|| अ‍ॅड. गीता प्रशांत मुळेकर

स्वत:च्या मस्तीत भान हरपून ऑर्गन वाजवत समुद्रकिनारी बसलेली माणसे कदाचित आपण पाहिली असतील. पण स्वत:च्या मस्तीत खळखळणाऱ्या बोटांनी ऑर्गन वाजवणारा समुद्र तुम्ही कधी पाहिला आहे का? पाहिला नसेल तर झाडर ला अवश्य भेट द्या. क्रोएशिया या देशात झाडर हे कमी लोकवस्तीचे एक टुमदार शहर आहे.

आम्ही पाच मैत्रिणी लुब्लियाना, बुडापेस्ट, झाग्रेब ही शहरे पाहून मग झाडर ला पोहोचलो. आम्ही आमच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचल्याबरोबर सामान ठेवून लगेच झाडर  सी ऑर्गनचा रस्ता गुगल मॅप्सवरून पाहून घेतला. आम्ही राहत असलेल्या अपार्टमेंटपासून सी ऑर्गन दहा मिनिटांच्या अंतरावर होतं. आम्ही लगेच सी ऑर्गन पाहायला निघालो. संध्याकाळ झाली होती. अथांग निळ्या एड्रियाटिक समुद्राच्या किनाऱ्यावर हा सी ऑर्गन निकोला बेसिक नावाच्या वास्तुविशारदाने बांधला आहे. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकतात तेव्हा पाणी या ऑर्गनच्या पोकळ्यांमध्ये शिरते आणि मग त्यातून विविध सूर ऐकू येतात. या ऑर्गनचे सर्व भाग समुद्राखाली असल्याने ते आपल्याला दिसत नाहीत. सी ऑर्गन रात्रंदिवस वाजत राहतो. रोज संध्याकाळी लोक वाईन आणि खाद्यपदार्थ घेऊन सी ऑर्गनजवळ बसून हे निसर्ग स्वर ऐकतात.

आम्ही झाडर ला मे महिन्यात गेलो होतो. मे महिन्यात सूर्यास्त रात्री आठला होतो. सूर्यास्तानंतर तर खूपच विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. इथे सौरऊर्जेवर आधारित एक प्रकल्प उभारलेला आहे. दिवसभर सौरऊर्जा जवळपास २२ मीटर व्यासाच्या काचेच्या प्लेटखालील बॅटरीज् चार्ज करतात. सूर्यास्तानंतर रात्री झाडर  येथील सी ऑर्गनच्या तालावर काचेच्या प्लेट्समधून रंगीबेरंगी आकर्षक दिवे लागतात. रंगांची आतषबाजी रात्रभर चालूच राहते. जणू रोजच दिवाळी.

झाडर  येथील आमच्या बरोबर असलेली गाईड आम्हाला म्हणाली की, ‘झाडार पाहायला येणाऱ्या प्रत्येक चिनी ग्रुपला मी निक्षून सांगते- खबरदार! या सी ऑर्गनची कॉपी कराल तर.’  झाडर  येथील संपूर्ण वास्तव्यात रोज दोन तास आम्ही सी ऑर्गन आणि त्याच्या तालावर उघडझाप करणारे रंगीबेरंगी दिवे पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. आमच्यासाठी तो एक अविस्मरणीय अनुभव होता.

झाडर  गावातील बहुसंख्य वास्तू शंभर वर्षे जुन्या आहेत. कौतुकाची बाब म्हणजे, गावातील जुन्या वास्तू आणि रोमन साम्राज्याचे अवशेष व्यवस्थित जपले आहेत. त्यामुळेच झाडर  पाहताना आपण जणू रोमन काळात हिंडत आहोत असाच भास होतो.

झाडर  गावाचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे, गावाच्या सभोवती भक्कम तटबंदी आहे आणि आत यायला चार दिशांना प्रवेशद्वारे आहेत. पण प्रवेशद्वारातून वाहनांना आत यायला बंदी आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी झाडर ला पोहोचल्यावर आम्हाला टॅक्सी प्रवेशद्वाराजवळ सोडून आपापले सामान घेऊन चालत अपार्टमेंट गाठावे लागले. गावातील रस्ते पिवळसर, पण चमकदार संगमरवरी आहेत.

झाडर  तसे छोटे गाव आहे. तुम्ही संपूर्ण झाडर  चालत एका तासात बघू शकता. आमच्या गाईडने ज्या चर्चमध्ये १२०० वर्षांपूर्वी पहिल्यांदाच वाईन बनवली गेली ते चर्च दाखवले. सी ऑर्गनव्यतिरिक झाडर  मध्ये सेंट डोनटचे गोलाकार बायझेंटाईन चर्च, पीपल्स स्क्वेअर, झाडर म्युझियम, पाच विहिरींचा चौक, बेल टॉवर, सेंट सायमन चर्च, सी गेट, न्यू गेट, तेराव्या शतकातील गॉथिक पद्धतीची फ्रान्सिस मॉनेस्ट्री या प्रेक्षणीय जागा पाहण्यासारख्या आहेत.

मे महिन्यात चेरी, प्लम, ब्लुबेरी, रास्पबेरी, अशी भरपूर फळे आम्हाला खायला मिळाली. इथली चेरीची बनवलेली मरास्का नावाची ब्रांडी खूप प्रसिद्ध आहे. झाडरमध्ये खूप कॉफी शॉप्स आहेत. शिवाय, केक, पेस्ट्रीज् यांची दुकाने, पिझ्झाची रेस्टॉरंटस् आहेत. आम्हाला ऑलिव्ह झाडांवर छोटी-छोटी ऑलिव्हची लगडलेली फळे पाहायला मिळाली. झाडर मध्ये एक म्हण आहे, इथले मासे तीन वेळा पोहतात. पहिल्यांदा समुद्रात, दुसऱ्यांदा ऑलिव्ह तेलात आणि तिसऱ्यांदा पोटातील वाईनमध्ये! ही म्हण आम्हाला  प्रत्यक्ष अनुभवायास मिळाली. ऑलिव्हच्या तेलात खमंग तळलेले ताजे मासे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

अप्रतिम वास्तू, समुद्राचं वेगळेपण, रुचकर खाद्यपदार्थ.. अशी शिदोरी घेऊनच पुढच्या प्रवासाला निघालो. झाडर कायम स्मरणात राहील असाच हा प्रवास होता.

mulekarlegal@gmail.com