५ जून या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण अभ्यासकांच्या मुलाखती व लेखांचे ‘वेध पर्यावरणाचा’ हे रविराज गंधे संपादित पुस्तक डिम्पल प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यातील विवेक कुलकर्णी यांचा लेख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गंगा, ब्रह्मपुत्रा व मेघनी या तीन प्रचंड नद्यांचा प्रवाह एकत्र येऊन जणू सागराचा खारटपणा धुऊन काढत होता. तो विशाल सागर आपल्या सर्व हातांनी या नद्यांचे पाणी सामावून घेत होता. सुंदरी, कांदळ व तिवरांचे वृक्ष जणू एक पाय पाण्यात व एक पाय जमिनीवर ठेवून ध्यानस्थ बसले होते. कुठेतरी दूर खंडय़ा पक्षी तुतारी वाजवून लोकांना सजग करत होता. झाडांवर माकडांची उगाचच लगबग चालू होती. तेवढय़ात चितळांनी एकच गलका करत चिखल तुडवत पळायला सुरुवात केली. हे सर्व पाहून ताजुद्दीनने- माझ्या नावाडय़ाने- ‘मामू आ गया’ असे म्हणत हातात फटाके तयार ठेवले. मीसुद्धा माझा निकॉन सरसावून बसलो. पश्चिम बंगालमधील सुंदरबनातला तो माझा पहिलाच दिवस होता.

सुंदरबन म्हणजे खारफुटी वनस्पतीचे जगातील सर्वात मोठे जंगल. साधारण दहा कोटी वर्षांपूर्वी सदाहरित जंगलातील स्पर्धात्मक वातावरणापासून फारकत घेऊन काही वनस्पती नद्यांच्या मुखाशी वसलेल्या भरती-ओहोटीच्या प्रदेशात राहू लागल्या. अनुकूलनातून त्यांनी स्वतमध्ये काही बदल घडवून आणले व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहण्याचे कसब बाणवले. काळाच्या ओघात साधारण ७० जातींच्या वनस्पतींनी अशा प्रकारे निराळे जीवन सुरू केले. समुद्राच्या क्षारतेसमोर टिकाव धरण्याची क्षमता असल्यामुळे या वनस्पतींना मराठीत ‘खारफुटी’ असे संबोधले जाऊ लागले.

समुद्र व नद्यांचे मुख याच्या परिसरात नद्यांनी आणलेला गाळ साठतो. अत्यंत तलम अशा या मातीत कुठल्याही वनस्पतींना जगणे कठीणच असते. समुद्राची क्षारता, भरती-ओहोटीचे प्रवाह, वेगवान वारे, अस्थिर गाळाची जमीन, जमिनीत प्राणवायूचा अभाव या व अशा अनेक कारणांनी या परिसरामध्ये विपरीत परिस्थिती असते. या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी खारफुटींनी जणू नवे रूपच धारण केले. गाळात उभे राहता यावे म्हणून वनस्पतींची मुळे खोलवर न जाता पसरली गेली. जमिनीतील प्राणवायूच्या अभावामुळे काही मुळे जमिनीतून वर काढावी लागली, तर काही झाडांना पारंब्या फुटल्या. शरीरातील जास्तीचे क्षार उत्सर्जति करण्यासाठी क्षारग्रंथी निर्माण केल्या, तर बहुतेक वनस्पतींनी वाळवंटातील वनस्पतींसारखे मेणाचे आच्छादन घेतले. या मेणाच्या आच्छादनामुळे एकंदरीत पाण्याचे उत्सर्जन कमी होऊन शरीरातील क्षारता फारशी वाढू दिली जात नाही. या वनस्पतींची मुळेसुद्धा (उलट द्रवाभिसरण- Reverse Osmosis) सारखे तंत्रज्ञान वापरून फक्त पाणी शोषतात व क्षार बाहेर ठेवतात.

त्रिभूज प्रदेशांमध्ये सर्वात जास्त प्रतिकूलता असते ती प्रजननासाठी. सर्वसाधारण वनस्पतींमध्ये अंडज प्रजनन आढळते. म्हणजेच फुलातील परागांचे संकिर्णन होऊन फळ तयार होते. हे फळ झाडावेगळे होऊन अनुकूल वातावरणाची वाट पाहते. अनुकूल वातावरणात फळातील बीज रुजते व नवीन रोप तयार होते. दर सहा तासांनी बदलणाऱ्या भरती-ओहोटीच्या प्रवाहात, गाळाच्या जमिनीत व प्राणवायूच्या अभावात अंडज प्रजनन प्रक्रियेतून नवीन रोप होणे दुरापास्तच. या परिस्थितीवर मात करण्यासाठी खारफुटीचे प्रजनन स्वेदज स्वरूपाचे असते. या प्रकारात फळांमध्ये बीज नसते, तर संपूर्ण फळ एक रोपटे असते. ओहोटीच्या वेळी हे फळरूपी रोपटे झाडापासून वेगळे होते व माता-पित्याच्या मुळांचा सहारा घेऊन स्वतला रुजवते.

साधारण दहा कोटी वर्षांपूर्वी या वनस्पतीचा जन्म इंडोनेशिया-मलेशिया येथे झाला असावा. मोठय़ा नद्या व अनुकूल वातावरणामुळे आशिया खंडात याचे संवर्धन चांगले झाले व सर्वात जास्त जाती याच ठिकाणी विकसित झाल्या.

भारतात खारफुटी वनस्पती पूर्व किनाऱ्यावर जास्त प्रमाणात आढळतात. याचे मुख्य कारण म्हणजे भारतातील बहुतेक मोठय़ा नद्या पूर्ववाहिनी आहेत. नर्मदा व तापी सोडल्यास बहुतेक मोठय़ा नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपली पूर्व किनारपट्टी रुंद असून ती सौम्य उताराने समुद्रात बुडते. यामुळे भरती-ओहोटीचे विस्तृत क्षेत्र मिळते व खारफुटी वनस्पती याच क्षेत्रात वाढतात.

खारफुटीची बरीचशी माहिती आता आपल्याला कळली आहे, तेव्हा या वनस्पतीचे नेमके महत्त्व काय, हे आता जाणून घेऊ या.

किनारपट्टींचे रक्षण हे खारफुटीचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. भारताच्या किनारपट्टीची लांबी ७,५१७ किलोमीटर आहे. एवढय़ा विस्तृत किनारपट्टीचे संरक्षण होण्यासाठी एका सक्षम यंत्रणेची गरज असते. खारफुटी ही यातील एक महत्त्वाची यंत्रणा आहे. खारफुटी म्हणजे जणू काही या किनारपट्टीची त्वचा असते व त्वचा जशी आपल्या शरीराची काळजी घेते, तसेच खारफुटी किनारपट्टीचे संरक्षण समुद्राच्या लाटा, वादळे, वारा यांपासून करत असतात. पण येथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे खारफुटी फक्त संरक्षित किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी आढळतात. खुल्या समुद्रासमोरील वाळूच्या व खडकाळ किनाऱ्यावर त्याचा फारसा प्रभाव पडत नाही.

खारफुटींच्या जंगलांमध्ये विविध प्राणी आढळतात. कीटकांपासून वाघापर्यंत व छोटय़ा शिंपल्यापासून मगरीपर्यंत जैववैविध्य येथे सापडते. जितके खारफुटीचे वन विस्तृत असते, तेवढे जैववैविध्य जास्त आढळते. भारत व बांगलादेशात संयुक्तपणे वाढणारे सुंदरबन हे म्हणूनच जगातील सर्वात मोठे व सर्वात वैविध्यपूर्ण खारफुटीचे वन आहे. सुंदरबनाचे वैशिष्टय़ म्हणजे जमिनीवरील प्राण्यांचा सम्राट- म्हणजेच वाघांचे अस्तित्व येथे आहे. एवढेच नव्हे, तर येथील वाघ केवळ जमिनीवरील भक्ष्यांवर अवलंबून न राहता मासेमारी करूनदेखील आपली उपजीविका करतो.

निकोबार बेटामध्ये एक खेकडा खाणारे माकड आढळते. या माकडाची खेकडे पकडण्याची पद्धत फार मजेशीर आहे. स्वतची राठ केसांची शेपटी हे माकड खेकडय़ाच्या बिळात घालते. शत्रू समजून खेकडय़ाने त्याच्या नांगीने ती पकडली की चपळाईने हे माकड शेपटी वर खेचते व खेकडय़ाला पकडून खाते. सुंदरबनच्या खाडीतील सुसर हा खारफुटीतील वनात सापडणारा सर्वात मोठा प्राणी आहे.

मोठय़ा प्राण्यांप्रमाणेच असंख्य लहान प्राणी या वनात सापडतात. विविध जातींची फुलपाखरे, कीटक, मधमाश्यादेखील येथे सापडतात. खारफुटीमधील ‘काजळा’ (River Mangrove) या वनस्पतीच्या फुलापासून उत्तम प्रकारचे मध मिळते. या मधाला इतकी जास्त मागणी असते, की सुंदरबनात वाघाचा धोका पत्करून ‘माधोक’ म्हणून ओळखले जाणारे मध गोळा करणारे लोक जीवावर उदार होऊन हा मध गोळा करतात. सामान्य मधाच्या दुप्पट ते तिप्पट किमतीला हा मध विकला जातो.

जैविक महत्त्वाबरोबरच खारफुटीपासून इतरही अनेक फायदे होतात. खारफुटीच्या काही जातींचे लाकूड हे सागवानासारखे मजबूत असून ते इमारत, फर्निचर तसेच जहाजबांधणीसाठी वापरता येते. निपा नावाचे पाम जातीचे झाड असते, त्यापासून साखर निर्माण करतात. चिपी जातीच्या झाडांच्या फळांपासून श्रीलंकेत खाद्यपेये बनवतात. खारफुटीच्या विविध जातींपासून पारंपरिक औषधे तयार होतात. तर मेस्वाल या वनस्पतीपासून साबणापासून टूथपेस्टपर्यंत विविध वस्तू तयार होतात.

एकंदरीत पाहता जमिनीवरील जंगलापासून जे फायदे मिळतात तेवढेच फायदे आपल्याला खारफुटीपासूनही मिळतात. खरं तर उष्ण कटिबंधीय वर्षांवनांचे समुद्राकडील टोक म्हणजेच खारफुटी. वर्षांवनांना ‘जंगल’ असे संबोधले जाते, तर खारफुटींना स्पॅनिश भाषेत ‘मंगलार’ किंवा ‘मँगल’ असे संबोधले जाते. एका अर्थी किनारपट्टय़ांवरील जंगलांचे ‘मंगल’ होते व ‘जंगल में मंगल’ या उक्तीचा एक निराळाच अर्थ प्रतीत होतो.

जगातील ६० टक्के लोक किनाऱ्यापासून ६० कि. मी.च्या प्रदेशात राहतात. साहजिकच किनारी भागातील लोकांना पुरातन काळापासून हवा, वनस्पती व त्यांचे महत्त्व माहीत होते. सॉलोमन आयलँड्स, आफ्रिका, बांगलादेश, भारत, पापुआ न्यूगिनी, अमेरिका अशा कितीतरी देशांत खारफुटी- संदर्भात दंतकथा, कथा, इतिहास ज्ञात आहे. भारतापुरते बोलायचे तर चेन्नईजवळ चिदम्बरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’ म्हणून एक मूर्ती स्थापन केली आहे. भाविक आजही तिला पूजतात. सुंदरबनात ‘बनबिबी’ नावाची देवता खारफुटीच्या जंगलाची देवता समजली जाते व हिंदू-मुस्लीम तिला सारखेच पूजतात. ठाणे जिल्ह्य़ात एका गावी मला एक वेगळीच परंपरा आढळली. एक गाव समिती असते, ती खारफुटीचे संरक्षण करते. गाव समितीमार्फत मर्यादित प्रमाणात खारफुटीचे लाकूड गोळा करता येते. पण कोणीही जर मर्यादेपेक्षा जास्त लाकडे तोडली तर समिती निवाडा करून मर्यादाभंग करणाऱ्याला शिक्षा देते. शिक्षेनुसार त्या व्यक्तीला रात्रभर खारफुटीच्या झाडाला बांधून ठेवायची तरतूद आहे. इतकी कडक शिक्षा ठेवल्यामुळे कोणीही या वनस्पतीचा दुरुपयोग करीत नाही व या वनस्पतीचे संवर्धनही योग्य रीतीने होते.

आपल्या परंपरा व संस्कृतीचा विचार केला तर खारफुटींनासुद्धा योग्य मान देऊन त्यांचे जतन करण्याची पद्धत दिसते. गोव्यात ‘मांगे थापणी’ नावाची पूजा पौष अमावस्येला करतात व मगरीची मातीची मूर्ती करून तिची पूजा केली जाते. मगरींनासुद्धा योग्य मान देणाऱ्या आपल्या संस्कृतीत अलीकडे मात्र बदल झालेला दिसतो. खारफुटीचा उपयोग कचरा, सांडपाणी व मानवी अवशेषांचे दहन करण्यासाठी केला जातो. बहुतांश ठिकाणी भराव टाकून त्या नष्ट केल्या जातात व एकंदरीतच त्या आपल्या संस्कृतीतून हद्दपार होत आहेत.

खारफुटीचे नष्ट होणारे अधिवास व कमी होत चाललेले त्यांचे महत्त्व यामुळे पर्यावरण मंत्रालयाने त्यांना ‘अतिमहत्त्वाच्या वनस्पती’चा दर्जा दिला व पुढे सागरी नियंत्रण कायदा, वन कायदा यामध्ये त्यांना समाविष्ट करून त्यांच्या संरक्षणाची कायदेशीर तरतूद केली. न्यायालयांनीसुद्धा वेळोवेळी कठोर धोरण अवलंबून खारफुटींच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. तरीही गेल्या दोन दशकांत भारतात खारफुटींचा नाश झालेला आढळतो. या अनास्थेचे सर्वात मोठे कारण म्हणजे खारफुटीबद्दलचे अज्ञान. एक दृष्टिकोन असा आहे, की या मानवास कुठलाही उपयोग नसलेल्या व रोगराई पसरविणाऱ्या टाकाऊ वनस्पती आहेत. तर याच्या विरोधात काही पर्यावरणवाद्यांनी त्यांचे असे गुणगान केले, की यासम याच!

दोन गोष्टी खारफुटींसाठी मारक ठरतात. त्या म्हणजे अति स्तुती व अति निंदा. उलटपक्षी या वनस्पतींचे योग्य मूल्यमापन करून त्यांना आपल्या जीवनात योग्य ते स्थान दिले व प्रगती आणि निसर्गाचा योग्य समतोल साधला तर खारफुटीच्या संवर्धनासाठी वेगळे काहीही करण्याची गरज भासणार नाही.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vivek kulkarni article from marathi book vedh paryavaranacha
First published on: 04-06-2017 at 01:43 IST