News Flash

ब्रॅण्डनामा : लक्स

विल्यम लिव्हर आणि जेम्स डॉर्सी लिव्हर या दोन भावांनी १८८५ साली साबण बनवण्याची फॅक्टरी टाकली.

लक्स

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

स्वप्न पाहायला आपल्याला आवडतात आणि स्वप्निल जगात घेऊन जाणारे ब्रॅण्डसुद्धा. जे आहे त्यापेक्षा अधिक सुंदर, अधिक आकर्षक असं काही हवं असणं ही स्वाभाविक मनोवृत्ती आहे आणि याच वृत्तीतून चेहऱ्याचा सौंदर्यपूर्ण आविष्कार घडवणारा ब्रॅण्ड म्हणजे लक्स. हा फक्त साबण नाही. ही एक गुळगुळीत, आकर्षक अनुभूती आहे. त्या अनुभूतीचीच ही कहाणी.

विल्यम लिव्हर आणि जेम्स डॉर्सी लिव्हर या दोन भावांनी १८८५ साली साबण बनवण्याची फॅक्टरी टाकली. ते कपडे धुवायचा साबण बनवीत असत. सनलाइट फ्लेक्स असं त्या साबणाचं नाव होतं. या साबणाचं मार्केटिंग करण्याच्या निमित्ताने जो सव्‍‌र्हे झाला त्यात या बंधूंना एक विस्मयकारक गोष्ट कळली. कपडे धुवायच्या त्यांच्या साबणाने स्त्रिया चक्क आंघोळ करत असत. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे या साबणासाठी अतिशुद्ध पाण्याचा वापर केला जाई. दुसरं म्हणजे त्यातले घटक त्वचेसाठी पूर्णत: सुरक्षित होते. यावरून लिव्हर बंधूंना ब्युटी सोप बनवण्याची कल्पना सुचली. विल्यम हॉफ वॉटसन या रसायनतज्ज्ञासोबत भागीदारी करत त्यांनी नवा साबण बनवला. त्यात ग्लिसरिन आणि पामतेलाचा वापर करण्यात आला. खूप फेस आणणारा हा सुगंधी हनीसोप सुरुवातीला सनलाइट नावानेच आला. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळताच साबणाचं नाव बदलून ‘लक्स’ ठेवण्यात आलं. लॅटिन भाषेत लक्स म्हणजे प्रकाश. सनलाइट या नावाचंच हे सुधारित रूप होतं. शिवाय ‘लक्स’ या नावातून लग्झरी अर्थात सुखासीनतादेखील योग्य प्रकारे झळकत होती.

अमेरिकेत ‘लक्स’ने १९२५ साली यशस्वी पदार्पण केले. त्याची जाहिरातच फ्रेंच सोपच्या फॉम्र्युल्याने बनवलेला साबण अशी केली जाई. सुगंधाच्या दुनियेत फ्रेंच अत्तरांना असलेली मागणी लक्षात घेता ‘लक्स’ लोकप्रिय होणं स्वाभाविक होतं. १९३१ साली ‘आय एम ओव्हर थर्टी’ हा उपक्रम लक्सने राबवला. तिशीनंतर त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते त्यासाठी ‘लक्स’ने या उपक्रमातून तिशीपुढच्या स्त्रियांना लक्ष्य केलं.

१९४०-५०च्या दशकात लक्सने उंच भरारी घेतली. त्यामागे होती लक्सच्या जाहिरातींमधील कल्पकता. सर्वसामान्य माणसाला सिनेतारकांचं असलेलं आकर्षण लक्षात घेऊन सिनेतारकांचा जाहिरातींमध्ये वापर पहिल्यांदा आणि खुबीने केला गेला. एलिझाबेथ टेलर, मर्लीन मन्रो यांनी पाश्चिमात्य जाहिरातींमध्ये काम केलं तर भारतात लक्स साबणाची पहिली जाहिरात करणारी नायिका ठरल्या लीला चिटणीस. तेव्हापासून ते आतापर्यंत मधुबाला, नर्गिस, मीनाकुमारी, माला सिन्हा, शर्मिला टागोर, वहिदा रेहमान, सायरा बानू, हेमामालिनी, झीनत अमान, जुही चावला, माधुरी दीक्षित, तब्बू , श्रीदेवी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट अशा अनेक चित्रपट तारकांनी लक्सची जाहिरात केली. या जाहिरातीत येण्यासाठी अभिनेत्रींमध्ये चढाओढ असे इतकं ते सन्मानाचे होतं. अलीकडच्या काळात शाहरूख खाननेसुद्धा या ब्रॅण्डसाठी काम केलं. या तारकांच्या मांदियाळीमुळे लक्स बनला ‘फिल्मी सितारों का सौंदर्य साबून.’ अगदी अलीकडे त्यात बदल करत सामान्य माणसाला ‘ब्रिंग आऊट द स्टार इन यू’ असे आवाहन करण्यात आले.

आज ७१ उत्पादन केंद्रासह लक्स जवळपास १०० देशांत विकला जातो. जगभरातील ३४% घरात लक्स वापरला जातो. मोठय़ा प्रमाणावर उत्पादन केल्या जाणाऱ्या सौंदर्यसाबणांमध्ये आद्यत्वाचा मान लक्सकडे आहे. चित्रपट तारकांविषयीचं आकर्षण हे या साबणाच्या खपाचं एक रहस्य आहे. पण त्यापलीकडे सुगंध, रूप याबाबतीतही हा साबण सरस आहे. सतत बदलत ठेवलेल्या फॉम्र्युलामुळे नव्या पिढय़ा या साबणाला जोडल्या गेल्या. साबणाच्या सुगंधाइतकीच त्यावरच्या नक्षीचीही चर्चा झाली.

एकूणच ‘लक्स’ हे नाव घेतल्यावर डोळ्यासमोर तरळतं ते एक श्रीमंती विश्व. विशाल बाथटब, पाकळ्यांची पखरण, गुलाबी माहोल, चित्रपट तारकांचा नखरा, सौंदर्य. या गुलाबी सुगंधासह आपल्यालाही आपल्यातला ‘तारा’ शोधायचा मोह होतो. शुभ्रधवल फेसाच्या बुडबुडय़ात काही काळ का होईना पण तो तारांकित अनुभव आपणही घेतो. ही भावानुभूती हेच या ब्रॅण्डचं यश!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 1:25 am

Web Title: a success story of lux soap brand
Next Stories
1 ‘पॉप्यु’लिस्ट : प्रवासाची गाणी
2 ‘कट्टा’उवाच : ओओटीडी
3 ‘जग’ते रहो : फिट अ‍ॅण्ड फाइन
Just Now!
X