27 February 2021

News Flash

वर्तमानाचा स्वशोध

या संग्रहात ‘कविता आणि मी’ असा एक शोध सर्वत्र आढळतो.

नव्वदोत्तरी मराठी कवितेचा प्रवाह समाजातल्या आजवर अलक्षित राहिलेल्या विविध घटकांच्या अभिव्यक्तींनी समृद्ध झाला आहे. त्यातील एक समर्थ आवाज आहे कवी अजीम नवाज राही यांचा. ‘व्यवहाराचा काळा घोडा’ आणि ‘कल्लोळातला एकांत’ या कवितासंग्रहांनी याआधीच राही यांच्या अभिव्यक्तीतील वेगळेपणाने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते. नुकताच त्यांचा ‘वर्तमानाचा वतनदार’ हा तिसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.

या संग्रहात ‘कविता आणि मी’ असा एक शोध सर्वत्र आढळतो. कवितेनं आयुष्याला आकार नि अर्थ दिल्याचा कृतज्ञ भाव तर त्यात आहेच; शिवाय कवितेसोबतच्या आयुष्याचं उत्खननही त्यात दिसून येतं. स्वशोधार्थ खोल खणत जाण्याचा ध्यास घेताना ही कविता वर्तमानाचा, व्यवस्थेचा तळही ढवळून काढते.

‘सुरू आहे सलग पन्नासवर्षीय उत्खनन

उत्खननात सापडले

मला माझेच हरवलेले अवशेष

अस्वस्थतेचा जडला दुर्धर आजार

याच आजाराच्या ताकदीवर

जगू शकलो निरोगी आयुष्य आजवर..’

असा जगण्यातला विरोधाभास ते अधोरेखित करतात. जगण्यातल्या संघर्षांमुळे कलिजात कवितेची ठिणगी पेटली अन् कवितेनं जगणं निभावून नेणं शक्य झालं, असा परस्परसंबंध या कवितांमध्ये ठायी ठायी सापडतो. ‘स्व’ आणि ‘स्वेतर’ अशा दोन्ही जगण्यांना कवी सारख्याच उत्कटतेनं कवटाळतो. या दोन्हींमध्ये कवीच्या कवितेची बीजं सापडतात. त्या अर्थाने जगण्याच्या लढाईचे भाषांतरच ते कवितेत मांडतात असे म्हणायला हरकत नाही.

अस्तित्वाच्या बुडाशी संघर्षांचा वणवा पेटलेला असतानाही कवितेनं पुरवलेली जीवनसन्मुखता आणि सत्व यांवर जगणे बेफिकीरपणे निभावले गेल्याची भावना व्यक्त करताना ते लिहितात-

‘ढेकरांच्या मैफिलीत

माझी उपासमार ठरली खास’

अजीम नवाज यांच्या कवितांमधून अपरिहार्यपणे मोहोल्ल्यातलं जग अवतरतं. कवी-सूत्रसंचालक म्हणून मोहोल्ल्यापेक्षा वेगळं, व्यासपीठावरच्या उजेडाचं जगणं कवीला जगायला मिळालं. पण त्यामुळे वास्तवामधील मोहोल्ल्यातल्या जगण्यातला भयाण अंधार अधिकच भेडसावू लागला.

‘सभासमारंभात मिरवतो अस्तित्व वलयांकित

घरी परततो तेव्हा

जत्रा संपल्यानंतरची भयाणता

फिदीफिदी हसत

स्वागत करते मोहल्ल्याच्या सरहद्दीवर’

बाहेरचं विचारपीठावरचं रमवणारं जग आणि ते संपलं की भेसूर हसत सामोरं येणारं मोहोल्ल्यातलं वास्तव जग यांतलं विदारक अंतर त्यांची कविता उदासपणे दर्शवते. मोहोल्ल्याची दुनिया वेगळीच आहे. तिथे कवितेबिवितेशी काही देणंघेणं, सोयरसुतक नाही. तिथे केवळ जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आहे. आजची भ्रांत त्यांच्यासमोर आहे. मोहोल्ल्यातला पाऊसही ‘कवितेची फुलपाखरी ओळ प्रसवत नाही.’

शिवाय विचारपीठांवर उजेड असला तरी तिथेही सारे काही आलबेल नाही. जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींची खंत तिथेही आहेच. ‘सूत्रसंचालकाची रोजनिशी’ ही कविता त्यादृष्टीने अभ्यासण्यासारखी आहे. नेत्यांचा, पुढाऱ्यांचा, कवितेच्या क्षेत्रात समारंभ आयोजित करणाऱ्यांचा, समारंभाच्या पाहुण्यांचा, गर्दीचा, श्रोत्यांचा.. सर्वाचा अनुनय करता करता हाती शून्य आल्याची, एकाकीपणाची दिवसेंदिवस बळावत जाणारी भावना अजीम नवाज यांनी प्रत्ययकारी पद्धतीने व्यक्त केली आहे-

‘रोज घेतली फिनिक्ससारखी भरारी

गरजेपुरत्या रकमेसाठी

स्वत:ची कबर खोदली स्वत:

.. माझ्यातला सूत्रसंचालक नि हमाल

रेल्वेरुळासारखे समांतर वागले’

अजीम नवाज यांच्या कवितेतलं विश्व हे कष्टकरी समूहाचं जग आहे. ते कल्पनेतल्या दु:खभोगांचं नाही, तर जिवंत, जळत्या दाहांचं जग आहे. त्यामुळे या कवितांना जिवंत वेदनांचा स्पर्श आहे. कष्टकऱ्यांच्या ढोरमेहनतीवर भाष्य करताना ते लिहितात..

‘कष्टकऱ्यांच्या पाचवीला पूजलेलं हमालपण

अन् गाढवांचं कष्टाळू जिणं

यात कुठे असतं अंतर

तोंडावाटे आतडी बाहेर येते

भोवतालच्या ढोरमेहनतीचं

करताना भाषांतर..’

वर्तमान व्यवस्थेला भोक पाडू पाहणारी अजीम नवाज यांच्या कवितेची भाषा उत्कटतेनं भरलेली आहे. तिच्यात प्रचंड आवेग आहे. कवी आपल्या आतला सगळा कल्लोळ, आकांत आणि अशांतता शब्दा-शब्दांत ओततो. त्यामुळे त्यांची ही समस्त कविता संवेदनासंपृक्त संवेदनांनी भरलेली होते. ओसंडत्या वेदनेनं जणू कवितेचा कंठ दाटून येतो. ‘टंगळमंगळ उपकारांचा इतिहास अमंगळ’ किंवा ‘हिशोबाला रत्ती, बक्षिसाला हत्ती’ अशी ती विनासायास उपहास नि अनुप्रास साधते. ती कधी स्वगतासारखी व्यक्त होते, तर कधी ‘विषय सोडा झाडांचा’ अशी बोलल्यासारखी, गप्पा मारल्यासारखी मनीचं गूज खोलते. ‘पानांचा गर्दावा’सारखी आशयघन, सुंदर, चपखल शब्दयोजना हे वैशिष्टय़ ती जपते.

मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे, ‘परिसरातील प्रतिमासृष्टीची अर्थघन निर्मिती’ या कवितांमध्ये पाहायला मिळते. या सगळ्या प्रतिमांची निवड आपसूकपणे भोवतालातून, वर्तमान जगण्यातून कवी करताना दिसतात. उदा. गावाकडून शहरात राहायला आलेला लाला सांगतो-

‘नहीं तो गाव में घिसते जिंदगीभर

जुतों चपलों की तरह फट जाते

एक दिन गूपचूप

कब्रस्तान में जाके गड जाते..’

फाटक्या जुन्या चपलेइतकीच आपली किंमत, तीच आपली गत हे कवीने फार प्रत्ययकारी पद्धतीने सांगितले आहे. ‘चार ओळींचा पत्ता’ आणि इतरही कवितांतील कथात्म अनुभव फार मनभावन आहे.

‘लाला बोलता बोलता शायर झाला

उंट छापचा झुरका ओढत म्हणाला’

– असा तो कथेसारखा अनुभव पुढे सरकतो. जगण्याचं तत्त्वज्ञान सांगताना कवितेतला ‘शायर लाला’ भावनावश होतो. गाव सोडून शहरात आलो, नोटांनी खिसे भरले; पण गावातला ‘अपनापन’ शहरात हरवून बसलो, ही खंत तो व्यक्त करतो. खरं सांगायचं तर ‘वर्तमानाचा हा वतनदार’ अस्वस्थ आहे तो या हरवलेल्या ‘अपनापन’मुळेच! अजीम नवाज यांच्यासारखा कवी ते कवितेत शोधतो आणि त्यासाठी ‘संघर्षांच्या वैशाखाची तल्खी सोसली..’ ही तयारीही ठेवतो. म्हणूनच त्याची कविता झळझळीतपणे समोर येते.

  • ‘वर्तमानाचा वतनदार’- अजीम नवाज राही,
  • लोकवाङ्मय गृह प्रकाशन,
  • पृष्ठे- १०३, मूल्य- १६० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 12:40 am

Web Title: wartmanacha watandar book by ajim nawaj rahi
Next Stories
1 ‘काश्मीर प्रश्न’ ‘शब्द’कडून मागे!
2 ‘सेक्शुअल’ कथांचा काव्यात्मक आविष्कार
3 चिरंतन पुराणकथा
Just Now!
X