‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मध्ये अभिनेत्री अश्विनी भावे यांच्याशी अनौपचारिक गप्पांची मैफल रंगली होती. या गप्पांमधून या लोकप्रिय अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडले गेले. चित्रपटसृष्टीतील अनुभवांचे आणि व्यक्तिगत आयुष्यातले अनेक किस्से सांगत त्यांनी प्रेक्षकांशी दिलखुलासपणे संवाद साधला. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील वातावरण, चित्रपटाची भाषा, अमेरिकेतील आयुष्य, पुनरागमनाचे अनुभव अशा अनेक गोष्टी या संवादातून उलगडल्या. कार्यक्रमाला उपस्थित काही तरुणाईच्या याविषयी प्रतिक्रिया..

मनमोकळा संवाद

अश्विनी भावेंबरोबरचा संवाद आवडला. एका सेलेब्रिटीपलीकडे जाणारी त्यांची पर्सनॅलिटी मला खूप आवडली. त्यांनी मनमोकळा पण मुद्दय़ाला अनुसरून संवाद साधला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला प्रचंड आत्मविश्वास या बोलण्यातून दिसत होता. एक स्त्री करिअर सोडून संसारासाठी परदेशात जाते, तेव्हाचा त्यांचा अनुभव आणि त्याबद्दलचे त्यांचे विचार भावले.

अर्चना सोनावणे

 

मनाची कवाडं उघडली

शिकायला काही वय नसतं. नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी मनाची कवाडं उघडी ठेवावी लागतात, हे अश्विनी भावे यांच्या अनुभवांवरून शिकायला मिळालं. त्यांच्या बोलण्यातून जनरेशन गॅप अजिबात जाणवली नाही. दिलखुलास तरीही खंबीर व्यक्तिमत्त्व खूपच भावलं

अश्विनी शर्मा

 

शंकाचं निरसन

अभिनय ही माझी पॅशन आहे. मला यामध्येच करिअर करायचं आहे. चित्रपट क्षेत्राविषयी माझ्या मनात अनेक शंका होत्या. त्यांचं निरसन अश्विनी भावे यांच्याशी झालेल्या गप्पांमधून झालं. त्यांच्या अभिनयाच्या प्रवासातून, चित्रपटसृष्टीच्या अनुभवातून मला खूप काही शिकायला मिळालं. मी प्रथमच ‘व्हिवा लाउंज’च्या कार्यक्रमाला आलो होतो. आता अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना भेटायला नियमित येणार आहे.

सचिन गोडबोले

 

अनुकरणीय जिद्द

लग्नानंतर मुंबईत मी अटेंड केलेला हा पहिलाच कार्यक्रम. अश्विनी भावेंना भेटायची उत्सुकता होतीच. त्यांना जवळून पाहण्याची, ऐकायची इच्छा पूर्ण झाली. एक कलाकार म्हणून त्यांची विचार करण्याची पद्धत, जिद्द आणि कॉन्फिडन्स खरंच अनुकरणीय आहे. या गोष्टी आत्मसात कारायचा मी नक्की प्रयत्न करेन.

प्रियंका खंबाळे

 

कामातली निष्ठा भावली

मला कार्यक्रम खूप आवडला. मी अश्विनी भावे यांचे अनेक चित्रपट बघितले आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका एका भूमिकेपासून वेगळी असते. मला त्यांची कामाची जिद्द खूप भावली. कामामागची प्रेरणा आज समजली. त्या मोठय़ा अभिनेत्री असल्या तरी कामाप्रति त्यांची निष्ठा आजही कायम आहे. ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मुळे अशा अभिनेत्रीला भेटायची संधी मिळाली.

मिथिला शेटय़े

 

दृष्टिकोन बदला

पुन्हा एकदा ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या कार्यक्रमाला येऊन काही नवीन ऐकता आलं. समजून घेता आलं. सेलेब्रिटीकडे बघण्याचा आपला ठरावीक दृष्टिकोन असतो. पण अश्विनी भावे यांच्या वागण्या-बोलण्यातून सेलेब्रिटी स्टेटसपलीकडचं व्यक्तिमत्त्व दिसलं. एक विचारी अभिनेत्री समजली.  जिद्द, कामावरचं प्रेम, निष्ठा, मेहनतीची तयारी आणि महत्त्वाकांक्षा यशाकडे नेते, हे जाणवलं.

प्रज्ञा दामले

 

प्रवासातून दिशा सापडली

मी प्रथमच ‘व्हिवा लाउंज’चा कार्यक्रम प्रत्यक्ष बघितला. लाडक्या अभिनेत्रीला प्रत्यक्ष बघायची, ऐकायची, भेटायची संधी मला या कार्यक्रमामुळे मिळाली. अश्विनी भावे यांनी करिअरमधील आणि आयुष्यातील चढ-उतार मोकळेपणाने मांडले. मी सध्या नोकरीच्या शोधात आहे, यातून मला दिशा सापडली. जे काही कराल ते आनंदसाठी करा, हा सल्ला मी नेहमीच लक्षात ठेवेन.

संदीप काटके

 

विचारवंत कलाकार भेटली

‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ला येण्याची माझी पहिलीच वेळ. कार्यक्रम खूपच सुंदर झाला. अश्विनी भावेंची डॅशिंग पर्सनॅलिटी मला खूपच आवडली. त्यांचे विचार मला आवडले. एका विचारवंत कलाकाराची आज भेट घडली. त्यांचं मनमोकळं बोलणं, त्यातून ओसंडणारा आत्मविश्वास मला आवडला. अशाच वेगवगेळ्या क्षेत्रांतील मंडळींना ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मधून भेटता येतं, त्यामुळे हा उपक्रम खूपच स्तुत्य आहे.

नीलम सोनावणे

भावलेली मुलाखत

मी दिवेआगारला राहते. ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’बद्दल जाहिरात वाचली, दादरला एका कामानिमित्त आलेच होते, त्यामुळे कार्यक्रम न चुकवता आले. सुरुवातीला केवळ मुलाखतीचा कार्यक्रम म्हणजे कंटाळवाणा असेल असं वाटत होतं, परंतु हळूहळू अश्विनी भावे यांच्याबरोबरची गप्पांची मैफल रंगत गेली. थोडय़ा वेळात परतायचं ठरवून गेलेली मी शेवटपर्यंत थांबले. अश्विनी भावे यांचं कॉन्फिडंट व्यक्तिमत्त्व खूपच भावलं. निर्णय घेण्याअगोदर खोलवर विचार केला पाहिजे हे मी त्यांच्याकडून शिकले.

पूजा गंद्रे

 

खंबीर आणि बेधडक व्यक्तिमत्त्व भावलं

मला चित्रपट, नाटकं यांची खूपच आवड आहे. ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मध्ये अश्विनी भावे येणार आहेत हे समजलं आणि मी या कार्यक्रमाला यायचंच हे ठरवलं. त्यांचा ‘ध्यानीमनी’ हा चित्रपट पाहून त्यांच्याविषयी उत्सुकता वाढली होती. ‘व्हिवा लाउंज’च्या या संवादातून एका अभिनेत्रीपलीकडे माणूस म्हणून अश्विनी भावेंची ओळख झाली. त्यांचं खंबीर आणि धीट व्यक्तिमत्त्व मला खूपच आवडलं.

सुधीर घाणेकर