12नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

डिसेंबर म्हणजे आम्हा कलाकारांचा धावपळीचा महिना. या महिन्यात सर्वात जास्त लग्ने, कॉर्पोरेट इव्हेंट्स, कार्यक्रम, कॉन्सर्ट्समुळे परफॉर्मन्सेस घडत असतात. हा रसिकांसाठीसुद्धा पर्वणीचा महिना! रोज कुठे ना कुठे तरी कॉन्सर्ट घडतच असते. NH7 weekender सारखे म्यूझिक फेस्टिव्हल्स असतात. मोठमोठय़ा बँड्सच्या रॉक कॉन्सर्ट्ससुद्धा या दोन-तीन महिन्यांमध्ये खूप जास्त होतात. मी तसा रॉकचा अभ्यासक नाही, खूप मोठा चाहतासुद्धा नाही. तरीही माझ्या संगीतातल्या मित्रांमुळे, मी ज्या बँड्समध्ये गायचो, गातो, त्यातून जे रॉक कानावर पडत गेले, त्याचे माझ्यावर काही प्रमाणात संस्कार नक्कीच झाले. रॉकमध्ये नक्की काय ऐकायचे असते हे मित्रांमुळे थोडय़ाबहुत प्रमाणात कळत गेले आणि या संगीतप्रकाराविषयी आवड निर्माण झाली. ऐकणाऱ्याला खिळवून ठेवायची, स्थलकाल विसरून एका वेगळ्याच उन्मादाच्या अवस्थेत नेण्याची जेवढी क्षमता या संगीतप्रकारात आहे, तेवढी दुसऱ्या कुठल्याच प्रकारात नाही हे मान्य करावेच लागते. रॉक म्हणजे कलाकाराच्या आणि श्रोत्याच्याही आत असलेल्या ऊर्जेला वाट करून देण्याचा एक मार्ग आहे असे मला वाटते. कारण रॉकचे सादरीकरण आणि एखाद्या कॉन्सर्टमध्ये रॉक ऐकणे-पाहणे हे दोन्ही प्रकार भरपूर दमछाक करणारे, घाम गाळणारे असतात. रॉक न ऐकणाऱ्यांना हा प्रकार म्हणजे निव्वळ आरडाओरडा, गोंगाट वाटू शकतो, पण प्रत्यक्षात रॉकमध्ये अनेक उपप्रकार आहेत. सॉफ्ट रॉक, रॉक अँड रोलसारखे सौम्य प्रकार, तर थ्रॅश मेटल, डेथ मेटल, इंडस्ट्रियल रॉकसारखे गोंगाटप्रधान प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराचा वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे. कुठल्या प्रकारात काय ऐकायचे हे कळले तर त्याची मजा नक्कीच येते. माझ्या रॉकप्रेमी मित्रांमुळे माझ्या कानावर पडलेल्या काही बँड्सपैकी अग्रगण्य बँड म्हणजे मेटॅलिका. हेवी मेटल, थ्रॅश मेटल या प्रकारात मोडणारा हा बँड. तुम्हाला रॉकची गोडी लावायची असेल तर हा बँड पहिला ऐका. यांची One, Unforgiven, Nothing else matters, Sad but true, आणि माझे सर्वात आवडते Master of puppets ही गाणी केवळ भन्नाट आहेत. प्रत्येक गाण्याला एक वेगळी चाल, वेगळा ताल, वेगळी ओळख आहे. यातले प्रत्येक गाणे हे कुठल्याही रॉकप्रेमीला मुखोद्गत असते. यांचे शब्द, गिटार, ड्रम्सचे पीसेस हे लक्षात राहावे, पाठ करावे असे असतात.
अजून एक असाच भन्नाट बँड म्हणजे ड्रीम थिएटर. प्रोग्रेसिव्ह रॉक प्रकारात मोडणारा हा बँड अजबगजब आहे. यांची गाणी ऐकताना तुम्हाला बाकी बँड्ससारखे हेडबँगिंग करत नाचता येत नाही, किंबहुना तसे करण्यास उसंतच मिळत नाही. तुम्ही यांच्या सतत उडय़ा मारणाऱ्या, राग, ताल, सूर, लय बदलत राहणाऱ्या गाण्यांना ऐकण्यातच गुंग होऊन जाता. त्या बदलांमुळे सतत धक्के बसत राहतात. त्यामुळे यांची सगळीच गाणी ही लक्ष देऊन ऐकावी लागतात. या मोठमोठय़ा गाण्यांमधील गिटार, बास गिटार, सिंथेसायजर आणि ड्रम्स यांचे एकत्र वादन, त्यांचा एकमेकांशी असणारा ताळमेळ ऐकून थक्क व्हायला होते. ही गाणी नुसती ऐकल्यानेसुद्धा मेंदूला थकवा येतो. A change of seasons- माझे सर्वात आवडते. याशिवाय Another brick in the wall ( pink floid), Sultans of swing (dire straits), Smoke on the water, Highway star (deep purple), Summer of 69, 18 till I die (brian adams) ही रॉक गाणी माझ्या सतत ऐकण्यात असतात. खरे तर ऐकण्यापेक्षा यांचे लाईव्ह शो बघण्यात जास्त माजा असते. यू टय़ूबवर त्यांच्या कॉन्सर्ट्स पाहण्यात वेगळाच आनंद असतो. तो प्रचंड जनसमुदाय, त्या सगळ्यांना बँडची गाणी मुखोद्गत असणे, प्रसंगी रॉक स्टार्सचे स्वत:ला त्या गर्दीत झोकून देणे हे पाहणे प्रचंड स्फूर्तिदायक असते. हा नियोजित गोंगाट एकदा तरी अनुभवाच! लेट्स रॉक!

हे ऐकाच..
जिथे सागरा धरणी मिळते
रॉक आणि सिंफनी हे खरे तर दोन टोकाचे संगीतप्रकार. एक अभिजात तर दुसरा बंडखोर. एकमेकांमध्ये काहीच साम्य नाही. पण हे दोघे एकत्र आले तर काय चमत्कार घडू शकतो, हे अनुभवायचे असेल, तर S and M अथवा S&M म्हणजे सिंफनी अँड मेटॅलिका ही जगप्रसिद्ध कॉन्सर्ट यू टय़ूबवर जाऊन नक्की पाहा. रॉकमध्ये मायकल कामेन या इसमाने सिंफनीचा वापर करून एक अद्भुत अनुभव आपल्याला दिला आहे. तसेच ड्रीम थिएटरच्या मागील वर्षी झालेल्या बोस्टन ऑपेरा हाउसमधील कॉन्सर्टमध्ये त्यांना बर्कले या जगातील सर्वोच्च संगीतशाळेच्या strings आणि choir (कोरस) ग्रुप ने साथ दिली आहे. हा अनुभवसुद्धा तितकाच अद्भुत आहे. ‘जिथे सागरा धरणी मिळते’ अशा या दोन कॉन्सर्ट्स न चुकता अनुभवा.

5

viva.loksatta@gmail.com