ज्येष्ठ व्यंगचित्रकार

वसंत सरवटे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे सुहृद आणि ‘राजहंस’चे प्रकाशक दिलीप माजगावकर यांना उभयतांच्या वेळोवेळी झालेल्या भेटींतून उलगडलेले सरवटे..

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
woman who went for a morning walk in Dombivli has been missing for twelve days
डोंबिवलीत सकाळी फिरण्यासाठी गेलेली महिला बारा दिवसांपासून बेपत्ता

प्रिय वसंतराव,

तेंडुलकर गेले. पाडगांवकर गेले. आता तुम्ही. तुमच्यापैकी कोणाचेही जाणे अनपेक्षित नव्हते. त्यामुळे धक्का नाही बसला. खरं तर तुमच्या जाण्याने तुमची थोडी सुटका झाल्यासारखे वाटले. राजेंद्र मंत्रींचा फोन आला. मागून मंजू बोलली- ‘‘तुम्ही येऊ  नका,’’ म्हणाली, ‘‘प्रकृती कशी आहे?’’ विचारलं. ‘‘बाबा अखेपर्यंत तुमच्या प्रकृतीची चौकशी करत होते,’’ म्हणाली. फोन ठेवला. आणि तुमची शेवटची भेट डोक्यानं घेतली. फार त्रासाची झाली हो ती भेट. तुमचे फोनवर फोन येत होते- ‘‘या. सत्यजीतसाठी या. एकटे या. खूप बोलायचंय.’’ पण माझा पाय पुण्यातून सुटता सुटत नव्हता. शेवटी येण्याचा दिवस ठरवला, कळवला. म्हणालात, ‘‘येऊ  नका. अडचण आहे. फोनवर सांगता येत नाही. नंतर कळवतो.’’ मग फोन आला, या. आलो. सत्यजीतनेच दार उघडले. हसला. आनंदात वाटला. बरं वाटलं. मग आत आलो. समोरच्या सोफ्याच्या एका कडेला तुम्ही बसला होता. अंगावर स्वच्छ पांढरा, इस्त्री न केलेला पायजमा-नेहरू शर्ट होता. उजव्या हाताला काठी. फार आक्रसून बसलेले वाटलात. थोडय़ा अंतरावर वहिनी. त्यांना ऐकण्याचा प्रश्न असल्याने फक्त हसल्या. चेहरा निर्विकार. तुम्ही हसलात. पण हसणे नेहमीसारखे नव्हते. त्यात उदासी जाणवली. पण खूप बोलण्याचा मूड होता. बोलत होतात, पण आवाज खोल खोल होता. बोलणे स्पष्ट कळत नव्हते. बोलताना सुरुवात झाली की मधेच एखाद्या व्यक्तीचा, गावाचा संदर्भ यायचा. नेमके तेच नाव तुम्हाला आठवायचे नाही. अगदी तोंडावर यायचे, पण आठवायचे नाही. तुमचा उजवा हात वर-खाली, कपाळावर सगळीकडे फिरायचा; पण नाही आठवायचे. मी अंदाजाने दोन-चार नावे घ्यायचो. एखादे जमले तर तेवढय़ापुरते हुशारायचात. पण दर दोन वाक्यांनंतर असे व्हायला लागले की कंटाळायचात. म्हणायचात- ‘‘बघा, असं होतं. नावच आठवत नाही.’’ मग मीच गप्पा खुलवण्यासाठी विषय पुरवत राहिलो. कोल्हापूरचे दिवस, शि. द. फडणीस, मंत्री, केशवराव कोठावळे यांच्यावर बोलताना थोडे खुललात. त्यातून शि. दं.विषयी बोलताना विशेष. म्हणालात, ‘‘शिवराम माझा शाळासोबती. आम्ही दोघांनी एकाच सुमारास चित्रे काढायला सुरुवात केली. मी अभ्यासात चांगला होतो म्हणून इंजिनीयरिंगच्या वाटेला गेलो. पण त्यानं झोकून देऊन चित्रकलाच केली. मी केलं ते चूक की बरोबर, हे इतक्या वर्षांनंतरही मला सांगता येत नाही. फार विचार करून मी हा निर्णय घेतला असंही नाही. आपण आयुष्यात ठरवतो काय, होतं काय! आता मजा वाटते सगळी. एक काळ असा होता, की नोकरी करून मी रात्री उशिरा काम करायचो. दिवाळी अंकाच्या वेळी तर विशेष. आता आश्चर्य वाटतं, पण तेव्हा झालं खरं.’’

रमेश मंत्री तुमच्या विशेष प्रेमाचे. म्हणालात, ‘‘त्याचं सगळंच लेखन मला नाही आवडायचं. पण जनू बांडे आवडला. पण मंत्री माणूस फार छान होता, उत्साही होता.’’ दळवींविषयी फार भरभरून बोललात. त्या दिवशी हे सगळे विषय आपल्या बोलण्यात आले. पण बैठकीला रंग नव्हता. तुमचा खोल आवाज, अस्पष्ट बोलणं, विस्मरण या अडथळ्यांतून फार कमी गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. अंदाजाने मी काही घेत होतो. सारखे मनात येत होते- तुम्हाला दुसरंच काही बोलायचंय. तुम्ही एक-दोनदा तसं बोललातही. पण बाजूला इतर मंडळी वावरत होती. तुम्हाला बोलणं जमत नव्हतं. मला अडचण लक्षात येत होती; पण दोघे काही करू शकत नव्हतो. तास-दीड तासानंतर मी बैठक आवरती घेतली. ‘‘पुन्हा या, वेळ काढून या,’’ असे दोन-तीनदा तुम्ही मला बजावले. मी तुम्हाला पुण्याला जातोय असं सांगून निघालो.

जिना उतरून रस्त्याला लागलो. पण तेव्हाच मनाने घेतले, की ही तुमची बहुधा शेवटची भेट ठरणार. नंतर पुण्याला आलो. चार-सहा दिवस कामाच्या धावपळीत गेले आणि अचानक फोन आला- ‘पोहोचलात का पुण्यात?’ मी इकडून दोन-तीन वेळा सांगून पाहिले की, त्याच दिवशी आलो; पण तुम्हाला कळल्याचे जाणवले नाही. मी नाइलाजाने फोन ठेवून दिला. पुन्हा डोक्यात तुमचे विचार सुरू झाले. एक अस्वस्थता आली. सहज म्हणून जुन्या फायलीतून तुमची पत्रे काढली. वेगवेगळ्या संदर्भात तुम्ही लिहिलेली. तुमच्यावर ‘रेषालेखक’ पुस्तकात मी थोडे लिहिलेय. ते आता माझ्यासमोर आहे. ते वाचताना तर जवळपास पन्नास वर्षांपूर्वीचे ते दिवस लख्ख आठवले. पहिली भेट आठवली. ६८ साल. जुलै महिन्याचे दिवस. ‘मौज’चे ऑफिस. तिथून आपण चालत चालत एका हॉटेलमध्ये चहा घेतला होता. त्या काळात तुम्ही ए. सी. सी.त नोकरीला होतात. आपण ऑफिसमध्येच भेटायचो. जेवायला बाहेर हॉटेलमध्ये जायचो. काळा घोडय़ाजवळचं एक छोटं पारशी हॉटेल आपल्या दोघांनाही आवडायचं.

आपल्या गप्पांना कोणताही विषय वज्र्य नसायचा. राजकारण, समाजकारण तर असायचेच; पण लेखक, त्यांचे नवे-जुने लेखन, नवी नाटके, चित्रपट आणि वेगवेगळे चित्रकार, त्यांची चित्रे, त्यांच्या चित्रशैली याविषयी आपण बोलायचो. म्हणजे मुख्यत: तुम्ही बोलायचात अन् मी ऐकायचो. या ऐकण्यातच त्या- त्या विषयातले माझे शिकणे सुरू होते. तुमच्याशी गप्पा हेच माझं खरं शिक्षण होतं. कितीतरी गोष्टी मी तुमच्याकडून शिकत होतो.

चित्रकला हा माझ्या आवडीचा विषय नव्हता; पण चित्र कसे बघायचे, त्यात नेमके काय पाहायचे, त्याची शैली कशी ओळखायची, त्याची रेषा, त्याचे कम्पोझिशन, त्यातल्या स्पेसचा वापर, अंधार-उजेडाचा खेळ, त्यातले रंग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रामागचा चित्रकाराचा विचार कसा समजून घ्यायचा- हे मला तुमच्याकडून हळूहळू समजू लागले. त्यात गोडी निर्माण झाली. वेळ मिळेल तेव्हा आपण दोघं बाजूच्या जहांगीर आर्ट गॅलरीतल्या प्रदर्शनाला जात असू. तिथली चित्रे पाहत असताना मी आपल्याला बोलते करायचो. तुम्ही चित्रे कशी बघता, त्यावर विचार कसा करता, हे मी समजून घ्यायचो. त्यातून माझी समज वाढत होती. माझ्या परीनं मला एक नजर मिळत होती. मी मनाशी विचार करू लागलो, त्याचा अर्थ लावू लागलो. पुढे तो माझ्या मनाचा आवडीचा खेळ झाला. हा खेळ खेळायला माझ्या हाताशी ‘माणूस’चे माध्यम होते. तिथे मी वेगवेगळे प्रयोग करून बघायचो. काही जमायचे. काही साफ फसायचे. त्याविषयी मुंबईत तुमच्याशी बोलायचो. त्या प्रयोगांतल्या अधिक-उण्याविषयी तुम्ही फार आत्मीयतेने माझ्याशी बोलायचात. इतर चित्रकारांच्या कामाविषयी तुम्ही बोलायचात. अनंत सालकर हे त्या काळात ‘माणूस’मध्ये बरेच काम करायचे. त्यांच्या कामातली सफाई तुम्हाला आवडायची. पण ‘दलालांच्या प्रभावातून ते बाहेर आलेले नाहीत. आणि चित्रकाराने फार काळ कोणाच्या प्रभावाखाली राहू नये,’

असे तुम्ही बोलून गेलात. शाम जोशींच्या कामाविषयी बोलताना तुम्ही म्हणालात, ‘चित्रकार ज्या वातावरणात सतत काम करतो, त्याचा परिणाम त्याच्या कामावर होत असतो. शाम जोशी जाहिरात संस्थेत कामाला नसते तर त्यांचं काम वेगळ्या दिशेनं पुढे गेलं असतं.’ अशा तुमच्या बोलण्यातून मी काही ना काही घेत होतो. एकदा बोलताना सहज म्हणून गेलात, ‘मला आश्चर्य वाटतं. इतक्या वर्षांत तुम्ही ‘माणूस’चा लोगो (बोधचिन्ह) करू नये. दर अंकागणिक ‘माणूस’ हे नाव सोयीनुसार हवं तसं तुम्ही अंकावर वापरता. जगातलं हे पहिलंच उदाहरण असावं.’

वसंतराव, असे आपण कितीतरी विषयांवर, किती काळ बोलत असू. भेटी तर अगणित. त्या कमी पडायच्या म्हणून तुम्ही दिवस-दोन दिवस मुक्कामाला यायचात. पहाटेपर्यंत गप्पा चालायच्या. तेंडुलकर आपल्या दोघांचे मित्र. तुम्ही त्यांची सदैव पाठराखण करायचात. त्यावर आपण वाद घालायचो. आठवतंय, एका भेटीत तेंडुलकरांच्या ‘म. टा.’मधल्या श्री. पुं.संबंधातल्या पत्रावरून असाच वाद झाला होता. ‘तेंडुलकर श्री. पुं.वरचा त्यांचा जुना राग चुकीच्या पद्धतीने इथे काढत आहेत. त्यांची भूमिका निखळ नैतिकतेच्या पातळीवर जरी बरोबर असली, तरी त्यांनी अशी नैतिकता स्वत:च्या बाबतीत कधी दाखवली नाही. म्हणूनच त्यांना ती घेण्याचा अधिकार नाही!’ या माझ्या विधानावर तुम्ही पटल्यासारखे छानसे हसलात; पण काही बोलला मात्र नाहीत. तुमच्या अशा कितीतरी भेटी माझ्या मनाशी येताहेत.

आणि सुनीताबाईंबरोबरची ती भेट आठवतीय का? प्रयाग हॉस्पिटल. रात्रीचे दहा वाजले होते. पुलं आता अखेरच्या प्रवासाला निघाले होते. प्रश्न काही तासांचा होता. दिवसभर लोकांची ये-जा होती, म्हणून सुनीताबाईंनी आपल्याला उशिरा बोलावले होते. त्यांच्या खोलीबाहेरच्या व्हरांडय़ात आपण तिघे बसलो होतो. सुनीताबाई शांत होत्या. थकवा चेहऱ्यावर दिसत होता. भाईंबद्दल बोलत होत्या. अखंड, तासभर.  खूप आठवणी सांगत होत्या. मधेच एकजण आला. भाईंना बघायचंय, म्हणाला. त्यांच्यासाठी पंढरपूरहून प्रसाद घेऊन आलोय, म्हणाला. त्या म्हणाल्या, ‘‘भाई झोपलाय आता. उद्या देईन हं.’’ तो गेल्यावर म्हणाल्या, ‘‘फार प्रेम करतात हो लोक भाईवर.’’ नंतर म्हणाल्या, ‘‘भाई दहा वर्षांचा असताना पुण्यात शाळेच्या ट्रिपबरोबर आला होता. त्या वेळी ज्या वास्तूत त्याने प्रथम पाऊल टाकले आणि एक रात्र मुक्काम केला, त्याच एम. आर. जोशींच्या वास्तूतून उद्या भाई जगाचा निरोप घेईल. कसे योग असतात बघा.’’ पुढे म्हणाल्या, ‘‘एका संस्थेला भाईला मोठी देणगी द्यायची आहे. पण काही सरकारी उपचारांत कागदपत्रे रखडली. भाईसमोर ती देता आली असती तर त्याला फार आनंद झाला असता.’’ त्याही परिस्थितीत बाई कोणता विचार करतात, हे बघून आपण दोघं चकित झालो. उठून तिघे भाईंच्या खोलीत गेलो. बघितलं- ते शांत पडले होते. नाका-तोंडात नळ्या होत्या. निघताना सुनीताबाईंनी तुमचे हात हातात घेतले. म्हणाल्या, ‘‘भाईला तुमचं काम फार आवडायचं.’’ नंतर आपण कोणीच काही बोलत नव्हतो. डोळे मात्र बोलत होते.

घरी आल्यावर दोघेच बोलत बसलो. विषय अर्थात पुलं. तुम्ही त्यांच्या खूप आठवणी सांगत होतात. गप्पांच्या ओघात म्हणालात, ‘‘पुलंना चित्रकला आवडायची. ते कौतुकानं चित्रं बघायचे. चित्रकाराचं कौतुकही करायचे. मी त्यांच्या अनेक पुस्तकांचं काम केलंय. पुलंनी त्या- त्या वेळी माझं कौतुकही केलंय. त्या कौतुकात प्रेम होतं; पण चित्रांची जाणकारी मला दिसली नाही. त्यांना चित्रकलेची ‘ती’ नजर नव्हती. तेंडुलकरांकडे मात्र ‘ती’ नजर होती. त्यांच्याशी बोलताना ते जाणवायचं. पण पुलंकडे संगीताचा जो कान होता, तो तेंडुलकरांकडे नव्हता.’’ मग मला झर्रकन् आठवला तो तेंडुलकरांचा ‘रातराणी’ सदरातील बडे गुलाम अली खां यांच्यावरचा लेख. तो लेख अप्रतिम होता. पण त्या लेखात तेंडुलकर गाण्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचत नाहीत, तर परिघावरून त्या गाण्याचा श्रोत्यांवरचा परिणाम ते चितारतात.

आपण असेच बोलत राहिलो. आपल्या गप्पांना अंत नव्हता. घडय़ाळात पहाटेचे तीन वाजले होते. तुम्ही चहा केलात. थोडा वेळ आपण पडलो. सकाळी मधू गानूंचा फोन आला. आपण रिक्षा करून पुलंच्या अंत्यदर्शनाला त्यांच्या घरी गेलो. नंतरच्या अंत्ययात्रेला आपण जाणार नव्हतो, कारण ती सरकारी इतमामाने होणार होती. पण गेलो. दूरवर उभे होतो. नंतर आपण दोघेही तिथून निघालो. तुम्ही मुंबईला परतलात.

मात्र, तेंडुलकरांकडे असलेल्या चित्रकलेबद्दलच्या ‘त्या नजरे’बद्दल तुम्ही केलेली टिप्पणी माझ्या लक्षात राहिली. त्यातून माझ्या डोळ्यांपुढे एक पुस्तक दिसत होते. चित्रकलेची जाणकारी असलेला तेंडुलकरांसारखा प्रतिभावान साहित्यिक आणि साहित्याची प्रगल्भ समज बाळगणारा तुमच्यासारखा प्रतिभाशाली चित्रकार यांच्या गप्पांमधून तुमचा कलाप्रवास अन् कलाविचार उलगडला तर..? मी तेंडुलकरांशी आणि तुमच्याशी हा विषय बोललो. तुम्हा दोघांनाही ही कल्पना आवडली. तेंडुलकरांनी तुमच्या आठ-दहा प्रदीर्घ मुलाखती घ्याव्यात असे ठरले. मात्र, तेंडुलकरांच्या तब्येतीमुळे ही कल्पना पुढे प्रत्यक्षात येऊ  शकली नाही.

ठरवूनही भरता न आलेली.. कोरीच राहून गेलेली ही मोकळी जागा.

वसंतराव, विचारपूर्वक मोकळ्या ठेवलेल्या कोऱ्या जागा हे तुमच्या चित्रांचे एक ठळक वैशिष्टय़. तुमच्या जाण्याने कोरीच राहणारी तुमच्या कलाविचाराची मोकळी जागा आता मात्र भरली जाणार नाही.. ती कोरीच राहणार.

तुमचा,

दिलीप माजगावकर

मला व्यंगचित्रांतली आपली रेषा फार आवडते. ती विलक्षण बोलकी आहे. आपलं अवघं व्यक्तिमत्त्व ती चित्रातून व्यक्त करते. आपला चेहरा, त्याची विशिष्ट ठेवण, आपलं हसणं, बोलणं, केसांचा भांग.. इतकंच नाही, तर आपलं इंजिनीयर असणं- हे सारं मी आपल्या रेषेतून पाहू शकतो. त्या रेषेला स्वत:चं एक वळण आहे, शिस्त आहे, तिचं म्हणून एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. ती स्टेटमेंट करते. पण ते करताना आक्रमक होत नाही. ती मिश्कील आहे. ती बोलते, हसते.

वसंतरावांच्या चित्रांचे एक वैशिष्टय़ आहे. ती चित्रं मिश्कील असतात, पण ती पाहिल्यावर आपण सहसा खुदकन् हसत नाही. पाहताक्षणी हसू आणणारी चित्रं अनेकदा One-dimentional ’ असतात. ती परत पाहण्यात पूर्वीसारखी गंमत येत नाही. त्यांची चित्रं मात्र वेगळा अनुभव देतात. ती मिश्कील असतात, पण त्यात कल्पना आणि विसंगतीच्या जोडीनं एक विचारही येतो. प्रसंगी तो बघणाऱ्याला काहीसा अंतर्मुख करतो; पण तो व्यंगचित्राला तोलून धरणाऱ्या वजनानं येतो, जड होऊन येत नाही, चित्रातली गंमत घालवत नाही. हा विचार, विनोदातला तोल आपण फार सहज सांभाळता.

मला जाणवलेली दुसरी एक गोष्ट : आपण कोऱ्या जागेचा (Space वापर विलक्षण कल्पकतेनं आणि फार विचारपूर्वक करता. चित्र काढून झाल्यावर भोवती उरेल ती कोरी जागा असं आपल्या चित्रांच्या बाबतीत कधी होत नाही; तर त्या जागेलाही एक नेमून दिलेली भूमिका असते. एक व्यक्तिमत्त्व असतं. ती अधिक काही व्यक्त करू पाहते. आपलं जयवंत दळवींचं ‘परममित्र’ पुस्तक आठवा. मुखपृष्ठावर कप-बश्या, काटे-चमचे असं चित्र आहे. त्या कप-बश्यांचा आकार किंवा संख्या वाढवून चित्र तीन बाजूंनी फ्लॅशकट करण्याचा मोह कोणाही चित्रकाराला सहज झाला असता. तो टाळून आपण तीन बाजूंना कोरी जागा ठेवलेली आहे. मी त्या वेळी पत्र पाठवून असं करण्यामागची आपली भूमिका विचारली होती. उत्तरात दळवींच्या मोकळ्या स्वभावाचं दर्शन त्या जागेतून आपल्याला अभिप्रेत असल्याचं आपण मला लिहिलं होतं.

(‘रेषालेखक : वसंत सरवटे’ या पुस्तकातील माजगावकर यांच्या संपादकीय टिपणीतून)

rajhansprakashan1@gmail.com