भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी आदी नेहमीचे चाट पदार्थ खाऊन खाऊन खाबू मोशायच्या जिभेला कंटाळा आला आणि चाटमध्येच काही नवे मिळते का,
याचा शोध खाबूला थेट ‘आलू बॉम्ब’ नावाच्या धमाकेदार पदार्थापर्यंत घेऊन गेली. या बॉम्बला आणि तो बनवणाऱ्या गुप्ता चाटवाल्यांना खाबूचा कुर्निसात..

खाबू मोशायला नेहमीच नव्याचा सोस आहे. पण म्हणून तो ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि’ म्हणणाऱ्यांच्या पंथातलाही नाही. जुन्याचा टेकू घेऊन तयार केलेल्या नव्या पदार्थाना खाबू मोशायच्या उदरात मानाचं पान आहे. वास्तविक बटाटा हा सर्वच भारतीयांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ! अतिपरिचयामुळे इतका अवज्ञा झालेला की, शेवटी तो अर्धा कापून त्यात उदबत्त्या खुपसण्यापर्यंत त्याची अवहेलना झाली. पण मुंबईकरांसाठी मात्र बटाटा खूप महत्त्वाचा पदार्थ आहे. अख्ख्या बटाटय़ाचा रस्सा, गोडी बटाटय़ाचा रस्सा, बटाटा भजी, उकडलेल्या बटाटय़ांची भाजी, उपासाची भाजी, बटाटय़ाच्या काचऱ्या (आहाहाहाहा!!!), बटाटय़ाचं थालिपीठ आणि बटाटावडा अशा अनेक पदार्थामधून मुंबईकरांचं बटाटाप्रेम ओसंडून वाहत असतं. शिवाय तो कोणत्याही भाजीत आपली जागा घेत असल्याने गृहिणींच्याही आवडीचा!

तर अशा या बटाटय़ाचा नवा अवतार खाबू मोशायला नुकताच सापडला. चाट पदार्थामध्ये बटाटय़ाला असलेलं अनन्यसाधारण महत्त्व भेळेत किंवा मिसळीत मध्येच मिळणारा बटाटा, शेवपुडीवरील बटाटा यांमुळे अधोरेखित होतंच. पण बटाटा हाच महत्त्वाचा घटक असलेला आलू बॉम्ब नावाच्या पदार्थाबद्दल खाबू मोशायला कुणकुण लागली आणि काही दिवसांपासून हा पदार्थ चाखण्यासाठी खाबू मोशाय बेचैन झाला होता. लखनौच्या अख्तरी मंझिलमध्ये बेहजादने लिहिलेली एखादी नवी गजल बेगम अख्तरच्या आर्त सुरांत भिजून अंजुमन रौशन करतेय, हे कळल्यावर आसपासच्या गजलेच्या दिदावरांना जशी बेचैनी होत असे, त्या बेचैनीची आणि खाबू मोशायच्या बेचैनीची जातकुळी साधारण सारखीच!

हा पदार्थ वाळकेश्वरमध्ये मिळतो, हे कळल्यावर खाबू मोशाय थोडासा बिथरला होता. वास्तविक मुंबईत राहणाऱ्या खाबूसारख्या सामान्य लोकांसाठी वाळकेश्वर वगैरे भाग म्हणजे एखाद्या सुटीच्या दिवशी घरातल्या पोराटोरांना हँगिंग गार्डन आणि त्यातला म्हातारीचा बूट दाखवण्यापुरताच आहे. या भागातले जुने बंगले, फ्लॅटच्या दिवाणखान्यातच तीन कुटुंबांचे संसार होतील, अशा इमारती हे सगळं पाहून खाबू मोशाय थोडासा दिपून जातो. वास्तविक लहानपणी आई-बाबांचा हात धरून खाबूनेही या हँगिंग गार्डनमधला तो म्हातारीचा बूट पाहिला होता. एवढा मोठा बूट विसरून गेलेली म्हातारी कोण, असा प्रश्नही खाबूला त्या वेळी पडला होता. पण तो बूट म्हातारी विसरून गेली नसणार. गल्लीतल्या लहान पोरांवर सतत डाफरणाऱ्या त्या म्हातारीचा एकच बूट खाबूसारख्याच एखाद्य व्रात्य पोराने पळवून या बागेत आणून टाकला असणार, याची खाबूला त्या वेळीच खात्री पटली होती. पुढे कॉलेजला वगैरे गेल्यावर आतापर्यंत म्हातारीचा बूट न बघितलेल्या मैत्रिणींनाही अनेकदा खाबूने हँगिंग गार्डनला आणून हा बूट दाखवला होता. बिच्चाऱ्या त्या मैत्रिणी! म्हातारीचा बूटपण बघितला नव्हता..

तर, ते एक असो. मुद्दा हा की, आलू बॉम्ब हा पदार्थ वाळकेश्वरला मिळतो हे कळल्यावर खाबूने ‘चलो वाळकेश्वर’ केलं. चौपाटीवरून वाळकेश्वरला जाणारा रस्ता खूप छान आहे. एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला टेकडी यांच्यामधून जाणारा हा रस्ता खाबूला गोव्याची आठवण करून देतो. या रस्त्यावर असलेल्या गोपी बिर्ला मेमोरियल हायस्कूलच्या बाजूलाच आलू बॉम्ब मिळतो. खाबू मोशाय या शाळेजवळ उतरला खरा, पण तिथे त्याला आलू बॉम्ब मिळण्यासारखी जागा कुठेच दिसे ना. अखेर त्याने शाळेच्या वॉचमनलाच या आलू बॉम्बबद्दल विचारले. त्या वॉचमनला या प्रश्नाची सवय असावी. कारण त्याने आलू बॉम्बपैकी आलू एवढंच ऐकून दिशा दाखवली. खाबू मोशायने मुकाटपणे या वॉचमनने दाखवलेल्या दिशेकडे कूच केले.

एका दुकानाबाहेर दोन डब्यांवर फळी टाकून खालीच ठाण मांडून बसलेला एक चाट विकणारा भय्या खाबूला दिसला. खाबूने तरीही साशंकपणे आलू बॉम्बबद्दल पृच्छा केली. या भय्याने, म्हणजेच धनिराम गुप्ता यांनी काहीही न बोलता हातातलं काम पूर्ण करण्यास, म्हणजे शेवपुडीची प्लेट पार्सल करण्यास सुरुवात केली. बाजूलाच उभ्या असलेल्या एका मुलीला ते शेवपुडीचं पार्सल देता देता, ‘अरी बिटिया रानी, काहे जल्दबाजी करत हो, तनिक सुखा भेल लेकर जाओ’, असा अस्सल देसी भाषेत दम देत सुकी भेळही बनवून दिली. खाबूचे आणि गुप्ता चाचांचे बरेच गुण तिथेच जुळले. अस्सल रसिकाला तबियतीत खिलवणारा हा माणूस खाबूच्या मनाचा ठाव घेऊन गेला. धनिराम चाचा दर दिवशी दुपारपासून रात्री साडेनऊपर्यंत हा ठेला लावून बसतात. त्यांनी खाबूकडे एकवार पाहिलं आणि जवळच्या पोतडीतून उकडलेला बटाटा काढला. तो बटाटा आडवा चिरून त्याचे दोन भाग केले. या दोन्ही भागांच्या पृष्ठभागावरील बटाटा थोडासा काढून त्यांनी थोडा खोलगट आकार केला.

या खोलगट भागात त्यांनी वेगवेगळे मसाले, चाटसाठी वापरल्या जाणाऱ्या नेहमीच्या चटण्या, बारीक चिरलेला कांदा आणि टॉमेटो टाकले त्यावर भरपूर शेव टाकली. त्यानंतर आडवे चिरलेले दोन्ही बटाटे त्यांनी एकावर एक ठेवून मधला मसाला चांगला चेपला. आता अख्खा झालेला बटाटा सँडविचसारखा चार भागांत कापून त्यांनी खाबूसमोर पेश केला. हा आलू बॉम्ब! खाबूला बटाटय़ावर झालेली ती कलाकारी खूपच आवडली. आलू बॉम्बचा एक तुकडा खाबूने तोंडात टाकला. नेहमीच्याच चाटची चव, पण बटाटय़ामुळे या चवीला एक नवीन परिमाण लाभलं होतं. हा वास्तविक खाणाऱ्याची समाधी लावणारा पदार्थ नक्कीच नाही. पण एका सर्जनशील बल्लवाचार्याच्या डोक्यातून स्फुरलेल्या या पदार्थाला दाद गेल्याशिवाय राहत नाही.

त्याशिवाय या धनिराम चाचांकडे इतरही चाट पदार्थ मिळतात. त्यातली शेवपुरी खाबू मोशायला खूपच आवडली. बरं, या आलू बॉम्बची चवही फक्त ४० रुपये एवढीच आहे. तर इतर चाट पदार्थ २५ ते ३० रुपये या ‘बॉम्बे रेट’नेच विकले जातात. हा पदार्थ कदाचित घरीही करता येऊ शकेल. पण घरच्या बशीत हा पदार्थ खाण्यापेक्षा इथे कागदावर घेऊन खाल्लेला कधीही चांगला.

कसे जाल – वाळकेश्वला जाण्यासाठी ग्रँट रोड किंवा चर्नी रोडला उतरून टॅक्सी करणं उत्तम. टॅक्सीवाल्याला गोपी बिर्ला मेमोरियल हायस्कूल सांगितलंत की, तो तुम्हाला नेऊन सोडेल. किंवा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून १०८ किंवा १०३ क्रमांकाची बसही तुम्हाला आलू बॉम्बपर्यंत घेऊन जाईल.

– खाबू मोशाय