आदिमकाळात उघडय़ावर, झाडाखाली राहणारा माणूस पुढील काळात घर बांधून राहू लागला. त्याला पुढे ग्रामरचना, नगररचना या संकल्पनांची जोड मिळाली. नंतरच्या काळात भव्य राजप्रासाद, मंदिरांची उभारणीही होऊ लागली. एकप्रकारे स्थापत्यशास्त्रच मानवाने विकसित केले. भारतही त्याला अपवाद नव्हता. सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमधून त्याचा प्रत्यय येतोच. हे भारतीय स्थापत्यशास्त्र नक्की काय होते, त्याचे स्वरूप आणि विस्तार यांचा संदर्भसंपृक्त आढावा घेणारे ‘वास्तुकप्रशस्ते देशे..’ हे डॉ. आसावरी उदय बापट यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाची रचना दोन भागांत केली आहे. पहिला भाग हा संस्कृत काव्यग्रंथांतून येणारी स्थापत्यकलेची माहिती देणारा आहे. यात कल्पसूत्र, रामायण, महाभारत, कालिदासाची नाटके, बाणभट्टाची ‘कादंबरी’ व ‘हर्षचरित’ ही दोन काव्ये यांतील स्थापत्यविषयक संदर्भाची माहिती देत प्राचीन भारतीय स्थापत्याचा सविस्तर धांडोळा घेतला गेला आहे. तर दुसऱ्या विभागात वास्तुशास्त्राच्या विकासाचा विवेचक आढावा घेण्यात आला आहे. कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’, ‘मानसार’, ‘बृहत्संहिता’, ‘मयमत’, ‘काश्यपशिल्प’, आदी प्राचीन संस्कृत ग्रंथांचा संदर्भ देत ग्राम, दुर्ग आणि भव्य प्रासादांची रचना कशी केली जात असे यांविषयी सविस्तर लिहिले आहे.

वास्तुकप्रशस्ते देशे..

  • डॉ. आसावरी उदय बापट, अपरांत प्रकाशन,
  • पृष्ठे- १४४, मूल्य- २०० रुपये.