मुळातल्या अभ्यासू-जिज्ञासू वृत्तीला मेहनत आणि जिद्दीची जोड देऊन संशोधन क्षेत्रामधील आपलं ध्येय साध्य करण्याची गोष्ट सांगतेय अमेरिकेतली आभा.

गुड मॉर्निग फ्रेण्ड्स! मी इथं वाफाळत्या कॉफीचे घुटके घेत तुमच्याशी गप्पा मारतेय. एरवी मी या अध्र्या तासात पुस्तकं वाचते. कारण तेवढाच वेळ काय तो माझ्या हातात असतो. इथं आल्यावर सुरुवातीच्या काळात माझं वाचन अगदी बंद होतं. कारण खूप अभ्यास होता. प्रचंड थंडीमुळं सकाळी लवकर उठणं व्हायचं नाही. आता थंडीचीही सवय झाल्येय. इकडच्या सेकंड हँड बुकस्टोअर्सच्या सेलमध्ये, बुकफेअर्समधून पुष्कळ पुस्तकं घेतली आहेत. माझे आवडते लेखक आहेत पी. जी. वुडहाऊस. माझ्या आजोबांचेही ते लाडके लेखक. त्यांचं साहित्य कालातीत वाटतं.

आठवणींचा कानोसा घेतला तर, मला लहानपणापासूनच परदेशी राहायची क्रेझ खूप होती. पालकांकडून शिक्षणासाठी कायमच प्रोत्साहन मिळत गेलं. इंजिनीअरिंग झाल्यावर कुठल्याही जॉबला अप्लाय केलं नव्हतं. कारण ठरलंच होतं की, मास्टर्ससाठी परदेशी जाणार. दुसऱ्या वर्षांनंतर रिसर्चची गोडी लागल्यानं पीएच.डी. करण्याचं ठरवलं. त्याआधी शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात झालं. मग पुण्याच्या फग्र्युसन ज्युनिअर कॉलेजमध्ये दोन र्वष होते. मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून केमिकल इंजिनीअरिंग केलं. ‘आयसीटी’मध्ये असतानाच दोन एन्ट्रन्सशिप केल्या. पैकी पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये इंटर्नशिप करताना माझा पहिला रिसर्च पेपर सेकंड ऑथर म्हणून प्रसिद्ध झाला. त्यानंतर मी टेक्सोल इंजिनीयरिंगमध्ये काम केलं. पुढं एमएस-पीएचडी इन्टिग्रेटेड कोर्ससाठी अमेरिकेतल्या नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला. मी शिकागोजवळ एव्हनस्टनमध्ये राहातेय.

आता माझं मास्टर्स जवळपास संपलंय आणि पीएचडीचं काम चालू झालंय. भारतातली आयसीटी ही माझी केमिकल इंजिनीअरिंगमधली टॉप इन्स्टिटय़ूट होती. त्यामुळं जो विषय आम्हाला शिकवला होता, तो खूप अप्रतिम होता आणि तो हँण्डलही खूप छान केला होता. त्यामुळं मी शिकलेय, त्यापेक्षा खूप काही नवीन शिकलेय इथं, असं मला नाही वाटत. इथल्या मुलांना स्वत:हून अभ्यास करण्यात रस असतो. इथले अंडरग्रॅज्युएट्स फारच हुशार आणि फोकस्ड आहेत. मी अंडरग्रॅज्युएट असताना मला मात्र क्लास बंक करून फिरणं, गप्पा मारण्याचं आकर्षण वाटायचं. इथले प्रोफेसर्स फार अप्रोचेबल आणि फ्रेण्डली असतात. शंकांचं लगेचच निरसन करतात. त्यांच्याबद्दल आदर असतोच. त्यांना पहिल्या नावानं हाक मारायची पद्धत इथं आहे. भारतात असताना काही वेळा संशोधनाच्या कामात अडीअडचणी यायच्या. उदाहरणार्थ- एखादं केमिकल ऑर्डर करण्यासाठी चिक्कार पेपरवर्क करावं लागे. ते पहिल्या फटक्यात मंजूर झालं तर ठीक, नाही तर पुन्हा करणं आलंच. आपल्या संस्थांमध्ये काम चांगलं होतं, संशोधन चांगलं होतं. फक्त फंडिंग प्रॉब्लेम आहे. एक प्रकारचा रिसर्च अॅटिटय़ूड आपल्याकडं विशेष नाहीये. मला ज्या क्षेत्रात काम करायचं होतं, त्यातली उपकरणं खूपच महाग असतात. आपल्याकडे पटकन उपलब्ध होत नाहीत. त्यामुळंही मी परदेशी जायचा निर्णय घेतला. सध्याचा माझा रिसर्च टॉपिक धातूकणांसंदर्भात आहे. धातूचे सूक्ष्म कण, ज्यांच्या फक्त असण्यानं रासायनिक कृतीचा वेग वाढतो, अशा कणांचं अध्ययन, विभागीकरण, स्थिरीकरण आणि त्यांना कृतीसाठी तयार करण्याचं काम मी करते.

6इकडं येताना दोन अपार्टमेंट-मेट्ससोबत आले. आम्ही नॉर्थवेस्टर्न युनिव्र्हसिटीच्या इंडियन असोसिएशनच्या मीटिंग्जना भेटलो. जायच्या आधीच अपार्टमेंट बुक केलं. लीज ई-मेलवरूनच साइन केलं. वर्षभर सोबत राहिलो. सुरुवातीला स्वयंपाक आळीपाळीनं करायचो. नंतर सगळ्याजणी बिझी झाल्यानंतर आपापलं करायला लागलो. बरेचदा बाहेर जेवायचो. इथं बर्फ खूप पडतो. बर्फातून घरी यायला थोडा त्रास व्हायचा आणि स्वयंपाक करणं अजिबात नकोसं वाटायचं. आता सेकंड इयरला मी वेगळ्या अपार्टमेंटमध्ये राहातेय. फेसबुकवर एक ग्रुप होता नॉर्थवेस्टर्न युनिव्र्हसिटीला जाणाऱ्यांचा. व्हॉट्स अॅप-एफबीवर बोलून खूप ओळखी झाल्या. त्यामुळं माझी पहिली सेमिस्टर भारतीय मित्रमंडळीमध्येच गेली. एक भीतीही होती की, हे लोकं आपल्याला स्वीकारतील का.. कारण आपण त्यांची एक सीट घेतोय.. ऐकलं होतं की, त्यांना भारतीयांबद्दल आणि विशेषत: विद्यार्थ्यांबद्दल काहीशी असुरक्षिततेची भावना असते. सुरुवातीला लोकं थोडं कोरडेपणानं वागताहेत, पटकन स्वीकारत नाहीयेत, असाही अनुभव आला. त्यांची स्लॅंग समजून घ्यायला आपल्याला वेळ लागतो. त्यांना आपल्यापेक्षा वेगळ्या खेळांत रस वाटतो. त्यामुळं संवाद साधण्यासाठी कॉमन टॉपिक्स खूप कमी असतात. नंतर दुसऱ्या लॅबमधल्या लोकांना भारतीय संस्कृतीबद्दल खूपच इंटरेस्ट होता. ते फारच छान वागले. आमचा इंटरकल्चरल ग्रुप आहे. माझी फ्रेण्ड इस्तंबूलची आहे. ती कुतुहलानं भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल अनेक प्रश्न विचारते. मीही इतरांच्या देश-संस्कृतीबद्दल जाणून घेते. इथले लोकं आपुलकीनं चौकशी नि मदत करतात. बसड्रायव्हर-टॅक्सीवाल्यांची ‘हॅलो-थँक्यू’ असं आवर्जून म्हणायची पद्धत मला फार आवडली.

एक-दोन किस्से फार लक्षात राहिलेत.. एकदा माझी टर्किश बेस्टफ्रेण्ड, तिची रूममेट आणि मी शिकागोमध्ये फिरायला गेलो. संध्याकाळी अचानक स्नो-स्टॉर्म आलं होतं. रेस्तराँमध्ये बसून ते बघत आम्ही गरमागरम टर्किश जेवण केलं आणि त्यांची खास कॉफी प्यायलो. बर्फामधून घरी परतताना धुडगूस घातला. स्नो-एंजल्स बनवले.. त्या रात्री फार मज्जा आली. आणखी एक आठवण – ‘थँक्स गिव्हिंग डे’ची. त्यानिमित्तानं युनिव्र्हसिटीत शिकत असल्यामुळं मला शिकागोतील डॉक्टरांच्या घरी आमंत्रित करण्यात आलं होतं. एका चायनीज मुलीचं आणि माझं त्यांच्या घरी खूप छान स्वागत झालं. त्यांनी अमेरिकन परंपरा समजावत थँक्स गिव्हिंगची गोष्ट सांगितली. पारंपरिक पद्धतीचा बेत होता. त्यांनी भारतीय परंपरा-सणावारांबद्दल विचारलं. तीन विभिन्न संस्कृतींमधले आम्ही हास्यविनोद करत एकत्र जेवलो होतो.

एकटी राहायला लागल्यापासून मी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय केल्यात. आता मला स्वयंपाकाची एवढी आवड निर्माण झालेय की, तो करणं म्हणजे माझ्यासाठी ब्रेक घेण्यासारखं असतं. इथं मिस करते ते इंडो-चायनीज फूड. ते इथं अजिबात मिळत नाही. फूड फोटोग्राफीची आवड मला इथं आल्यावरच लागली. इन्स्टाग्रामवर इंडियन फूडचे फोटो बघून मला वाटायला लागलं की, आपणही असा स्वयंपाक करावा. आताशा इन्स्टावर टाकायचेत म्हणूनही काही वेळा पदार्थ केले जातात. स्वयंपाक रोजचाच केला तरी त्याच्या सजावटीवर लक्ष दिलं जातंय.. आतापर्यंत सर्वाधिक लाइक्स माझ्या ‘मिसळपाव’ला मिळालेत. समर व्हेकेशननंतर माझ्याकडच्या पार्टीसाठी दीड दिवस स्वयंपाक करत होते. त्या स्वयंपाकाची चव भारतीयांखेरीज अमेरिकन, चायनीज, कोरियन फ्रेण्ड्सनीही फारच आवडीनं चाखली. आपल्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करताना मलाही फार बरं वाटलं.. इथं जॉब करायची इच्छा आहे. पण काही वर्षांनी भारतात परतायचंय.. कारण एकदा इथली सवय झाली की, परतायचे चान्सेस खूप कमी आहेत.

इथं समरमध्ये मी बाईकनं कॉलेजला जाते. बाईक म्हणजे बायसिकल. वीकएण्डला आम्ही फ्रेण्ड्स लेक मिशिगनजवळच्या ट्रॅकवर बायसिकल्स चालवतो. तीन-चार मैलांची रपेट. सायकलवरून कधीकधी कॉलेजलाही जाते. मस्त वाटतं. या ऐन थंडीत मात्र ट्रेननंच जायचंय कॉलेजला. निघायला हवं.. बाय!

आभा गोसावी,
एव्हनस्टन
(शब्दांकन – राधिका कुंटे ) 

‘ती’चं विश्व, ‘ती’चं अवकाश, ‘ती’चं करिअर, ‘ती’चा ध्यास.. त्यासाठी तिला घरापासून दूर जावं लागतं. देशी-परदेशी.. आपल्या अनुभवांची टिपिकल चौकट ओलांडताना कोणकोणते अनुभव बांधते ती गाठीशी? कशी वावरते, राहते परक्या प्रांतात.. कशी अॅडजस्ट करते त्या संस्कृतीत स्वत:ला.. काय काय जाणवतं तिला.. ते या सदरातून वाचायला मिळणार आहे.
तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळ्या प्रांतात, नवख्या देशात, वेगळी वाट निवडून शिक्षण, जॉबच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल लिहिताना विषय म्हणून ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com