18 October 2018

News Flash

मीठ आणि अश्रू

आम्ही लख्ख दिव्यांच्या प्रकाशात मजबूत लाकडी पायऱ्या उतरून खाणीत उतरलो.

पोलंडमधील तेराव्या शतकात शोध लागलेली मिठाची प्रचंड खाण..

पोलंडमधील तेराव्या शतकात शोध लागलेली मिठाची प्रचंड खाण.. या खाणीची सफर करताना तिचे भव्यपण जाणवतेच, पण श्रम आणि दमन यांत पिचलेल्या तिथल्या कामगारांच्या कलावंतपणाच्या खुणाही तिथे आढळतात. दुसऱ्या महायुद्धात नाझींनी पोलंडमधील आउश्वित्झमध्ये उभारलेली छळछावणी मानवी हिंस्रतेची आठवण करून देते..

वॉर्सा ही पोलंडची राजधानी आहे, तर क्रॅकोव्ह ही सांस्कृतिक राजधानी. क्रॅकोव्हपासून साधारण वीस कि. मी. अंतरावर असलेल्या वेलिक्सा (Weiliczka) येथील ‘सॉल्ट माइन’ म्हणजे पोलंडला मिळालेले नैसर्गिक वरदान आहे. या खाणीमध्ये कायम १४ ते १६ अंश सेल्सियस तापमान असल्याने स्वेटर चढवणे गरजेचे असते. खाणीतील ओलसरपणामुळे घसरायला होऊ नये म्हणून चांगली पकड असणारे बूट घालावे लागतात. आम्हाला चारशे फूट खोल जायचे होते. इलेक्ट्रिक दिव्यांनी उजळलेल्या ३८० मजबूत लाकडी पायऱ्या उतरून  साधारण २०० फूटांचा पहिला टप्पा गाठला. तिथे आणि आत खाणीत त्याकाळच्या कामगारांनी सॉल्ट रॉकमध्ये बांधलेली छोटी छोटी अनेक चॅपेल्स (येशूची मंदिरे)आहेत.

आम्ही लख्ख दिव्यांच्या प्रकाशात मजबूत लाकडी पायऱ्या उतरून खाणीत उतरलो. पण इ. स. १२५२ मध्ये या खाणीचा शोध लागला तेव्हा जिवावर उदार होऊन पोटासाठी कामगार या खोल अंधाऱ्या विवरात उतरत असत. मेणबत्त्यांच्या प्रकाशात शारीरिक कष्ट करताना केव्हा, काय कुठून कोसळेल, अन्नपाण्याविना खाणीत कधी अडकून पडावे लागेल, खाणीतील ज्वालाग्रही वायू कधी पेट घेतील याचा भरवसा नसे. माणसाच्या मनात मृत्यूविषयी आदिम भय असते. त्याचवेळी या अनंत अवकाशातला कुणीतरी ‘तो’ आपला पाठीराखा आहे, हा विश्वासही असतो. हे खाण कामगार एकमेकांना त्यांच्या भाषेत ‘shtench boes -yuh’- म्हणजे ‘गॉड बी विथ यू’ असे म्हणत. आणि पायऱ्या उतरायला सुरुवात केल्यावर मी तरी वेगळं काय केलं होतं?

शास्त्रज्ञांच्या मते, साधारण दोन कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटातील घडामोडींमुळे इथल्या समुद्राची वाफ होऊन ती वरच्या दिशेला रेटली गेली. कालांतराने सगळ्या समुद्राचे मिठाच्या खडकांमध्ये रूपांतर झाले. अनेक ठिकाणी मिठाचे स्फटिकासारखे शुभ्र, नैसर्गिक क्रिस्टल्स तयार झाले. सॉल्ट रॉक्स खोदल्यामुळे इथे मोठय़ा चौकोनी गुंफेसदृश अनेक खोल्या तयार झाल्या आहेत. आता तिथे कामगारांची जुन्या काळातील हत्यारे ठेवली आहेत. लोखंडी रुळांवरील ढकलगाडी आणि घोडय़ांचे तबेलेही आहेत. घोडय़ांची काळजी घेणारे कामगार नेमलेले होते. फोडलेले सॉल्ट रॉक्स रुळावरील ढकलगाडीपर्यंत आणण्याचे काम घोडे करीत. आपल्याकडच्या रहाटासारखा एक आडवा रहाट तिथे होता. घाण्यासारखा हा रहाट फिरवून मिठाचे खडक फोडले जात. एका मोठय़ा गुंफेसमोर काळोख करून गाइडने लेसर किरणांच्या साहाय्याने पूर्वी ज्वालाग्रही वायू कसे पेट घेत याचे प्रात्यक्षिक दाखवले.

काही ठिकाणी खाणीची खोली चार-पाच मजल्यांएवढी होती. दुसऱ्या टप्प्यावर- म्हणजे साधारण ३६० फूट खाली आलो आणि गाइडने चक्क वीस मिनिटांची विश्रांती जाहीर केली आणि इथे रेस्ट-रूम्स (टॉयलेट्स) आहेत अशी आनंदाची बातमीही दिली. मोकळे होऊन तिथल्या स्नॅकबार्स आणि सोव्हिनिअर्स काऊंटर्सना भेट दिली. रुंद, मोकळ्या पायऱ्यांवरून या दुसऱ्या टप्प्यावर उतरत असतानाच समोरच्या खूप मोठय़ा दगडी हॉलमध्ये अनेक झुंबरं उजळलेली दिसली. गाइड म्हणाली, की ही सारी झुंबरं कामगारांनी मिठाच्या स्फटिकांपासून बनवलेली आहेत. या दगडी हॉलच्या भिंतींमध्ये सॉल्ट रॉक्स कोरून कामगारांनी येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील अनेक प्रसंग साकारले आहेत. त्यांचा रेखीवपणा व चेहऱ्यावरील भाव अप्रतिम आहेत. या निरनिराळ्या आकार-प्रकारांच्या स्फटिक झुंबरांमध्ये पूर्वी मेणबत्त्या लावल्या जात. आता छोटे छोटे पांढरे दिवे लावलेले होते.

आज जरी मीठ सहजी उपलब्ध असलं तरी त्याकाळी मीठ हा एक मौल्यवान पदार्थ होता. सबंध युरोपला मांस टिकवण्यासाठी मिठाची अत्यंत गरज होती. रोमन शिपायांना मिठाच्या स्वरूपात पगार दिला जात असे. ‘सॅलरी’ हा शब्द लॅटिन ‘salarium- सॉल्टी वेजेस’ अशा अर्थाने उपयोगात आणत. या खाणीचा शोध लागल्यावर पोलंडच्या राजाच्या खजिन्यात घसघशीत भर पडली. राजघराण्यातील एक राणी उदारमतवादी आणि दयाळू होती. तिने खाणीतील कामगारांसाठी विविध सोयी आणि सुरक्षेसाठी अनेक उपाय योजले. त्यांचे जीवनमान उंचावले. कामगारांची या राणीवर भक्ती जडली. पुढे संतपदी पोहोचलेल्या या राणीचे ‘सेंट किंगा’ असे नामाभिधान झाले. खाणीच्या दुसऱ्या टप्प्यावर- म्हणजे जमिनीखाली साधारण ३५० फुटांवर सेंट किंगाचे अप्रतिम चॅपेल आहे. एका मोठय़ा चौकोनी सॉल्ट रॉकच्या गुंफेसारख्या जागेत येशू ख्रिस्ताची क्रुसावरील मूर्ती, सेंट किंगा आणि प्रार्थना करणारे भाविक सॉल्ट रॉकमध्ये कोरले आहेत. प्रवेशद्वारीही दोन्ही बाजूला खांबांची ओळ, पुढय़ात एक लांब-रुंद कोरीव पेटी व अल्टार (फुले, फळे, मेणबत्त्या ठेवण्याची जागा) आहे. छताला टांगलेले सॉल्ट क्रिस्टलचे झुंबर सौंदर्यपूर्ण आहे. खाणकामगारांच्या अंतरंगात दडलेले कलावंताचे मन आणि त्यांची कारागिरी पाहून आपण थक्क होतो. आजही दर रविवारी इथे सामुदायिक प्रार्थना होते.

खाणीची एकूण खोली ३२७ मीटर- म्हणजे साधारण ११०० फूट आहे. प्रवाशांना फक्त तिसऱ्या टप्प्यापर्यंत- म्हणजे ४०० फुटांपर्यंतच जाता येते. आत ३०० कि. मी.चे बोगदे आहेत. आता हे बोगदे खारटपणा शोषून घेऊ शकणाऱ्या मोठमोठय़ा लाकडी ओंडक्यांनी मजबूत, सुरक्षित केले गेले आहेत. इथल्या ओलसर, पाझरणाऱ्या खडकांच्या भिंतीवरील खारट पाण्याची चव आपण घेऊ शकतो. खडकांवरून ओघळणारे पाणी एका तलावसदृश खोलगट ठिकाणी जमा होते. लिटरमध्ये ३०० ग्रॅम मिठाची क्षारता या पाण्यात आहे. १९९६ पासून या खाणीतील मिठाचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. फक्त औषधी उपयोगासाठीच मिठाचे थोडेसे उत्पादन घेण्यात येते.

तिसऱ्या टप्प्यावर- म्हणजे चारशे फुटांवर एक सुसज्ज रेस्टॉरंट आहे. देशोदेशींचे पर्यटक इथे खानपानाचा आनंद घेत होते. याच टप्प्यावर एक संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये प्रसिद्ध पोलिश चित्रकारांची पेंटिग्ज, लखलखते सॉल्ट क्रिस्टल्स आणि त्यांच्यापासून बनवलेल्या कलाकृती ठेवल्या आहेत. पृथ्वीच्या पोटातील हे अनोखे विश्व पाहण्यासाठी आणि सेंट किंगाचे भूमिगत चॅपेल बघण्यासाठी दरवर्षी इथे साधारणपणे बारा ते चौदा लाख लोक येत असतात. त्यामुळे आजही या खाणीमुळे पोलंडच्या खजिन्यात भर पडत आहे.

क्रॅकोव्हमध्ये संध्याकाळच्या जेवणासाठी आम्हाला एका भारतीय पंजाबी हॉटेलमध्ये नेण्यात आले. तिथे रस्त्यावर पांढराशुभ्र मांडव घालून तीन दिवसांचा भारतीय खाद्यमहोत्सव सुरू होता. परदेशी प्रवाशांची आणि पोलंडवासीयांची भरपूर गर्दी तिथे होती. पावभाजी, पाणीपुरी, डोसा, भेळचे स्टॉल्स लावलेले होते. एका परदेशी चमूच्या टेबलवर एकजण डिशमधून पाणीपुरी घेऊन आली. काटय़ा-चमच्याने पुरी फोडल्यावर साहजिकच त्यातले पाणी बाहेर आले. मी पुढे होऊन तिला पाणीपुरी तोंडात अख्खी कशी टाकायची ते दाखवलं. त्यांच्या टेबलावरील हास्याच्या फवाऱ्यात तिने अख्खी पाणीपुरी तोंडात टाकली आणि नंतर लगेच टेबलावरील वाइनचा घोट घेतला. ‘पाणीपुरी विथ वाइन’ हा अफलातून प्रकार बघायला मिळाला!

पोलंडच्या हृदयात एक भळभळती जखम आहे. क्रॅकोव्हपासून साधारण साठ कि. मी. अंतरावरील आउश्वित्झ इथे जर्मन नाझींनी छळछावणी उभारली होती. जी छळछावणी बघू नये, त्याविषयी बोलू नये, लिहू नये असं वाटावं अशी एक अमानुष, पण ऐतिहासिक सत्य घटना! युरोपातील सर्वाधिक ज्यू क्रॅकोव्हमध्ये वास्तव्य करून होते. व्यापारी असलेल्या ज्यूंची आलिशान घरं उंची कपडे, दागदागिने आणि अमूल्य कलाकुसरीच्या वस्तूंनी भरलेली होती. स्थानिक लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर जर्मन आक्रमकांनी पोलंडचा घास घेतला. ज्यूंवर त्यांची वक्रदृष्टी होतीच. आपापली घरं सोडायला लावून अगदी जुजबी वस्तूंसह त्यांची रवानगी घेट्टोमध्ये करण्यात आली. ज्यांनी प्रतिकार केला त्यांना ठार मारण्यात आले. नंतर घेट्टोमधील ज्यूंना गुरांसारखं रेल्वेगाडय़ांत कोंबून आउश्वित्झच्या छळछावणीत नेण्यात आलं. युरोपातील ज्यू तसेच हंगेरी, रशिया, पोलंडमधील विद्वान, उच्चभ्रूंना इथे आणण्यात आलं. लहान मुलं आणि वृद्धांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. स्त्रियांना वेगळं करण्यात आलं आणि धडधाकट माणसांचा अनन्वित छळ सुरू झाला.

गाइडबरोबर आउश्वित्झची छळछावणी बघायला जाताना मनात अपराधीपणाची भावना दाटून आली होती. काटेरी तारांचं छळछावणीचं कुंपण दाखवून गाइडने सांगितलं की, त्यावेळी या कुंपणावर विजेच्या उघडय़ा तारा होत्या. एकदा आत ढकलल्यावर मृत्यूशिवाय दुसरा मार्ग नव्हता. एका हॉलमध्ये लहान मुलांचे असंख्य कपडे, बूट, हॅट्स होत्या. ज्यूंनी घरदार सोडताना बरोबर घेतलेल्या जेवणाच्या डिश, सुऱ्या, काटे-चमचे, शेव्हिंग किट्स अशा वस्तू काचेच्या कपाटांतून ठेवल्या होत्या. एका मोठय़ा काचेच्या पेटीत केसांचा ढीग होता. सोनेरी, चॉकलेटी, पिवळट, पांढरट रंगाच्या केसांचा तो सात टनांचा ढीग अंगावर शहारे आणत होता. गॅस चेम्बर्समध्ये जो विषारी वायू वापरण्यात आला होता, त्याचे हजारो रिकामे टिन्स तिथे होते. आंघोळ करण्यासाठी म्हणून अनेकांना एका खोलीत ढकलत आणि शॉवरऐवजी विषारी वायूने गुदमरवून मारून टाकत. प्रेतांना जाळण्यासाठी मोठमोठय़ा भट्टय़ा होत्या. त्यात फिरत्या पट्टय़ावरून प्रेत टाकण्याचं काम धडधाकट ज्यूंनाच करावं लागे. त्यांना दिवसाला एक पावाचा तुकडा दिला जात असे. उपासमार, मलेरिया यांत अनेकांचा बळी गेला. स्त्रियांचे अनन्वित हाल झाले. निर्बीजीकरण, खच्चीकरण यासाठी स्त्री-पुरुषांवर अमानवी प्रयोग करण्यात आले. हे सारं बघताना, तिथली चित्रं पाहताना मेंदू आणि मन बधिर होतं. द्वेषमूलक विकृत वर्णाभिमान, विकृत देशाभिमान यातून हे सामुदायिक शिरकाण केलं गेलं होतं. या घटनेवर अनेक पुस्तके लिहिली गेली. माहितीपट, सिनेमे झाले. स्टीव्हन स्पिलबर्ग यांचा ‘शिंडलर्स लिस्ट’ अनेकांनी पाहिला असेल. सात लाख ज्यू आणि इतर हजारो लोकांचा बळी घेणारी ही छळछावणी म्हणजे मानवी इतिहासावरील काळंकुट्ट लांच्छन आहे. माणसं माणसांशी अशी का वागत असतील? आजही ही हिंस्र वृत्ती वेगवेगळ्या रूपांमध्ये का दिसावी? अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांचा कल्लोळ मनात घेऊन तिथून बाहेर पडलो.

पुष्पा जोशी pushpajoshi56@gmail.com

First Published on November 19, 2017 2:35 am

Web Title: wieliczka salt mine in poland