कला आणि ‘कल्ला’कार..कलाकार आणि त्यांचा कल्ला.. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, हा प्रश्न वर्षांनुर्वष कायम आहे. त्याचं एकच एक असं ठोस, ठाशीव उत्तर देता येत नाही. पण ‘कल्ला’कार या सदरासाठी कल्लाकार मंडळी शोधायचं ठरलं आणि या प्रश्नाच्या उत्तराचं प्रतिबिंब ठरावं असे अनेक कल्लाकार आणि त्यांचा ‘कल्ला’ वाचकांपुढे शब्दांच्या माध्यमांतून मांडता आला. खरं तर काहींचा कल्ला इतका भारी होता की त्याला केवळ शब्दच नव्हे तर फोटोंच्या माध्यमातून मांडणं कठीण होतं. त्याचं एक उदाहरण म्हणजे व्हॉइसओव्हर आर्टिस्ट संकेत म्हात्रे. कार्टून मालिका, माहितीपर वाहिन्यांवरचे कार्यक्रम, डब केलेले बॉलीवूडपट किंवा दाक्षिणात्य चित्रपट असा खूप वेगळा प्रवास आवाजाच्या जादूगारानं केला आहे. तर अलीकडच्या काळात अतिशय लोकप्रिय ठरलेल्या ‘रुद्रम’ मालिकेसह अनेक मालिकांच्या प्रोमोजवर वेगळा ठसा उमटवणारा कल्लाकार होता ‘झी युवा’ आणि ‘झी टॉकीज’चा प्रोमो हेड अमोल पाठारे.

विविध क्षेत्रांतील कला साकारणाऱ्या कलाकारांशी या सदराच्या निमित्ताने संवाद साधता आला. त्यात नृत्य, अभिनय, शिल्प, चित्र, लेखक, कवी, संगीत-संगीतकार व गायक ही नेहमीची क्षेत्रं होतीच. त्याखेरीज कलेचं जतन आणि संवर्धन, वेशभूषा, नेपथ्य, फॅशन डिझाइनिंग या वेगळ्या वाटा धुंडाळणारी मंडळीही होती. कधी स्वत:तील कलाकाराला घडवता घडवता, पर्यावरणस्नेहाचा वसा घेणारा, भक्तिभावाला कल्पकता, विचार आणि कृतीची जोड देणारा कलाकार होता दत्ताद्री कोथूर. तर कधी पॅशन, कला आणि कल्पना या तिन्ही घटकांना कलाकृतीत कुशलतेने साकारल्यावर त्याच कलाकृतींना हळूहळू लोकमान्यता मिळू लागली. अशा प्रकारे धातू माध्यमांत काम करून मोठय़ा नजाकतीनं कलात्मकता पेरणारा कलाकार होता मेटल आर्टिस्ट निशांत सुधाकरन.

सोशल मीडियावरून आपापली कला सादर करणाऱ्या कलाकारांना अलीकडे चांगला वाव मिळू लागला आहे. त्यापैकी छायाचित्रणकलेची आवड, सोशल मीडियावरचा वावर आणि करिअरची संधी या तिन्ही गोष्टी हातात हात घालून आल्या. छायाचित्रणाचं पॅशन असलेला हा कल्लाकार होता छायाचित्रकार राहुल वंगानी. छंद रंग-रेषांचा, कागदी वस्तू तयार करता करता छंदाचं रूपांतर काही काळानं करिअरमध्ये झालेली कल्लाकार होती सबिना कर्णिक. तर एखाद्याला रडवणं सोपं असतं पण हसवणं तितकंच अवघड. हसवणं ही एक कला आहे आणि ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ हा या कलेतील एक प्रकार. आजकाल यूटय़ूबमुळे स्टॅण्ड अप कॉमेडी क्षेत्रांतील कलाकारांमध्ये प्रसिद्धी मिळवणाऱ्यांपैकी एक आघाडीचं नाव म्हणजे झाकीर खान. कलाकाराची खरी कसोटी असते ती म्हणजे रसिकांचं मन जिंकणं. त्यात तो संगीतकार असो, चित्रकार असो किंवा अगदी ‘शेफ’सुद्धा. कलिनरी आर्ट्समधून एका ‘शेफ’ची म्हणजेच कलेच्या आधारावर नव्या पदार्थाची चव रसिकांना चाखायला लावणं ही मोठी कामगिरीच असते. केक्स, पॅनकेक्सना नवकोरं रूप देणारी शेफ पूजा धिनग्रा असो किंवा  कॅनडाहून केवळ एका प्रोजेक्टसाठी भारतात आलेली आणि आता इथंच रमलेली ‘भा.डि.पा.’ या वेबचॅनलचा पडद्यामागचा चेहरा असणारी पॉला मॅकग्लिनची ओळखही इथेच झाली.

आज या सदराचा समारोप घेताना या सगळ्या कल्लाकारांची आठवण करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे केवळ आपल्या कलेच्या जोरावर नावारूपाला आलेल्या या तरुण मंडळींची जिद्द, त्यांची सर्जनशीलता, ध्यास यांना सलाम ठोकावा इतकं वैविध्यपूर्ण काम पाहता आलं. स्वप्नं अनेक जण बघतात, शिक्षण पूर्ण करतानाच आपल्याला आवडणारी एक करिअर वाट निवडून त्याच्यातलं शिक्षण घेऊन मग त्या त्या क्षेत्रातील नोकरी-व्यवसायात रमायचं हा महामार्ग त्यांना मान्यच नव्हता. त्यांना त्यांची स्वत:ची, मळवलेली वाट हवी होती. आणि त्यांनी ती शोधली, त्या वाटेने ते पुढेही गेले. आपल्या आवडीचं क्षेत्र त्यांनी निर्माण केलं आणि त्यातून त्यांनी अर्थार्जन-समाधान हे एरवी किचकट वाटणारं गणित साध्य करून दाखवलं. जनरेशन नेक्स्टमधली ही ताकद या सदरातून लोकांसमोर आली आणि अक्षरश: थक्क व्हायला झालं. अशी अनेक सर्जनशील तरुण मनं अजूनही या नव्या नव्या वाटा चोखाळतायेत. तूर्तास, इथे थांबायला हवं म्हणून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण या सदराच्या नाही तर अन्य माध्यमांतून आपण या तरुणाईशी कनेक्टेड राहू. ‘जनरेशन नेक्स्ट’च्या या कल्लाकारांमुळे अनेकांना नवीन वळणवाटा कळल्या आणि प्रेरणाही मिळाली. या सगळ्या आणि भावी कल्लाकारांनाही हार्दिक शुभेच्छा देत हे सदर इथेच संपवतो आहोत.

viva@expressindia.com