सुधाताईंकडे मी नाटय़दिग्दर्शनाचे, अभिनयाचे धडे घेतले. ‘लिटिल थिएटर’ (बालरंगभूमी) या संस्थेच्या कामाच्या निमित्ताने आमच्या अनेकदा भेटीगाठी होत. कामाच्या जास्त आणि अवांतर फारच कमी गप्पा व्हायच्या. सुधाताईंच्या ग्लॅमरमुळे मला त्यांची भीतीच वाटायची. त्यांच्या तडफदार व्यक्तिमत्त्वासमोर मला नेहमी न्यूनगंडाने पछाडलेले असायचे. सुधाताई नेहमी धावपळीत असायच्या. पण त्यांना मी गडबडून गेलेल्या कधीच पाहिले नाही. त्यांच्याभोवती एखाद्या मोठय़ा ग्रहाभोवती छोटय़ा छोटय़ा ताऱ्यांची प्रभावळ असते तशी प्रभावळ कायम असायची. हे सर्व कार्यकर्ते त्यांच्या शब्दाखातर काहीही करायची तयारी असलेले असायचे. कारण सुधाताई आपल्याला ‘काहीतरीच’ करायला सांगणार नाहीत अशी त्यांची खात्री असायची.

काळ चालला होता. सुधाताईंच्या बाजूची माणसं थकल्यामुळे, कधी मतभेदामुळे, कधी वैयक्तिक अडचणींमुळे बदलत होती. आधी डॉ. काशीनाथ घाणेकर, शंकर घाणेकर, भक्ती बर्वे अशी नंतर नामवंत झालेली माणसं त्यांच्याभोवती होती. तो सुधाताईंच्या लिटिल थिएटरचा सुवर्णकाळ होता. पुढे कार्यकर्त्यांची नावं बदलत गेली. पूर्वीइतक्या गुणवत्तेचे कार्यकर्ते सुधाताईंना मिळेनात. पण हाती असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी लिटिल थिएटर नुसतेच चालू न ठेवता गाजवत ठेवले. सुधाताईंवर, त्यांच्या उपक्रमशीलतेवर, उत्साहावर काळाचा परिणाम झाला नाही. त्या ‘सुधाताई’च राहिल्या. परवा- परवापर्यंत संस्थेत दाखल झालेला सात-आठ वर्षांचा बालकलाकारही त्यांना ‘ताई’च म्हणत असे.

लोकप्रियतेच्या पुरात वाहून उंच ठिकाणी पोहोचलेला कलाकार पूर ओसरल्यावर एखाद्या उंच ठिकाणी केविलवाण्या पद्धतीने लटकलेला दिसतो. तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे कुटुंबीयही नसतात. अशा वेळी कलाकार एकाकी, अगतिक, हताश, एकटा वाटू लागतो. रंगभूमीवरील कुठल्याही शोकांतिकेपेक्षा ही शोकांतिका भयाण आहे. पण सुधाताई मात्र एकाकी, हताश, अगतिक कधीच वाटल्या नाहीत. निराशा त्यांच्या आसपाससुद्धा का फिरकली नाही? ‘मुलगी झाली हो’मध्ये म्हटल्याप्रमाणे ‘स्त्रीजन्माचा भोग’ सुधाताईंच्या नशिबी आला नाही का? रंगमंचावर शोषित, सोशीक, सात्त्विक, तेजस्वी, कधी स्त्रीवादी, तर कधी रसिकांना केवळ रिझवणाऱ्या भूमिका करणाऱ्या सुधाताई स्त्री म्हणून कशा जगल्या? त्या कशा घडत गेल्या याचा शोध घेणे मोठे जिकिरीचे आहे.

तात्या आमोणकरांसारखे वडील लाभणे हे सुधाताईंचे भाग्य! सुधाताईंनीच त्यांच्या एका निवेदनात म्हटल्याप्रमाणे, मुलीच्या जातीने लग्न जमेपर्यंत शिकायचं.. ‘नाचगाणं’ हे शब्द उच्चारायचेसुद्धा नाहीत असा तो काळ. १९३४ च्या सुमाराचा! तात्यांनी आपल्या मुलींना पार्वतीकुमारांकडे नृत्य शिकायला पाठवलं. सुधाताई म्हणतात, ‘गुरू पार्वतीकुमारांनी आम्हाला पाठीच्या कण्यातून ताठ उभं राहायला शिकवलं.’ सुधाताई पाठीचा कणा आणि मानही ताठ ठेवायला शिकल्या! सुधाताईंनी कुठल्याही कारणासाठी लाचार, बोटचेपी तडजोड स्वीकारली नाही.

फटाफट यशाच्या पायऱ्या चढून यशोमंदिर गाठू पाहणाऱ्या प्रत्येकाने सुधाताईंसारख्या व्यक्तीचा जीवनप्रवास अभ्यासणे हितावह ठरेल. साहित्य संघाच्या नाटकांत त्याकाळी दुर्गा खोटे, वनमाला, सुमती गुप्ते अशा तालेवार नायिका काम करायच्या. आणि दासींची कामं करायला कोणीच नसल्याने त्या मामुली भूमिका भालेराव, आमोणकरांच्या मुलींच्या वाटय़ाला यायच्या. सुधा (करमरकर) आणि ललिता (केंकरे) यांना या भूमिका करणे खटकायचे. पण त्याचवेळी नकळत या दिग्गज स्त्रियांच्या पातळीवर जाऊन पोहोचणे या विचाराची ठिणगी पडत होती. केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशा नटश्रेष्ठांच्या अभिनयाचं अवलोकन करून शिक्षण घेण्यासाठी त्या दासींच्या छोटय़ा भूमिका म्हणजे शिष्यवृत्तीच होत्या! सरस्वतीबाई बोडस नागपूरचा प्रयोग करू शकल्या नाहीत, त्यामुळे सुधाताई ‘भाऊबंदकी’त दुर्गाकाकू म्हणून उभ्या राहिल्या. नंतर दिल्लीत केलेल्या दुर्गाकाकूंच्या भूमिकेमुळेच त्यांना भारत सरकारची नाटय़- शिष्यवृत्तीसुद्धा मिळाली!

सुरुवातीला त्यांच्या प्रगतीचे श्रेय तात्यांना दिले जायचे. पण एखाद्याकडे गुणांचा अस्सल वाण असल्यावर ‘तात्यांच्या मुली ना!’मधला कुत्सितपणा हळूहळू नाहीसा झाला. सुधाताईंनी ‘तात्यांची कन्या’ यापेक्षा स्वत:ची स्वतंत्र, वेगळी ओळख तयार केली. क्वचितप्रसंगी ‘तात्यांची मुलगी’ऐवजी ‘सुधाताईंचे वडील’ असे तात्या ओळखले जाऊ लागले. त्याचा अर्थात तात्यांना अभिमान वाटायचा.

स्वत:च्या आयुष्याचा निर्णय स्वत: घेण्याची सुरुवात बहुधा सुधाताईंनी धर्माने प्रोटेस्टंट ख्रिश्चन असलेल्या सुधाकर करमरकर यांच्याशी लग्न करण्याच्या निर्णयाने केली असावी. वाडीत बसवलेल्या ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकाने सुधाकर करमरकर आणि सुधा आमोणकर यांची ओळख झाली. लग्न झालं. लग्नाला विरोध झाला. सुधा आमोणकरांची सुधा करमरकर झाली. ‘सुधा आमोणकर- करमरकर’ अशी जोडनावं लिहायची पद्धत त्यावेळी नव्हती आणि असती तरी त्यांनी ती स्वीकारली नसती. याचं एक मजेशीर कारण म्हणजे या जोडआडनावांनी वर्तमानपत्रांची बरीच जागा व्यापली असती! दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आमोणकर किंवा करमरकर या आडनावांनी त्या ओळखल्या जाण्यापेक्षा ‘सुधाताई’ म्हणूनच जास्त ओळखल्या गेल्या.

त्यांची विवाहाची सुरुवातीची वर्षे ही सर्वार्थाने सहजीवनाची होती असे दिसते. सुधाकर करमरकर फुलब्राइट स्कॉलरशिप घेऊन अमेरिकेला गेले. आणि त्यांच्याच आग्रहाने सुधाताई नाटय़विषयक स्कॉलरशिप घेऊन शिकागोला गेल्या. तिथे त्यांनी प्रौढांनी सादर केलेली बालनाटय़े पाहिली. बालनाटय़- निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होऊन ती प्रक्रिया समजावून घेतली. पुढे बालनाटय़ हेच त्यांच्या जगण्याचं प्रयोजन झालं. ‘बालनाटय़’ या शब्दाने त्यांचं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलं. त्या तरुण वयातच ‘बालनाटय़ा’ने झपाटल्या गेल्या.

आनंद संगीत मंडळी, बालमोहन नाटय़ कंपनी बाल-युवा कलाकारांना घेऊन पौराणिक नाटके सादर करायचे. पण ती काही बालनाटय़े नव्हती. केवळ मुलांनी केलेले नाटक हेच बालनाटय़ ही समजूत सुधाताईंनी ‘मधुमंजिरी’ हे नाटक करून खोडून काढली. ‘मधुमंजिरी आणि चेटकीण’ नाटकात डॉ. काशिनाथ घाणेकर, भावना आणि स्वत: सुधाताईंनी चेटकिणीचे काम केले. व्यावसायिक रंगभूमीवर नायिकेची भूमिका करत असताना चेटकिणीचे काम करणे हे धाडसच होते. या चेटकिणीने मुलांना घाबरवले, मुलांचा थरकाप झाला. आज आजे-आज्या झालेल्या त्यावेळच्या अनेक बालप्रेक्षकांना सुधाताईंची चेटकीण आठवते. मात्र, या ‘चेटकिणी’ने सुधाताईंना महत्त्वाचा धडा शिकवला. आपण पाहून आलेली पाश्चिमात्त्य संस्कृती आणि पौर्वात्य संस्कृती यांत जमीन-अस्मानचा फरक आहे. बालनाटय़ातला खलनायक किंवा खलनायिका ही खरोखर क्रूर न वाटता विनोदी वाटली पाहिजे.. नायकासमोर अथवा नायिकेसमोर हास्यास्पद ठरली  पाहिजे.

सुधाताईंचे वडील तात्या हे साहित्य संघाचे एक प्रमुख कार्यकर्ते असले तरी संघाच्या कार्यकारिणीने बालनाटय़ चालवणे शक्य नाही असे म्हटल्यावर सुधाताईंनी संघाच्या सावलीच्या बाहेर पडून १९५९ साली बालनाटय़ संस्थेचं रोपटं लावलं. ‘लिटिल थिएटर’ (बालरंगभूमी) ची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात तांत्रिक अंगं सुविहित असावीत म्हणून सुधाकर करमरकर यांनी सुधाताईंना मनापासून साथ दिली.

सुधाताई करमरकर जर केवळ बालरंगभूमीचं कार्य करत राहिल्या असत्या तर.. या ‘तर’ला सुधाताईंच्या संदर्भात काही अर्थ नव्हता. बालनाटय़ातील अभिनयाच्या, दिग्दर्शनाच्या मर्यादा त्यांना मानवणाऱ्या नव्हत्याच. सुधा करमरकर नावाच्या एका चतुरस्र कर्तृत्व असलेल्या स्त्रीला केवळ बालरंगभूमी एके बालरंगभूमी करणे मंजूर नसावे. त्या प्रौढ रंगभूमीवर आणि बालरंगभूमीवर तेवढय़ाच ताकदीने काम करत राहिल्या. ही तारेवरची कसरत त्यांना जमली, हे मी सांगायला नको. प्रौढ रंगभूमीवर गाजलेल्या त्यांच्या २५ हून अधिक भूमिका आणि बालरंगभूमीवर ४० हून अधिक नाटके सादर करून त्यांनी ते सिद्ध केले आहे.

त्यांच्या भूमिकांमधील वैविध्य थक्क करणारे आहे. ऐतिहासिक आणि पारंपरिक नाटकांत त्यांनी येसूबाई (‘इथे ओशाळला मृत्यू’), कुंती (‘तो राजहंस एक’), राणी लक्ष्मीबाई (‘वीज म्हणाली धरतीला’) अशा मोठमोठय़ा भूमिका केल्या. शारीरिक उंची नसूनही, लहानसर चण असूनही डौलदारपणे त्या रंगमंचावर वावरल्या. समरसून अभिनय करण्याच्या सवयीमुळे त्यांचे खुजेपण कुणाला जाणवले नाही. त्यांना चित्तरंजन कोल्हटकर गमतीने ‘दीडफुटी राणी’ म्हणायचे!

स्वरांवर प्रचंड ताबा, उच्चार स्पष्ट, लखलखीत, आवाजाची फेक कोणालाही हेवा वाटेल अशी पल्लेदार, शब्दार्थाची विलक्षण जाण यामुळे केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर ‘मला काही सांगायचंय’, ‘पुत्रकामेष्टी’, ‘दुर्गी’ अशा अनेक सामाजिक नाटकांतील भूमिकाही त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. या सर्व भूमिका एकाच साच्यातल्या नव्हत्या. त्या भूमिका करताना अगदी क्वचितच त्यात कधीतरी सुधाताई डोकावायच्या. ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’मध्ये त्या डबल रोल करायच्या. एक- म्हातारी मोठी आत्या आणि गोव्याची खेळकर, उच्छृंखल, भिंगरीसारखी फिरणारी सुनंदा. दोन्ही भूमिकांमध्ये जमीन-अस्मानचा फरक असायचा.

सुधाताई म्हणजे धीरोदात्त, धीरगंभीर व्यक्तिमत्त्व असं कोणी समजत असेल तर ते पूर्ण सत्य नव्हते. त्यांच्यात व्रात्यपणा होता. ‘अरे’ला ‘का रे’ म्हणायची खुमखुमी होती. खटय़ाळपणा, खोडकरपणा होता. लोकांच्या फिरक्या घ्यायची क्षमता होती. अलीकडे लोकांना फिरक्या घेऊ द्यायची सहिष्णुताही त्यांनी कमावली होती. सुधाताईंमधला हा अवखळपणा सुनंदाच्या भूमिकेत दिसत असे. ‘हॉव सायबा गोयॉक वैता’ हे गाणं स्टेजवर बघणं हा एक अनुभव होता. ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’मध्ये त्या जेमतेम पंधरा-वीस मिनिटे रंगमंचावर असायच्या, पण कायम लक्षात राहायच्या. ‘दुर्गी’मध्ये ‘आपण टांग्यातून जाऊ या, म्हणजे जास्त वेळ हलत-डुलत जाता येईल..’ म्हणून लाजणाऱ्या सुधाताई ‘दुर्गी’च वाटायच्या. ‘बेइमान’, ‘विकत घेतलेला न्याय’मधील त्यांच्या भूमिका थोडय़ा खलनायकी स्वरूपाच्या होत्या. ‘खलनायक’ नावाच्या एका बऱ्यापैकी सुमार नाटकात त्यांनी गोव्याची म्हातारी सादर केली होती. ‘माझा खेळ मांडू दे’मधील शेवटी वेडय़ा होणाऱ्या मामीच्या भूमिकेत त्यांची खरी कसोटी लागली. एरवी बऱ्याच वेळा भूमिकेची, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची इस्त्री सावरून वावरणाऱ्या सुधाताईंनी त्यांच्या त्यावेळच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत अशा या व्यक्तिरेखेत स्वत:ला अक्षरश: झोकून दिले होते.

व्यावसायिक रंगमंचाने सुधाताईंची अभिनयाची भूक भागली. त्यांना नाव मिळाले, प्रतिष्ठा मिळाली, पैसा मिळाला. आपल्या व्यावसायिक संबंधांचा वापर त्यांनी बालरंगभूमीच्या विकासासाठी केला. पदरमोड केली. व्यावसायिक रंगभूमीवरील संस्थांबरोबर संयुक्त दौरे आखले. खेडोपाडी कंत्राटदारांना गाठून बालनाटय़ खेडोपाडी पोहोचवले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रयोग करणारी ‘लिटिल थिएटर’ ही कदाचित एकमेव बालनाटय़ संस्था असेल.

बालरंगभूमीइतकंच शालेय रंगभूमीसाठी त्यांनी काम केलं. शालेय विद्यार्थ्यांना नवीन संहिता उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी शिक्षकांच्या आणि इतरांच्या लेखन स्पर्धा आयोजित केल्या. या स्पर्धामधून आलेल्या संहितांमुळे मुलांनी स्पर्धामधून काय सादर करावं या प्रश्नाची कोंडी फुटली.

‘लिटिल थिएटर’ला शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाबद्दल अनेकांना पोटदुखी होती. पण सुधाताईंनी अशा लोकांकडे लक्ष दिले नाही. शासकीय अनुदाने अनेक संस्थांना मिळतात. ‘अनुदाने मिळवा- अनुदाने जिरवा’ असा या संस्थांचा एककलमी कार्यक्रम असतो. सुधाताईंनी अनुदान घेऊन जेवढे कार्य केले तेवढे इतर कुणीही केले नाही. जे शासनाने करायला पाहिजे, ते त्यांनी केले. राज्यस्तरीय नाटिका स्पर्धा भरवली. मुंबईबाहेरील बालरंगभूमीचे दर्शन मुंबईकरांना घडले. बालरंगभूमी चळवळीचा पाया व्यापक केला. स्वत: नऊ बालनाटय़े लिहिली, २५ दिग्दर्शित केली, २१ नाटकांचे नेपथ्य केले, १५ नाटकांचे संगीत, १७ बालनाटय़ांची वेशभूषा आणि पाच नाटकांचे नृत्यदिग्दर्शनसुद्धा! ३६ बालनाटय़ांचे एकूण २००० हून जास्त प्रयोग केले.

व्यावसायिक रंगभूमी आणि बालरंगभूमी या दोघांमधली तारेवरची कसरत त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. पण त्यांना घर आणि रंगभूमी यामधली तारेवरची कसरत यशस्वीपणे पार पाडता आली नाही असे दिसते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर- ‘‘बालरंगभूमीची एक प्रवर्तक, व्यावसायिक रंगभूमीवरील एक अभिनेत्री म्हणून मी तृप्त आहे. खंत एकच.. ही तृप्ती, समाधान मिळवताना मी बरंच गमावलं आहे. माझ्या संसारासाठी, मुलांसाठी मी पुरेसा वेळ देऊ शकले नाही. मी खऱ्या अर्थाने गृहिणी झालेच नाही!’’

सुधाताईंची ही खंत आपल्याला विचारात पाडणारी आहे. सुधाताईंनी केवळ बालरंगभूमीसाठी खस्ता खाल्ल्या असत्या तर बालरंगभूमीने त्यांना जीवनमान सांभाळण्यासाठी आवश्यक ते द्रव्य दिले असते? घरच्या आर्थिक जबाबदाऱ्या, खर्च पार पाडणे केवळ बालरंगभूमी करून शक्य झाले असते? एखाद्या बाईने नोकरी करून घर चालवायला मदत करावी तसाच सुधाताईंनी अभिनय व्यवसाय म्हणून पत्करून स्वत:च्या संसाराला हातभार लावलाच; पण बालरंगभूमीलाही भरभक्कम आधार दिला. सुधाताईंनी स्वत:ला झोकून देऊन जर रंगभूमीवर आणि बालरंगभूमीवर काम केले नसते, घर सांभाळले असते तर करोडो गृहकृत्यदक्ष बायकांमध्ये एकीची भर पडली असती. मग असंख्य मध्यमवर्गीयच नव्हे, तर अपंग, अनाथ, झोपडपट्टीतील मुलांना सुसज्ज नाटय़गृहात बसून बालनाटय़ कसे बघायला मिळाले  असते? आपल्यातील कला मारून त्या आदर्श पत्नी झाल्या असत्या तर आयुष्य संपताना सामाजिक कर्तव्य पार पाडल्याबद्दल जी कृतार्थतेची भावना त्यांच्या मनात होती, ती आढळली असती का?

सुधाताई, तुम्ही स्वत:पुरतं जगण्यात धन्यता मानली नाहीत. तुम्ही आमच्यासारख्या लाखो लोकांच्या सुधाताई झालात. स्वत:पुरत्या बंदिस्त झाल्या असता तर सात्त्विक मनोरंजनाच्या मेव्याला आम्ही लाखो लोक पारखे झालो असतो. तुमच्या या खंतीपेक्षा खरी मोठी खंत आम्हाला आहे. आम्ही तुमचे मोठेपण ओळखू शकलो नाही. तुम्ही त्याची जाणीव करून दिली नाहीत, म्हणून स्वत:ला तुमच्या बरोबरचेच समजलो. बरोबर वावरणं वेगळं आणि बरोबरी करणं वेगळं! तुमच्याबरोबर इतकी वर्ष वावरलो, पण तुमचे कार्य पुढे चालू ठेवण्याइतके बलवान झालो नाही. ‘स्नो व्हाइट आणि सात बुटक्यां’मधील बुटक्यांसारखे बुटकेच राहिलो. तुमच्या कार्याचा वेल गगनावरी गेला. तुम्ही गलिव्हर झालात; आम्ही सगळे लिलिपुट राहिलो.

(‘प्रेरक ललकारी’ अंकातून साभार)