मंदिराच्या गाभाऱ्यात अथवा त्या चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश हवा या मागणीत कोणती धर्मसुधारणा आहे? ज्या कर्मकांडातून सुटका व्हावी म्हणून फुले-आगरकरांनी जिवाचं रान केलं, देवस्थानात स्त्रीला जागा नाही असं पुरुषाच्या तोंडून वदवणारा देवच नाकारला आणि अर्थशून्य रूढींच्या शृंखलातून समाजाला मुक्त करण्यासाठी आयुष्य घालवलं, त्या देवस्थानात प्रवेश मिळावा म्हणून या बाया बंड उभारतात हा नुकतं कुठं उजाडत असताना परत अंधाराकडेच चाललेला प्रवास नव्हे काय?
स्त्रियांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश न देण्याची चारशे वर्षांची एक अनिष्ट परंपरा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खंडित झाली आणि स्त्रियांना आजवर नाकारला गेलेला गाभाराप्रवेशाचा हक्क एकदाचा प्राप्त झाला! शनी चौथरा लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन सर्वासाठी खुला झाला. नारीशक्तीचा विजय झाला! महिलांच्या हस्ते महाआरती झाली आणि हा एक गड जिंकल्यानंतर आता त्र्यंबकेश्वर व महालक्ष्मी मंदिराचे गडही सर करायलाच हवेत यासाठी हिरिरीनं स्त्रियांच्या सेनेनं आगेकूच करण्याचा विचार बोलून दाखवला.
हे सगळं विविध वृत्तवाहिन्यांवर पाहताना गाभाराप्रवेशाच्या हक्कासारख्या एका तद्दन फालतू गोष्टीसाठी स्त्रिया आपली ऊर्जा वाया का घालवत आहेत, हा प्रश्न अर्थातच अनेकांना पडला असणार. हा विजय प्रतीकात्मक आहे वगरेसारखी उत्तरं, अशा निर्थक आंदोलनाचं समर्थन अजिबातच करू शकत नाहीत. आपलं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी अधूनमधून असं काहीतरी करावं लागतं असं या स्त्रियांचं त्यावर उत्तर असेल तर ते मात्र मान्य होण्यासारखं आहे. स्त्रियांच्या विजया (?)वरची माझी ही प्रतिक्रिया या स्त्रियांच्या लेखी मोठा अपराध आहे आणि स्त्री-पुरुष समानतेच्या गाभ्याशी न भिडता वरवरची समानता मिळवण्यासाठी धडपडत चच्रेत राहणाऱ्या, असं काही केलं नाही तर आपलं अस्तित्व टिकणार कसं, अशा चिंतेनं ग्रासलेल्या ‘लढाऊ’ वगरे बाण्याच्या या स्त्रिया माझ्या या अपराधासाठी साहजिकच माझी संभावना ‘पुरुषधार्जणिी’ म्हणून करतील, याचीही मला कल्पना आहे. पण अशा उथळ आंदोलनांनी स्त्री-पुरुष समानतेच्या प्रश्नासाठी आयुष्यभर गंभीरपणे लढणाऱ्या चळवळींची मात्र निश्चितच हानी होते आहे, हे समोर येणं आवश्यक आहे. कारण ती चिंतेची बाब आहे.
गाभाराप्रवेशाचा हक्क मिळणं हा मुळात स्त्रियांचा विजय आहे का? कोर्टानं दिलेल्या निर्णयाबरोबरच शनिशिंगणापूरचे ग्रामस्थ, विश्वस्त आणि देवस्थान बचाव समिती यांच्यातले परस्परांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्नही स्त्रियांना हा हक्क मिळवून देण्यात मदत करणारे ठरले. अर्थात परस्परांवर कुरघोडी करण्यात स्त्रिया तरी कुठे कमी पडल्या? भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई विरुद्ध भूमाता महिला संघटनेच्या पुष्पक केवडकर या दोन गटांनी गाभाऱ्यात प्रथम प्रवेश करण्याची चढाओढ करत श्रेयासाठी ज्या लटपटी केल्या, त्यातून कुठल्याही गोष्टीचं राजकारण करण्यात आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यात आपण पुरुषाच्या अगदी खांद्याला खांदा लावून उभ्या राहू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं. समता समता म्हणतात ती हीच असावी का?
म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की, स्त्रियांना प्राप्त झालेल्या या तथाकथित विजयानं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. उदा. हा हक्क नव्हता म्हणून आजवर स्त्रिया आयुष्यातल्या कोणत्या मोठय़ा संधीपासून वंचित राहिल्या होत्या? आणि आता हा हक्क मिळाल्यावर त्यांच्या आयुष्याला कोणती सोनेरी किनार प्राप्त झाली? गाभाऱ्यात प्रवेश मिळवणं हा प्रश्न स्त्रियांना इतका इभ्रतीचा आणि अटीतटीचा का वाटतो? त्यापेक्षाही अधिक महत्त्वाच्या आणि व्यक्ती म्हणून आपली अस्मिता, आपला आत्मसन्मान जपणाऱ्या, जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला अजूनही मिळवायच्या आहेत आणि त्यासाठीचा लढा तीव्र करण्याची आवश्यकता आहे असं त्यांना वाटत नाही का?
दुसरा मुद्दा असा, की धर्म आणि देवकल्पनेचा संबंध काय आहे? स्त्रियांना मिळालेला हा विजय धर्मसुधारणेचा भाग म्हणता येईल का?
उच्चवर्ण वगळता हिंदू धर्मशास्त्रानं अन्य साऱ्या समाजघटकांवर अन्यायच केला आणि त्यासाठी या धर्माचा करावा तितका धिक्कार थोडाच ठरेल. स्त्रीची दुय्यमता या धर्मशास्त्रांनी वारंवार अधोरेखित केली. सती प्रथा, वैधव्यानंतरचं केशवपन, विधवेला पुनर्वविाहाचा अधिकार नसणं, तिचं अस्तित्वच अशुभ, स्त्री कधीही कुटुंबप्रमुख होऊ शकत नाही, स्त्री म्हणजे केवळ उपयोगाची आणि उपभोगाची वस्तू, स्त्री खोटारडी, दुर्भाग्याचे दुसरे रूप, दारू वा द्युत यांसारखे एक वाईट व्यसन, उष्टे-खरकटे तिला द्यावे, सर्व गुणांनी युक्त अशी स्त्रीसुद्धा अधमातील अधम पुरुषापेक्षा नीच होय.. अशी विधानं करणारी सारी हिंदू धर्मशास्त्रं जाळून टाकण्याच्याच पात्रतेची होती. अशा वेळी धर्मशास्त्रांनी तयार केलेल्या समाजमनाच्या या धारणा बदलणं हा धर्मसुधारणेचा अर्थ ठरतो. धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या ज्या ज्या गोष्टींमुळे स्त्रियांना माणूस म्हणून जगणं कठीण करून ठेवलं, त्या त्या गोष्टी धर्मशास्त्रातून हद्दपार करणं ही धर्मसुधारणा ठरते. फुले-आगरकर-कर्वे-आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांनी समाजिनदेची पर्वा न करता केल्या, त्या धर्मसुधारणा! अशा धर्मसुधारणा करताना स्वत: केवळ निंदेचे धनी होत या सुधारकांनी स्त्रीला जगण्याचं केवढंतरी मोठं बळ दिलं.
पण मंदिराच्या गाभाऱ्यात अथवा त्या चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश हवा या मागणीत कोणती धर्मसुधारणा आहे? ज्या कर्मकांडातून सुटका व्हावी म्हणून फुले-आगरकरांनी जिवाचं रान केलं, देवस्थानात स्त्रीला जागा नाही असं पुरुषाच्या तोंडून वदवणारा देवच नाकारला आणि अर्थशून्य रूढींच्या शृंखलातून समाजाला मुक्त करण्यासाठी आयुष्य घालवलं त्या देवस्थानात प्रवेश मिळावा म्हणून या बाया बंड उभारतात हा नुकतं कुठं उजाडत असताना परत अंधाराकडेच चाललेला प्रवास नव्हे काय?
गाभाराप्रवेशाचा हक्क मिळवण्यानं आपलं कोणतं वैचारिक पुरोगामित्व सिद्ध झालं असं या स्त्रियांना वाटतं? या विजयोत्सवाच्या काळात एका टी.व्ही.वाहिनीवर उजव्या हाताला डावा हात लावून दुधाचा.. पाण्याचा की तेलाचा.. कसला तरी अभिषेक देवाच्या मूर्तीवर करणाऱ्या तृप्ती देसाईंचं दर्शन घडलं. देवाला कसला आणि कशानं अभिषेक करायचा, नवेद्य काय ठेवायचा, त्यानं कुणाला दर्शन द्यायचं आणि कुणाला नाही हे पुरुषांनी लिहिलेल्या धर्मशास्त्रांत नमूद केलेलं आहे. शतकानुशतकं असा पुरुषाच्या मर्जीच्या अधीन असलेला देव आपलं काय भलं करणार? हा प्रश्न तरी स्त्रियांना पडायला हवा. पण हा प्रश्न तर त्यांना पडत नाहीच, उलट हक्कप्राप्तीचा विजयोत्सव त्या साजरा करतात. अनावश्यक अशा देवपूजेच्या अवडंबरांना पुरुषाच्या बरोबरीनं हातभार लावत गतानुगतिकतेच्या रस्त्यानंच परत प्रवास सुरू करून त्या काय साध्य करणार आहेत, हा म्हणूनच हतबल करणारा प्रश्न ठरतो आहे.
बरं, आता अभिषेकाचा, चौथऱ्यावर जाण्याचा अधिकार स्त्रियांना मिळाला आहे तर रोज त्या चौथऱ्यावर जाणार आहेत? की फक्त हक्कासाठी हक्क हवा? स्त्रियांसाठी प्रत्येक दार उघडं असलंच पाहिजे हे मान्य, पण ज्या उघडय़ा दाराचा आपल्या विकासाला कोणताही हातभार लागणार नाही ते दार उघडं असलं काय आणि बंद असलं काय! म्हणूनच आपण जो हक्क मिळवला तो अर्थशून्य असून, वेळेचा अपव्ययच करणारा आहे असं त्यांना वाटत नाही का? उलट देवपूजेचा अधिकार, गाभाराप्रवेश या अत्यंत निर्थक गोष्टी असून हे अधिकार आम्हाला कोणी देऊ केले तरी नकोत, ते तुमचे तुम्हालाच लखलाभ होवोत, शनिशिंगणापूरचा चौथरा ही कोणताही पराक्रम गाजवायची जागा नव्हे, असं सणसणीत उत्तर या स्त्रिया पुरुषांना का देत नाहीत? एकीकडे हळदी-कुंकू, वटसावित्रीची पूजा यांसारख्या पुरुषी अस्मितेला जोपासणाऱ्या प्रथा मोडून काढल्या पाहिजेत असं म्हणायचं आणि दुसरीकडे गाभाराप्रवेश आणि अभिषेकाचा हक्क यासाठी आंदोलनं करायची! केवळ पुरुषासारखं वागण्याच्या हट्टातूनच अशा विसंगतीपूर्ण कृती करून स्त्रिया आपलं हसं करून घेत आहेत.
आणि म्हणूनच चुकीच्या ठिकाणी स्त्री-पुरुष समानतेची लढाई खेळत मिळवलेल्या या अर्थशून्य विजयाकडे आपण उगीचच भावनिक होऊन पाहणार आहोत की अंतर्मुख होऊन विवेकवादी दृष्टिकोनातून पाहणार आहोत, हे स्त्रियांनी एकदा ठरवायलाच हवं.
पुरुष करतो ते सारं आम्हाला करायला मिळायलाच हवं असं म्हणणं म्हणजे पुरुषाला मोठं करणं, त्याला आदर्श मानणं! म्हणजे एका अर्थानं पुरुषाला उंच स्थानावर स्त्रियाच तर नेऊन बसवत नाहीत? तो करतो ते काहीतरी फार महत्त्वाचं आहे आणि ते आम्हाला करायला मिळालं नाही तर आम्ही दुय्यम ठरू, हे भय समतेच्या या विचित्र हट्टामागे आहे. तो करतो ते आम्ही करण्यानंच त्याची आणि आमची बरोबरी सिद्ध होणार हा केवळ अविचार आहे.
पुरुष करतो ती प्रत्येक गोष्ट स्त्रीलाही करायला मिळाली पाहिजे हाच स्त्री-पुरुष समानतेचा अर्थ आहे ही स्त्रियांची धारणाही पुरुषप्रधानव्यवस्थेचाच परिपाक आहे. आणि ही धारणाच आता तिच्यासाठी बेडी बनते आहे. व्यक्तिमत्व विकासाच्या ज्या ज्या संधी पुरुषाला मिळतात त्यातली एकही संधी मला ‘बाई’ म्हणून नाकारली जाता नये, याबाबत मात्र स्त्रीनं आग्रही असलंच पाहिजे. लिंगभेदावर आधारित असलेल्या विषमतेला निग्रहानं नकार दिलाच पाहिजे. पण आजही कौटुंबिक पातळीवर स्त्री-पुरुष विषमता मान्य करत मुकाटय़ानं जगणाऱ्या किती स्त्रिया दिसतात. आजही कौटुंबिक हिंसाचाराला किती स्त्रिया सामोऱ्या जातात. किती सुशिक्षित घरातून आजही स्त्रीभ्रूणहत्या केली जाते. बलात्कार करून किती मुली आजही मारून टाकल्या जातात. आपण या अन्यायाच्या विरोधात संघटित व्हायचं की मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश हवा म्हणून तडफडायचं? असले वरवरचे विजय मिळवण्यात धन्यता मानण्याचा नाद आता स्त्रियांनी सोडून दिला पाहिजे.
दुसरी गोष्ट अशी की, देवाच्या दर्शनापासून कुणालाही लिंगभेदावर रोखता येणार नाही हे खरं असलं; तरी देव फक्त मूर्तीत आहे या वेडेपणातूनही स्त्रियांनी बाहेर येण्याची आवश्यकता आहे. देव आहे असं मानायचं असलंच तर शनिशिंगणापूरच्या चौथऱ्याच्या आतच तो आहे आणि चौथऱ्याबाहेर नाही हा तर मोठा विनोद झाला! तर्कशुद्धतेपासून स्त्रिया इतकी फारकत घेणार असतील तर फुले-कर्वे-आगरकरांचे प्रयत्न व्यर्थच गेले असं म्हणावं लागेल.
जाता जाता- शनिशिंगणापूरला प्राप्त झालेल्या या विजयाबद्दल एका वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया देताना विद्या बाळ म्हणाल्या, ‘फळ मिळालं, पण तोंड कडूच राहिलं.’ विद्याताईंविषयी पूर्ण आदर राखून, पण काहीशा दु:खी मनानं मी त्यावर इतकंच म्हणेन, ‘विद्याताई, हे फळ बेचवच असणार होतं. त्याच्या प्राप्तीसाठी मुळात इतका अट्टहासच का केला?’
डॉ. मंगला आठलेकर -mangalaathlekar@gmail.com