मुंबईसारखे आहे नायजेरियाचे लागोस शहर. मुंबईत आल्यावर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत मिटते, तसं नायजेरियाच्या कानाकोपऱ्यातून लागोसला आल्यावर पोटापाण्याची व्यवस्था होणार, असा समज असलेलं हे शहर आहे. इथेही श्रीमंत आणि गरीब वर्गाचं अस्तित्व ठळकपणे जाणवतं. इथल्या व्हिक्टोरिया आयलंडसारखे काही भाग आपल्या मरिन लाइन्सशी साधर्म्य दर्शवणारे असून तिथे उच्चभ्रू वस्ती, महागडय़ा गाडय़ा, रेस्तराँ, मॉल्स आहेत. तर दुसरीकडे धारावीशी साधर्म्य सांगणारे झोपडपट्टी, बकालपणा, अस्वच्छता असणारे भागही आहेत. पायाभूत सुविधांची उभारणी अद्यापही होते आहे. इथे भ्रष्टाचाराचं प्रमाण खूपच आहे. भ्रष्टाचार म्हणजे काय?, ते आफ्रिकन देशात आल्यावर जाणवतं. लाच खूप मोठय़ा प्रमाणात घेतली जाते. आपापल्या पुढच्या पिढय़ांचं भलं करण्यात इथले राजकारणी गुंतलेले आहेत. क्रूड ऑइल आणि खनिज द्रव्यांचा साठा असूनही एकूणच राजकारणावर अमेरिकेचा खूप मोठा प्रभाव आहे. तितकाच प्रभाव त्यांच्या संस्कृतीवरही आहे. वीकएण्डला क्लब लाइफ पूर्ण एन्जॉय केलं जातं. हातावर पोट असणारे लोक उद्याचा विचार करत नाहीत. वृत्ती हॅपी गो लकी असून सकाळी हाती पडलेले पैसे संध्याकाळी कसे खर्च करायचे, हा विचार सतत सुरू असतो.

शहरी भागात लागोससारख्या ठिकाणी महाविद्यालये असली तरी शिक्षण गुणवत्तापूर्ण नाही. पदवीधर तरुणाईला चटकन नोकऱ्या मिळत नाहीत. केवळ १० ते २० टक्के मुलांना त्यांच्या करिअरची दिशा गवसते. बाकीचे राजकारणाला बोल लावत, मिळतील तशी छोटी-मोठी कामं करत, आपलं नशीब धुंडाळतात. मात्र इथले चलन असणाऱ्या नायरामध्ये होणारी कमाई लागोसमधल्या राहणीमानाच्या मानाने तशी अपुरी पडते. सध्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री तिथे वाढीस लागली असल्याने कार, मोटरसायकल, ट्रायसायकलच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांना थोडाफार रोजगार उपलब्ध होतो. क्रूड ऑइल इंडस्ट्रीत त्यांना फारसा रोजगार मिळत नाही, पण त्यांचं अर्थकारण त्यावर अधिकांशी अवलंबून आहे. सुपीक जमीन असूनही फारसं काही पिकवलं जात नाही. सरकारी दुर्लक्ष आणि स्वत:च्या क्षमतांबद्दल असणारं अज्ञान यासाठी कारणीभूत आहे. चीन, भारत आदी देशांकडून जीवनावश्यक वस्तू आयात केल्या जातात. काही मोजक्या मंडळींच्या या बाबी लक्षात येत असूनही ते काही करू शकत नाहीत, कारण एकूणच परिस्थिती हाताबाहेर आहे. सकाळी उठल्यावर रात्रीच्या जेवणाची भ्रांत असेल तर बाकीच्या गोष्टींकडे कोण कसं लक्ष देणार.. कसा विचार करणार.. त्यामुळे साहजिक गुन्हेगारी प्रवृत्तीची वाढ होते आहे. ही १६ ते ३० वर्षांची बेरोजगार मुलं एकत्र येऊन दादागिरी करतात. त्यांना एरिया बॉइज म्हणतात. ही मुलं परदेशी लोकांना धमकावून त्यांना लुटतात.

एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचं जाळं पसरलेलं नाही. त्यामुळे दोन-तीन वेळा वाहनं बदलत लोक लांबच्या ठिकाणाहून प्रवास करतात. एकेका टप्प्याला एकेक वाहन बदलत जातात. काही वेळा बॉक्सर गाडीतूनही प्रवासही केला जातो. ही बॉक्सर गाडी चालवण्याचा व्यवसाय मुलं करतात. प्रवाशांना ट्रॅफिक जॅमसारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ सहा किमीचं अंतर पार करायला आठ तास लागणं. लांबच्या लांब रांगा लागतात वाहनांच्या.. मग गाडीत बसून राहण्याखेरीज काहीही करता येत नाही. वाहतुकीचा खोळंबा नेमका कशामुळे झालाय ते काही कळत नाही. अलीकडेच सरकारतर्फे काही रिक्षा रोजगार म्हणून मुलं आणि माहिलांना देण्यात आल्या आहेत.

इथे लोकसंख्या नियंत्रण नाही. माझ्या एका ड्रायव्हरला चार बायका आणि पंधरा मुलं होती. अगदी अल्प प्रमाणात याविषयी जागृती व्हायला सुरुवात झाली आहे. फ्री सेक्स कल्चर आहे. देशभरातली एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इथे मुलीच्या संमतीविरुद्ध वागलं जात नाही. तिची कुठल्याही प्रकारे छळवणूक केली जात नाही. अशा प्रकारच्या छळाचं प्रमाण अत्यल्प आहे. मुलगी ‘नाही म्हणाली म्हणजे नाही’ ही गोष्ट समजून घेतली जाते. काही वेळा केवळ पैशांसाठी म्हणून काही लबाडी केली जाते, ही गोष्ट वगळता हे लोक फार छान आहेत. विशेषत: भारतीयांना मदत पटकन करतात. हे लोक प्रचंड ढोर मेहनत करू शकतात. मोजकेच लोक बँकिंग क्षेत्रामध्ये स्थिरावले आहेत. नायजेरियात हे चित्र जास्त पाहायला मिळतं.

इथल्या लोकांमध्ये धार्मिक वृत्ती खूप आहे. मशिदीमध्ये आणि चर्चमध्ये ते नियमितपणे जातात. ते देवाला खूपच मानतात. तितकेच ते त्यांच्या देशावरही नितांत प्रेम करतात. एक वेळ त्यांनी स्वत: देशाला प्रसंगी नाव ठेवलेलं चालतं, पण दुसऱ्यांना ते तसं अजिबात करू देत नाहीत. अगदी बोटावर मोजण्याइतकी माणसं चौकटीबाहेरचा विचार करतात. पण ‘एखादी गोष्ट स्वत:ला समजली आहे तर ती गोष्ट दुसऱ्याला सांगावी’ इतक्या वैचारिक पातळीला ही प्रक्रिया पोहोचलेली नाही. परिस्थितीमुळे त्यांना थोडं स्वार्थी होण्यावाचून पर्याय उरलेला नाही. बाकीचे ‘देव माझं भलं करेल’ अशा समजुतीत आला दिवस काढतात. काळी जादू करतील, या गैरसमजापोटी ते भारतीयांना घाबरतात आणि ही गोष्ट तरुणाईही मानते.

फुटबॉल हा इथला राष्ट्रीय खेळ आहे. तरुणाईसह सारेजण वेळात वेळ काढून फुटबॉल खेळतातच. फुटबॉलविषयी ते क्रेझीच असतात. बास्केटबॉलही खेळतात. मात्र फिटनेस वगैरेचा वेगळा विचार करण्याजोगी परिस्थितीच नाही. इथे बीफ मोठय़ा प्रमाणात खाल्लं जातं. त्यामुळे मुली बऱ्याचदा स्थूल असतात. मांसाहार अतिप्रमाणात केला जातो. फास्टफूड आवडीने खाल्लं जात. मुलं बिअर पितात आणि क्लबलाइफ एन्जॉय करतात. कुटुंबसंस्था नसल्याने सगळं बाहेरच खाल्लं जातं. लागोससारख्या शहरात भारतीय रेस्तराँ आहेत. काही ठिकाणी अस्वच्छता असल्याने बकाल वातावरणातले खाद्यपदार्थ सेवन केले जातात. इथे मुलीही रोजगारासाठी वणवण फिरतात. लिपस्टिक आणि कृत्रिम केस यांची इथे मोठी उलाढाल होते. फॅ शन हा एकदम वीकपॉइंट आहे. पगारातला ८० ते ९० टक्के भाग मुली त्यांच्या कपडय़ांवर उधळतात. प्रत्येक आठवडय़ाला हेअरस्टाइल बदलतात. त्यांच्या फॅशनवर पाश्चात्य फॅशनचा पगडा खूपच आहे. सणावाराच्या प्रसंगी मुस्लीम स्त्रिया आणि मुलं त्यांच्या पारंपरिक पोशाखात दिसतात.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी त्यांना गुलाम म्हणून हिणकस वागणूक दिली जायची. त्यामुळे मुख्यत्वे बहुसंख्याचा झगडा हा जगण्यासाठीच चालू राहिला.. आजचा दिवस पदरी पडला म्हणजे आपण जिंकलो, अशी परिस्थिती अजूनही आहे. त्यामुळे कला वगैरे गोष्टी फारशा दिसत नाहीत. मुस्लीम पद्धतीचे संगीत ऐकायला मिळते. ख्रिश्चन पाश्चत्य पद्धतीचे संगीत ऐकतात. सगळेच लोक संगीतप्रेमी आहेत. संगीताच्या तालावर लगोलग ठेका धरतातच. ते कुठल्याही गाण्यावर नृत्य करू शकतात. संगीत त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. स्मार्ट फोन्स, कारसारख्या नवीन गोष्टी घेण्याकडे त्यांचा जास्ती कल आहे. ते टेक्नोसॅव्ही आहेत. इंटरनेटचा वापर बराच होतो त्यामानाने सामाजिक जाणिवा मात्र कमी आहेत. गरीबांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. हायवेचा प्रवास खूप जोखमीचा असतो. कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. गाडीची मोडतोड होईपर्यंत तिची दुरुस्ती केली जात नाही. ती चालतेय तोपर्यंत चालवत राहायची. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो, कारण दुसरा काहीच पर्याय नसतो. रेल्वे फारशी विकसित  झालेली नसल्याने दळणवळण हे रस्ता वाहतुकीवरच अवलंबून आहे. रस्ते काही ठिकाणी चांगले तर काही ठिकाणी रस्त्यांची अतिशय दुरवस्था आहे. कायदा व सुव्यववस्था कडक नसल्याने अवैध वाहतूक, अपघात होतात. या सगळ्याबद्दल लोकांची संवेदनशीलता जणू कोरडीठाक झाली आहे, असं दिसतं. हाही जणू आयुष्याचा एक भाग आहे, अशी भावना दिसते. ‘आयुष्य आज आहे, उद्या नाही’ हा दृष्टिकोन इतका पक्का आहे की त्याचा प्रत्येक कृतीवर प्रभाव दिसतो. त्यामुळे बेडर वृत्तीही त्यांच्यात जास्त दिसते. पूर्वेकडच्या भागातील लोकांकडे तुलनेने सुबत्ता असून त्यांच्याकडे शिक्षण आणि विचार करण्याची क्षमता आहे. नायजेरियात हिरवाई चांगली आहे. जंगलं आहेत. पाऊ स बेहिशोबीपणे केव्हाही पडतो. निसर्गाकडं पाहायची त्यांची वृत्तीही काहीशी तटस्थ आहे. इंग्रजी चांगलं बोललं जात असल्याने काही प्रसंगी भाषेचा प्रश्न येतो. ते शॉर्टकट इंग्रजी बोलतात, जे व्याकरणदृष्टय़ा चुकीचं असतं. त्यांच्या इंग्रजीला ‘पिजन इंग्लिश’ म्हणतात. इथे हौसा आणि योरुबा या भाषा बोलल्या जातात. नायजेरियातले लोक मनाने चांगले आहेत. पण एकुणातच ही ‘आहे रे आणि नाही रे’ परिस्थिती बघता सध्यातरी त्यांना कोणी वाली नाही. त्यांचे आयुष्यमान कधी सुधारणार हा प्रश्न उरतोच..

उन्मेष पाध्ये, / लागोस, नायजेरिया

शब्दांकन- राधिका कुंटे