बालकलाकार ते ‘चला हवा येऊ द्या’सारख्या लोकप्रिय शोमधली एकमेव विनोदी अभिनेत्री असा पल्ला गाठणाऱ्या श्रेया बुगडे या कलाकार वल्लीशी बोलण्याचा योग ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत, लागू बंधू सहप्रायोजित ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’च्या निमित्ताने जुळून आला. एखाद्या व्यक्तीचं निरीक्षण करून त्याच्यासारखं बोलणं, वागणं या गोष्टी लहानपणापासून तिच्या नकळत अंगी बाणवल्या गेल्या. अभिनय आणि ती वेगळे राहिलेलेच नाहीत जणू इतक्या सहजपद्धतीने नवनव्या व्यक्तिरेखांमध्ये प्रवेश करत प्रेक्षकांसमोर येणाऱ्या आणि त्यांची मनं जिंकून घेणाऱ्या श्रेयाला बोलतं केलं ‘लोकसत्ता’चे प्रतिनिधी रेश्मा राईकवार आणि किन्नरी जाधव यांनी..

कामातून शिक्षण

मी कोणत्याच अभिनयाच्या शाळेत शिकले नाही. बरेच जण मला मुलाखतीदरम्यानही विचारतात की तुम्ही अभिनय कुठे शिकलात? माझी सुरुवातच वेगळी होती. प्रेक्षक मला अभिनेत्री म्हणून ओळखू लागले ते म्हणजे मीना मावशीच्या बाल लैंगिक शोषण या विषयावर आधारित ‘वाटेवरती काचा गं’ या नाटकातून. त्याचे आम्ही महाराष्ट्रभर रेड लाईट परिसरात प्रयोग केले. मग कॉलेजला जायला लागल्यापासून ‘एड्स अवेअरनेस’वरचं ‘दिल मांगे मोअर’ हे नाटक केलं. त्या वयात आईवडिलांनी ‘ज्या’ गोष्टी सांगायला हव्या होत्या त्या मी नाटकांतून शिकले. माझ्या कामातून तरुणांना संदेश देत होते. या सगळ्यात माझी मीच शिकत गेले. नाटकाच्या वेळीही प्रयोगांच्या निमित्ताने रेड लाईट एरियात म्हणा किंवा अन्य ठिकाणी फिरताना इतक्या गोष्टी जवळून पाहिल्यामुळे त्यातूनच माझं त्याबद्दलचं शिक्षण आपोआप होत गेलं.

विनोदाचेही रिटेक!

विनोदी प्रसंग साकारतानाही रिटेक होत असतात, पण मग त्याची मजा आम्हालाच येत नाही. प्रेक्षकांना हसायला येऊ  शकतं कारण ते पहिल्यांदाच पाहत असतात. कधी कधी शूट अर्ध्यावर थांबतं, ते रिशूट करावं लागतं. कधी लाईटचा किंवा मग कॅमेऱ्याची समस्या येते. नऊचं स्किट तांत्रिक कारणाने थांबलं तर तेवढंच पोस्ट शूट करावं लागतं. आलेले पाहुणे शूट आटोपून घरी जाण्यासाठी निघाले की मग आम्ही रात्री साडेचारला शूट करतो. त्या वेळी नऊ वाजता जो उत्साह होता तोच साडेचारच्या शूटला दाखवणं कठीण असतं. पण ते तितक्याच उत्साहाने शूट करावं लागतं. कित्येकदा असं घडतं की दुसऱ्या दिवशी सकाळी शूट संपतं. ‘चला हवा येऊ  द्या’च्या शूटिंगची गंमत म्हणजे ते कधी संपेल हे विधात्यालाही सांगता येणार नाही इतकं ते लांबत जातं, कधी कधी २२ तास शूटिंग सुरू असतं.

रोज नव्या भूमिका

‘चला हवा येऊ  द्या’चे चारशे एपिसोड झाले. त्यातही मला माझ्या भूमिकेत वेगळेपण कसं आणता येईल यावर मी सुरुवातीपासूनच लक्ष ठेवून होते. आमच्या कपडय़ांपासून मेकअपपर्यंत वेगळेपण ठेवण्याचं सगळं श्रेय आमच्या टीमचं आहे. आम्ही सगळे एकत्र बसून स्क्रिप्ट तयार करतो. त्यावर काय हवं, काय नको ते बघतो. जे प्रेक्षकांना आवडणार नाही ते आम्ही लगेच काढून टाकतो. माझ्याबाबतीतही एखादं काम झालंय तर त्याच पद्धतीचं परत नको, असा माझा हट्ट असतो. शोमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखा करतानाही मी सतत निरीक्षण करत असते त्याचाच उपयोग होतो. लहानपणी शाळेत असताना टीचर काय घालून आली होती, कशी बोलत होती हे अभ्यास न करता घरी येऊ न अर्धा पाऊ ण तास करून दाखवायचे. लहानपणीपासूनची ही कला कुठेतरी आता उपयोगी पडते आहे. शोमध्ये डॉक्टर विचारतो एखाद्या व्यक्तिरेखेविषयी.. तेव्हा मी त्याला सांगते की मी पारशी बाई करू का? मग तुला पारशी बोलता येतं असा त्याचा कु तूहलमिश्रित प्रश्न असतो. येत नाही पण प्रयत्न करेन थोडा.. असं सांगत मी पारशी, गुजराती बायकांचा अभ्यास करते आणि मग कुशलसोबत शोमध्ये पारशी बाई साकारताना त्याचा फायदा होतो.

हसवणं महाकठीण

विनोदी भूमिका करताना बऱ्याच समांतर गोष्टी असतात. जसं ‘क्रॉस ड्रेसिंग’. पूर्वीच्या कलाकारांपासून हे आपण पाहत आलोय. स्त्री कलाकारांच्या बाबतीत विनोदी भूमिकेसाठीही काही परिमाणं असतात. पुरुषांनी स्त्रीच्या भूमिका करताना त्यांचं तसं दिसणं सोपं झालं आहे ते कपडे आणि लुक देऊन पूर्ण केलं जातं. मुळात तसं त्यांनी साडी नेसून वगैरे स्त्री पात्र साकारणं अजिबात सोपं नाही आहे. त्यातही मग त्यांचं शरीराने जाड असणं, इतरांपेक्षा वेगळं दिसणं याला केंद्रस्थानी ठेवून विनोदनिर्मिती केली जाते. माझ्याबाबतीत तसं काहीच होतं नव्हतं. कुठलीच समीकरणं जुळत नव्हती जी मला विनोदी अभिनयाजवळ घेऊन जातील. ‘फू बाई फू’मध्ये असतानाच मला ‘चला हवा येऊ  द्या’साठी विचारलं तेव्हा मला अशाप्रकारे विनोदी भूमिका करता येत नाहीत, असं मी त्यांना सांगितलं. कारण तेव्हा सुप्रिया पाठारे, विशाखा सुभेदार यांना मी पाहत आले होते. मी हे स्वीकारलं होतं की मला हे जमणार नाही. पण त्यांनी मला एक ट्रायल एपिसोड करण्यासाठी विनंती केली. मग त्यांच्यासोबत मी ‘फू बाई फू’चं सातवं पर्व केलं आणि त्यात रमले. खरंतर खूप कठीण आहे परफॉर्म करणंसुद्धा आणि त्या पद्धतीचं स्क्रिप्ट माझ्यासाठी लिहिणं, कारण विनोदनिर्मिती करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. पण माझ्याबरोबरच्या मंडळींनी माझा हात पुढे नेतच मला इथवर आणलंय. एकतर विनोदी भूमिका हा माझा जॉनर कधीच नव्हता. अजूनही ‘चला हवा येऊ द्या’मध्ये नवीन पाहुणे आले की घसा कोरडा पडतो, सतत पाणी प्यावं लागतं, पण त्यातही मला आनंद आहे.

सेटवर रंगणारा रिअ‍ॅलिटी शो

आमच्या शोचा जॉनर विनोदी असल्याने स्क्रिप्टवरून कधी वाद होत नाही. शेवटी डॉक्टरही सगळ्यांना सांभाळून, त्यांचा विचार घेऊन लिहीत असतो. मतभेद खूप होतात, पण भांडणं ही फक्त टाइमपास गोष्टींवरून होत असतात. सेटवर खूप धमाल सुरू असते. एकतर डॉक्टर एकटाच लिहीत असतो आणि आम्ही टाइमपास करत असतो. त्याचं लिहून झालं की तो मग आम्हाला अक्षरश: गोळा करून कामासाठी तयार करतो. आमच्यात सर्वात लहान बाळ मी नाही, भारत गणेशपुरे आहे. त्याचं कोणालाही बाटली फेकून मार वगैरे चाललेलं असतं. भाऊ  कदम नेहमी आगीत तेल ओतायचं काम करतो, त्यामुळे सतत मजा असते. बरं भाऊचा चेहरा असा आहे की तो झोपेतून उठला तरी तसाच सीन करतो. एकतर तो खूप काम करतो. त्यामुळे आम्ही जेव्हा एकत्र वाचन करायला बसतो तेव्हाही तो जागेवर नसतो. त्याला शोधायचं तर तो मेकअप रूममध्ये एसी लावून झोपलेला असतो. आम्हालाच त्याला सीनची आठवण करून द्यावी लागते. पण तो कायम ताजातवाना असतो. आम्हीच बऱ्याचदा चिडचिड करतो की, ‘चला पॅकअप करा’ वगैरे, पण सेटवर ही धम्माल अशीच सुरू राहते, शेवटी नीलेशच आम्हाला सांभाळतो.

प्रयोग फसू शकतात..

पुरुष कलाकार स्त्री पात्र साकारतायेत मात्र विश्व दौऱ्यात त्याचा अतिरेक झाला, अशा प्रतिक्रिया आम्हाला प्रेक्षकांकडून मिळाल्या. जे निखळ मनोरंजन आम्ही स्टुडिओमध्ये असताना मिळत होतं ते आता प्रेक्षकांना मिळत नाहीये. मी हे सांगू इच्छिते की आम्हीही नवनवीन प्रयोग करत असतो. कशाने तुम्हा प्रेक्षकांचं मनोरंजन होईल हे आधी ठरवता येत नाही. ‘चला हवा येऊ  द्या’ जेव्हा सुरू झाला तेव्हा तोही ३० एपिसोड्सचा एक प्रयोग होता. तो प्रयोग फसू शकला असता, पण लोकांना तो आवडला आणि त्याच ३० एपिसोड्सचे आज ३०० एपिसोड झालेत. तीन वर्ष या शोला पूर्ण झाली. ‘चला हवा येऊ  द्या’चा  विश्व दौरा हाही एक प्रयोगच होता. काही तांत्रिक गोष्टींमुळे त्या तुमच्यापर्यंत नीट पोहोचल्या नाहीत. जर मला तयार व्हायला एक तास लागू शकतो तर पुरुष कलाकाराला स्त्री भूमिकेसाठी तयार व्हायला अडीच तास लागतात. बायकांनाही काही तास साडी नेसल्यानंतर कधी ती सोडेन असं होतं. इथे तर पुरुष कलाकार अनेक तास साडी, विग, मेकअप लावून बसलेले असतात, शूटिंग करत असतात. त्यातूनही सगळं छान करायचं, छान दिसायचं आहे. ते कुठेही घाणेरडे दिसायला नको, कोणाच्या भावना दुखवायला नको, हे सगळं लक्षात ठेवूनच त्यांच्या तोंडचे संवाद लिहिले जातात. ती खूप मोठी जबाबदारी असते. यामध्ये खूप वेळ जातो परंतु तोच कलाकार तुमच्यासमोर जेव्हा स्त्री भूमिकेत येतो तेव्हा पडद्यावर तो किती दिसतो? सगळं मिळून त्याचं काम खरं म्हणजे सात-आठ मिनिटांचंच असतं, पण दिवसच्या दिवस तो त्या भूमिकेत वावरत असतो.

ड्रीम रोल..

मी असा कधी विचार केला नाही, पण स्मिता पाटील यांच्यासारखं काम करायला मला आवडेल. मला त्यांच्यासारखं काम करायचं आव्हान घ्यायला आवडेल. विनोदी भूमिकांमध्ये ड्रीम रोल असं काही नाही आहे, पण शक्य झालंच तर अमेरिकेतील विनोदी अभिनेत्री एलेन डीजेनरससारखं काम करायचं आहे. तिचा प्रवास खूप सुंदर आहे. ती आधी स्टॅण्डअप कॉमेडी करायची. नंतर तिने स्वत:चा टॉक शो सुरू केला ज्यात बराक ओबामासारख्या मोठय़ा व्यक्ती येतात. या शोच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक कमाईतून तिने स्वत:ची एक संस्था स्थापन केली आहे. जी वेगवेगळ्या लोकांना, मुलांना मदत करते. मलाही असंच काहीसं काम करायचं आहे म्हणजे माझा असण्याचा काही तरी फायदा होईल. त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन.

कलाकाराचं ‘स्विच ऑन अ‍ॅण्ड ऑफ’

माणसाला हसवणं हे खूपच कठीण काम आहे आणि त्यातून स्वत: दु:खात असूनही इतरांना आनंद देणं हे प्रत्येक कलाकारासाठी आव्हान असतं. आमचा असाच एक शो सुरू होता तेव्हा कळलं की भारतदादाचे वडील अचानक गेले. त्यामुळे तो पुढच्या आमच्या इव्हेंटलाही येऊ  शकला नाही. पण जेव्हा तो परत आला शोमध्ये तेव्हा त्याने त्याचं दु:ख दाखवलं नाही. शूटिंगच्या वेळी त्याच्या आयुष्यात काय घडलंय हे अजिबात दाखवून न देता चेहऱ्यावर स्मित ठेवून त्याने चित्रीकरण पूर्ण केलं. प्रत्येक कलाकारासाठी ही कठीण परिस्थिती असते. दु:खातही आनंदी राहून हसवणं हे अवघड आहे पण आपली जबाबदारीच मनोरंजन करण्याची आहे तर हसतमुख राहणं गरजेचं आहे. कारण ते आमचं कर्तव्य आहे. त्यातून शाब्बासकीची थाप नेहमीच मिळते. कलाकाराचं आयुष्य हे स्विच ऑन आणि ऑफप्रमाणे असतं. जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर रंग लागतो तेव्हा तुमचं कलाकाराचं आयुष्य हे स्विच ऑन असतं व जेव्हा तो उतरतो तेव्हा ते स्विच ऑफ होतं.

आई नेहमीच वास्तवाची जाणीव करून देते..

आपण प्रसिद्धीच्या झोतात आहोत हे कधीच मनात येऊ  द्यायचं नाही. मी शाळेत असताना सगळीकडून खूप अ‍ॅवॉर्ड्स मिळू लागले, नंतर कॉलेजमध्येही खूप बक्षिसं मिळवली. असंच एका अ‍ॅवॉर्डच्या कार्यक्रमानंतर मी घरी आले. सगळं छान मस्त कौतुक झालं. तेव्हा माझी आई प्रत्येक वेळी मला पत्र किंवा भेटकार्ड द्यायची. तिने मला तेव्हाही एक भेटकार्ड दिलं होतं. जिच्या मुखपृष्ठावरती एक मांजर होती जिचं शरीर गुबगुबीत होतं आणि डोकं एकदम बारीक होतं. त्यावरून आईने सागितलं होतं की तू स्वत:हून समजून घे मला काय सांगायचं आहे ते.. अजूनही बऱ्याचदा असं होतं की थोडीशी हवा गेली की माझी भाषा वेगळी होते. तेव्हा त्याच क्षणी मला जमिनीवर आणण्याचं काम माझी आई करते. अशी एक व्यक्ती घरात हवीच जी तुम्ही कितीही मोठे झालात तरी  माणुसकी विसरता कामा नये याची आठवण करून देत राहील.

पुन्हा रंगभूमी

मला परत नाटक करायला आवडेल. मालिका करतानाची प्रक्रिया मोठी असते. म्हणजे तीन मिनिटांचा सीन दिसतो मात्र प्रत्यक्षात त्यासाठी एक ते दीड तास शूट केलं जातं. एक मास्टर शॉट, टू शॉट व नंतर क्लोजअपमध्ये. त्यामुळे एक वाक्य मी मालिकेत तीनदा बोलते. जे नाटकात होत नाही. तुम्ही एकदा स्टेजवर आलात की प्रेक्षक समोर असतात. तुमचा बाण सुटला की सुटला. ‘चला हवा येऊ  द्या’चं शूटिंग हे असंच होतं. स्टेजवर खूप कॅमेरे असतात. एकदा आम्ही स्टेजवर आलो की मग आम्ही सगळे एकत्र असतो. तिथे स्टेजवर असल्याची भावना सतत मनात असते, कारण तिथे लाइव्ह ऑडियन्स आम्हाला मिळतो. नाटकांसाठी मला खूप ठिकाणी विचारणाही झाली, पण अडचण अशी आहे की ती नाटकं विनोदी अंगाची आहेत. आणि मला परत तसंच प्रेक्षकांसमोर यायचं नाहीये. मलाही कलाकार म्हणून वेगळं काम करायचंय.

बालकलाकार म्हणून सुरुवात..

माझी सुरुवात विनोदी भूमिकेने झालीच नाही. लहानपणापासून नाटक करायचे पण अभिनयाची खरी सुरुवात झाली ती म्हणजे माझी मेन्टॉर आणि माझी लाडकी मावशी मीना नाईक हिच्यापासूनच. माझं या ठिकाणी असण्याचं कारणच ती आहे. मीना मावशी लहान मुलांचं नाटक बसवायची. नुसतीच नाटकं नाही तर इतर अनेक सामाजिक कामात तिचं सहकार्य असतंच. मी तिचं या क्षेत्रातलं एक बाळ आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळे तिसरीपासून मराठी बाराखडीची सुरुवात झाली होती. शाळेत मी खूप सक्रिय होते, स्पर्धामध्ये भाग घ्यायचे, १५ ऑगस्टसाठी भाषणं द्यायचे, परिसंवादात सहभागी व्हायचे, लहान मुलांसोबत खूप असायचे. तर माझ्या आईच्या व मीना मावशीच्या एका कॉमन मैत्रिणीने नाटकात भाग घेण्याविषयी सुचवलं. त्यामुळे असंच एकदा मे महिन्याच्या सुट्टीत पृथ्वी थिएटरमध्ये मीना मावशीची लहान मुलांची नाटकं होती. तेव्हा एका प्रयोगाला मी गेले. तिने मला घरी यायला सांगितलं आणि माझ्या हातात तेव्हा मराठीत लिहिलेलं तीन अंकी पटकथेचं बाड दिलं. तेव्हा नुकतीच माझी मराठी बाराखडीची सुरुवात झालेली, त्यामुळे माझ्या आईला फारच टेन्शन आलं, हे काही पेलणारं नाहीये असं वाटायचं. मीना मावशीने तेव्हा माझा हात धरला आणि आज तोच हात धरून मी आज इथे उभी आहे.

मराठी सोडून हिंदीत जाणार नाही

मी मराठी पूर्णपणे सोडून हिंदीमध्ये कधीही जाणार नाही हे मी ठामपणे सांगते. आणि हिंदीमध्येही काम करायला आवडेल पण आपल्याकडे तयार होणारे सिनेमे, साहित्य याचा दर्जा खूप वेगळा आहे. मला जमिनीवर पाय ठेवून उंच उडायला आवडेल. मराठीचा पाया भक्कम करून मग पुढे तुमच्या आशीर्वादाने जे होईल ते होईल.

नक्कल सार्थकी लागली!

डॉक्टर आम्हाला प्रथम सांगतो की शोमध्ये कोण पाहुणे येणार आहेत. त्या वेळी मी विचारते की, मला काय करायचंय? मग तो सांगतो, तू उषा नाडकर्णी करायची आहेस. पण मला नाही येत उषा नाडकर्णी करता.. तेव्हा होईल गं मिळेल काहीतरी.., हे त्याचं म्हणणं असतं. मग माझा अभ्यास असा असतो, जी माझ्या परिचयाची लोकं असतात तेव्हा त्यांच्या खासगी गोष्टी आम्ही स्क्रिप्टमध्ये देतो. ते मित्रमैत्रिणीच असतात त्यामुळे काही वाटत नाही. पण काही व्यक्तींसमोर त्यांची नक्कल करणं मला खूपच कठीण होऊ न जातं. जसं शुभांगी गोखले यांच्याबाबतीत घडलं होतं. मग श्रीदेवीची नक्कल मला करायची होती. मी म्हटलं आपल्या माणसांपर्यंत ठीक आहे, पण श्रीदेवीची नक्कल वगैरे नको. मग नीलेश सांगतो की त्यांचे काही सीन्स बघ. वैयक्तिक पातळीवर त्या कशा वागतात-बोलतात हे पाहायचं. मग त्यांचा आवाज काढून बघायचा. कधी कधी माझाच असा आवाज ऐकताना मला हसू येतं. ‘नटसम्राट’च्या वेळेस मी उषा नाडकर्णी यांची नक्कल केली. त्या एपिसोडला उषा नाडकर्णी नव्हत्या म्हणून मी शांत होते. त्यानंतर त्यांनी तो एपिसोड पाहिला आणि मग जेव्हा मला भेटल्या तेव्हा त्यांनी मला मिठीच मारली. श्रीदेवीनेही माझं कौतुक केलं. ‘याआधी कोणीच माझी इतकी स्वच्छ व मनापासून नक्कल केली नव्हती,’ असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे एका अर्थी नक्कल करण्याचा जो धोका मी पत्करला तो सार्थकी लागला.

कॉलेजचा काळ सुखाचा

मी मिठीबाई कॉलेजमधून माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. मिठीबाई कॉलेजमधून करिना कपूर खान, श्रेयस तळपदेसारखे बरेच स्टार कलाकार होते. कॉलेजमध्ये असताना मी काही मालिकासुद्धा करत होते. त्याच वेळी ‘वाटेवरती काचा गं’ हे नाटकही प्रसिद्ध  झालं होतं. तेव्हा आमचे प्राचार्य किरण माणगावकरांनी सांगितलं की आत्तापर्यंत हिंदीत प्रसिद्ध झालेल्या कॉलेजच्या कोणत्याच कलाकारांनी आंतरमहाविद्यालयीन उपक्रमांमध्ये भाग घेतलेला नाही. तू मात्र हे करायला हवंस, आम्ही त्यासाठी तुझा पूरेपूर वापर करून घेणार आहोत. त्यानंतर मी कॉलेजच्या सर्व एकांकिकांमधून व नाटकांमधून आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये भाग घ्यायला लागले. त्यामुळे त्या दिवसांत खूप धम्माल, मज्जामस्ती करून स्टेजचा अनुभव घेत होते. असं करत करत माझ्या आयुष्यात बऱ्याच नंतर ‘हवा’ आली आणि आज त्या हवेचं वादळ झालंय असं म्हणायला हरकत नाही.

थोडा वेळ द्या..

आता विश्व दौऱ्याचेही काही भाग आमचे आधीच शूट झाले आहेत. उडी आम्ही घेतलेली आहे, आता आम्ही तरंगतोय, वेळ फक्त जमिनीला पाय लागण्यापर्यंतचा द्या. ते एकदा लागले की आम्ही परत धावायला सुरुवात क रू, कारण आता सध्या लॅण्डिंग शक्य नाही आहे. एक-दीड महिना आम्हाला वेळ द्या. मी ‘लोकसत्ता व्हिवा’च्या मंचावरून ग्वाही देते की तुमचा शो तुम्हाला आवडतो तसा किंबहुना त्याच्यापेक्षाही उत्तम देण्याचा आम्ही प्रयत्न करू.

‘व्हिवा लाउंज’मध्ये खास श्रेयाच्या गप्पा ऐकण्यासाठी आलेले तरुण तुर्क.

श्रेया बुगडेला प्रत्यक्ष बघून अत्यंत आनंद झाला. बालपणापासून ते आजपर्यंतच्या करिअरमधील महत्त्वाचे टप्पे त्यांनी मनमोकळेपणाने सांगितले. त्याचप्रमाणे नाटकात काम करत असतानाही अभ्यासाकडे दुर्लक्ष न करण्याचा महत्त्वाचा सल्ला त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना दिला. आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबरचे अनेक गमतीशीर किस्से त्यांनी ऐकवल्यामुळे गप्पांच्या मैफलीला बहार आली. तसेच एक सुजाण व्यक्ती म्हणून आपण समाजाप्रति काही तरी देणं लागतो या त्यांच्या विचाराने समाजासाठी काम करण्याची प्रेरणाही मिळाली.

विवेकानंद देसाई

‘चला हवा येऊ  द्या’ या माझ्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमातील एकमेव स्त्री कलाकार श्रेयाला भेटून अतिशय आनंद झाला. आयुष्यात काहीही चुकलं तरी चालेल, पण एक माणूस म्हणून आपण चुकायला नको, हा तिचा विचार मला अतिशय प्रेरणा देऊ न गेला. स्वत:ला शोधण्याची एक नवी ऊर्मी मला या कार्यक्रमातून मिळाली आहे. – मयूरी कोकणे

कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. श्रेयाने आपला शालेय जीवनापासूनचा संघर्ष आमच्यासमोर मांडला. तिचं अतिशय कौतुक वाटतं; परंतु स्वत: एक कलाकार असताना हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना त्या परकं समजतात याची खंत वाटते. – चिन्मय पंडित

श्रेयाची मी खूप मोठी फॅन आहे. त्यांना आज ‘व्हिवा लाऊंज’मध्ये प्रत्यक्ष बघून फार आनंद झाला. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे मी खूप प्रभावित झाले. – ऐश्वर्या गुरव

‘चला हवा येऊ  द्या’ हा माझा अत्यंत आवडता कार्यक्रम. त्यातील एका नामवंत कलाकाराला आज प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली, याबद्दल खूप छान वाटलं. श्रेया बुगडेची विचार करण्याची पद्धत खूपच भावली. अनेक गोष्टी शिकता आल्या. कलाकार म्हणून त्या उत्तम आहेतच, पण एक माणूस म्हणूनसुद्धा त्या ग्रेट आहेत हे आजच्या संवादातून जाणवलं. – अर्चित चक्रांकित

या कार्यक्रमातून प्रथमच मी एका कलाकाराला भेटले. त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली. त्यांचे विचार जाणून घेता आले, त्यामुळे खूप आनंद झाला. – सोनाली मोहिते

श्रेया बुगडे यांना जवळून पाहण्याचं, त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याचं स्वप्न आज साकार झालं, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांचे वेगवेगळे अनुभव, त्यांनी करिअरसाठी घेतलेले कष्ट यामुळे मी प्रभावित झालो.

सुभाष सुतार संकलन : विदिशा कुलकर्णी