पंकज भोसले

इलायजा वाल्ड नावाचा एक तिकडम अमेरिकी संगीतकार आहे. पण त्याच्या सांगीतिक कारकीर्दीपेक्षा त्याची खरी ओळख ही अमेरिकेतील संगीतमुळांचा अभ्यासक म्हणून आहे. ‘हाऊ द बिटल्स डिस्ट्रॉय द रॉक अ‍ॅण्ड रोल’ या त्याच्या बंडखोर पुस्तकाने बिटल्स विषयीच्या जगात पसरलेल्या मतांना धक्का बसला असला, तरी त्यात संगीत आणि गायकांची शतकभराच्या संदर्भाची खाण सापडते. या संगीतप्रेमी अभ्यासकाने अमेरिकी लोकसंगीत, कृष्णवंशीयांच्या पायावर उभ्या असलेल्या आजच्या अमेरिकी संगीताची इतकी पडताळणी केली की त्यातून ज्ञात संगीत इतिहासाला समांतर दस्तावेज तयार झाला.

‘अ‍ॅन अल्टरनेटिव्ह हिस्ट्री ऑफ अमेरिकन पॉप्युलर म्युझिक’ असा पुस्तकाच्या उपशीर्षकाला जागणारा माहिती खजिना वाल्ड यांच्याकडून मिळतो. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार पॉल व्हाइटमन ते एलविस प्रेस्ले आणि पुढे लोकप्रिय झालेल्या बिटल्स बॅण्डने आपल्या पूर्वाश्रमीच्या दशकांत विस्मृतीत गेलेल्या कृष्णवंशीयांच्या संगीतातून शैलीसह बऱ्याच गोष्टी आयात केल्या. व्हाइटमन (१९२०-३०च्या दशकातील तारांकित संगीतकार), प्रेस्ले आणि बिटल्स यांना तुडुंब प्रसिद्धी मिळाली मात्र त्यांच्या मुळारंभांना लोक विसरून गेले. बो डिडली, मडी वॉटर्स आणि चबी चेकर या काळ्या कलाकारांच्या संगीताच्या प्रभावातून या थोर संगीतकारांनी जगावर राज्य केले. वाल्ड यांच्या दाव्यातील तथ्य आजच्या यूटय़ुब उपलब्धीच्या युगात सहज पटण्यासारखे आहे. सोळाव्या शतकात आफ्रिकेतून मळ्यात राबण्यासाठी गुलाम म्हणून आणलेल्या कृष्णवंशीयांनी शेकडो वर्षांच्या वास्तव्यात त्या भूमीमध्ये संगीताचे झरे तयार केले. वाद्यांवर हुकमत मिळवली आणि कामाच्या, दु:खांच्या-आनंदांच्या लहरींना संगीतातून वाट करून दिली. ब्लू, जॅझ, रॅगे संगीतामध्ये गेल्या शतकाच्या आरंभापासून शेकडो कृष्णवंशीय कलाकार तयार झाले. प्रेस्ले आणि बिटल्सच्या संगीतासोबत त्यांच्यावर प्रभाव असलेल्या काळ्या संगीतकारांची गाणी ऐकल्यास आपल्याकडल्याही काही तथाकथित थोर संगीतकारांची अजरामर गीते हाती लागतील. उदाहरणच घ्यायचे तर चबी चेकर्स यांच्या ‘लेट्स ट्विस्ट अगेन’ या गाण्याचे ‘आवो ट्विस्ट करे’ हे उत्तम हिंदी भाषांतर आपल्याकडच्या सर्वोत्तम ‘थोर’ संगीतकाराच्या आरंभीच्या काळातील हीट गाणे होते. त्याच काळात कृष्णवंशीय रॉक अ‍ॅण्ड रोलच्या प्रभावातून निपजलेले एलविस प्रेस्ले यांचे ‘जेलहाऊस रॉक’ नावाचे गाणे आले नसते तर शम्मी कपूर नावाच्या भारतीय अवलिया कलाकाराने कोणती अभिनय-नृत्यशैली स्वीकारली असती हा प्रचंड मोठा कुतुहलाचा विषय आहे. जुन्या हिंदी चित्रसंगीत भक्तांचे कचकडय़ाचे देव्हारे मोडण्याचा या लेखाचा विषय नसल्याने काळ्या संगीतातील उत्तमाकडे येणे इष्ट. प्रेस्ले, बिटल्स यांच्या पूर्वाश्रमीच्या, समांतर काळातील काळ्या संगीतकार, गायक आणि वादकांनी संगीतात अफलातून प्रयोग केले. हे प्रयोग प्रभावांतून जगभरातील संगीतात अजूनही झिरपत आहेत. जेम्स ब्राऊन यांच्या ‘पापा गॉट ए ब्रॅण्ड न्यू बॅग’ या गाण्यातील ट्रम्पेट, गिटारसह गायनशैली कुणालाही आवडू शकते. ऱ्हिदम अ‍ॅण्ड ब्लू प्रकारातील हे बिलबोर्ड यादीत इतिहास घडविणारे कृष्णवंशीय गीत आहे. बिटल्सचा जगभर प्रभाव असताना या गाण्याची लोकप्रियता कमी झाली नाही. ‘आय फिल गुड’, ‘इट्स मॅन्स मॅन्स वर्ल्ड’ ही त्याची गाणी खास ऐकून पाहावी अशीच आहेत. रॉक अ‍ॅण्ड रोल, जॅझ, ऱ्हिदम अ‍ॅण्ड ब्लू यांच्यानंतर १९८०च्या दशकात आलेल्या मायकेल जॅक्सनच्या डिस्को युगापर्यंत ब्राऊनची गाणी लोकप्रिय झाली. आजच्या ब्रुनो मार्सच्या गाण्यांमध्ये जेम्स ब्राऊन यांची शैली जिवंत दिसते. आपल्याकडे रे चार्ल्सच्या ‘हीट द रोड जॅक’पासून ट्रेसी चॅपमनच्या ‘फास्ट कार’पर्यंत अनेक गाण्यांवर जीवापाड प्रेम करणारे भक्त आहेत. बोनी एम, स्टीव्ही वण्डर, लायोनल रिची यांची गाणी एमटीव्ही क्लासिक्सने आणि एफएम वाहिन्यांनी परिचित करून दिलीत. पण शोधायला गेलात, तर यापलीकडे जगभरातील संगीतावर प्रभाव पाडणारे कृष्णवंशीयांनी तयार केलेले स्वरपटल अनुभवायला मिळेल. वाल्ड यांनी दशकापूर्वी लिहिलेल्या पुस्तककाळात नसला, तरी आजच्या सर्व संगीत प्रवाहांवर हीपहॉप आणि ड्रेक, कार्डी बी, खालीद या काळ्यांच्या संगीताचे राज्य आहे, ही खरी गंमत आहे.

म्युझिक बॉक्स

Chubby Checker – Let’s Twist Again

James Brown – Papa’s Got A Brand New Bag

Ain’t Got No, I Got Life – Nina Simone

Aloe Blacc – I Need A Dollar

Childish Gambino – Feels Like Summer

Raleigh Ritchie – Time in a Tree

Lonnie Holley – I Woke Up…

viva@expressindia.com