे फेर, मंगळागौरीचे खेळ, गावदेवीला नहाण घालण्यासारख्या कितीतरी चालीरीती, वर्षभरातले पारंपरिक सण-उत्सव, रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत होणारी कीर्तनं, बायकांची व्रतवैकल्यं असं सगळं पारंपरिक वातावरण भोवती होतं. दुसरीकडे अण्णांनी स्वीकारलेल्या असामान्य वाटेचा स्वीकार आई-आत्यांसह आम्ही मुलांनी फार आनंदानं आणि सहजपणानं केला. पुस्तकांच्या घरातला आमचा वावर, शब्द आणि भाषेशी जोडलेले कितीतरी खेळ, अण्णांचं अविश्रांत लेखन-वाचन, अण्णा आमच्यासाठी जो मुद्दाम आणायचे तो निरनिराळ्या प्रकारच्या पुस्तकांचा खाऊ, त्यांच्याकडे येणारी विद्वान, रसिक मंडळी, अण्णांच्या त्यांच्यासोबत चालणाऱ्या अनेक विषयांवरच्या चर्चा व अनौपचारिक गप्पांचे फड, वासुदेव-भुत्ये-गोंधळी अशा लोककलाकारांशी अण्णांचे होणारे संवाद, अनेक भल्या माणसांशी, कुटुंबांशी असलेला आणि आई-अण्णा-आत्या या तिघांनीही जिवापाड जपलेला, वाढविलेला रक्ताच्या नात्यापल्याडचा स्नेह.. अशा खऱ्या अर्थाने सुसंस्कृत घरात आम्ही वाढत होतो. भौतिक प्रतिकूलता असली तरी त्याची जाणीव होऊ नये इतके लहान लहान अलौकिक आनंद अण्णांमुळे आमच्या वाटय़ाला आले होते.

या सगळ्या संचिताची पुरचुंडी सोबत घेऊन ताई लिहायला लागली. शब्द तिला पहिल्यांदा भेटला तो कवितेतूनच! अण्णांचा मूळ पिंडही कवीचाच होता; परंतु संशोधनाच्या वाटेने चालताना त्यांची कविता मागे राहिली आणि बहुधा तीच पुढे ताईच्या मनात रुजली. कवितेचं बोट धरूनच तिनं वाङ्मयविश्वात प्रवेश केला आणि पुढे ललित लेखन, कथा, कादंबरी, संशोधन अशा अनेक वाङ्मयप्रकारांना तिनं सहज आपलंसं केलं. परंतु ताईला अण्णांकडून मिळालेला हा वारसा केवळ वाङ्मयीन नाही; तो माणूसपणाचा आहे, संवेदनशीलतेचा आहे, सहृदयतेचा आहे. सहिष्णुता आणि समन्वयशीलतेचाही आहे. मुळात आपलं जगणं आणि साहित्य या विभक्त बाबी नाहीत. कागदावर उमटणारा शब्द हा फक्त भाषेचा एक अवयव नसतो, ती आपल्या अस्तित्वाची खूण असते, हे भान तिला घरातल्या वातावरणानं दिलं. हे भान जागं असल्यामुळे कळत्या वयाच्याही आधीपासून अनुभवलेल्या वातावरणाकडे, भेटलेल्या माणसांकडे, त्यांच्या जगण्याविषयीच्या समजुतींकडे, वेगवेगळ्या नातेसंबंधांकडे पुढच्या सगळ्या लेखनप्रक्रियेमध्ये अगदी नितळ दृष्टीनं ती पुन्हा पाहू शकली.

आम्ही राहत होतो त्या वाडय़ात आणि आमच्या जोडलेल्या परिवारांमध्ये वेगवेगळ्या पारंपरिक भूमिकांमधल्या अनेक बायका होत्या. त्यांचं अनेक प्रकारचं सोसणं, त्यांची घुसमट, त्यांचे लहान लहान आनंद आणि वेदना, त्या काळाची धडधड सोबत घेऊन ताईच्या मनात नेणिवेच्या पातळीवर कुठेतरी अगदी ताज्या राहिल्या होत्या. पुढे तिचे पीएच. डी.चे मार्गदर्शक आणि गुरू डॉ. भा. दि. फडके यांच्यासोबत तिनं पुणे विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण विभागासाठीही काही काळ काम केलं. या कामाच्या निमित्ताने ती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बरीच हिंडली. नंतर अण्णांच्या संशोधनाच्या निमित्तानंही दक्षिण भारतातल्या लहान लहान गावांमध्ये तिचा पुष्कळ प्रवास झाला. अण्णांसोबत केलेल्या प्रवासात बहुजन संस्कृतीशी तिची अधिक जाणतेपणानं ओळख झाली आणि अभिजात परंपरेशी असलेलं या संस्कृतीचं नातं ती समजून घेऊ शकली. शिवाय या सगळ्या भटकंतीत रूढींचं जू मानेवर घेऊन जगणाऱ्या, परंपरेला शरण जाणाऱ्या बायका तिनं पाहिल्या. घराचा उंबरा न ओलांडलेल्या, निरक्षर, पण विलक्षण शहाणीव असलेल्या बायका तिनं पाहिल्या. एकमेकींच्या सहवासात मोकळ्या होणाऱ्या, आपली सगळी दु:खं सीता-द्रौपदीसारख्या स्त्रियांबरोबर वाटून घेणाऱ्या बायका तिला भेटल्या. आणि परंपरेला प्रश्न विचारत ती झुगारून देणाऱ्याही अनेक जणी तिला भेटल्या. नकळत्या वयापासून पुढे सातत्यानं भेटलेल्या या सगळ्या जणींनी ताईच्या स्त्रीविषयक जाणिवेला आकार दिला आहे. पुढे वाढत गेलेल्या वाचन आणि अभ्यासामुळे ताई मिथकांतल्या स्त्रियांच्या, संत स्त्रियांच्या, १९ व्या शतकातल्या परिवर्तन पर्वातल्या आणि समकालीन स्त्रियांच्याही जगण्याची मुळं एका तीव्र असोशीनं, विलक्षण संवेदनशीलतेनं आणि गाढ सहृदयतेनं शोधत राहिली. तिची स्त्रियांविषयीची ही संवेदनशीलता, आस्था आणि समजूत तिच्या अनेक कवितांमधून, ‘स्त्री आणि संस्कृती’सारख्या ललित गद्यामधून, ‘विस्मृतिचित्रे’सारख्या संशोधनपर लेखनातून, ‘प्रतिष्ठेचा प्रश्न’सारख्या अनुवादातून, ‘भगव्या वाटा’सारख्या स्त्री-संतांविषयीच्या लेखनातून सातत्यानं प्रतिबिंबित होत राहिली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी आणि महाराष्ट्राच्या परिघाबाहेर असलेल्या संत स्त्रिया, इतर प्रांतांमधल्या लेखिका-कवयित्री यांचंही साहित्य ताई अभ्यासते आहे. त्यांच्याविषयीच्या लेखन-अनुवादातून मराठीशी त्यांची नाळ जोडू बघते आहे आणि देश-प्रांत-भाषा-जात-धर्म अशा भेदांच्या पलीकडे जाणारा, वाङ्मयातून उमटलेला स्त्रीच्या जगण्याचा सार्वकालिक चेहरा स्पष्ट करू पाहते आहे. स्त्रियांच्या दु:ख-वेदनांची, त्यांच्या साध्यासुध्या आनंदाची, त्यांच्या अपेक्षांची, त्यांच्या निरागस, धीट जाणिवांची, सृष्टीच्या श्वासात मिसळून गेलेल्या त्यांच्या श्वासांची, परिवर्तनाला अनुकूल अशा त्यांच्या आंतरसामर्थ्यांची एक फार घट्ट वीण ताईच्या आजवरच्या सगळ्याच लेखनातून समोर येत राहिली आहे. स्त्रीवादाचा हा आविष्कार स्त्रियांसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कामापेक्षा उणा कसा असेल?

शिवाय क्रांतिकारक, पुरोगामी अभिव्यक्ती केवळ परखड, रोखठोक शब्दांतूनच प्रतीत होते असं नव्हे. शब्दांच्या वरच्या कवचाच्या आत दडलेला गाभा जो आशय व्यक्त करतो, तोच खरा लेखकाचा पिंड स्पष्ट करत असतो. शब्दांचं शस्त्र उपसण्यापेक्षा ताईची तरल, स्निग्ध अभिव्यक्ती तिच्या साऱ्या लेखनातून जगण्यातलं वास्तव ओल्या कंदासारखं अलगद सोलून दाखवताना दिसते. अण्णांकडून तिला मिळालेली सहिष्णु आणि समन्वयशील दृष्टी विरोध आणि कटुतेवर भर देण्याऐवजी शब्दाच्या हातात नेहमीच जगण्याविषयीच्या समजुतीचं बोट देत आली आहे. अशा निरंजन शब्दावर, त्याच्या सामर्थ्यांवर ताईचा कायम विश्वास राहिला आहे. किंबहुना, तोच तिच्या जगण्याचाही धर्म आहे.

अण्णा सार्वजनिक जीवनापासून नेहमीच दूर राहिले. एकांडेपणाने साठ वर्ष ज्ञानयज्ञ चालवत राहिले; परंतु त्यांची अध्ययनदृष्टी एकारलेली नव्हती. वर्तमानाच्या उजेडात भूतकाळाची पुनर्बाधणी करणारी त्यांची संशोधन भूमिका होती आणि या भूमिकेला पुष्टी देणाऱ्या पूर्वसुरींच्या कामाविषयी त्यांना कृतज्ञताही होती. दैवतविज्ञान, मूर्तिशास्त्र, समाजशास्त्र, सांस्कृतिक इतिहास आणि भूगोल, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती अशा अनेक विषयांचा मेळ घालणारी अण्णांची संशोधनदृष्टी बहुविद्याशाखीय होती. ज्ञानाचे कप्पे न करता त्याच्या विविध प्रवाहांना जोडणारे दुवे अण्णांच्या लेखनानं स्पष्ट केले आहेत. ताईच्या लेखनाचं क्षेत्र भिन्न असलं तरी परंपरेचा राजहंसी विवेकाने स्वीकार करून समकालीन वास्तव तपासण्यावर, त्याचा अन्वयार्थ लावण्यावर ताईच्या सगळ्याच लेखनाचा भर राहिला आहे. तिनंही महाराष्ट्रातल्या विशाल ज्ञानपरंपरेचं, इथल्या सकस वाङ्मय परंपरेचं भान नेहमीच जागं ठेवलं आहे आणि ती परंपरा पुढे नेण्यासाठी आपल्या परीनं आपल्या शब्दाचं बळ एकवटलं आहे.

आजच्या नव्या पिढीतल्या अभ्यासकांना या समृद्ध ज्ञानपरंपरेशी जोडण्याच्या विचारानं एखादी संस्था स्थापन करायचा विचार अनेक दिवस ताईच्या मनात होता. अण्णांच्या नावाने ‘डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती-संशोधन केंद्र’ सुरू करून आम्ही ताईची कल्पना तीन वर्षांपूर्वी प्रत्यक्षात आणली. अण्णांचा प्रचंड आणि अमोल ग्रंथसंग्रह अभ्यासक आणि संशोधकांना सर्व सुविधांसह खुला व्हावा, बहुविद्याशाखीय आणि समन्वयशील संशोधनदृष्टी असणारे अनेकानेक संशोधन प्रकल्प या संग्रहाच्या आधारे सिद्ध व्हावेत आणि सांस्कृतिक अभ्यासाला गती व पुष्टी मिळावी, अशी ताईच्या मनातली केंद्राची दिशा आहे. वाङ्मयबाह्य़ घटकांना दूर ठेवून विशुद्ध ज्ञानाची क्षितिजं विस्तारणारी संशोधनदृष्टी रुजावी, वाढावी, ही तिची भूमिका स्वत:च्या लेखनापलीकडे जाऊन वाङ्मयाच्या, ज्ञानाच्या क्षेत्राशी असणारी बांधिलकी स्पष्ट करणारी आहे असं मला वाटतं.

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत गेल्या दोनेक दशकांपासून माणसाच्या जगण्यावर एक झाकोळलेपण आलं आहे आणि सगळीकडचा असह्य़ कोलाहल वाढतो आहे. अशा वेळी कुणाही संवेदनशील व्यक्तीला जाणवणारी खंत व अस्वस्थता ताईलाही जाणवते आहे आणि तिच्या शब्दांतून ती व्यक्तही होते आहे. मात्र, संमेलनाध्यक्ष म्हणून तिची निवड झाल्यापासून गेल्या आठ दिवसांत सगळ्या स्तरांतून तिच्यापर्यंत पोहोचलेला आनंद नक्कीच उभारी देणारा आहे. शिवाय जगातल्या भलेपणावरचा विश्वासही आम्हा सगळ्यांना अण्णांकडून वारशाने मिळाला आहे. तो ताईच्या शब्दाला कायम बळ देत राहीलच.