बालम केतकर यांचा नवा कवितासंग्रह तब्बल २० वर्षांनी प्रसिद्ध झाला आहे. ‘तळघरातील हंसध्वनी’ हा त्यांचा आधीचा कवितासंग्रह त्याच्या विलक्षण शीर्षकाबरोबरच त्यातील अंतस्थ संज्ञाप्रवाहांतील अमूर्त प्रतिमांचा वेध घेणाऱ्या कवितांमुळे गाजला होता. आता आलेला ‘विरक्त फुलपाखरे’ हा नवा संग्रहसुद्धा खास ‘बालम केतकरी’ शैलीतला आहे. हा कवी नामवंत चित्रकार आहे. हा ‘चित्रकार कवी’ निर्मितीच्या शक्यतांचे व्यापक अवकाश शोधणारा आहे. सायन पब्लिकेशन्स, पुणे या संस्थेने प्रकाशित केलेला हा संग्रह देखणा, नेटका आणि सुबक आहे. शीर्षकाची आर्तता स्पष्ट करणारे मुखपृष्ठ अर्थातच स्वत: केतकरांचे आहे. ‘विरक्त फुलपाखरे’ चित्रित करताना काहीशा अमूर्त, काहीशा सूचक अशा रंगरेखालिपीचे लेपन त्यांनी शब्दांवर केले आहे असे काहीसे म्हणता येईल. कोशातून मोठय़ा प्रयासाने मुक्त झालेली फुलपाखरे आपले रंगीत पंख पसरून भोवताली स्वच्छंदपणे विहार न करता एकाएकी विरक्त होतात, हा विचारच अस्वस्थ करणारा आहे. मुक्ततेला विरक्त का व्हावेसे वाटतेय, हा शोध म्हणजेच ही ‘केतकरी’ कविता.

‘कोण मी? कुठून मी? कशास मी बरे इथे?

तर्कशुद्ध मूर्खताच कार्यकारणामध्ये

वर्तमान शून्य, त्यात शिल्प कोरणे कसे?

आपलेच वाद्य वाजवून कोणी जातसे’

हे जगणं, ही व्यवस्था, जगरहाटीतील संगती-विसंगती, त्यातील दांभिक देखावे आणि तशातच जगत राहण्याची सक्ती आणि परिस्थितीशरणता यांनी हा कवी सरभर होतो. मनातील अस्वस्थ प्रदेशातली चित्रे तो आपल्या मन:चक्षूंनी पाहतो आणि मग त्यांना वर्तमान जगण्याच्या पातळीवर आणताना लौकिक भाषेतील प्रतिमांची आपसुकपणे योजना करतो. त्यांच्या मनातल्या अगणित प्रश्नांना, गुंतागुंतींना आणि कल्लोळांना शब्दरूप देण्याची निकड त्यांना कविता लिहायला भाग पाडते. बहुधा अमूर्त, अप्रकट चित्रांच्या अभिव्यक्तीसाठीच हे ‘माध्यमांतर’ ते करू धजतात. ‘कारण आम्ही माणसं आहोत’ या मुक्तकात ते लिहितात-‘आमचे जीवन एक पेंटिंग आहे आणि जगणे एक कला आहे.’

चित्रकार-कवीच्या दुरंगी प्रतिभेच्या प्रदेशात कुंचला आणि लेखणी यांची इथे जुगलबंदी रंगलेली दिसते. कोऱ्या कॅनव्हासवर अमूर्त असलेलं चित्र चित्रकाराला दिसत राहावं तशी ही कविता आहे- एखाद्या अनाकलनीय स्वप्नासारखी.

‘गाफील ना, बेसावध ना, निद्रेतही आता मी जागा

हरवुन मी भेटलो स्वत:ला,

शोध बिंदुचा हा अवघा

अज्ञानाचे कृष्णविवर अन् ज्ञानाचा तो सूर्य प्रखर

दगडामधुनी देव दाखवे, जादुगार ही तुझी नजर’

प्रस्तावनेत कवी संतोष शेणई यांनी या कवितेला ‘कठीण कातळाची कविता’ अशी समर्पक उपमा दिली आहे. कवीचे वास्तव व्यवहारी जीवन आणि त्याच्या प्रातिभ प्रतिसृष्टीतील विलक्षण विश्व यांच्यामधील संघर्ष कधी दिसतो, तर कधी त्यात सरमिसळ झाल्याचा प्रत्यय येतो. कधी ती कविता काहीशी कालसुसंगत असल्यासारखी वाटते, तर कधी त्यात कालविपर्यास दिसतो. त्यांच्या कवितेत भाषिक चमत्कृती आहेत, रचनेचे प्रयोग आहेत, नीती-अनीतीच्या पार जाणारे आत्मप्रकटीकरण आहे. रामायण-महाभारत आदी महाकाव्यांमधले संदर्भ आहेत. तीत परंपरा, इतिहास, वर्तमान समाज आणि भविष्यसूचनसुद्धा आहे. ‘स्व’चा आणि भोवतालाचा शोध घेताना अनाकलनीय अथवा शब्दांपल्याडच्या शक्यतांना कवी कवेत घेताना दिसतो. त्यामुळेच की काय, काही कविता अमूर्त आणि दुबरेध वाटतात. एका कवितेत प्रतिमांची इतकी दाटी असते, की वाचक गोंधळून जातो.

‘शब्दांच्या श्लेषामधले, ते क्लेष कसे सांगावे

जे सत्य नाहिसे होते, ते सत्य कसे मानावे’

शब्दांचे श्लेष आणि त्यांचे क्लेष आणि शब्दांचं त्रिकालाबाधित असणं हे कवीच्या असण्या-नसण्याच्या पलीकडचे असते. कवी हा त्या शब्दांची वस्त्रे अर्थावर चढवत राहतो. केतकरांची कविता ‘बोलणारी’ वा ‘आवाजी’ नाही; ती मनाचा तळ ढवळणारी आहे.. खोलवर तरळणारा सूर पकडण्यासाठी उत्खनन करणारी आहे.. भाषेतील चमत्कारांना आरपार पाहू धजणारी आहे.

‘कित्येक सूर्य येथे अंधारकोठडीत

आणि कितीक चंद्र पडतात अडगळीत

झाले असे कशाने गेले निघून सारे

मोजून काय मिळते, स्वप्नामधील तारे..’

कधी अतार्किक प्रश्नांचे गुंते, तर कधी विरोधाभास दर्शवणारा उपहास त्यांच्या कवितेत दिसतो. आटीव, घट्ट आणि बांधीव प्रतिमांची घनावळ वाचकांना संभ्रमात टाकते. अस्तित्वाचा टोकदार आणि मूलभूत सल त्यांच्या कवितेत पसरलेला आहे. चकित करून टाकणारा कवितेतील नाटय़पूर्ण कल्लोळ एखाद्या भयस्वप्नाचे रूपच वाटते. शहरातली घुसमट वर्णन करताना कवी लिहितो-

‘निबिड शहर भरले, कोणी ना वाट पाहे

बरळत बसतात भिंती भिंतींशी खोटे

कळप बुडुन मेले की मृगाच्या जळात

विकल व्यथित सूर आर्तसे काळजात’

दुसऱ्या एका कवितेत ते शहराला ‘मुखपृष्ठ छापलेले कागदी शहर’ असं संबोधतात. स्वत:ला शोधण्यात बरबाद झाल्याची कबुलीही देतात. कवीची चित्रकलेची भाषा आणि चित्रप्रतिमा यांनी कवितांचा अवकाश व्यापला आहे. ‘स्व’शोधाचा हा प्रवास आनंदाची पीडा देणारा आहे, जणू-

‘तुझे रूप रेषेमधे येत नाही,

तुझे रूप रंगामधे येईना

(तुला वेगळाले मनाहून माझ्या-?)

स्वत:च्यामधे मी स्वत: पाहुणा’

कवीने विविध वृत्त, छंद यांचेही प्रयोग केले आहेत. अष्टाक्षरी, ओवी, द्वियमक, गझल-अंदाज, मालिनी वृत्त, शार्दुलविक्रीडित, भूपतिवैभव, मुक्तछंद, सयमक मुक्तछंद, मुक्तक इत्यादी प्रयोग केले आहेत. परंपरेचे आणि पूर्वसुरींचे संस्कार त्यांच्या कवितेला लगडूनच येतात. आजच्या अतिमुक्तछंदी कवितांच्या गर्दीत अशी घाटदार कविता उठून दिसते, हे खरे; परंतु काही वृत्तबद्ध कवितांमध्ये ऱ्हस्व-दीर्घाची ओढाताण, गडबडही दिसते. काही ठिकाणी चक्क ऱ्हस्व- दीर्घाच्या चुकाही आढळतात. अर्थात काव्यपरंपरेवरील कवीची निष्ठा अधिक महत्त्वाची आहे. कवितेचा कान आणि भान हे केतकरांचे संचित आहे. ‘कायकू’ हा त्यांच्या मते नवा काव्यप्रकारसुद्धा त्यांनी लिहिला आहे. ‘काय’ असा प्रश्न ‘कायकू’मध्ये अंतर्भूत असतो, असे त्यांचे स्पष्टीकरण!

‘विवर’, ‘फणफण’, ‘अंधारकोठडी’, ‘विनाश’, ‘अंधूक ओळ’, ‘कोरडी सांत्वना’ या कवितांमधून जगण्यातील अटळ क्लेश उतरले आहेत. जगून जन्म जुना झाला तरी पाटी कोरी करणारी वादळं सतत घोंघावतात. ‘मारवा’ कवितेत कवी म्हणतो-

‘वर्ष वर्ष ओळखून ही तपे अनोळखी

आपल्याच माणसात पाहुणा, अधोमुखी

असभ्य संधिकाल हा नि त्यास मृत्यूचा लळा

चिवचिवाट थांबला नि एक नाही कावळा’

मृत्यूचे वा परलोकीच्या जीवनाचे आकर्षण हा अनेक कवितांचा स्थायीभाव आहे. ‘मला मृत्यूची तहान देहाच्याही पलीकडे’ असे म्हणणारा हा कवी ‘विदिशा’ या कवितेतून आईला हाक मारतो-

‘दृश्य तू, अदृश्य तू अन् चिद्रुपाचे रूप तू

धीर तू, गंभीर तू अन् अर्पणाचा श्लोक तू’

अस्तित्ववेदनेचे उद्गार देणारी ही कविता आशय आणि अभिव्यक्तीच्या विविध परिमिती समोर ठेवते. रूपाचा आणि अरूपाचाही अखंड शोध ही या कवितेची आंतरिक ओढ आहे. अनोखी शब्दकळा, विलक्षण शब्दजोडय़ा, शाब्दिक कोटय़ा, कंसातील सहेतुक शब्द, चित्रमय संवाद, अपूर्व प्रतिमा यांची पखरण असलेली ही कविता वैफल्याची घालमेल रंगवत राहते. स्वच्छंदपणे भिरभिरण्याची मुभा असलेली फुलपाखरं प्रदूषित पर्यावरणात नि जगण्याच्या कोलाहलात विरक्त होतात. अंतरंगीचे पतंग पंखहीन होतात नि पिंजऱ्यात कोंडले जातात. अशा या विरक्त फुलपंखी कविता ‘अनुभवास भाषा देतो, भाषेला पाजुन रक्त’ अशा प्रकारच्या आहेत. कवी संतोष शेणई आणि गणेश दिघे यांच्या अभ्यासपूर्ण आणि मन:पूर्वक लिहिलेल्या प्रस्तावना बालम केतकरांच्या कवितेला सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. गतिमान काळाचे कवडसे पकडू पाहणारी ही कविता वाचकांना आत्मनिवेदन करायला लावते.

‘विरक्त फुलपाखरे’- बालम केतकर,

सायन पब्लिकेशन्स, पुणे,

पृष्ठे- १४४, मूल्य- २०० रुपये

आश्लेषा महाजन ashlesha27mahajan@gmail.com