प्रवीण दशरथ बांदेकर

कवयित्री, कादंबरीकार आणि सामाजिक कार्यकर्त्यां कविता महाजन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या समकालीन कवी, कादंबरीकार सुह्रदाने रेखाटलेले त्यांचे शब्दचित्र..

raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

कविता महाजन आता आपल्यात नाही. जेमतेम चार-सहा दिवसांचं तिचं आजारपण आणि त्यातच ती गेली. हो, ती गेली! आता आपण काहीही लिहिलं, कसंही लिहिलं तरी ते वाचायला, कान उपटायला वा तारीफ करायला यापुढे ती नसेल. आपल्याला छळणाऱ्या, त्रासदायक ठरणाऱ्या छोटय़ामोठय़ा असंख्य गोष्टी, अगदी रात्री-अपरात्रीसुद्धा कधीही जिच्यापाशी हक्कानं सांगता येत होत्या अशी आपल्याला आपल्या सगळ्या गुण-दोषांसहित समजून घेणारी एक मैत्रीण गेली. कविता महाजन नावाची एक प्रचंड ऊर्जा असलेली समकालातील दमदार लेखिका गेली. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातल्या पुरुषी आणि सरंजामी मानसिकतेच्या विरोधात उच्चरवात ब्र उच्चारण्याची हिंमत दाखवणारी कणखर कार्यकर्ती गेली.

कविता महाजन खरोखरच आता कायमसाठी आपल्यातून निघून गेली आहे, हे असं पुन:पुन्हा मनाला बजावावं लागत आहे. आठवडा उलटून गेला, तरीही हे धक्कादायक सत्य स्वीकारायची मनाची तयारी होत नाहीये. सतत वाटत राहतं, कोणत्याही क्षणी तिची एखादी नोंद फेसबुकवर दिसेल. सोबतीची खात्री देत राहील. कविताच्या लिखाणाइतकीच तिच्या व्यक्तिमत्त्वाची एक लढाऊ  बाजू होती जी तिला तिच्या समकालीन कवी-लेखकांपासून वेगळी ठरवणारी होती.

शोषित, वंचित, अन्यायग्रस्तांच्या कळवळ्यापोटी तळमळीनं लिहिणारे अनेक लेखक आजूबाजूला आहेत. पण वेळ येताच आपली लेखकपणाची झूल उतरवून अन्यायग्रस्तांच्या बाजूने कार्यकर्ता बनून रस्त्यावर उतरण्याचं, सत्ता, प्रशासन आणि व्यवस्थेला अंगावर घेण्याचं धाडस दाखवणारे समकाळात फारच कमी लोक आहेत. या मोजक्याच लेखकांपैकी कविता एक होती. मराठी लेखकांत अभावानेच आढळणारी तिच्या व्यक्तिमत्त्वाची ही बाजू तिला दुर्गाबाई भागवतांसारख्या बंडखोर मराठी विदुषी लेखिकेशी जोडून घेणारी होती, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कविताच्या या दुर्मीळ गुणामुळे वेगळ्या वाटेवरून चालू पाहणाऱ्या, भाषा, आशय, जाणिवा-संवेदना यांच्या पारंपरिक चाकोरीला धक्का देणारं लिहू पाहणाऱ्या नव्या लेखक-कवींना आपली बाजू घेऊन भांडणारं कुणी तरी सोबत आहे, याचा एक दिलासा वाटत असे. कविता गेल्यानंतर फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप वगैरे समाजमाध्यमांमधून तिच्याविषयीच्या आपल्या भावना, आठवणी यांना उजाळा देणाऱ्या नोंदींचा अक्षरश: पाऊस पडला होता. त्यात अशा नव्या लिहित्या तरुण-तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. तिच्या जाण्यानं अनेकांना आपलं माहेर संपल्याची जाणीव व्हावी यातच सगळं काही आलं.

कविताच्या अकस्मात जाण्याची वार्ता कळल्यापासून प्रतिक्रिया देण्यासाठी, तिच्यावर लिहिण्याविषयी अनेकांनी विचारणा केली. पण तिच्यावर आपल्याला काही श्रद्धांजलीदाखल लिहावं लागतंय ही कल्पनाही असह्य़ वाटत होती. काय लिहायचं? किती आणि कुठच्या गोष्टी सांगायच्या? तिच्या कवितेविषयी बोलायचं, की कादंबरीविषयी? अनुवादाविषयी की संपादनांविषयी? चित्रांविषयी, की फेसबुक आणि ब्लॉग्ज्मधल्या अखंड लिहिण्याविषयी? बालसाहित्याविषयी, ललित लेखांविषयी, लोकसाहित्याच्या अभ्यासाविषयी, की तिच्या सामाजिक जाणिवांविषयी? काय बोलावं, किती बोलावं? विचार करताना गोंधळ वाढत जावा नि आता काहीच बोलू नये, नुसतंच निमूट उरावं असं काही तरी वाटत राहिलं होतं. साहित्यातले इतके विविध प्रकार आपल्या व्यक्तिमत्त्व आणि लेखकीय भूमिकेशी कसलीही तडजोड न करता सारख्याच ताकदीनं हाताळणारी, जगण्याला इतके आयाम असलेली लेखिका आजच्या काळात दुसरी दिसून येत नाही. तिच्या लेखनातून जाणवणारी वैशिष्टय़े, तिचं जगणं आणि तिचं लिहिणं यात दिसून येणारी समतानता, तिच्या व्यक्तिगत जीवनातले संघर्ष, तिने अंगावर ओढवून घेतलेले वाद आणि त्यातूनही दिसून येणारं तिचं स्वाभिमानी, कणखर व खंबीर व्यक्तिमत्त्व.. या साऱ्या पैलूंचा धावता धांडोळा घ्यायचा म्हटला तरी दमछाक होऊ  शकते.

साधारणत: लिहिणाऱ्या बहुतेक लोकांची होते तशी कविताच्या लेखनाची सुरुवातही नव्वदच्या दशकात कवितालेखनानेच झाली होती. नव्वदच्या दशकात मराठी कवितेत सामाजिक, आर्थिक बदलांच्या परिणामांमुळे, त्यातून व्यक्तीच्या आणि समूहाच्या जीवनात निर्माण झालेल्या कल्लोळ आणि गोंधळामुळे मूलभूत परिवर्तन घडू लागले होते. या नव्वदोत्तर कवितेत महानगरीय संवेदना, ग्रामीण, दलित आणि स्त्रीवादी जीवनजाणिवांमध्ये होऊ लागलेले बदल, मूल्यव्यूहांतील परिवर्तने यांसारखी काही वैशिष्टय़े ठळकपणे जाणवू लागली होती. कविता महाजनची कविताही याच बदलत्या काळाचा आवाज घेऊन आली होती. जागतिकीकरणामुळे भारतीय कुटुंबव्यवस्थेतील स्त्री-पुरुषसंबंधांच्या पारंपरिक दृष्टिकोनात होऊ लागलेले मूल्यात्मक बदल, नात्यांची पडझड, पुरुषी मानसिकतेतून केल्या जाणाऱ्या स्त्रीच्या गुलामी आणि वस्तुकरणाविरोधातील बंडखोरीचा सूर.. अशा अनेक आशयसूत्रांना आधुनिक जगण्याशी निगडित असलेल्या तितक्याच नावीन्यपूर्ण प्रतिमांच्या भाषेतून तिनं कवितेतून आपलेसे केले होते. तरीही ही कविता बव्हंशी नव्वदोत्तर कवितेप्रमाणे कवितापण हरवून बसल्यासारखी वाटणारी, गद्यप्राय, आक्रस्ताळी, कंठाळी अशा स्वरूपाची बिलकूल नव्हती. तिनं विशुद्ध भावकवितेचे वैशिष्टय़ मानली जाणारी अंतर्गत लय, भारतीय मध्यमवर्गीय स्त्रीच्या भावविश्वाशी संबंधित बोलभाषा, शब्दकळा, लोकभाषेच्या लयी, काव्यात्म अनुभवाचे आंतरिकीकरण आणि परंपरेचं बोट न सोडता पुढे जाणं असं आपलं म्हणून असलेलं एक वैशिष्टय़ जपलं होतं. तिच्या खासगी जगण्यातील संघर्ष आणि ताणतणावांचं प्रतिबिंबही कळत-नकळतपणे तिच्या कवितांमधून पडलेलं जाणवत राहतं. कवितेकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनही एखाद्या खूप जवळच्या सखीशी विश्वासानं मनातलं सगळं मोकळेपणानं बोलावं तसा काहीसा होता. म्हणूनच तिच्या एका कवितेत ती म्हणते-

‘कवितेजवळ सांगता येतं इवलंसं गुपित,

कवितेच्या खांद्यावर ठेवता येतो

एक अस्फुट हुंदका

एक दुखरी कळ, एक निरागस हसू

पायात खुपलेला मत्सराचा काटा..

लेकरू आईजवळ असावं तसं

कवितेला लुचता झटता चावता येतं

लोळता येतं मांडीवर मनसोक्त मस्ती करत

रडता येतं कमरेला घट्ट मिठी मारून

पदर धरून तिच्या मागे मागे घरभर फिरता येतं’

कविता लिहिता लिहिताच कविता महाजन अधिक व्यापक अवकाश व्यापणाऱ्या अभिव्यक्तीची गरज म्हणून कादंबरीकडे वळली. कादंबरी लिहिणं आणि कविता लिहिणं या दोन्हींसाठी म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाववृत्तींची आवश्यकता असते. कवितेचं तोंड आपल्या आतल्या- व्यक्तिनिष्ठ काळोख्या जगाचा शोध घेण्याकडे वळलेलं असतं; तर कादंबरीचं तोंड समाजाकडे, बाह्य़वास्तवाकडे, समष्टीच्या शोधाकडे वळलेलं असतं. त्यामुळेच कविता आणि कादंबरी या दोन्ही परस्परविरोधी रूपाकाराच्या रचनांची निर्मिती एकाच वेळी तितक्याच सक्षमपणे करणं फारच कमी लोकांना जमतं. कित्येकदा उत्तम कवी असलेल्या अनेकांची कविता गद्यलेखनाने गिळंकृत करून टाकलेली दिसते. कविताच्या बाबतीत मात्र असं झालं नाही. तिच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वातले हे दोन्ही कप्पे – कवी असणं आणि कादंबरीकार असणं- तिनं स्वतंत्रपणे जपले, टिकवले आणि अखेपर्यंत यशस्वीपणे निभावून नेले. मराठी साहित्याला महत्त्वाचं योगदान देण्याच्या दृष्टीने तिच्यातील कवी अधिक मोठा ठरतो, की तिच्यातील कादंबरीकार कवीवर मात करतो, हे ठरवणं कठीण आहे. मात्र एक नक्की म्हणता येईल, की तिच्या चित्रांप्रमाणेच कविता लिहिणं ही बव्हंशी तिची स्वत:ची वैयक्तिक निकड होती. तर कादंबरीसह अन्य स्वरूपातील गद्यलेखन करणं ही तिची सामाजिक उत्तरदायित्व निभावणारी आणि काही वेळा व्यावसायिक म्हणता येईल अशी गरज होती. तरीही या दोन्ही भूमिका तिच्या व्यक्तिमत्त्वाला परस्परपूरक ठरणाऱ्या अशाच होत्या. त्या तिनं कसलाही विशेष आव न आणता कसोशीनं जपल्या.

‘ब्र’ या तिच्या पहिल्याच कादंबरीनं कविताला कादंबरीकार म्हणून स्वत:ची ओळख मिळवून दिली. या कादंबरीसाठी तिनं वैयक्तिक आयुष्यातील काही अनुभव वापरले असले, तरीही एक स्वतंत्र कादंबरी म्हणून तिचे स्थान कुठेही उणावत नाही. कादंबरीतील नायिकेचा स्वत:च्या आयुष्यातील आपलं एक स्त्री म्हणून आणि त्याहीपेक्षा एक माणूस म्हणून असलेलं अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेला संघर्ष आणि त्याला समांतर कादंबरीअंतर्गत असंख्य आदिवासी, ग्रामीण स्त्रियांचा आपलं सामाजिक स्थान निश्चित करण्यासाठी झगडणं अशा दुहेरी पातळीवर ही कादंबरी पुढे सरकते. यातील विविध व्यक्तिरेखा, चित्रात्मक निवेदन आणि संवादशैली, आवश्यकतेनुसार आलेली काव्यात्म वर्णने, आदिवासी जगण्यातील विविध तपशील आणि रिपोर्ताज निवेदनात्मक पद्धतीची केलेली सरमिसळ यामुळे ही कादंबरी वैशिष्टय़पूर्ण ठरली. जगण्याच्या संघर्षांत आपली मुळं उखडली जाण्याच्या भयानं पुरुषी मानसिकतेच्या विरोधात ब्रही उच्चारण्यास घाबरणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यां व मध्यमवर्गीय स्त्रियांना या कादंबरीने एक प्रकारचं मानसिक बळ दिलं असं म्हणता येईल. या कादंबरीच्या सुरुवातीला ‘दृष्टांतपाठ’मधील भींगरुटीएचा दृष्टांत कवितानं उद्धृत केला आहे, तो अत्यंत समर्पक असाच आहे. आपल्या घरात कोंडून ठेवलेल्या कीटकीला गांधीलमाशी सतत दंश करून हैराण करीत असते. ती आपल्याला खाणार या भीतीने, तिच्या सततच्या स्मरणाने कीटकीला पंख फुटतात आणि एकेदिवशी ती स्वत:च गांधीलमाशीचे रूप धारण करते. हा दृष्टांत कविताच्या व्यक्तिगत जीवनालाही लागू पडणारा आहे. विशेषत: ‘ब्र’ या कादंबरीच्या लेखनानंतर कवितानं कधी मागे वळून पाहिलं नाही. जणू तिचंही रूपांतर असंच एका कणखर आणि प्रखर आत्मभान आलेल्या गांधीलमाशीमध्ये झालं असं म्हणता येतं. सर्वसामान्य सरळ रेषेमधील पारंपरिक आयुष्य जगणाऱ्या स्त्रीला तिच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांनंतर आलेलं आत्मभान हा कविताच्या एकूणच लेखनाचा गाभा आहे असंच दिसून येईल. तिच्या एका कवितेतील निवेदिका म्हणते, ‘परवा आंघोळीनंतर राहून गेलं कपाळाला कुंकू लावणं, आठवतच नाहीये स्वयंपाक केलाय का नाही.. पायांना टाकता येत नाहीयेत पाऊल दुसऱ्यांच्या पावलावर, पाठीचा कणा विसरलाय वाकणं.. तल्लख झालाय मेंदू एकाएकी निखाऱ्यासारखा..’ पारंपरिक व्यवस्थेनं वर्षांनुवर्ष स्त्रीवर लादलेले अन्यायकारक संस्कार, जाचक रूढी नाकारून स्वाभिमानानं, ताठ कण्यानं आणि स्वत:चा मेंदू वापरून जगण्याचा निर्णय घेणाऱ्या व्यक्तिरेखा तिच्या कादंबऱ्यांमधूनही सतत भेटत राहतात.

‘ब्र’प्रमाणे कविताची ‘भिन्न’ ही कादंबरीही तिच्यातील आशयाचं नावीन्य आणि निवेदनाची भाषा, ठसठशीत व्यक्तिरेखा व त्यांची बिनधास्त भाषाशैली यांसारख्या वैशिष्टय़ांसाठी बहुचर्चित ठरली. या कादंबरीत हाताळण्यात आलेलं एड्सग्रस्त स्त्रियांचं भावविश्व मराठी साहित्याला अपरिचित होतं, तितकंच ते पारंपरिक मानसिकतेला धक्का देणारंही होतं. या असाध्य रोगाला बळी पडणाऱ्या स्त्रियांचा स्वत:चा दोष असो/नसो, समाजातून त्या आपसूकच बाजूला फेकल्या जातात. त्यांचं मानसिक, कौटुंबिक व सामाजिक जीवन उद्ध्वस्त होतं. तरीही एका क्षणी हे त्यांचं तुटलेपणच त्यांना लढण्याचं बळ देतं, कणखर बनवतं हे यातील विविध स्त्रीपात्रांच्या जीवनसंघर्षांच्या कहाण्यांमधून कवितानं मांडलं आहे.

‘कुहू’ या मराठीतील पहिल्या मल्टिमीडिया कादंबरीच्या प्रयोगानं कविताच्या जीवनात बऱ्याच उलथापालथी घडवून आणल्या. त्याविषयी खरं तर स्वतंत्रपणे लिहायला, बोलायला हवं आहे. तरीही चित्रं, दृक्श्राव्य परिणाम, मोठय़ांची व छोटय़ांची स्वतंत्र आवृत्ती अशा गोष्टी मराठी साहित्यासाठी अनोख्या ठरणाऱ्या अशाच होत्या. या कादंबरीतही कुहू या पक्ष्याच्या रूपकाच्या वापरामधून  कलावंताचं भागधेय, त्याचे संघर्ष आणि आयुष्यातील चढ-उतार मांडण्यात कविता यशस्वी ठरली आहे. कवितामधील चित्रकाराचे दर्शनही या कादंबरीमुळे घडू शकतं. ‘कुहू’प्रमाणे ‘ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम’ या मराठी अभिनेत्रीचं लौकिक आणि व्यावसायिक जीवन चित्रित करणाऱ्या कादंबरीकडेही वाचकांचं म्हणावं तितकं लक्ष गेलेलं नाही. यामागे कदाचित तिच्या आधीच्या कादंबऱ्यांमुळे निर्माण झालेली प्रतिमा ओलांडून पुढे जाण्यात कविताला आलेलं अपयश, लोकप्रिय कादंबरीच्या धाटणीनं केलेली लैंगिक वर्णनं व तत्सम फॅन्टसीज्चा अतिवापर यांसारखी काही कारणं असू शकतात. या कादंबरीत केलेला कादंबरीआतील कादंबरीसारखा निवेदनाचा प्रयोगही खरं तर या गोष्टींमुळे झाकोळला गेला. याशिवाय ‘ग्राफिटी वॉल’ हे ललित सदरलेखनाचं पुस्तक, बालवाङ्मय, अनुवाद यांमधूनही कवितानं आपला स्वतंत्र ठसा उमटवलेला दिसून येतो.

कवितानं विविध प्रकाशनांसाठी व स्वतंत्रपणे केलेली संपादनं हाही एक स्वतंत्रपणे चर्चेला घेण्याचा विषय म्हणावा लागेल. विविध भाषांमधील लेखिकांच्या स्त्रीविश्वासंदर्भातील कथांची संपादनं, विविध लेखकांच्या ग्रंथांची प्रकाशनपूर्व संपादनं यांमधून कविताची संपादकीय दृष्टी जाणवून येते. माझ्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीची काही प्रकरणं ‘मुक्त शब्द’च्या दिवाळी अंकात वाचल्यावर तिनं त्याविषयी उत्सुकता दाखवली होती. ‘चाळेगत’ ही माझी पहिली कादंबरी नीट संपादन संस्कारातून बाहेर यायला हवी होती, असं ती अनेकदा बोलून दाखवत असे. त्यामुळे या दुसऱ्या कादंबरीची संहिता तिनं सांगितल्यावर मी, डोळ्यांखालून घाल म्हणत तिच्याकडे पाठवली होती. महिन्याभरातच तिनं या कादंबरीची ओळन् ओळ बारकाईनं वाचून असंख्य बारीकबारीक सूचना केल्या होत्या. माझ्या लेखनाचा बाज हा कविताच्या लेखनापेक्षा पूर्णपणे वेगळा असल्यानं तिच्या संपादनाविषयी मी काहीसा साशंक होतो. परंतु या कादंबरीचं मर्म तिनं अचूक ओळखलं आहे हे तिनं केलेल्या सूचनांवरून लक्षात येत होतं. माझ्या या कादंबरीची मूळ संहिता, त्यावर कविताने पेन्सिलनं खुणा करून सुचवलेले बदल, काटछाट, मजकुराची फिरवाफिरव वगैरे करून अंतिमत: बदलेली संहिता याविषयी संपादनव्यवहारात रुची असलेल्या एखाद्या अभ्यासकाला तौलनिकदृष्टय़ा अनेक गोष्टी पाहता येतील.

पुरस्कारवापसीनंतरचा गदारोळ, चिपळूण संमेलन वा गोव्यातील काव्यहोत्र वगैरेंसंबंधीच्या माझ्या फेसबुकवरील नोंदीनंतरची काही वाक्युद्धं, गेल्या महिन्यात एका कट्टरतावादी संघटनेच्या ‘हिट लिस्ट’मध्ये माझं नाव आल्याचं समजल्यावर पुरवण्यात आलेली सुरक्षा अशा माझ्यातल्या लेखकाला काहीशा अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगांच्या वेळी बाकी कुणाच्याही आधी कविताचे धीर देणारे, मानसिक बळ वाढवणारे फोन आले होते, हेही विसरता येत नाही. एक-दोन निमित्तांनी ती सावंतवाडी वा गोव्यात आली असताना माझ्या घरी येऊन राहून गेली होती. सावंतवाडी हे माझं माहेर आहे, असं नेहमीच ती म्हणायची. एका भेटीत सावंतवाडीच्या प्रसिद्ध लाकडी खेळण्यांमधील ठकी ही बाहुली तिला खूप आवडली होती. ती निरखताना चटकन म्हणाली होती, ‘‘ही माझ्या पुढच्या कादंबरीची नायिका असेल. आणि समजा, मी मेले कादंबरी लिहायच्या आधी, तर तू ठेव तुझ्या नायिकेचं हे नाव!’’ आणि त्यावरचं तिचं ते खळखळून हसणं. सुदैवानं तिनं तिचं म्हणणं खरं करीत तिच्या पुढच्या कादंबरीच्या शीर्षकासाठी हे नाव वापरलं होतं.

खूप स्पष्टवक्ती, तितकीच प्रेमळ, बोलण्या-वागण्यातून शत्रू निर्माण करणारी, वाद ओढवून घेणारी आणि तरीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत असंख्य चाहते, मित्रमैत्रिणी (आणि तिच्याच मिश्कील शब्दांत सांगायचं तर छप्पन्न प्रियकरसुद्धा!) असलेली, कुणाही विषयी आकस, वैरभाव मनात न ठेवता बोलणारी कविता कधी नव्हे इतकी आज आणि यापुढच्या अधिकाधिक बिघडत जाणाऱ्या काळात हवी होती, हे यापुढे पावलोपावली जाणवत राहील. कविताच्याच शब्दांत म्हणायचं तर,

‘तरीही कविताच उरली आहे फक्त

रिकाम्या टेबलावर फडफडणाऱ्या

कागदावर गोंदलेली अक्षरं

त्यावर एक लहानसा नक्षीदार काचेचा

पेपरवेट ठेवलाय कुणी तरी

आठवणींचा..’

samwadpravin@gmail.com