‘यशवंत संस्कृती’ हा विलास फुटाणे संपादित लेखसंग्रह म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाचं तटस्थ निरीक्षण आहे. विविध क्षेत्रातील २५ मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचा यात समावेश असून, त्यातून यशवंतरावांच्या जीवन व कार्याचं अर्थाविष्करण झालेलं आहे. संग्रहातील सुरुवातीचे चार लेख हे महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचे आहेत. त्यात वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, मारोतराव कन्नमवार आणि शरद पवार यांचा समावेश आहे. तर उर्वरित लेख हे साहित्य, कला आदी क्षेत्रांतील व्यक्तींचे आहेत. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, के. जी. जोगळेकर, मोहन धारिया, एस. एम. जोशी, रणजीत देसाई, सरोजिनी बाबर, विठ्ठलराव गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, मा. पं. मंगुडकर, बाळ कोल्हटकर, आचार्य अत्रे, य. दि. फडके, वि. स. पागे, नरुभाई लिमये आदींचा समावेश आहे. या साऱ्या नावांवरून यशवंतरावांच्या स्नेहबंधाचं वर्तुळ हे किती विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेलं होतं याची जाणीव होते.

सर्वसाधारणपणे यशवंतरावांच्या कार्याचा गौरव करताना त्यातील काही मूलभूत गोष्टींचा उल्लेख होणे अगदी अपरिहार्यच असतो. त्या म्हणजे- महाराष्ट्र राज्याची निर्मिती, मुंबईसह महाराष्ट्राची भूमिका, जिल्हा परिषदांची निर्मिती आणि त्या अनुषंगाने सत्तेचे विकेंद्रीकरण करून लोकसहभागातून प्रशासन यंत्रणेला गती देणे, १९६२ चे चीन-भारत युद्ध, यशवंतरावांवर विश्वास टाकून पं. नेहरूंनी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवणे.. याविषयी या लेखांमधून माहिती येते. या माहितीशी अनेकजण परिचित असतील. मात्र यशवंतरावांच्या राजकीय कारकीर्दीच्या पलीकडे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील इतरही अनेक पलूंचे दर्शन या संग्रहातून होते.

वसंतदादा पाटील आणि वसंतराव नाईक यांनी यशवंतरावांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्यातील सोशीकता आणि चिकाटी या मूलभूत गुणांविषयी लिहिले आहे. विदर्भ-मराठवाडय़ातील जनतेला एकत्र बांधण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांविषयी कन्नमवारांनी लिहिले आहे. तर यशवंतरावांचा स्वच्छ कारभार, त्यांची धोरणे, संसदपटू म्हणून त्यांची कारकीर्द याविषयी शरद पवार यांनी लिहिले आहे. डाव्या विचारांत स्वतंत्र नवविचारप्रवाह निर्माण करणाऱ्या मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचारांचा यशवंतरावांवर प्रभाव होता. रॉय हे नवमानवतावादी होते. त्यांच्या विचार बठकांनाही यशवंतराव जात असत. पुढे पंडितजींचा सहवास त्यांना लाभला आणि त्यातून त्यांचे लोकशाही समाजवादी व्यक्तिमत्त्व घडत गेले. हे सारे शरद पवार यांच्या लेखात मांडले गेले आहे.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी यशवंतरावांच्या आयुष्यातील जवळपास सगळ्या महत्त्वाच्या घटनांचा धावता आढावा घेतला आहे. त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीपासून ते थेट १९४२ चे आंदोलन, १९४८-४९ चे िहदू-मुस्लीम दंगे, गांधीहत्या आणि त्यानंतरची नाजूक परिस्थिती, पहिली सार्वत्रिक निवडणूक, आधी द्विभाषिक राज्य व नंतरचे महाराष्ट्र राज्य, भारत-चीन युद्ध असा कालपट लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या लेखातून उलगडला गेला आहे. के. जी. जोगळेकर, मोहन धारिया आणि रामभाऊ जोशी यांचे लेखही यशवंतरावांवरील त्यांच्या निरलस प्रेमाचे प्रत्यय आणून देणारे आहेत. ‘दीनांचा कैवारी’ हा एस. एम. जोशी यांचा लेख तसा स्वल्प असला, तरी त्यात त्यांनी आपली परखड मतेही नोंदवली आहे. तर कादंबरीकार रणजीत देसाई यांचा लेख यशवंतरावांविषयीच्या हृद्य आठवणी सांगणारा आहे.

डॉ. सरोजिनी बाबर यांनी ‘महाराष्ट्राची अस्मिता’ या लेखातून यशवंतरावांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या लेखात यशवंतरावांच्या काँग्रेसमधील संघटनात्मक कार्याविषयी, त्यांच्या ग्रंथप्रेमाविषयी वाचायला मिळते. गोविंदराव तळवलकर यांचा लेख यशवंतरावांच्या कुशल प्रशासन कौशल्याचे वर्णन करणारा आहे. तात्यासाहेब केळकर आणि यशवंतराव यांच्या संदर्भाने लिहिताना तारतम्य आणि मध्यम मार्ग याविषयी तळवलकरांनी केलेले विवेचन आवर्जून वाचायला हवे. मा. पं. मंगुडकर, बाळ कोल्हटकर, वि. स. पागे, ले. जन. एस. पी. थोरात, नरुभाऊ लिमये, य. दि. फडके, गो. रा. सोहनी अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना दिसलेले यशवंतराव मांडले आहेत. आचार्य अत्रे यांचा लेखही या संग्रहात आहे. मात्र तो अतिशय त्रोटक आहे. एकूणच निरनिराळ्या क्षेत्रांतील व्यक्तींनी निरनिराळ्या काळांत लिहिलेल्या या लेखांतून यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाचे बहुआयामी दर्शन घडते.

यशवंत संस्कृती’, संपादन- विलास फुटाणे,

  • आदित्य प्रकाशन, औरंगाबाद,
  • पृष्ठे- १६८, मूल्य- २०० रुपये.