अदोर रेहमान

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

निर्मलेंदू गून यांच्या ‘प्रेमर कोबिता’ (प्रेम कविता) या पुस्तकातील ‘आकाश ओ मानूस’ (आकाश व माणूस) या कवितेतील ही ओळ मला जास्त आवडते. कवी या ओळीतून माणसाला सांगतो आहे की तू माणूस आहेस, तुला मन आहे त्यामुळे तुला कोणी टोचून बोललं की तू मनाला लावून घेतोस. म्हणूनच मला माणसाच्या अगदी उलट स्वभाव असलेल्या आकोशासारखं व्हायचं आहे. खुल्या आकाशाची भव्यता, त्याच्या पोटात अगणित तारे, आकाशगंगा खूप सारं सामावलं आहे, तिथेही उलाढाली होत असतात मात्र आकाश नेहमी शांत असतं. त्याच्या शांततेचं, भव्यतेचंच कौतुक माणसाला असतं. मानवी मनाची जगापासून वेगळं असण्याची सुप्त इच्छा असते. आकाशाच्या उंचीवर पोहोचावं म्हणजे तिथे आपल्याला कोणी टोचून बोलणार नाही, अव्हेरणार नाही, अशी कल्पना करणारा माणूस त्याच्याएवढं मोठं मन करायला मात्र सहजी तयार होत नाही, हा कवीने लक्षात आणून दिलेला विरोधाभास इथे खूप महत्त्वाचा आहे.