मराठी व्यंगचित्रकारांच्या ‘कार्टुनिस्ट्स कंबाइन’ संस्थेचे संमेलन मुंबईत सावरकर स्मारक, दादर येथे १६ व १७ एप्रिलला होत आहे. त्यात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस आणि वसंत सरवटे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नव्वदीच्या घरात असलेल्या या व्यंगचित्रकारांच्या कारकीर्दीला प्रशांत कुलकर्णी यांनी केलेला सलाम!

lr09
शि. द. फडणीस आणि वसंत सरवटे

मराठी साहित्याच्या सुवर्णकाळातील काही नावे म्हणजे पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, मंगेश पाडगावकर, गंगाधर गाडगीळ, गोविंद तळवलकर, व. पु. काळे, चिं. त्र्यं. खानोलकर, जयंत नारळीकर, रामदास भटकळ, श्री. पु. भागवत, विंदा करंदीकर, इत्यादी. या सर्व दिग्गज साहित्यिक व संपादकांशी जोडले गेलेले एक आणि एकमेव नाव म्हणजे हास्यचित्रकार वसंत सरवटे!!
कधी मुखपृष्ठाच्या, तर कधी आतल्या रेखाटनांच्या निमित्ताने सरवटे यांनी अक्षरश: शेकडो पुस्तकांना अन् साहित्याला वेगळं दृश्यरूप दिलं आहे. पुस्तकाच्या आशयाप्रमाणे कधी विनोदी, तर कधी गंभीर अशी हजारो रेखाटने सरवटे यांनी चितारली आहेत.
पु. ल., जयवंत दळवी, पाडगावकर, करंदीकर, मंत्री यांच्या पुस्तकांसाठी चित्रे रेखाटताना सरवटे जातिवंत हास्यचित्रकार होतात, तर तेंडुलकर, अवचट, भटकळ, नारळीकर यांच्या साहित्यासाठी ते अंतर्मुख करायला लावणारे इलस्ट्रेटर होतात. दोन्ही ठिकाणी दिसणारी त्यांची प्रतिभा थक्क करणारी आहे.
वास्तविक पु. ल. देशपांडे आणि वसंत सरवटे हे मराठी साहित्यातील एक अजरामर द्वैत आहे. या दोघांची असंख्य पुस्तकं याची साक्ष देतील. त्यातही उदाहरण द्यायचे तर ‘पुलं एक साठवण’ या जयवंत दळवी यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे देता येईल. पुलंच्या साठीनिमित्ताने हा ग्रंथ प्रकाशित होणार होता. त्याच्या मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रांसाठी अर्थातच वसंत सरवटे हेच एकमेव स्वाभाविक नाव होते. पुलंच्या गौरवार्थ पोस्टाचे तिकीट काढावे ही संकल्पना सरवटे यांनी प्रत्यक्षात आणली. मुखपृष्ठाला पोस्टाच्या लिफाफ्याचे स्वरूप दिले. त्यावर विलेपार्ले पोस्ट ऑफिसचे शिक्के मारले. नीट पाहिले तर कळते की पोस्टाच्या शिक्क्याची तारीख पुलंच्या वाढदिवसाची आहे. आणि सोबत पाच ठसठशीत तिकिटे पुलंचे वेगवेगळे पैलू दाखविणारी! मुखपृष्ठावरची रंगसंगती आणि लेटरिंग खास सरवटे स्टाईलचे!
या ग्रंथात पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दाखवणारे विभाग आहेत. उदा. व्यक्तिचित्र, ललित लेखन, विनोदी कविता, व्याख्याने, बटाटय़ाची चाळ, बंगाली भाषा, प्रवासवर्णन, इत्यादी. हे सगळे पैलू दाखवण्यासाठी सरवटेंनी एक वेगळाच प्रयोग केला. त्यांनी पुलंची अभ्यासिका रेखाटली. अगदी पुलंचे बहुगुणी व्यक्तिमत्त्व दाखवणारी. ही अभ्यासिका एका अतिशय रसिक कलावंताची आहे, उच्च अभिरुचीची आहे, हे अनेक गोष्टींवरून कळते. हे चित्र बारकाईने पाहावे असे आहे. कारण यातील प्रत्येक गोष्ट ही पुलंच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित आहे. हार्मोनिअम, चार्ली चॅप्लिन, स्त्रीवेशातील बालगंधर्व, संगीत नाटकातील नांदीच्या वेळचा गणपतीचा मुखवटा, भिंतीवरचे टोले देणारे घडय़ाळ, टेबलावर दौत, टाक, छत्री, तांब्या-भांडे, कंदील, नक्षीदार खुर्ची-टेबल, तल्लफ आली तर चहा पिण्यासाठी नाजूक नक्षीची चहाची किटली व कपबश्या, आलेली भरपूर पत्रे, नृत्यकलेचा संदर्भ दाखवणारा कथकलीचा मुखवटा, ग्रामोफोन व कपाटभर पुस्तके! हे रेखाटन इतके सुरेख झालेय, की कोणत्याही क्षणी एखादी सुरेल तान घेत साक्षात् पुलं मित्रमंडळींसह येतील आणि पेटीवादनाची वा गप्पांची मैफल सुरू होईल असं वाटावं.
पुस्तकातील प्रत्येक विभागाच्या सुरुवातीला सरवटे यांचे हेच चित्र आहे. (अशी चौदा चित्रे आहेत.) जरा बारकाईने पाहिले तरच नेमका कोणता विभाग आहे, हे या पुस्तकाच्या कपाटावरील एखाद्या बदललेल्या चौकटीवरून कळते. जणू पुलंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कप्पेच सरवटे उलगडून दाखवताहेत. कधी संगीत, कधी बटाटय़ाची चाळ, कधी व्याख्याने, तर कधी बंगाली भाषा, तर कधी प्रवासवर्णन! संपादक दळवी व चित्रकार सरवटे यांना याबद्दल दिलखुलास दाद देताना पुलंनी ‘माझ्या मैफलीतले हे साथीदार थिरकवा खाँसाहेबांच्या तोलामोलाचा तबलजी अणि कादर बक्ष यांच्यासारखा सारंगिया असे हे आहेत,’ असा उभयतांचा सार्थ गौरव केला होता.
सरवटे यांनी विंदा करंदीकरांच्या बालगीतांना सुंदर रेखाटने काढली आणि पुस्तकाची मांडणीही केली. याबद्दल दाद देताना स्वत: विंदा म्हणतात, ‘कविता कुठे संपते आणि चित्र कुठे सुरू होते हे कळत नाही, इतकी ती कवितेशी एकजीव झाली आहेत.’
सरवटे यांची मुखपृष्ठेसुद्धा अशीच गंभीर आणि गमतीदार आहेत. गंभीर मुखपृष्ठांची उदाहरणे द्यायची तर पु. शि. रेगे यांचे ‘सावित्री’, तेंडुलकरांचे ‘शांतता, कोर्ट चालू आहे’, भटकळांचे ‘जिगसॉ’ ही देता येतील. सरवटे किती विविध प्रकारे विचार करतात व रेखाटने करतात याची ही ठळक उदाहरणे. विनोदी मुखपृष्ठांमध्ये पुलं, दळवी, मंत्री यांच्या विनोदी पुस्तकाच्या मुखपृष्ठांवर सरवटे यांच्या मिश्कीलतेचा रंग लागलेला दिसेल. याचबरोबरीने ‘ललित’ दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ हे सरवटे यांची विशेष कामगिरी. पन्नासहून अधिक वर्षे त्यांनी ही मुखपृष्ठे रेखाटली. सुरुवातीच्या काळात निव्वळ साहित्याशी संबंधित असलेले मुखपृष्ठांचे विषय कालांतराने सामाजिक व क्वचित राजकीय संदर्भ दाखवणारे झाले. सामाजिक बदल टिपणारी अर्थपूर्ण, अंतर्मुख करणारी ही मुखपृष्ठे पेंटिंगच्या अंगाने जाणारी गंभीर हास्यचित्रेच म्हणावी लागतील. अमेरिकेला गेलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलाच्या फोनची रात्री जागून वाट पाहणारे वृद्ध जोडपे हे चित्र कितीतरी घरांतील प्रातिनिधिक दृश्य म्हणावे लागेल. ‘ललित’ मासिकात जयवंत दळवींचा ‘ठणठणपाळ’ गाजत होता. साहित्यविषयक घडामोडींवर मिश्कील भाष्य करणारे हे सदर अतिशय गाजले ते दळवींच्या लेखनामुळे आणि सरवटे यांच्या व्यंगचित्रांमुळे! ठणठणपाळला दृश्यरूप देण्यापासून ते अनेक साहित्यिकांची अर्कचित्रं काढण्यापर्यंत सरवटे या स्तंभाचा एक महत्त्वाचा स्तंभ होते. ‘अर्कचित्र’ हा शब्दही सरवटे यांनीच तयार केला.
सरवटे यांच्या मते, अर्कचित्रासाठी आवश्यक असतो तो त्या माणसाचा फील, चेहऱ्याची ठेवण, अंगलट, हातवारे, बसण्याची, चालण्याची स्टाईल इत्यादी गोष्टी. त्यांच्या चित्रांत रामदास भटकळांचं इझी गोइंग कॅरेक्टर, श्री. पु. भागवतांचं दोन हात समोर ठेवून बोलणं, दुर्गाबाई भागवतांचं मुठी वळवून, शिरा ताणून बोलणं, गाडगीळांचा इतरांबद्दलचा तुच्छतापूर्ण भाव, पुलंचं आनंदयात्रीपण, दळवींचा मिश्कीलपणा, गोविंदराव तळवलकरांचं अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व.. हे सारं अर्करूपाने या चित्रांतून उतरलेलं दिसतं.
त्यांनी दैनंदिन विषयांवर भाष्य करणारी व्यंगचित्रंही रेखाटली आहेत. ‘माणूस’ साप्ताहिकासाठी त्यांनी सुमारे तीन र्वष अशी चित्रं काढली. बौद्धिक आनंद देणारी ही व्यंगचित्रं सरवटेंमध्ये लपलेल्या राजकीय व्यंगचित्रकाराची चुणूक दाखवतात.
पण सरवटेंची खरी प्रतिभा खुलते ती हास्यचित्र मालिकांमधून! व्यंगचित्रमालिका हा प्रकार सरवटे यांनीच मराठीत प्रथम आणला, रुजवला आणि वाढवला असं म्हटलं तरी चालेल. सरवटेंनी या प्रकाराला आपल्या प्रतिभेच्या साहाय्याने एक विलक्षण उंची दिली. मोजकी उदाहरणं द्यायची तर ती ‘मोर्ला’ वा ‘बॅकबे’ या मालिकांची देता येतील. मुंबईत एकेकाळी दिसणाऱ्या मोर्चाचं एक वेगळंच दृश्य या चित्रांतून दिसतं. तसंच बॅकबेत अंगावर येणाऱ्या महाकाय इमारतींचं चित्रण प्रत्ययकारी आणि भीतीदायक वाटावं असं आहे.
सरवटे यांनी व्यंगचित्रकलेच्या प्रत्येक कप्प्यात वेगवेगळे प्रयोग केले. त्यातलं एक लक्षणीय उदाहरण द्यायचं तर ते निर्जीव वस्तूंना दिलेले मानवी स्वभाव हे द्यावं लागेल. खिडक्या, खुच्र्या, टोप्या, पत्त्यांचा कॅट वगैरे मालिका ही त्याची ठळक उदाहरणं. या निर्जीव वस्तूंच्या तोंडी त्यांनी जी वाक्यं पेरली आहेत, ती वाचली तर साध्या वाक्यांना केवळ चित्रांच्या जोडीने वाचल्यामुळे वेगळाच अर्थ प्राप्त झाल्याचं लक्षात येतं व वाचकांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटते!
उदाहरणार्थ, ‘‘तू-मी सांगाती’ या मालिकेतील साधी कात्री ती काय, पण तिची दोन पाती म्हणतात, ‘आपल्या मीलनाच्या आड कुणी आलं की त्याचा तुकडा पाडायचाच!’ एरवी एखाद्या राकट प्रेमवीराच्या तोंडी शोभणारं हे वाक्य; पण ते कात्रीच्या तोंडी आल्यामुळे हास्यनिर्मिती होतेच! किंवा ‘या वयात आपणच एकमेकांना सांभाळून राहिलं पाहिजे’ हे वयोवृद्ध जोडप्याला शोभणारं वाक्य प्रत्यक्षात जेव्हा दातांची वरची व खालची कवळी बोलते तेव्हा फुलणारं हास्य हे कारुण्याची छटा घेऊन येतं. किंवा ‘खेडय़ापाडय़ांतून संगणक पोहोचवायचं काम मलाच करावं लागणाराय..’ हे वाक्य कम्प्युटर कंपनीचा मॅनेजर वा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान खात्याचा उच्च अधिकारी म्हणतोय असं वाटू शकेल. पण जेव्हा ते प्रत्यक्ष एका खटाऱ्याच्या तोंडी येतं तेव्हा ते देशातील पायाभूत सुविधांवर केलेलं परखड भाष्य ठरतं.
पण सरवटे यांनी या निर्जीव वस्तूंमध्ये अत्यंत उच्च दर्जाची बौद्धिक कामगिरी कुठली केली असेल, तर ती मराठी अक्षरांना दिलेली व्यक्तिमत्त्वं! ‘अक्षर शहा’ या मालिकेतील ही व्यक्तिमत्त्वं म्हणजे सरवटे यांच्या कल्पनेचा प्रतिभावंत आविष्कार म्हणायला हवा.
सरवटे यांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांची काही चित्रं ही ‘अल्ट्रा दृश्य’ स्वरूपाची आहेत. उदा. नेता-नेतृत्व, किंवा ल- लाट इत्यादी. ही अशी व्यंगचित्रं सुचणं हे अत्यंत असामान्य आहे. त्यादृष्टीने त्यांची चित्रं ही जागतिक पातळीवरची वाटू लागतात. सरवटे यांच्या व्यंगचित्रांची तसेच व्यंगचित्रकलेवरच्या लेखनाची अनेक पुस्तकं आहेत. त्यात त्यांनी बऱ्याचदा व्यंगचित्रकाराला विदूषकाच्या वेशात दाखवलंय. अर्थात हा विदूषक माकडचेष्टा करून हसवणारा नसून विनोदाला गांभीर्याने पेश करणारा आहे. विचार करणारा आणि करायला लावणारा ‘थिंकर’ आहे!!

Organizing an international conference on Dr Babasaheb Ambedkar in london
लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद; शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर
Sharad Pawar supporter Praveen Mane join mahayuti
शरद पवार यांचे कट्टर समर्थक महायुतीमध्ये सहभागी… झाले काय?
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
first case registered for violation of code of conduct in mira road
मिरा रोड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल