12 July 2020

News Flash

कॅफे कल्चर – बी. मेरवान अ‍ॅण्ड कंपनी : तुम जिओ हजारो साल..

ग्रँट रोड स्थानकाच्या पूर्वेला एक शतकी परंपरा लाभलेला इराणी कॅ फे आहे. बी. मेरवान अ‍ॅण्ड कंपनी.

प्रशांत ननावरे

मुंबई उपनगरीय रेल्वे म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण. कारण सामान्य मुंबईकरासाठी मुंबईतला प्रवास रेल्वेशिवाय पूर्णच होऊ  शकत नाही किंवा त्याचा विचारही केला जाऊ  शकत नाही. दीडशे वर्षांहून अधिक काळ धावणाऱ्या या रेल्वेचं जाळं आता चांगलंच पसरलं आहे. पण तीनही रेल्वे मार्गापैकी मध्य रेल्वेनंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील दक्षिण मुंबईतील काही रेल्वे स्थानकांचा अगदी प्रारंभीच्या रेल्वे स्थानकांत समावेश होतो. ग्रँट रोड रेल्वे स्थानक हे त्यापैकीच एक. जुन्या मुंबईची ओळख असलेल्या या परिसरात या स्थानकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. १८३५ ते १८३९ या काळात मुंबईचे गव्हर्नरपद भूषविलेल्या सर रॉबर्ट ग्रांट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्थानकाला हे नाव देण्यात आलेले आहे.

ग्रँट रोड स्थानक सुरुवातीपासूनच लोकवस्ती आणि बाजाराचा परिसर म्हणून सर्वाना परिचित आहे. जैन, मुसलमान, पारशी आणि इराणी झोराष्ट्रीयन लोकांची मोठय़ा प्रमाणात वस्ती असलेलं हे मुंबईतील महत्त्वाचं स्थानक. याच परिसरातल्या बलराम रोड आणि स्लेटर रोडवरील झोराष्ट्रीयन लोकांची अशी भावना आहे की त्यांचे पूर्वज याच भागात फार पूर्वीपासून वास्तव्यास होते. त्यामुळेच की काय या परिसरात पारशी लोकांची एकूण चार अग्नी मंदिरे आहेत. शिवाय पारशी लग्न समारंभ आणि इतर महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठीची कामा बाग ही जागादेखील याच परिसरात आहे.

ही संपूर्ण पाश्र्वभूमी देण्याचं कारण म्हणजे याच ग्रँट रोड स्थानकाच्या पूर्वेला एक शतकी परंपरा लाभलेला इराणी कॅ फे आहे. बी. मेरवान अ‍ॅण्ड कंपनी. रेल्वे स्थानकातूनच नव्हे तर रेल्वे फलाट क्रमांक चारवर थांबली असताना रेल्वेच्या डब्यातूनही सहज दिसेल असा हा कॅफे म्हणूनच या मार्गाने मार्गस्थ होणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रत्येकाच्या चांगलाच परिचयाचा आहे. इथून जाणाऱ्या-येणाऱ्या अनेक चाकरमान्यांचा दिवस याच कॅफेतील चहा घेऊन सुरू होतो आणि संपतो. आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना

कॅ फेच्या बेकरीत मिळणारा ब्रेड आणि मावा केक चहासोबत लागतो म्हणजे लागतोच. इतकं घट्ट नातं त्यांचं या जागेशी जुळलेलं आहे.

इराणमधील राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेला कंटाळून शतकभरापूर्वी भारतात स्थलांतरित झालेल्या अनेक इराणींपैकी बोमन हेदेखील एक होत. बोमन मेरवान नझाराबादी हे मूळचे इराणमधील नझाराबाद प्रांतातले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी मुंबई गाठली. तो काळ असा होता, जेव्हा लोक बाहेर जाऊन फारसं खात नसत. हॉटेल आणि दुकानांची संख्याही मर्यादितच होती. अशा वेळी नाक्यावरील मोक्याच्या जागा घेऊन मेहनती इराणी मंडळींनी इराणी कॅ फेसुरू केले. बोमन यांनी १९१४ साली तेच केलं. चहा, बन मस्का, मावा केक असे मोजकेच पदार्थ तेव्हा येथे मिळत असत. विशेष म्हणजे शतकभरानंतरही त्यात वेगळ्या पदार्थाची विशेष भर पडलेली नाही.

बोमन यांच्यानंतर त्यांचा मुलगा नौशीद आणि त्यांच्यानंतर त्यांची दोन मुलं सरोश आणि बोमी हा कॅ फे चालवतात. दोघेही आता ऐंशीच्या पुढे आहेत. बोमी इराणी यांनी १९५६ साली पुण्याला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. तर सरोश १९८४ पर्यंत इराणमध्येच काम करीत होते. त्यानंतर ते मुंबईत आले.

मेरवान यांची तिसरी पिढी हा कॅफे चालवत असली तरी त्यांनी इराणी कॅफेची जुनी ओळख कायम ठेवली आहे. इतर कॅफेप्रमाणे चायनीज किंवा इतर पदार्थाची आपल्या मेन्यूमध्ये भर घातलेली नाही. आजही कॅ फेसकाळी साडेसहा वाजता उघडतो आणि सायंकाळी सहा वाजता बंद होतो. विशेष म्हणजे सकाळी उघडल्यावर आणि बंद होतानाही लोकांची प्रचंड गर्दी येथे असते. बेकरीचे पदार्थ बनवायला पहाटे तीन वाजल्यापासून सुरुवात होते. त्यातील अनेक पदार्थ सकाळी आठ ते दहा या वेळेत संपतातदेखील. आजही दिवसाला येथे पाच ते सात हजार मावा केक विकले जातात. यावरूनच त्याची लोकप्रियता आणि पदार्थाची चव लक्षात येईल. रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांसोबतच आजूबाजूचे नागरिक सकाळी सकाळी इथून कपकेक, पॅटिस आणि ब्रेड घेऊन जाण्यासाठी गर्दी करतात.

इथे आजही कुठल्याच ग्राहकाला बिल दिलं जात नाही. वेटर किंमत सांगतो आणि ग्राहक तेवढं बिल काऊंटरवर जाऊन देतात. त्यामध्ये फेरीवाल्यापासून टायसुटातले असे सर्वच लोक असतात. कुणीच लबाडी करत नाही. इतक्या वर्षांनंतरही मुंबईसारख्या शहरात हे असं घडणं ही चमत्कारिक गोष्टच म्हणायला हवी.

बोमन यांच्या काळापासून असलेल्या शंभराहून अधिक वर्ष जुन्या टाइल्स, मार्बल टेबल टॉप आणि खुर्च्या आजही तशाच आहेत. इथल्या खुर्च्या झेकोस्लोवाकियातल्या तर मार्बल टेबल टॉप इटलीचे आहेत. आजही इथे वेगळी फॅमिली रूम आहे. महिला आणि कुटुंबाला तिथे सकाळी सातनंतर बसण्याची परवानगी दिली जाते. लाकडी छत, मोठाल्या खिडक्या, लाकडी फर्निचर, मोठाल्या काचा ही इराणी हॉटेलची सर्व वैशिष्टय़े आजही कायम आहेत. कॅफेच्या मध्यभागी असलेल्या लाकडी खांबांवर मेन्यू लावलेला आहे. त्यावर चहा, बन मस्का, ब्रून मस्का, जॅम-मस्का बन, ऑमलेट, मसाला ऑमलेट, मावा केक, मावा समोसा, बॉर्नविटा, जॅम पफ, कस्टर्ड, पुडिंग, ब्रेड स्लाइस, फालुदा आणि आइस्क्रीम, व्हेज पॅटिस असे पदार्थ दिसतात. पण त्यातले मिळतात किती याची वेटरला विचारल्याशिवाय खात्री होत नाही. इथे जी जागा रिकामी असते ती आपली. संपूर्ण टेबल रिकामी होईल आणि मग तिथे बसू असं इथे नाही. येणाऱ्या ग्राहकालाही हा नियम आता चांगलाच माहीत झाला आहे.

२०१४ च्या एप्रिल महिन्यात शंभर वर्ष झाली तेव्हा हा कॅफे दुरुस्तीसाठी काही काळ बंद करण्यात आला होता. त्या वेळी अनेक वर्तमानपत्रांनी मेरवान बंद होणार म्हणून राळ उठवली होती. पण महिन्याभरातच तो सुरू झाला आणि खवय्यांच्या गर्दीने पुन्हा गजबजू लागला. बी. मेरवान असा एकमेव कॅफे असेल ज्याने आपल्या मेन्यूमध्ये फार पदार्थाची भर न घालता इतकी वर्ष आपलं अस्तित्व कायम ठेवलं आहे. पदार्थाची चवही तीच कायम असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मेरवान बंद व्हायची अफवा उठायच्या आधी तिथे जाण्याची संधी अजिबात दवडू नका.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2018 2:45 am

Web Title: 100 year old bakery b merwan and company
Next Stories
1 ब्रॅण्डनामा : वॅसलिन
2 नावापुरते स्पा फूड..
3 नया है यह : थंडीतले सोबती
Just Now!
X