अमेय मराठे, कॉपरबेल्ट, झांबिया

      ब्रिटिश वसाहतीच्या काळापासून तांब्याच्या खाणी आणि शहरापासून अवघ्या १५-२० किलोमीटरवर असणारी डोमिनिकन रिपब्लिकन ऑफ काँगोची आंतरराष्ट्रीय सीमा, यामुळे तेथील बहुतेक आर्थिक व्यवहार डॉलरमध्ये चालत. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये डॉलरचा अपभ्रंश होऊ न न्डोला हे नाव प्रचलित झालं असावं

मी नोकरीनिमित्त तीन वर्षे झांबियामधील न्डोला शहरात राहात होतो. झांबियाचं प्रमुख उत्पादन तांबे आहे. झांबियाच्या कॉपरबेल्ट परगण्यामध्ये प्रामुख्याने तांब्याच्या खाणी आहेत. या परगण्याच्या राजधानीचं आणि झांबियातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर म्हणजे न्डोला (उच्चार – एन्डोला) आहे. असे म्हणतात की, ब्रिटिश वसाहतीच्या काळापासून तांब्याच्या खाणी आणि शहरापासून अवघ्या १५-२० किलोमीटरवर असणारी डोमिनिकन रिपब्लिकन ऑफ काँगोची आंतरराष्ट्रीय सीमा, यामुळे तेथील बहुतेक आर्थिक व्यवहार डॉलरमध्ये चालत. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये डॉलरचा अपभ्रंश होऊ न न्डोला हे नाव प्रचलित झालं असावं, तिथले रस्ते चांगले आणि मोठे असून शहराची आखणी सुनियोजित आहे. इथले लोक अत्यंत नम्र असून सगळे इंग्लिश मॅनरिझम बोलण्यात-वागण्यात फॉलो करतात. कुठेतरी अद्याप त्यांच्यावर ब्रिटिशांचा प्रभाव आहे आणि अमेरिकन-युरोपियन संस्कृतींचा प्रभावही अधिकांशी दिसू लागला आहे. ख्रिश्चन धर्माचे लोक बहुसंख्य असून अमेरिकन टीव्हीचा प्रभाव खूप जास्त आहे. तो त्यांच्या जीवनशैलीवरही दिसतो. त्यांचा मूळचा पोशाख आता घातलाच जात नाही. क्वचित वयस्कर लोक सणावाराला हे पोशाख वापरतात. बाकी पाश्चात्त्य पोशाखच वापरले जातात. वयस्कर बायका रोज बाहेर जाताना आणि तरुणाई केवळ सणसमारंभ आणि लग्नकार्यातच पारंपरिक पोशाख घालते. मी राहात होतो तिथे भारतीय लोक ही राहात असल्याने पंजाबी ड्रेस किंवा साडी तिथल्या काही स्त्रिया वापरतात. मुळात त्यांच्याकडचे दागिने लाकडी किंवा धातूचे असून आपल्याकडचे बांगडय़ा, कानातले, गळ्यातले वगैरे इमिटेशन ज्वेलरी वापरतात.

शिक्षणाची गुणवत्ता म्हणावी तितकी नाही. त्यामुळे त्याविषयीची जाणीव किंवा करिअर प्लॅन करणे या गोष्टी नाहीत. बरेचजण बारावीनंतर पुढे क्वचितच शिकतात. त्यांना बाहेरच्या जगात काय सुरू आहे ते बऱ्यापैकी माहिती आहे. त्यांचा जास्ती ओढा वैद्यकीय शिक्षणाकडे दिसून येतो. डॉक्टर, नर्सिग किंवा फार्मसी शिकणारी मुलं सर्वाधिक आहेत. सरकारकडून या क्षेत्रात त्यांना नोकऱ्या चांगल्या मिळतात. काहीजण परदेशात जाऊ न पुढचं शिक्षण घेत असले तरी उच्चशिक्षण घेऊ न परतणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. शिवाय इंजिनीअरिंग, मॅनेजमेंटचं शिक्षणही घेतात. शाळेत ख्रिश्चन धर्मशिक्षण हा विषय असतो. काहीजण बारावीनंतर पूर्ण वेळ याच विषयातली पदवी घेऊ न चर्चमध्ये काम करतात. पूर्वी मुलींचं शिकण्याचं प्रमाण कमी होतं, ते आता हळूहळू वाढतं आहे. नर्सिग आणि वैद्यकीय शिक्षण घ्यायची त्यांची इच्छा असते. शिक्षणात जास्त गती नसल्याने त्यांच्यासाठी हाऊ सकीपिंग, सोशल काऊन्सिलिंगचेही काही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

इथली तरुणाई नाइटक्लबमध्ये जाते. अमेरिकन चित्रपट डाऊ नलोड करून पाहिले जातात. काही वेळा भारतीय चित्रपटही पाहिले जातात. ‘झी इंग्लिश’च्या डब मालिका महिला विशेष आवडीने पाहतात. लघुपट तयार करणारी काही लोक आहेत, पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. फुटबॉलची खूपच क्रेझ असून मॅचच्या दिवशी स्टेडिअम खच्चून भरलेलं असतं. शालेय पातळीवर नियमितपणे फुटबॉलच्या स्पर्धा होतात. फुटबॉल खेळायला वयाची अट अजिबात आड येत नसल्याने सगळेजण तो आवडीने खेळतात. काही सरकारी कंपन्या, खाजगी कंपन्यांच्या फुटबॉल टीम असतात. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक हे तरुणाईकडून प्रचंड आवडीने वापरलं जातं.

पारंपरिक नृत्य हे गावातल्या लोकांपुरतंच उरलं आहे. कार्यक्रमांच्या वेळी त्यांना बोलावलं जातं. ड्रमसारखं त्यांचं वाद्यही ठरावीक लोकच वाजवतात. तिथल्या लोकांना संगीताची आवड भरपूर आहे. जणू गाणी चालू असल्याशिवाय लोक कामाला हात लावत नाहीत. रस्त्यावरचे विक्रेते मोठय़ा आवाजात ट्रान्झिस्टर लावून बसलेले असतात. रेडिओ चॅनेल्स चोवीस तास चालतात. ख्रिसमसच्या वेळी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये गाण्यांचा सराव करून ती सादर केली जातात. लग्नसमारंभातही नाचगाण्यांना बरंच महत्त्व दिलं जातं. अगदी कोरिओग्राफर बोलावून सराव केला जातो. लग्नाच्या सेलिब्रेशनवर पाश्चात्त्य पद्धतींचा प्रभाव अधिक असून थीमनुसार सगळ्या गोष्टींचं आयोजन केलं जातं. लग्नसमारंभात पारंपरिक प्रथा आणि ख्रिश्चन पद्धतीच्या रिवाजांचा मेळ घातला जातो. तिथल्या जमातींच्या रिवाजानुसार काही काही पद्धती बदलतात. एका जमातीतल्या माटेबेटो पद्धतीत नवऱ्या मुलाला नवऱ्या मुलीच्या घरी बोलावतात. तेव्हा मुलीला येणारे सगळे पदार्थ करून तिने त्याला खायला घालायचे असतात. मुलाने पुढय़ातले सगळे पदार्थ संपवायचे असतात. एके काळी असं मानलं जायचं की, मुलाने सगळं संपवलं तरच त्यांचं लग्न होईल आणि मुलगी जितके पदार्थ करेल तितकी ती सुगरण. आता तसं काही राहिलेलं नाही. तिथल्या परंपरेनुसार पुरुषाने अनेक लग्न करायची पद्धत होती. अलीकडच्या लग्नात कमिटमेंट हा प्रकार फारसा नसतो. त्यामुळे लग्न होतात, घटस्फोटही होतात. आता मुलींची एकापेक्षा जास्त लग्नं होतात. त्यांना अनेक मुलं होतात आणि त्यांचे नातेसंबंध कसे असतील, त्यावर इतर गोष्टी अवलंबून असतात.

झांबियाच्या स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव उत्साहाने साजरा झाला होता. दर स्वातंत्र्य दिनाला झेंडे लावणं आणि त्या रंगसंगतीची सजावट करणं सक्तीचं असतं. जवळपास ७० जमाती असूनही ‘एक देश’ ही भावना प्रकर्षांने जाणवते. स्थानिक भाषा खूप असल्याने तिथल्या लोकांना आपापल्या भाषा शिकाव्याच लागतात. अधिकृतपणे इंग्रजीचा वापर अधिकांशी होतो. शहरी भागांत भाषेचा प्रश्न फारसा येत नाही. कधीतरी अशिक्षित माणूस भेटल्यास थोडासा प्रश्न उद्भवतो. पण मुळात त्यांना अल्पसा का होईना, संवाद इंग्रजीतून साधता येतो. ते आपल्याला समजून घ्यायचा आणि सांगायचा प्रयत्न करतात. सुरुवातीला काहीजण मुद्दाम इंग्लिश बोलायचे नाहीत आणि त्यांचं स्थानिक भाषेतलं बोलणं मला कळायचं नाही. पण माझं काम औषधांशी संबंधित असल्याने ते काय बोलत आहेत याची खात्री मी सोबत काम करणाऱ्या स्थानिकांकडून करून घेई. त्यामुळे माझ्यासोबत कायम स्थानिक लोक असायचेच. शेजारचा डोमिनिकन रिपब्लिकन ऑफ काँगो हा देश पूर्वी फ्रेंच अधिपत्याखाली होता. सीमा जवळ असल्याने तिकडून अनेक लोक यायचे, तेव्हा मात्र त्यांची चांगलीच पंचाईत व्हायची. त्यांना फक्त फ्रेंच आणि त्यांची स्थानिक भाषा यायची आणि मला फक्त इंग्रजी. शेवटी त्यांची स्थानिक भाषा आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या झांबियन माणसाची स्थानिक भाषा यांत काथ्याकूट करून माझ्यासाठी त्याचं पुन्हा इंग्रजी भाषांतर केलं जाई आणि अखेरीस काम पार पडे. या सगळ्यात कुठेही चिडचिड किंवा तक्रार नसे. उलट आपलं काम झालं या आनंदात लोक मनमोकळं हसून आभार मानत असत. तिथे असणाऱ्या अन्य मराठी व्यक्तींशी गप्पा मारताना किंवा माझं फोनवरचं बोलणं ऐकल्यामुळे काही मराठी शब्द त्यांना कळायला लागले होते. गुजराथी लोक शंभर-सव्वाशे र्वष तिथं राहात असल्यामुळे तिथले काहीजण चांगलं गुजराथी बोलतात.

इथले बहुसंख्य लोक मांसाहारी आहेत. मका हे मुख्य पीक असून मक्याच्या पदार्थामध्ये बीफ, पोर्कचे तुकडे, फिश, चिकन वगैरे घालतात. शिमा हा आपल्याकडच्या उकडीसारखा पारंपरिक पदार्थ असून तो मांसाहारी-शाकाहारी असतो. शहरी भागांत हॉटेलमध्ये जास्त खाल्लं जातं. स्त्रिया नोकरीच्या ठिकाणी बरेचदा शिम्याचा डबा घेऊ न येतात. एरवी फास्टफूड खाल्लं जातं. मात्र खाण्यावर फार खर्च करतात असं नाही. तिथे रोटय़ा विकत मिळतात. पर्यटनाच्या दृष्टीने विचार केल्यास युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेला ‘व्हिक्टोरिया फॉल्स’ हा धबधबा झांबिया आणि झिंबाब्वेच्या सीमेवर आहे. भारतीय लोकांचं प्रमाण बऱ्यापैकी असल्यामुळे भारताविषयी जुजबी माहिती असते. भारतीय पेहराव आणि अन्नाविषयी कुतूहलही आहे. तिथल्या तरुणाईचे बरेच प्रश्न भारतातील शिक्षण, रोजगार याबरोबरीनेच हिंदू धर्म आणि भारतातील ख्रिश्चन धर्माचं महत्त्व याविषयी असायचे. दिवाळीला आतषबाजी बघायला बरेच स्थानिक लोक गर्दी करतात. गेली २५ र्वष महाराष्ट्र मंडळ, न्डोलातर्फे गणेशोत्सव साजरा होतो आहे. गणेशोत्सव सुरू केला तेव्हा तिथल्या वयस्कर स्थानिक लोकांना मूर्ती विसर्जनाची भीती वाटायची. एकेकाळी काळी जादू वगैरे गैरसमजुतींचा पगडा असल्याने त्यांनी त्याबद्दल तक्रारीही केल्या होत्या. प्रशासनाची अट एवढीच असते की विसर्जन सूर्यास्ताच्या आधी आणि नेमून दिलेल्या जागीच झालं पाहिजे. इथले लोक जिमला नियमित जातात. फुटबॉलमुळे काटक असतात. मुळात त्यांची ठेवणच मजबूत आहे. आपल्याकडे चार लोक मिळून जे काम करतील, ते तिथला एक माणूस करू शकतो. मात्र आरोग्यसुविधा तितक्या प्रगत नाहीत, साध्याशा रोगानंही माणसं दगावतात. खाजगी प्रॅक्टिस खूप कमी असून सरकारी हॉस्पिटल्स किंवा प्रायमरी हेल्थ सेंटर्सवर जास्ती भार आहे. तिथे औषधं, डॉक्टरांची वानवा असते.

पर्यावरणाचा विचार करून प्लॅस्टिक कमी वापरण्याविषयी जागरूकता नाही. प्लॅस्टिक कचरा तिथे प्रचंड जमतो आहे. त्याचं पुढे काय होणार, हा यक्षप्रश्न आहे. मी सुरुवातीला प्लॅस्टिकच्या वापराविषयी सांगायचा प्रयत्न केला, तर ते लोकांना आवडलं नाही. त्यांना वाटलं की मी प्लॅस्टिक पिशवीचे पैसे वाचवतो आहे. आहे ती व्यवस्था अद्ययावत करण्याचा काही प्रयत्न होत नाही. लोकसंख्या मर्यादित असल्याने तसा मूलभूत गरजांचा प्रश्न भेडसावत नाही. तिथे रात्री-अपरात्रीही फिरणं फारसं धोकादायक नाही. पण स्वत: गाडी चालवत असू तरच आणि तेही शहराच्या मुख्य भागात. नियमित पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीसव्हॅन असतात. वाहतुकीचे नियम पाळले जातात. काही वेळा घरकाम करणाऱ्या स्त्रिया चोरीमारी करतात. मात्र गरिबीबद्दल लोक तक्रार करत नाहीत. आहे त्यात तडजोड करून अडचणींतून मार्ग काढतात. लायन्स क्लबचे काही सदस्य, चर्च, मिशनरीज हॉस्पिटल्स, अनाथाश्रम, शाळांच्या माध्यमांतून काम करतात. आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्यालाच काहीतरी करणं, हातपाय हलवणं भाग आहे हा विचारच सामान्यांपर्यंत अजून पोहोचलेला नाही.

viva@expressindia.com