12 August 2020

News Flash

समग्र आयुष्याचा ‘व्यामोह’

आयुष्याच्या प्रवासात लाभलेल्या आणि भेटलेल्या अनेक व्यक्तींची चित्रे या कवितांतून उमटली आहेत.

‘व्यामोह’- प्रभा गणोरकर,

‘व्यामोह भयंकर दुस्तर भरला भारी

कीं जीव दडपतो पण निद्रेमाझारी

दिन पक्षमास ऋतू वर्ष भराभर गेले

हें रक्त जसेंच्या तसेंच सांकळलेले’

प्रभा गणोरकरांच्या ‘व्यामोह’ या कवितासंग्रहाची सुरुवातच या बालकवींच्या ‘हदयाची गुंतागुंत’ या कवितेतील उद्धृताने होते आणि मग या संग्रहातील ७२ कविता वाचताना त्या कवितांच्या व्यामोहाने आपलाही जीव दडपत जातो. कवितेच्या निवेदिकेच्या मनात साचून आलेली औदासीन्याची भावना प्रतीत होत राहते.

प्रभाताईंची कविता विलक्षण आत्ममग्न आहे. वाचकानुनय तर राहोच, पण निवेदिकेच्या अंतर्विश्वात वाचकाला सामावून घेण्यासाठी म्हणूनसुद्धा त्याबद्दलचा एखादा जादाचा तपशील ती देत नाही. मग वाचक कवितेच्या निवेदिकेच्या औदासीन्याचे कारण कवयित्रीच्या ज्ञात व्यक्तिगत तपशिलांत शोधू पाहतो. पण त्याच्याशी कवितेत मिळतेजुळते केवळ-

‘मला वर्तमान क्षणाशी असलेला मोह सोडवेना

माझे सजवलेले घर,

सुस्थिर मुलाबाळांचा संसार..’

एवढेच सापडते. या वर्तमान क्षणाशी असलेला मोह सोडून ही निवेदिका-

‘लक्तरलेले, जागोजाग खरचटलेले, रक्ताळलेले

दारोदार भटकून परतलेले, पराभूत आयुष्य’

त्याच्या व्यामोहात का नेते आहे याचा विस्मय करीत राहते. त्याचे उत्तर शोधण्यासाठी वाचकाजवळ असतात फक्त कविता. व्यामोहातील समग्र कविता.

प्रभाताईंची कविता प्रतिमांच्या भाषेत बोलते. आणि त्या बव्हंशी निसर्गप्रतिमा असतात. लिफ्टसारखी शहरी प्रतिमा क्वचितच येते (‘लिफ्टमधले स्वगत’). एरव्ही भेटतात त्या पाऊस, नदी, समुद्र, झाडे, पाने, फुले, पाखरे यांसारख्या सर्वसामान्य निसर्गप्रतिमा. कधीतरीच त्या विशिष्ट होतात. जसे ‘तंतुएवढे पाय हलवीत निघणारे लाल इंद्रगोप’ (‘आज, प्रिय आई’) किंवा ‘सतेज निळी मॉर्निग ग्लोरीची फुले’ (‘तू नसताना तुझ्याशी केलेला एक पर्यावरणविषयक संवाद, की काहीच नाही’). अन्यथा येतात त्या समुद्रातून चालताना सरकणारी पायाखालची वाळू, झिजलेले दगड उराशी घेऊन जुन्या अरण्याचे प्रतिबिंब वागवीत पडून असलेली नदी, उघडी पडलेली मुळे, डोंगरात धडाडून पेटलेले वणवे, पिसे तुटलेले जखमी पक्षी अशा प्रतिमा.. सगळ्याच औदासीन्य जागवणाऱ्या.

या कवितांमागे आहे कवितेच्या निवेदिकेचे समग्र आयुष्य. त्यात बालपणीची स्मरणे आहेत. आणि ती मात्र रम्य आहेत. कदाचित आजच्या उदास परिप्रेक्ष्यातून स्मरताना ते बालपण आणि ते जेथे गेले तो परिसर अधिकच रम्य भासतो आहे. स्वप्नवत भासतो आहे (‘स्वप्न’). निवेदिकेच्या मनात ठसठसणारे एक दु:ख : तिचे आजचे जग तिचे नाही, तिला नको आहे. आणि तिला तिच्या घराकडे परत नेणारी धुळीची वाट मागे जात जात कुठेतरी हरवून गेली आहे (‘देस बिराना है’), हे आहे. कधी हे असमाधान नकोसे आजचे शहर आणि हवेसे जुने गाव यांच्या विरोधाभासातूनही व्यक्त होते (‘वर्तमान’). या कवितांच्या औदासीन्यामागे जसे निवेदिकेचे स्वदु:ख आहे, तसेच तिला भेटलेल्या इतर व्यक्तींची दु:खेही आहेत.

आयुष्याच्या प्रवासात लाभलेल्या आणि भेटलेल्या अनेक व्यक्तींची चित्रे या कवितांतून उमटली आहेत. त्यात गावच्या वेशीपर्यंत सोडायला येणारे वडील आहेत (‘गोधडी’). शरीर-मनावर हळुवारपणे हात फिरवणारी आई अनेक कवींच्या कवितांतून भेटते. इथे ती आईने लिहिलेल्या कवितांतील शब्दांतून निवेदिकेच्या मनात साकार होते.. अलवार आईपण नाकारणारी आणि पूर्ण स्त्रीत्व सांभाळणारी (‘प्रिय आई’). अनेक कवितांतून थोरली आजी, मोठी आई यांचे उल्लेख ओझरते येतात (‘जुन्या घराच्या कविता, प्रिय आई’). या व्यक्तिचित्रांत जगावर विश्वास ठेवून सर्वस्व गमावणारी कुणी बाई आहे (‘बाई’) आणि फसल्याची जाणीव झाल्यावर शोषणाला, इशाऱ्यावर चालण्याला नकार देणारी निवेदिकेची आणि स्वत:ची हीरताही आहे (‘हीरता, समझबूझ’). कधी निवेदिका दुसऱ्या समकालीन कवयित्रीच्या भूमिकेत शिरूनही ‘तिची अलीकडची अप्रकाशित दीर्घकविता’ लिहिते. काही कवितांतून व्यक्तिविशिष्ट नसलेल्या अशा पोरवयातून हळूहळू शहाण्या होणाऱ्या ‘परक ऱ्या पोरी’ आहेत. आणि ‘हळूहळू’ आक्रसत, मागे जात जात पुन्हा पोरवयाशी येऊन थांबणाऱ्या बायकाही आहेत. ‘कथा : एक, दोन, तीन, चार.. कितीतरी’सारख्या कवितेत आत्महत्येला किंवा हत्येला सामोऱ्या जाणाऱ्या अनाम स्त्रिया भेटतात. निवेदिका आपल्या कवितांतून ही व्यक्तिचित्रे साकार करते.. त्यांच्या दु:खाला मुखर करते.

या कवितांमधील व्यक्तिचित्रांतली सर्वात मनोज्ञ चित्र आहे ते निवेदिकेच्या सहचराचे आणि त्याच्यासमवेतच्या निवेदिकेचेही! बाह्य़त: दगडासारखा अचल, एकांगी वाटणारा तो आतून कसा एखाद्या ‘तळ्यासारखा’ संवेदनक्षम, अलवार, केवळ मृदू आहे हे जाणवल्यावर त्याच्या सहवासाचे ‘पाथेय’ उरलेले आयुष्य वाळवंटातून चालत जातानाही पुरेल, अशी निवेदिकेची धारणा आहे. तो आयुष्यात आला तेव्हाची अल्लड निवेदिका आपली आपल्यातच गुंग असतानाही त्याचे आपले सगळे सोडून तिच्याकडे येणे तिला लोभावून टाकते. त्याचे हृदयंगम चित्र ‘एक प्रेमाची कविता’मध्ये उमटले आहे. पुढे आयुष्याचे वाळवंट पार करीत जाताना त्याच्यासोबतही निवेदिकेला एक पोकळी ग्रासू लागते (‘सोबत’). दोघांमध्ये एक मोठी दरी आहे असे वाटू लागते (‘दरी’). अशी रिक्तता, कंटाळा, थकवा जाणवू लागतो तेव्हा स्वत:भोवती ती विणत असलेल्या या जाळ्यातून बाहेर काढायला त्यालाच सांगते (‘दया कर’). या सर्व कविता सहचराला उद्देशून लिहिलेल्या असल्या तरीही हा निवेदिकेने आपल्याच मनात त्याच्याशी केलेला संवाद आहे. ‘तू नसताना तुझ्याशी केलेला एक पर्यावरणविषयक संवाद’ या कवितेत त्या दोघांतील बिघडत चाललेले वातावरण आहे आणि एकमेकांवर आघात-प्रत्याघात होत असताना निवेदिका या ‘तू’ला-

‘प्रेम ही तुला वाटते तेवढी

अविनाशी गोष्ट नाही’

हे सांगू इच्छिते. सर्वजण वर्तमानात आणि उद्याकडे बघत जमेल तसे जगत असताना तो मात्र स्मृतींच्या थडग्यात पडून राहिला आहे असे तिला वाटते. निवेदिकेला त्याच्यातील विनाशी प्रेरणांशी प्राणपणाने झुंज द्यायची आहे. ती उद्याबद्दल आशा बाळगून आहे. आणि त्यालाही ती सांगते आहे-

‘लवलवणारी पाती डुलतील प्रसन्नपणाने

तू डोळे उघडून पाहिलेस

तर ते निवतील

तुझ्या हाती आहे

स्वत:ला शांतवणे

किंवा आतल्या आत जळत राख होत जाणे’

असा आशावाद निवेदिका जागवू पाहत असली तरी सहचराबरोबर असतानाही अंतर्यामी वाटणारे एकटेपण हे या कवितांच्या औदासीन्यामागचे एक प्रबळ कारण असू शकते. केवळ सहचरच नव्हे, तर इतरही आपली माणसे आपल्याला वाटली तेवढी जवळ नव्हती, हे आणखी एक कारण. निवेदिकेला आजचे सामाजिक पर्यावरणही बिघडत जात असल्याची खंत आणि त्याबद्दल आपण काही करू शकत नसल्याची अपराधी भावनाही सतावते आहे. विचारांच्या अरण्यात भटकणे, स्वत:लाच अपराधाच्या धगीत होरपळून घेणे, आभासात राहणे हा निवेदिकेचा स्वभाव आहे. ‘परत ये’सारख्या स्वत:लाच उद्देशून लिहिलेल्या कवितेत निवेदिका यातून बाहेर येण्याचा मार्ग स्वत:च सुचवते आहे-

‘हे न पाझरणारे खडक, या चिरेबंद भिंती

कुणी नाही जवळ घेणारे हे समजून घे.

हात लांबवू नकोस

परत ये. परत ये स्वत:त

स्वत:च्या ठिकाणी स्वत: घरी

आणि निरोप पाठव पावसाला,

झाडांना, पाखरांना, मोरांना

परतल्याचा..’

पाऊस, झाडे, पाखरे, मोर हे सर्व प्रभाताईंच्या कवितांतले रहिवासी आहेत. अनेक कवितांतून ते भेटत राहतात. असे हे स्वत:त परतणे म्हणजे कवितेकडे परतणे आहे. आणि हे कवितालेखन एक प्रकारे स्वत:च्या किंवा स्वत:त भोगलेल्या इतरेजनांच्या दु:खातून मुक्त होणे आहे. अगदी आयुष्य नकोसे वाटायला लागले तरी त्यांच्या कवितेच्या निवेदिकेला हताश मृत्यू नको आहे (‘स्थिती’). तिची जीवनेच्छा चिवट आहे (‘तू नसताना..’). एखाद्याच ‘ये’सारख्या कवितेत ती मृत्यूला बोलावताना दिसते. पण असहाय परिस्थितीतही निवेदिकेला-

‘कविता फक्त लिहावीशी वाटते’ (‘स्थिती’)

कवितेविषयीच्या अनेक कविता या संग्रहात भेटतात. कधी या कवयित्रीला शब्दांची खात्री वाटत नाही. पण पवित्र, निरागस, कोवळीक बाळगणारे, मानवी अस्तित्वाला अर्थपूर्णता देणारे शब्द तिने ओंजळीत घ्यावे म्हणून बोलावीत आहेत असे तिला वाटते (‘कदाचित’). कधी आयुष्यच न जपलेल्या कवितेप्रमाणे वाटते (‘अदृश्य’). आपल्या कविमित्राप्रमाणे आपणही आपल्या देशातील लोकांना, विशेषत: हेलपाटणाऱ्या तरुण पिढीला जागृत करणारी कविता लिहावी असे कवयित्रीला वाटते (‘मला पण’). पण आपली कविता कुणाचे बाहू स्फुरविणारे चैतन्य निर्माण करणारी कविता नाही, ती आहे हलक्या आवाजातले स्वगत- हे ती जाणते (‘खरे तर’). ‘अशा कवितेला कोण प्रतिसाद देईल?’ असा प्रश्न तिला पडतो. भवभूतीचा ‘आपल्या काव्याला दाद देणारा कोणीतरी, कधीतरी निपजेलच; कारण काळ अनंत आहे, पृथ्वी विशाल आहे’ हा आशावाद तिला स्मरतो. पण स्वत:साठी काळ क्षणकाळच आहे आणि पृथ्वी पायाखाली आहे तेवढीच असे तिला वाटते. या उदास जाणिवेवरच या कवितासंग्रहाची इतिश्री झाली आहे.

पण कवितेने काही करावे अशी सच्च्या रसिकाची अपेक्षा थोडीच असते? फक्त तिने असावे!

आर्चिबाल्ड मक्लीश या आंग्ल कवीने आपल्या ‘आर्झ पोएटिका’ या बहुल्लेखित कवितेत म्हटल्याप्रमाणे-

kA poem should not mean,
But bel

प्रभा गणोरकरांच्या कवितेच्या चाहत्यांसाठी ती होती, आहे आणि असेलच याची खात्री त्यांचा ‘व्यामोह’ हा नवा कवितासंग्रह पुन्हा एकदा पटवतो!

‘व्यामोह’- प्रभा गणोरकर, 

पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

पृष्ठे- १२६ , मूल्य- २२५ रुपये.

हेमंत गोविंद जोगळेकर hemantjoglekar@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2017 2:00 am

Web Title: vyamoha book review written by prabha ganorkar
Next Stories
1 फुले परंपरेची मर्मग्राही चिकित्सा
2 सोंगाडय़ा तमाशा पार्टी
3 व्रतस्थ आणि वृत्तस्थ
Just Now!
X