डॉ. प्रार्थना धोत्रे, आबूधाबी

आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आपल्या करिअरचा आलेख उंचावणारी, फिजिओथेरपिस्ट प्रार्थना सांगतेय, तिच्या अबूधाबीमधील अनुभवांविषयी.

हाय फ्रेण्ड्स, विदेशिनी सदरासाठी माझे अरबी देशातले अनुभव मला शेअर करायचे आहेत. त्याआधी माझ्याबद्दल थोडंसं.. माझं शालेय शिक्षण मुंबईत झालं. अंधेरीतल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं. अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयात ज्युनिअर कॉलेजला होते. पुढं पुण्यातल्या संचेती कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये चार वर्षांचा कोर्स आणि सहा महिने इंटर्नशिप करून फिजिओथेरपिस्ट झाले. त्यानंतर मुंबईत चार र्वष काम केल्यानंतर अधिक आव्हानात्मक कामाच्या संधीसाठी आणि व्यवसायाचा आलेख उंचावण्यासाठी मी परदेशातील नोकरीच्या शोधात होते. तेवढय़ात अबूधाबीमधल्या एका कंपनीकडून ऑफर आली. त्याआधी जवळपास ४-६ महिने लागले.. पेपरवर्क आणि अबूधाबीमधील फिजिओथेरपी लायसन्स परीक्षा देण्याकरता. ती पास झाल्यावर इतर बाबींची पूर्तता केली आणि मिडल ईस्टच्या प्रवासाला निघाले.

आत्ताही आठवतंय की, सकाळी उजेडातच अबूधाबीला लॅण्ड झाले होते. खाली पाहिलं, तेव्हा वाळवंटाशिवाय काहीच दिसेना. दूरदूपर्यंत फक्त वाळवंट. विमान लॅण्ड व्हायच्या तयारीत होतं, तेव्हा एकदम आखीवरेखीव आणि सुशोभित रस्ते दिसले. अबूधाबीला लॅण्ड झाल्यावर कंपनीतर्फे पिकअप होता आणि घरी फोन करायला गाडीतच सिमकार्डही दिलं होतं. एअरपोर्टहून कंपनी अ‍ॅकोमोडेशनपर्यंतचा प्रवास चांगलाच आठवतोय.. तिथं जाण्याआधी मनात एक चित्र रेखाटलेलं की, अबूधाबी असं असावं.. वाळवंटच फक्त.. कुठंही झाडं नाहीत, पाणी नाही वगैरे.. पण खरं चित्रं वेगळंच होतं. तिथं रस्त्याला लागून खूप झाडं होती. ब्रिजवरून जाताना खाली पाणी दिसलं. संपूर्ण दृश्य अगदी सुंदर होतं. म्हणतात ना, ‘नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर’, ते खरं आहे.

मला पहिल्यापासूनच व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीची आवड असल्यामुळं त्यातील इतर पर्याय कोणते आहेत आणि त्याचा इतरांना कसा फायदा होईल, हा विचार करून मी हे क्षेत्र निवडलं. एका परीनं माझा छंद जोपासला. फिजिओथेरपिस्टचं काम म्हणजे पेशंटच्या शारीरिक अडचणी कमी करणं किंवा दूर करणं. ते दुखणं असो किंवा शस्त्रक्रियेनंतरचा आलेला दुबळेपणा किंवा अर्धागवायू झालेल्या पेशंटना परत त्यांचं रोजचं आयुष्य सुरळीत होण्यासाठी कसं वावरायचं, हे शिकवण्याचं काम आमचं असतं. इकडच्या कामातला फरक इतकाच की, पेशंट क्लिनिकमध्ये येण्याऐवजी मी त्यांच्या घरी जाऊन ट्रीटमेंट देते. याचा फायदा असा की, पेशंटला प्रवासाचा त्रास होत नाही. स्वत:च्या घरीच असल्यामुळं ते अधिक आरामशीरपणं व्यायाम करू शकतात. माझ्या कामाच्या निमित्तानं मी सतत वावरते. त्यामुळं मला वर्षभराच्या आत जवळपास सगळे रस्ते पाठ झालेत. शिवाय इकडच्या खड्डेविरहित रस्त्यांवर गाडी चालवण्याची मजाच वेगळी. माझ्या टीममध्ये भारतीय आणि फिलिपिनो सहकारी आहेत. वेगवेगळी शैक्षणिक पाश्र्वभूमी आणि स्पेशालिटीमुळं आम्ही सतत एकमेकांसाठी प्रेझेंटेशन करतो. त्यामुळं आम्ही एकसमानपणं पेशंटना ट्रीट करू शकतो. आम्ही टीममेंबर्स बीच मीटिंग करतो. अप टू डेट राहणं महत्त्वाचं असतं. म्हणून कॉन्फरन्सेस सतत अटेंड कराव्या लागतात.

इथलं वर्क कल्चर खूप चांगलं आहे. सगळे खूप फ्रेण्डली आणि अ‍ॅप्रोचेबल आहेत. कुणी बॉस किंवा एम्प्लॉयर नसून एका कंपनीचे एम्प्लॉईज म्हणून वावरतात. त्यामुळं काम करताना काही भीती किंवा अडचण वाटत नाही. कधी काही वाटलं तर आपण कामासाठी ‘सीईओ’शी फोनवर बोलू शकतो. क्वचित काही चूक झाली तरी खरा प्रॉब्लेम कळल्याशिवाय काही फिंगरपॉइंटिंग नाही होत. तो प्रश्न सहज व सुरळीतपणं सोडवला जाणं, हाच उद्देश असतो. पेशंट हे कुठंही सारखेच असतात. पण इथं भाषेच्या अडचणीमुळं मला सुरुवातीला ते काय बोलतात, हे कळायचं नाही. घरी काळजी घेतल्यानं इथल्या केसेसमध्ये लक्षणीय प्रगती पाहायला मिळते. लोकं खूप आदरानं आपल्याशी बोलतात. आपण परक्या देशातून आलो आहोत, असं जाणवून देत नाहीत. भाषा समजत नाही तरी ते प्रेमानं त्यांची व्यथा समजावतात. सरकारतर्फे लोकांना सरकारी हॉस्पिटलात मोफत उपचार असतात, त्यामुळं लोक क्वालिटी ट्रीटमेंटचा लाभ घेऊ  शकतात.

मुंबईला असताना कधी स्वयंपाक करायला किंवा शिकायला वेळच मिळाला नाही. पण इथं आल्यावर आईशी रोज स्काइपवर बोलून किंवा यूटय़ूबवर रेसिपीज बघून शिकले. सुरुवातीला सिटीमध्ये राहात असल्यामुळं आणि भारतीय लोकसंख्या बरीच असल्यामुळं आपल्या गरजेच्या गोष्टी – वस्तू लगेच खाली मिळायच्या. त्यामुळं जेवण तसं मॅनेज होऊन जायचं. बाहेर खायला मला जास्त आवडत नाही, म्हणून शक्यतो स्वयंपाक घरीच करते. इथं आल्यावर इकडं जंक फूड पाहून आपलं टिपिकल मुंबई स्नॅक्स खावेसे वाटायचे. मग काही भारतीय मित्रमंडळींसोबत बाहेर कधीतरी खायला जाणं व्हायचं. अरेबिक फूडमध्ये बिर्याणी आणि लॅम्बचे पदार्थ खूप प्रसिद्ध नि स्वादिष्ट आहेत. ते भारतीय पदार्थाएवढे मसालेदार नसूनही चविष्ट असतात. एका माणसाकरता जेवण करणं मात्र खूप अवघड जातं. इथले फ्रेण्ड्स मला भाजी किंवा वाणसामान खरेदी करताना चिडवतात. कारण मी मोजून भाज्या घेते. भाजी घ्यायला मॉलमध्ये जावं लागतं. तिथं वेगवेगळ्या प्रांतांतून भाज्या येतात. हॉलंडमधून टोमॅटो, ब्राझीलहून लिंबू, यूएसमधून बटाटे वगैरे. खूप मज्जा येते, हे ग्लोबल शॉपिंग करताना. इथं इतक्या अनोखळी भाज्या नि फळं असतात की, आपण त्यांची कधी नावंही ऐकलेली नसतात.

‘वीकडेज’ला दिवसभर काम करते. मग जिमला जाते. त्यानंतर घरी आल्यावर थोडा आराम करते. थोडी पेशंट हिस्ट्री वाचते, जेवते नि झोपते. वीकएण्डना बरेचदा बाहेर फिरायला जाते. नवनवीन क्युझीन ट्राय करते. चित्रपट बघते. जवळजवळ ८ – ९ महिने उन्हाळा असतो. त्यामुळं जास्त बाहेर फिरता येत नाही. फक्त मॉलसारख्या ठिकाणी फिरता येतं. पण बसस्टॉप, बस आणि टॅक्सी एसी असल्यामुळं फारशा उन्हाच्या झळा जाणवत नाहीत. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात वातावरण सुरेख असतं. तेव्हा बाहेर फिरणं, जॉगिंग करणं, आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीज करणं शक्य होतं. मागच्या वर्षी वॉटर पार्क, आउटडोअर ऑबस्टॅकल क्रॉसिंग, रिव्हर राफ्टिंग आणि मिरॅकल गार्डन हे सगळं पाहता आलं. यंदा फेरारी वर्ल्ड, डेझर्ट सफारी आणि क्रूझवर जायचा बेत आखतेय.

भाषा आणि संस्कृतीमध्ये बराच फरक आहे. पेशंटच्या घरी जात असल्यानं मी अगदी जवळून या गोष्टींचं निरीक्षण करू शकले. काही शब्द हिंदी किवा उर्दूसारखे आहेत. उदाहरणार्थ शुक्रान म्हणजे शुक्रिया, मुमकिन किंवा मौजूद वगैरे. पण काही शब्द हिंदीसारखे असूनही त्यांचे अर्थ वेगळे आहेत. त्यामुळं बोलताना विचार करून बोलावं लागतं. इथली भाषा शिकले, यापेक्षा ती शिकावी लागली. फिजिओथेरपीच्या क्षेत्रात संवाद साधणं, अतिशय आवश्यक असतं. अरबी भाषा बोलायला कठीण आहे, पण माझ्या क्षेत्रापुरती आणि दैनंदिन गरजेपुरती ती शिकले. इथली संस्कृती खूप अदबशीर आहे. मोठय़ांना आणि स्त्रियांना इथं मान दिला जातो. खूप प्रगतिशील लोक आहेत ही. लोकांना त्यांच्या भाषा व संस्कृतीविषयी अभिमान आहे. सगळी कामं अरबीमध्येच होतात. काही लोकांना तुटक इंग्लिश येत असल्यामुळं थोडंफार काम होऊन जातं. इथल्या भारतीयांना मीही भारतीय आहे हे कळल्यावर ते खूश होऊन गप्पा मारतात.

मला कविता करायला आवडायचं. पण सध्या त्यासाठी वेळ मिळत नाही. मी नाण्यांचा संग्रह करते आहे. इथं आल्यावर त्या संग्रहात इथल्या आणि आंतरराष्ट्रीय नाण्यांची भर पडली आहे. इथले लोक इथल्या जागेसारखीच आहेत. एका शब्दात सांगायचं तर ‘सुंदर’ आहेत. म्हणजे ती मनानं सुंदर आहेतच, पण आपल्या पेहरावाबाबतही जागरूक आहेत. मुली बुरख्यात असल्या तरी सुंदर मेकअप आणि छान शूज घालून वावरतात. पुरुष क्लीन शेव्ह केलेले किंवा छान दाढी ठेवून असतात. इथं सुंदर गाडय़ा नेहमी दिसतात. एकदा सिग्नलला थांबले असताना माझ्या पुढं निळी रोल्सरॉइस होती. तिच्या बाजूला एक पोर्शेची स्पोर्ट्स व्हर्जन आणि माझ्या एका बाजूला एक फेरारी होती. इथं आल्यापासून मर्सिडीझ आणि ऑडी आता नॉर्मल गाडय़ांच्या पंक्तीत जाऊन बसल्यात.

सुरुवातीला क्रॉसिंग करताना मी बाजू चुकत असे. डाव्या हाताला ड्राइव्ह असल्यामुळं सगळंच उलट वाटतं. आजही मी क्रॉस करताना दोन्ही दिशांना बघते. इथं रस्त्यावर गाडय़ा असल्या तरी काही आवाज नाही. कुणीही उगाचच हॉर्न वाजवत नाहीत नि रात्री हॉर्न वाजवण्याला बंदीच असते. कुणालाही कसलीही घाई नसते. लोकं इथं गाडय़ा थांबवून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडायची संधी देतात. लेनची शिस्त पाळणं आणि गाडीचे सिग्नल्स अचूक देणं या गोष्टी सुरुवातीला खूप मजेशीर वाटायच्या. इथली ड्रायव्हिंग लायसन्सची प्रोसिजर खूप सिस्टिमॅटिक आणि कठीण आहे. काही लोक वर्षांवर्षांनी त्यासाठी प्रयत्न करतात. सगळ्यांना थिअरी क्लासेस अटेंड करावे लागतात नि मग परीक्षा द्यावी लागते. पास झालात तर पुढची प्रोसिजर असते. इथं लेफ्ट हॅण्ड ड्राइव्ह नि ऑटोमॅटिक गाडय़ा असल्यामुळं इनिशिअली अवघड गेलं. मला चांगलंच आठवतंय की, माझा पहिला प्रॅक्टिकल क्लास होता. इन्स्ट्रक्टरनं गाडी सुरू करून चालवायला लावली. मी भारतातला धडा आठवून गाडी हळू चालवायला सुरुवात केली. ३०-४० किमीच्या गतीनं. ती म्हणाली की, आतल्या रस्त्यांवर ८०चा वेग ठेवावा लागतो. आपल्याकडं ८० म्हणजे फास्ट..

दुसरा अनुभव आठवतोय.. मी सहकाऱ्यांसोबत कंपनी व्हिलामध्ये राहते. बरेचसे सहकारी फिलिपिनोज आहेत. त्यांना भारतीय जेवणाबद्दल बरीच उत्सुकता वाटते. सुरुवातीच्या काही दिवसांतली गोष्ट. मी भाताचा कुकर लावला होता. आपल्याला कुकरच्या शिट्टीची सवय झालेली असते. पण इथं कुकरची शिट्टी वाजल्यावर सगळे घाबरून किचनबाहेर पळाले. तेव्हापासून कुकर लावल्यावर मी सगळ्यांना आधीच कल्पना देऊन ठेवते, पण तरीही ते किंचाळतातच.. हा देश खूपच सुरक्षित आहे. रात्री बारा वाजताही कधी असुरक्षित वाटलं नाही. माझ्या कामाकरता खूप लांब ड्राइव्ह करावं लागतं. लोकांच्या घरी ट्रीटमेंटसाठी जावं लागतं. पण कधीच असुरक्षित वाटलं नाही. इथं आल्यापासून माझा जगाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आपल्या कम्फर्ट स्पेसमधून बाहेर पडून जग बघितल्यानं आत्मविश्वास वाढलाय. पुढचे प्लॅन्स अजून ठरलेले नाहीत. यूएसएला जायची संधी मिळाली तर नक्की जाईन.. विश मी लक..