11 December 2017

News Flash

व्हायरलची साथ : जडण घडण

भारतात तर लग्न झालं की लगेच गोड बातमी कधी देणार याची विचारणा सुरू होते.

प्रशांत ननावरे | Updated: September 22, 2017 4:56 AM

आई होणं ही स्त्रीसाठी सर्वात आनंदाची बाब असते. पण आई झाल्यावर त्या स्त्रीचं वैयक्तिक आयुष्य संपतं. आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून दिवसरात्र बाळाच्या देखभालीत स्वत:ला गुंतवून घ्यावं लागतं. भारतात तर लग्न झालं की लगेच गोड बातमी कधी देणार याची विचारणा सुरू होते. ती गोड बातमी आली की त्या महिलेने बाळ एके बाळ करतच फिरावं अशी कुटुंबीयांची इच्छा असते. त्याचं चांगलं होईल ते कुटुंबातील इतर सदस्यांमुळे आणि वाईट होईल ते आईने लक्ष न दिल्यामुळे झालं. ही सर्वसाधारण मानसिकता. त्याचप्रमाणे मूल होणं आणि त्याचं पालनपोषण करणं हे कायद्याने किंवा विधिवत एकत्र आलेल्या जोडप्याचं काम. तसं झालेलं नसल्यास समाजाकडून त्यांना अतिशय तुच्छतेची वागणूक दिली जाते. पण जे भारतात आहे तसं जगात सगळीकडेच आहे असं नाही. अमेरिकेत कुमारी किंवा एकटय़ा मातांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी अनेक कायदे आणि सुविधाही आहेत. नव्याने पालक झालेल्या जोडप्यालाही अनेकदा बाळाला सांभाळणं कठीण होऊन बसतं. अशा वेळी बाळाची जबाबदारी एकटय़ा आईची असेल तर मग विचारायलाच नको.

टेक्सास शहरातील ‘ए अ‍ॅन्ड एम’ विद्यपीठात शिकणाऱ्या अ‍ॅस्टन रॉबिनसन या महिलेला आपल्या बाळावर लक्ष ठेवण्यासाठी आया सापडत नव्हती आणि त्यामुळे तिला विद्यापीठातील क्लासला दांडी मारावी लागणार होती. हे तिने आपल्या प्राध्यापकांना ईमेलद्वारे कळवलं आणि त्यानंतर तिला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण प्राध्यापक डॉ. हेन्री मुसोमा यांनी अ‍ॅस्टनचा ईमेल वाचला आणि ताबडतोब तिला फोन केला. तू तुझा मुलगा इमेट याला वर्गात घेऊन ये असं त्यांनी तिला कळवलं, एवढंच नव्हे तर त्या आईला वर्गात अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावं म्हणून डॉ. हेन्री यांनी वर्ग सुरू असताना इमेटला आपल्या मांडीवर बसवून आणि कडेवर घेऊ न विद्यार्थ्यांना धडे देण्याचं काम केलं.

डॉ. हेन्री यांच्या या कृतीने अ‍ॅस्टन इतकी भारावून गेली की तिने घडलेली सर्व हकिगत कथित करणारी एक पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर टाकली. सोबत एक फोटो आणि व्हिडीओदेखील जोडला. डॉ. हेन्री यांच्या या कृतीची दखल घेत लोकांनी त्यांची तोंडभरून स्तुती केली. आणि तो व्हिडीओ हजारो लोकांसोबत शेअरही केला. भारतात चांगल्या शिक्षकांची कमतरता नाही. त्यांचं ऋण फेडण्यासाठी आणि त्यांचा आदर म्हणून दरवर्षी आपल्याकडे शिक्षक दिन साजरा केला जातो. दोन आठवडय़ांपूर्वीच तो पार पडला. पण शिक्षकाचं काम हे केवळ वर्गात मुलांना धडे देणं इतकंच नसतं. विद्यर्थ्यांच्या सुख-दु:खात आणि अडीअडचणीतही त्यांच्या मदतीला धावून जातो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तोच खरा शिक्षक. डॉ. हेन्री यांच्या उदाहरणावरून हे समोर आलं. असं म्हटलं जातं, एक मूल घडवण्यामागे संपूर्ण गाव असतं. इमेटच्या आजूबाजूची माणसं पाहता त्याची जडणघडण चांगली होईल यात शंका नाही. परंतु, इथे एक आईसुद्धा घडण्याची प्रRि या सुरू आहे. वैयक्तिक स्वातंत्र्याला आणि स्वप्नपूर्तीला आपल्याकडे किती महत्त्व दिलं जातं हे वेगळं सांगायला नको. पण तिथे दूर अमेरिकेत तसं नाही. आपली संस्कृती थोर ठरवत भले तिथल्या अनेक गोष्टींना आपण बोल लावत असू पण ज्या गोष्टी खरंच त्यांच्याकडून शिकायला हव्यात त्याच्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. मूल झाल्यानंतर त्याच्या संगोपनाकडे लक्ष द्यायलाच हवं, पण प्रत्येक स्त्रीने त्यानंतरही काही कारणास्तव स्वत:ची अपूर्ण राहिलेली स्वप्नंदेखील पूर्ण करायला हवीत. डॉ. हेन्रीसारखे शिक्षक त्याचं महत्त्व जाणतात, म्हणूनच अ‍ॅस्टन उद्या विद्यापीठातून यशस्वीपणे पदवी घेऊ न बाहेर पडेल. त्या पदवीच्या जोरावर चांगली नोकरी किंवा व्यवसाय करून एकटी आई असतानाही इमेटला चांगलं आयुष्य देऊ  शकेल. चांगल्या नागरिकांची आणि महत्त्वाकांक्षी देशाची निर्मिती अशा लहानसहान गोष्टींतूनच होत असते, हे आपण विसरता कामा नये.

viva@expressindia.com

First Published on September 22, 2017 12:34 am

Web Title: a m university child issue after marriage aston robinson child issue western culture