कुठल्याही गोष्टीकडे, वस्तूकडे वा घटनांकडे पाहणारी संशोधक नजर असायला हवी. तरच नवीन काही तरी निर्माण करता येतं असं म्हटलं जातं. ही संशोधक नजर म्हणजे काय?, याचं उत्तर ‘व्हिवा लाऊंज’मध्ये अम्रिता हाजरा यांच्याशी झालेल्या गप्पांमधून मिळालं. समतोल किंवा पौष्टिक आहार ही आपल्या आयुष्यातील रोजची गरज खरी.. पण त्यावर बोलून थांबण्यापेक्षा मुळातच संशोधक वृत्ती असलेल्या अम्रिता यांनी पौष्टिकता कुठल्या आहारातून, कशा पद्धतीने मिळेल? त्याचा आहार घेणाऱ्याला आणि धान्य पिकवणाऱ्यालाही फायदा कसा होईल, याचं गणित आपल्या संशोधनातून मांडलं. ‘लोकसत्ता’च्या तरुण तेजांकित पुरस्काराने गौरवलेल्या आणि ‘आयसर’ या विज्ञान संशोधन संस्थेत कार्यरत असलेल्या, कॅलिफोर्नियात ‘द मिलेट प्रोजेक्ट’ यशस्वीपणे राबवलेल्या अम्रिताशी ‘लोकसत्ता व्हिवा लाऊं ज’च्या मंचावर संवाद साधला रेश्मा राईकवार आणि भक्ती बिसुरे यांनी..

विज्ञान ही लाइफस्टाइल असायला हवी..

girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
ग्रामविकासाची कहाणी
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ

माझे आई आणि बाबा दोघंही मूलभूत संशोधनात कार्यरत आहेत. त्यामुळे विज्ञान हे येता-जाता, उठता बसता, सतत सभोवताली होतं. रात्री जेवताना जसे सगळे जण दिवसभरातील गोष्टी बोलतात, गप्पा मारतात; त्या वेळेत आम्ही नेहमी विज्ञान, त्यातलं नवीन संशोधन, आईबाबांचं काम अशा गोष्टींबद्दलच बोलायचो. त्यामुळे विज्ञान हा शाळेत पुस्तकातून शिकायचा विषय आहे, असं मला कधीच वाटलं नाही. विज्ञान आमच्या रोजच्या जगण्याचा भाग होता. कोणताही प्रश्न पडला, शंका आली तर आईबाबांनी पुस्तकात बघून कधीच त्याचं उत्तर दिलं नाही. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही कायम सहज चर्चेतूनच मला मिळाली आहेत. आपल्या कुतूहलातून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते, त्या प्रश्नाच्या मागे लागून त्याचं उत्तर स्वत:च अनेकदा शोधावं लागतं याची सवय मला त्यामुळेच लहानपणापासून लागली होती. या सवयीमुळे मला कधीच कोणत्या क्लास किंवा टय़ूशनला जावं लागलं नाही. रोजच्या जगण्याचा एक ‘पॅटर्न’ म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन आमच्या घरात होता आणि तो प्रत्येकाच्या जगण्यात असायला हवा.

मूलभूत संशोधनाकडे वळण्याचा निर्णय

मला पहिल्यापासूनच बायोलॉजी आवडत होतं. घरून नसलं तरी सर्वसामान्यपणे बाहेरच्या इतर ओळखीच्या लोकांकडून, शिक्षकांकडून मेडिकलला जाण्यासाठी थोडंफार प्रेशर होतंच. मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करताना लक्षात आलं की आपल्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळणार नाहीत. एका टप्प्यानंतर आपले प्रश्न अनुत्तरित राहणार आहेत. त्यामुळे प्रवेश परीक्षेतून मेडिकल कॉलेजला मिळत असलेली अ‍ॅडमिशन मी घेतली नाही आणि मूलभूत संशोधनाकडे वळायचा निर्णय घेतला. मायक्रोबायोलॉजी हा विषय घेऊन गरवारे कॉलेजमधून मी बी.एस्सी. पूर्ण केलं आणि मास्टर्ससाठी केमिस्ट्री निवडलं. कलकत्त्याला राहून मी केमिस्ट्री शिकले आणि मास्टर्ससाठी आयआयटी खरगपूरला गेले. केमिस्ट्रीतच पीएचडी करायची असं ठरवून मी यूएसला गेले आणि पोस्ट-डॉक्टरल रिसर्चसाठी पुन्हा मायक्रोबायोलॉजी हा विषय घेतला. मला बॅक्टेरियामध्ये प्रचंड रस होता. बॅक्टेरिया आपल्याभोवताली सगळीकडे आहेत. आपल्याला फक्त त्यांच्यामुळे आजार होतो एवढंच डोक्यात असतं पण हेच बॅक्टेरिया आपल्याला अगदी इडलीचं पीठ आंबवण्यासारख्या रोजच्या गोष्टीतही मदत करत असतात. त्यामुळे एका अर्थी बॅक्टेरिया आपल्याला आजारही देतात आणि त्यावरचा उपायही. त्यामुळे मी त्यांच्यावर आधारित माझं पुढील संशोधन करायचं ठरवलं.

नवीन प्रयोग

अमेरिकेत इटालियन रेस्टॉरंटमध्ये ‘रेसोटो’ नावाची एक डिश सव्‍‌र्ह केली जाते, ज्यात अबरेरिओ राइस असतो. त्या डिशला आम्ही आमच्या पद्धतीने मिलेट्स वापरून तयार केलं आणि तिला ‘मिलेटो’ असं नाव दिलं. पिझ्झा-बेसच्या पिठात अर्धा गहू आणि अर्धी मिलेट्स वापरायचा प्रयोगही आम्ही केला. ‘मॉल्ट’ असं ज्याला म्हटलं जातं, ज्याच्यापासून बीअरही तयार केली जाते ते ‘मॉल्ट’ बनवायलाही आम्ही सुरुवात केली. माझे दोन मित्र जे बीअर ब्रूइंग करतात त्यांनी या ‘मॉल्ट’पासून बीअर ब्रू करायला सुरुवात केली. धान्याला मोड आणून, ते सुकवून, भाजून आणि मग दळून ही ‘मॉल्ट्स’ बनतात. जगभरात बार्ली आणि व्हीट मॉल्ट हे बीअरसाठी वापरले जातात. पुण्यातल्याच एका स्टार्टअपने आमच्याकडून ही प्रक्रिया शिकून घेऊन मिलेट्स बीअर करायची तयारी दाखवली आहे आणि ते त्यावर काम करत आहेत.

संशोधन क्षेत्रातील करिअर..?

संशोधन क्षेत्रात करिअर करायची तर शिक्षण घेणं आणि रिसर्च करणं यात खूप वेळ जातो. मात्र त्या काळातही स्वत:साठी तरी निदान कमवावंच लागतं. सरकारने याबाबतीत काहीएक सोय नक्की केली आहे. रिसर्च करताना पहिली दोन र्वष महिना २५ हजार रक्कम आणि घरभाडे, पुढची तीन र्वष महिना ३२ हजार रक्कम आणि घरभाडे असा आपल्या रिसर्चचा मोबदला आपल्याला दिला जातो. पोस्ट-डॉक्टरल रिसर्चला महिना ५५ ते ६० हजार रक्कम अधिक घरभाडे असं उत्पन्न मिळेल, अशी सोय सरकारने केली आहे. त्यामुळे अगदीच अस्तित्वाचा प्रश्न येत नाही; मात्र रिसर्च पूर्ण झाल्यावर मनासारखी नोकरी शोधणं हे जास्त गरजेचं असतं. ती तशी मिळाली नाही तर मात्र नंतर त्याचा त्रास होऊ  शकतो. पण तरुणांना संशोधन क्षेत्रात उत्तम करिअर करता येऊ शकते. त्यांनी ते करायला हवं.

‘द मिलेट प्रोजेक्ट’

मी २०१० मध्ये ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’मध्ये होते. २०१२ ते २०१५ या वर्षांत अमेरिकेत पाण्याची मोठय़ा प्रमाणावर समस्या निर्माण झाली होती. त्या काळात कमी पाण्यावर होणारी पिकं घेणं हे तिथल्या शेतकऱ्यांसाठीही फायद्याचं होतं आणि तिथल्या न्यूट्रिशनसाठीही हे गरजेचं होतं. मिलेट्सचं उत्पादन घेताना मिळणाऱ्या नफ्याचा विचार केला तर मिलेट्सच्या दाण्यांवर काही प्रक्रिया कराव्या लागतात, ज्याचा खर्च बऱ्यापैकी असतो. त्यामुळे नफा देणाऱ्या पिकांमध्ये त्यांचा समावेश होत नाही. मात्र ही पिकं कमी पाण्यावर होतात आणि उलट जास्त पाणी दिलं गेलं तर ती जगत नाहीत. त्यामुळे डोंगरउतारावर जिथे पाणी साचत नाही आणि वाहून जातं तिथे ही पिकं सहज घेता येऊ  शकतात. या सगळ्या कारणांनी तिथल्या लोकांना या धान्याची माहिती होणं आवश्यक होतं. तिथल्या शेतकऱ्यांना याचा फायदा समजावण्यापासून ते लोकांना याचं पोषणमूल्य समजावण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर मेहनत घ्यावी लागली. दुष्काळी परिस्थितीत तरून जाण्यासाठी ‘द मिलेट प्रोजेक्ट’ आम्ही तिथे सुरू केला होता.

मिलेट्स म्हणजे..

वरी, नाचणी, भगर, सावा, ज्वारी, बाजरी, राजगिरा अशा प्रकारच्या लहान दाणा असलेल्या धान्याला मिलेट्स किंवा भरड धान्य म्हटलं जातं. या धान्याच्या दाण्यांवर आवरण असतं, कवच असतं जे काढायला कठीण असतं. म्हणूनच आपल्याकडे पहिल्यापासून ते आवरणासकट खायची पद्धत आहे. हे आवरण आपल्या आहारात ‘फायबर’ पुरवतं. आपण या धान्यांचा आपल्या जेवणात सीझनल समावेश करत असतो. ज्या वातावरणात जे उगवतं, जे पिकतं ते आपण आपल्या रोजच्या आहारात घेत असतो. मिलेट्समध्ये जीवनसत्त्व जास्त असतात. म्हणजे जर एक वाटी नाचणी आणि एक वाटी दूध यांची तुलना केली तर नाचणीत दुधापेक्षा तिप्पट कॅल्शियम असतं. मात्र भरड धान्यांतून मिळणारे हे जे फायदे आहेत त्यांचा वापरच आपण आपल्यासाठी करून घेत नाही आणि त्यामुळे आपल्या तब्येतीवर परिणाम होतो.

मिलेट्सच का ?

अमेरिकेत राहत असताना अनेकदा प्रोसेस्ड फूड खरेदी केलं जायचं. त्याच्या कंपन्या वेगवेगळ्या असल्या तरी त्या सगळ्यातले घटक सारखेच असायचे. तांदूळ, गहू आणि मका ही तीनच प्रकारची धान्य खाल्ली जायची. आपल्या पारंपरिक थाळीमध्ये एकतृतीयांश भाग हा गहू किंवा तांदूळाचा असतो, मात्र तिथे फक्त हीच धान्य खाल्ली जात होती असं माझ्या लक्षात आलं. आपल्याकडे परंपरागत असलेली इतर धान्य ज्यांचा समावेश मिलेट्समध्ये होतो, ती तिथल्या लोकांना माहीतच नव्हती. मिलेट्स ही जवळपास दहा हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतात. पश्चिमेकडच्या देशांत अनेक ठिकाणी न्यूट्रिशनची समस्या ही केवळ एकाच प्रकारचे धान्य खात असल्याने उद्भवलेली आहे. म्हणून आम्ही तिथे मिलेट्सवर संशोधन करायला सुरुवात केली.

‘मिलेट इयर’

थोडय़ा काळात उगवणारी मिलेट्स पिकं फायद्याची ठरतात. जमिनीतली पोषक तत्त्वं टिकून राहण्यासाठीही पिकं बदलत राहवी लागतात आणि शरीरालाही पोषणमूल्य मिळण्यासाठीही सर्व प्रकारची धान्य गरजेची असतात. आपल्याकडच्या या धान्यांचा विसर पडू नये, त्यांचं महत्त्व कळावं म्हणून सरकारने हे वर्ष ‘मिलेट इयर’ म्हणून घोषित केलं आहे.

मिलेट्स कसे खावेत?

मिलेट्स ही काही नव्याने शोधून काढलेली धान्य नाहीत. ती आपण वर्षांनुर्वष आपण आहारात घेत असलेली धान्य आहेत. त्यामुळे आहाराची ही पारंपरिक पद्धत जपली आणि आपल्या जेवणातील ताटातलं त्याचं प्रमाण जपलं की आपोआप हव्या त्या प्रमाणात मिलेट्स पोटात जाणार आहेत. मात्र तेच खायचा कंटाळा येत असेल तर काही आवडत्या पदार्थाच्या रेसिपीत थोडा बदल करून त्यात मिलेट्सचा समावेश करता येऊ  शकतो. मला स्वत:ला डोसे खूप आवडतात. त्यामुळे मी डोशाच्या पिठात वेगवेगळी मिलेट्स घालून डोसे बनवते. डोशाच्या पिठाच्या प्रमाणात तीनचतुर्थाश भाग मिलेटचा आणि एकचतुर्थाश भाग उडीद डाळ असा घेऊ न एरवी तयार करतो तसंच पीठ तयार करायचं आणि त्याचे डोसे घालायचे. वरी किंवा भगर यांचा वापर तांदळाच्या भाताऐवजी करता येऊ  शकतो. ज्वारी-बाजरीच्या भाकरी आवडत नसतील तर कुकीज आणि बिस्किटांमध्ये त्यांचा समावेश करता येऊ  शकतो.

नैराश्य येऊ  द्यायचं नाही

तुम्ही एक उद्दिष्ट घेऊन तुमच्या प्रयोगाला, रिसर्चला सुरुवात करता. त्या उद्देशाच्या दृष्टीने सगळे प्रयत्न करता आणि रिसर्चच्या शेवटी तुम्ही विचार केलेला निष्कर्ष तुम्हाला मिळत नाही आणि भलताच काही तरी रिझल्ट तुम्हाला मिळतो. त्या वेळी तुमच्या रिसर्चच्या सगळ्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. तुम्हाला अपेक्षित असलेल्या गोष्टी रिसर्चमध्ये सापडतच नाहीत आणि तुमचा रिसर्च ‘फेल’ झाल्याचं तुम्हाला समजतं. या अपयशाने त्रास होतो, वाईट वाटतं, स्वत:चा राग येतो, वेळ वाया गेल्याचं दु:ख होतं, इत्यादी इत्यादी..  मात्र या सगळ्या भावना तात्पुरत्या असल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्ही एक रिसर्च फेल झाला म्हणून कायमचे त्या क्षेत्रातून बाहेर पडत नाहीत. मुळात ज्या गोष्टीची आपल्याला प्रचंड ‘पॅशन’ असते त्याबद्दल आपण जास्त काळ डिप्रेस वगैरे राहूच शकत नाही. ९० टक्के वेळा अपयशच येणार आहे हे गृहीत धरून काम करा म्हणजे डिप्रेशन वगैरे येणार नाही.

मिलेट्सचा आर्थिक फायदा

‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मिलेट रिसर्च’ने मिलेट्सपासून शेवया, पापड, नूडल्स अशा गोष्टी तयार केल्या आहेत. या गोष्टी बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रं तयार केली आहेत, जी तुलनेने स्वस्तात बनतात आणि त्यातून उत्पादनही चांगलं मिळतं. अनेक गावांतील तरुणांनी त्यांचं प्रशिक्षण घेऊ न त्याचा उपयोग करायला सुरुवात केली आहे. आपल्या उत्पादनाच्या प्रमाणावर आधारित सबसिडीही सरकारकडून दिली जाते. हिमाचलमध्ये डोंगरउतार अधिक असल्याने मिलेट्सचं उत्पादन घेण्याचं प्रमाण तिथे जास्त आहे. त्यामुळे तिथल्या सरकारने त्यांना आधार देतील अशा योजना राबवल्या आहेत.

स्त्रियांनी मूलभूत संशोधन क्षेत्रात यायला हवं..

मूलभूत संशोधन क्षेत्रात स्त्रियांचा आकडा कमी आहे. हे निरीक्षण इथेच नाही तर जगभरात सगळीकडे लागू पडतं. भारतात जे प्रमाण आहे तेच प्रमाण अमेरिकेतही आहे. पण याचं कारण संशोधन क्षेत्रात पुरुषांचं वर्चस्व किंवा पुरुषसत्ताक पद्धती वगैरे आहे असं अजिबात नाही. या क्षेत्रातला स्त्रियांचा वावर कमी असण्यामागचं कारण त्यांच्या वयाशी निगडित आहे. या क्षेत्रात ज्या काळात तुमचं करिअर अत्यंत महत्त्वाच्या आणि कठीण टप्प्यावर असतं तेच वय हे स्त्रियांचं प्रजननक्षम वय मानलं जातं. आई होणं आणि करिअर सांभाळणं या दोन्ही गोष्टी एकत्र करणं हे खरंच अत्यंत अवघड असतं. त्या काळात घेतलेल्या ब्रेकनंतर पुन्हा आपलं करिअर त्याच जोमाने सुरू करणं अवघड होतं, कित्येकदा त्यांना आधीच्या पोस्टवर घेतलं जात नाही, नव्याने सुरूवात करावी लागते. त्यामुळे पूर्णपणे हे क्षेत्रच सोडून दिलं जातं. आता हळूहळू अशा योजना अनेक कंपन्या आणि अनेक क्षेत्र राबवत आहेत, ज्यामध्ये मॅटर्निटी ब्रेकनंतर परत येण्यासाठी स्त्रियांना काही इन्सेंटिव्ह दिली जातात, त्यांची पोस्ट तशीच परत दिली जाते आणि त्यांना परत येण्यासाठीही प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे आता जास्तीत जास्त स्त्रियांनी मूलभूत संशोधन क्षेत्रात यायला हवं.

प्रयत्नांशिवाय काहीच नाही

मी स्वत: रिसर्च करतो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा एक महत्त्वाचा कार्यक्रम ठरला. माझ्या डोक्यात बऱ्याचदा नकारात्मक विचार यायचे की किती त्रास मेहनत आहे आपल्याच वाटय़ाला. पण अम्रिता यांच्याकडून ऐकून समजलं की प्रयत्नांशिवाय काहीच शक्य नाही. त्यामुळे मला माझ्या प्रयत्नांकडे नकारात्मक न बघता एक आवड, जिज्ञासा म्हणून बघण्याची प्रेरणा मिळाली.

आशीष कदम

प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान असतंच

लहानपणापासून आई आग्रह करायची की घरचं जेवण कधीही चांगलं. कधी कधी भाकरीही खावी. शरीरासाठी चांगली असते. पिढय़ांपासून आलेले हे उपदेश खरंच किती महत्त्वाचे असतात हे आज कार्यक्रमामुळे अगदी सहज समजले.

अमोल पांडुळे

जिद्द महत्त्वाची

या कार्यक्रमामुळे अजून जिद्द निर्माण झाली. संशोधन क्षेत्र, त्यातले विविध पर्याय याबद्दल माहिती मिळालीच पण स्त्री म्हणजे फक्त स्वयंपाक असं समाज म्हणतो. त्याला बळी न पडता किचनमध्येही आपण अनेक शोध लावत असतो. यायाच अर्थ आपलं संशोधन क्षेत्र आपल्यासमोरच असतं पण आपण त्याचा करिअरच्या दृष्टीने कधीच विचार करत नाही, असं वाटतं.

शामा जरांडे

रिसर्चसाठी योग्य विषयाची निवड हवी

हे वर्ष भारत सरकारने ‘मिलेट्स इयर’ म्हणून घोषित केले आहे ही खूप कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे. मिलेट्स शरीरासाठी किती महत्त्वाचे आहे हे आज समजले. आणि सहज उपलब्ध होणाऱ्या मिलेट्सपासून बनवता येतील अशा पदार्थाबरोबरच संशोधन क्षेत्रासाठी अभ्यास कसा करावा? आपल्या संशोधनाचा देशालाही कसा फायदा करून देता येईल? याबद्दलचे विचार त्यांच्याकडून समजले.

रंजित पवार

भारतीय पदार्थच बेस्ट

मी मूळचा साताऱ्याचा असून अभ्यासानिमित्ताने मी पुण्यात आहे. मला भारतीय पदार्थ खूप आवडतात, पण माझ्यासोबत शिकणाऱ्या, राहणाऱ्या मुलांना पाश्चिमात्य पदार्थच खूप आवडतात. आजच्या कार्यक्रमामुळे माझा भारतीय पदार्थावरचा हा विश्वास आणखी दृढ झाला आहे.

शुभम पिंगळे

साध्या-सोप्या शब्दांत बोलणारी शास्त्रज्ञ

मी इथे येण्यापूर्वी शास्त्रज्ञ म्हणून त्या कशा असतील, त्यांचं बोलणं मला समजेल का?, असे विचार मनात होते. पण त्यांनी इतक्या सोप्या आणि साध्या भाषेत सगळं समजावून सांगितलं. आता तर मीही त्या रेसिपीज क रून बघेन.

श्रावणी शिवणेकर

महिला शास्त्रज्ञ कशा असाव्यात हे समजलं..

मी मूळची अहमदनगरची आहे. मला पुढे जाऊ न संशोधन करायची इच्छा आहे. आजच्या कार्यक्रमामुळे मला शास्त्रज्ञ कशा असतात, त्यांची राहणी साधी असली तरी अभ्यास, संयम, परिश्रम कसे असतात या सगळ्याची माहिती मिळाली.

श्रीप्रभा ठुबे

‘व्हिवा लाऊंज’ एक उत्तम अनुभव

मी नेहमीच लोकसत्ता ‘व्हिवा लाऊं ज’ची वाट बघत असते. मी स्वत: सायन्सची विद्यार्थिनी आहे. त्यामुळे अम्रिता यांचे बोल हे खूप अनुभवातून आलेत हे समजत होतं. मिलेट्सबद्दल बेसिक माहिती होती पण त्यामागचं विज्ञान आज समजलं.

* नेहा जोशी

संकलन :  तेजश्री गायकवाड, प्रियंका वाघुले.