यशवंत मनोहर हे चिंतनशील कवी म्हणून ख्यातकीर्त आहेत. समाजातल्या विचित्र सद्य:स्थितीचा, जगण्यातल्या भयावह कोलाहलाचा, मूल्यांमधल्या संगती-विसंगतींचा, जागतिकीकरणातून जन्मलेल्या शर्यतींचा, विषमतेच्या उतरंडीवरल्या बाईमाणसाचा धांडोळा घेणारा ‘युगांतर’ हा त्यांचा नवा काव्यसंग्रह. या संग्रहात जेमतेम १८ कविता असल्या तरी त्या सर्व मुक्तछंदात्मक कवितांनी ११९ पाने व्यापली आहेत. याचा अर्थ या दीर्घ आणि प्रदीर्घ कविता आहेत. शिवाय या कवितांचे काही छोटे-मोठे खंडित भाग असून त्यांना १,२ असे क्रमांक दिलेले आहेत. उदाहरणार्थ, ‘जागतिकीकरण आणि माझ्या जगाची कविता’ या कवितेचे ११ भाग असून, ही कविता तब्बल नऊ पानांची आहे. ‘मायबाई’ ही कविता मात्र सलगपणे ४१ पानांची आहे. या कवितेला ‘खंडकाव्य’ म्हणावे काय, असा प्रश्न पडतो. ‘कविता’ नामक कवितेत कवी लिहितो-

‘कविता : अनाथ मुलाच्या हंबरडय़ासारखी;

model code of conduct for general elections by central election commission
पहिली बाजू : आचारसंहिता : रोखठोक तरीही मानवी!
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?

सूर्याचे महाकाव्य लिहिणाऱ्या लिपीसारखी असते कविता.

कविता : मुक्या घुंगरांना फुटणाऱ्या वाचेसारखी,

वठलेल्या झाडाला येणाऱ्या पालवीसारखी असते कविता..’

नवे प्रयोगशील काही घडवायचे असेल तर आधीचे तयार कोष विस्कटावे लागतात. कवीच्याच म्हणण्यानुसार,‘वाऱ्याची, वाटांची आणि युगाची दिशा बदलून देते कविता.’ मनोहर यांची कविता युगांतराची आशा घेऊन येते. कवी आपल्या खास वृत्तीचा प्रातिभ आविष्कार करताना विलक्षण वाटा शोधताना दिसतो.. कविता या आकृतिबंधाच्या जुन्या ठराविक साच्यात न मावणारा व्यापक पस व्यापू पाहतो. ‘निर्मिती’ या कवितेत कवी आपल्या काव्यनिर्मितीची प्रक्रियाच मांडतो-

‘थांबू दिले नाही मला ह्य़ा घुसमटीने;

होऊ दिले नाही मला समाधानी

तिने करायला लावली मला गंभीर अवकाशाची निर्मिती,

करायला लावले त्याचे बाळंतपण..’

अभिव्यक्तीची, निर्मितीची निकड सर्वच कवींना लिहिण्याची चेतना देत असते. मनोहर यांच्या निर्मितीने तर त्यांना अंगाराचा पान्हा पाजला. छळले, जाळले. त्यामुळेच त्यांच्या कवितेतून जळजळीत वास्तव सामोरे येते.

या संग्रहातली सुमारे १४ पानांची ‘हे कवी’ ही दीर्घकविता म्हणजे कवीचा स्वसंवादच आहे. कवी स्वत:ला सतत समाजातल्या दु:ख-दैन्याला बांधून ठेवण्याची याचना करतो. ‘भोवतीच्या जखमांकडे मी पाठ फिरवली, तर बेलाशक माझा मृत्यू जाहीर कर..’ असे कवी स्वत:लाच बजावतो. ‘मी भ्रष्टाचारावर ज्वालामुखी ओतणे थांबवले, तर माझ्या आयुष्याची संसद बरखास्त कर..’ असेही ते स्वत:ला निक्षून सांगतात.

‘हे कवी! तू मला निखाऱ्याचे घास भरवतोस; हातात जाळ देतोस;

तू मला बसू देत नाहीस क्षणही शांत; सूर्यासोबत बोलायला लावतोस;

तू मला लिहायला लावतोस जगातल्या जगण्याचा जमाखर्च;

तू मला सतत नक्षत्रांच्या प्रवासापुढे पेटत चालायला लावतोस..’

असे रोखठोक आणि जळजळीत वास्तव कवी समोर ठेवतो. कवीला स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूल्यवर्धन करणारी सज्जनशक्ती या साऱ्या गोष्टी हव्या आहेत. पण समाजात भरून राहिलेले अतोनात दारिद्रय़, गंज चढलेल्या बुद्धीचा अडाणीपणा, निष्क्रिय समाज, अंधश्रद्धांनी गिळंकृत केलेली रूढींची बजबजपुरी, भेदाभेदाच्या मगरमिठीतील सनातन भोळसटपणा, मूलतत्त्ववादाने सुरुंग लावून उद्ध्वस्त केलेली धर्माची जमीन, भ्रष्टाचाराचा विक्राळ वावर आणि जागतिकीकरणाचा जगड्व्याळ पसाराच किती अवतीभोवती! कवी लिहितो-

‘जागतिकीकरणा,

आजही तुझी भीती आम्हाला घातली जात आहे.

तुझ्यामुळे आमच्या भोवतीचे अंधाराचे कडे चिरंतन रहावे

म्हणून आम्हाला अंधश्रद्धांची आणि स्थितिवाद दृढ करणाऱ्या परंपरांची, साहित्याची, व्रतवैकल्यांची, भाषेची आणि त्यांच्या संस्कृतीच्या अस्मितेची अफू चारून

परत परत चितेत ढकलले जात आहे..’

कवीने जागतिकीकरणाची भीती घालणाऱ्या प्रस्थापित संस्कृतीविरुद्ध, अंधश्रद्धांच्या सांस्कृतिक महासत्तेविरुद्ध, अन्याय-अत्याचार पोसणाऱ्या साम्राज्यवादाविरुद्ध आणि गरीबाला अधिक गरीब करणाऱ्या भांडवलशाहीविरुद्ध एल्गार पुकारला आहे. कारण त्यांना त्यांच्या भूतकालीन गुलामीशी पुन्हा बांधून घ्यायचे नाहीये. त्याच जागतिकीकरणाच्या खांद्यावर बसून कवीला क्रांतीच्या क्षितिजावर पोचायचे आहे, त्याच्याच तेजाच्या ‘समाजवादी’ किल्लीने विजयाचे महाद्वार उघडायचे आहे!

कवीला युगांतर घडवायचे आहे त्याच्या अनेक परी आहेत. समाजातला जातीयवाद, त्यातून उद्भवलेली असमानता, त्यातून फोफावलेले अन्याय-अत्याचार या दुष्टचक्राला भेदायचा प्रयत्न करणारी ही कविता आहे. समाजातील श्रेष्ठीजनांचे कावे नि डाव कवीने ओळखले आहेत. ‘वळसे’ या कवितेत अशा श्रेष्ठीजनांसाठी ‘माणसांना हजारो वर्षे थांबविणारे लाल सिग्नल आपण’ अशी नवीन प्रतिमा कवीने योजली आहे. विषमतेविषयीचा कवीच्या मनातला असंतोष ओळीओळींतून वाहत राहतो. ‘वूंडेड कंट्री’ अशा आंग्ल शीर्षकाच्या कवितेत कवी म्हणतो-

‘आम्ही पाहतो हजारो वर्षांच्या जखमांचे

ओझे वाहणारा वाकलेला वर्तमान,

निवडुंगाच्या अरण्यातील प्रवासात

फाटून निघावा वारा,

तसे फाटतो आम्ही जखमांच्या चीत्कारांनी..

आमची अस्तित्वे झाली आहेत देशाच्या जखमांची निवासस्थाने

आणि तरीही आम्ही सोडला नाही आजवर भारत..’

मनोहर यांची कविता वाचकाला विचार करायला प्रवृत्त करते. ती चंद्र-फुलांची कोरीव गाणी गात नाही. माणूस होण्याच्या विरोधात अडचणी आणणाऱ्या, ज्ञानाला काळ्या पाण्यात पाहणाऱ्या, सत्याला छळणाऱ्या ‘हरपाहरपीला’ (म्हणजे हरपणाऱ्या) आता कवी ओळखून आहे. सत्याच्या पोटी जन्म घेणारा हा कवी म्हणतो..

‘सत्याचा पराभवच असतो माणसाचा पराभव

आणि उद्ध्वस्त झाले तरी

सत्य होणार नाही पराभूत;

होईल तेज:पुंज अधिकच

असत्यांच्या हल्ल्यांनी

या निष्कर्षांचा कणा माझा वाकतही नाही

आणि मोडतही नाही.’

कवीची भाषा सुस्पष्ट आणि परखड आहे. विचारवलयांच्या जोरदार प्रवाहांनी त्वेषाने उचंबळून येणाऱ्या या कविता म्हणजे ‘चिंतनिका’ किंवा ‘वैचारिका’ आहेत. त्या जगण्याचा तळ खरवडणाऱ्या आहेत. समाजवादी, साम्यवादी विचारसरणीचा उद्घोष करणारी ही कविता बाईचे जगणेही सविस्तरपणे मांडते. ‘मायबाई’ या प्रदीर्घ कवितेत बाईबद्दलचे कुतूहल, अचंबा, आकर्षण, भय, प्रीती, आदर, तिच्यातल्या सर्जनशीलतेविषयीची कृतज्ञता अशा अनेक भावनांचे प्रतिबिंब त्यात पडलेले आहे.

‘मी नतमस्तक आहे तुझ्या अथांगापुढे

दुनियेच्या पाठीवरच्या तुझ्या पहिल्या बाळंतपणापुढे..’

असे विनयाने म्हणणारा कवी मायबाईला असेही म्हणतो की..

‘वापरू देऊ नकोस तू तुझ्या गर्भाची पिशवी,

जाती-धर्माच्या भांडणछावण्यांचा

अंधार जन्मू नये तुझ्या पोटी..’

कवी मायबाईला संस्कृतीचे निर्णायक मंथन करून इतिहासाचे आणि वर्तमानाचे ‘रिकन्स्ट्रक्शन’ करण्याचे आवाहन करतो. बाईच्या दुय्यमतेच्या जळमटांचे निर्दालन करण्यास कवी सरसावतो आणि तिच्यामध्ये युगंधरेचे स्फुरण चढावे म्हणून म्हणतो- ‘मायबाई, तूच हो आता युद्धभूमीवरील क्रांतीची कविता.’

‘युगांतर’ या संग्रहामध्ये एका युगाला.. या वर्तमानकाळाला धारण करण्याची ताकद आहे. हा कवितासंग्रह कवितांच्या, चिंतनिकांच्या माध्यमांतून आजच्या ‘ग्लोकल’ (ग्लोबल व लोकल) वस्तुस्थितीचे चित्रण करणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे.

‘युगांतर’- यशवंत मनोहर, मौज प्रकाशन गृह,  पृष्ठे- ११९, मूल्य- १५० रुपये.

ashlesha27mahajan@gmail.com