परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं?

स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

सौम्या कॉलेजमधून आली आणि थकून पडून राहिली. काही करावंसंच वाटत नव्हतं तिला. असं का होतंय? जरा काही काम केलं की अगदी गळून जायला होतंय. परीक्षा जवळ आलीये, अभ्यास करायला हवा हे कळतंय, पण इतकी झोप येते की होतच नाही अभ्यास. गेले काही दिवस तर पीरियड्सही वेळेवर येत नाहीयेत. आता मात्र तिला काळजी वाटायला लागलीये. आपल्याला काही तरी मोठा आजार झालाय का?, कॅन्सरबिन्सर तर नसेल?, नुकतेच शेजारचे काका कॅन्सरनं गेले. त्यांना असंच काय काय होत होतं. घरच्या सगळ्यांच्या, मैत्रिणींच्या लक्षात आलंय तिचं बदललेलं रुटीन. ‘काय होतंय तुला नक्की?’, या त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे सौम्याला कळत नाहीये. तिला काही ताप येत नाही, उलटय़ा-जुलाब होत नाहीत की सर्दी-खोकलाही नाही. तिची मावशी तर म्हणाली काही तरी मानसिक असेल म्हणून. ‘बॉयफ्रेण्डशी भांडण झालंय का? की ब्रेकअप वगैरे झालंय?’, ‘काही तरीच काय गं मावशी? भांडण आणि ब्रेकअप व्हायला बॉयफ्रेण्ड असायला तरी हवा ना आधी!,’ सौम्या वैतागून म्हणाली.

शेवटी आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. तपासून त्या म्हणाल्या की सौम्याला अ‍ॅनिमिया झालाय. म्हणजे तिच्या अंगातलं रक्त कमी झालंय. त्यांनी ती काय आणि किती खाते याची चौकशी केली, काही तपासण्याही करायला सांगितल्या.

अ‍ॅनिमिया हा खरं तर आजार म्हणण्यापेक्षा एक लक्षण आहे. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी हिमोग्लोबिन असतं. ते बनण्यासाठी आयर्न आणि प्रोटिन्स लागतात. आहार अपुरा असेल तर यांचा सप्लाय कमी होतो आणि अ‍ॅनिमिया होतो. काही कारणानं अंगातून रक्त निघून जात असेल तरी असं होऊ  शकतं. उदाहरणार्थ आपल्या देशात पोटात जंत होण्याचं प्रमाण खूप आहे. हे जंत आतडय़ाला छोटय़ा जखमा करतात. त्यामुळे आपलं रक्त हळूहळू कमी होऊ  शकतं.

पण किशोरवय आणि तरुणपण हा काळ तर सगळ्यात फिट असण्याचा! चांगले धडधाकट असतो आपण. तेव्हा कसा होईल अ‍ॅनिमिया? दुर्दैवानं तो होतो. आपल्या भारतात तर पन्नास टक्क्यांहून अधिक तरुणांना अ‍ॅनिमिया असतो. अनेक कारणं असतात त्याला. या वयात आपल्या शरीराची वाढ इतक्या वेगानं होत असते की नेहमीच्या आहारातून मिळालेले घटक पुरे पडत नाहीत. थोडक्यात डिमांड जास्त आणि सप्लाय कमी अशी स्थिती! त्यातून खाण्याची वेगवेगळी फॅड्स या वयात चालू होतात, बाहेर खाण्याचं प्रमाण वाढतं. आहारात जंक फूड जास्त जाऊ  लागतं. ब्रेकफास्टवर काट मारली जाते. साहजिकच आयर्न, प्रथिनं, जीवनसत्त्व कमी पडतात. आणि हिमोग्लोबिन कमी होऊन अ‍ॅनिमिया होतो. मुलींमध्ये याचं प्रमाण जास्त आहे आणि त्याला काही अ‍ॅडिशनल कारणं असतात. अनेक मुली आवश्यकतेपेक्षा कमी खातात. काही वेळा वजन कमी करण्यासाठी तर काही वेळा नाइलाज म्हणून. मुलींनी, स्त्रियांनी उरलंसुरलं, शेवटी खायची पद्धत अजूनही अनेक घरांत असते. शिवाय दर महिन्याला पीरियड्सच्या वेळी मुलींच्या शरीरातून रक्त जातं.

हा अ‍ॅनिमिया म्हटलं तर अगदी साधा आणि म्हटलं तर धोकादायक. याची वेगळी अशी खास लक्षणं नसतात. पण थकवा जाणवतो, कामातला उत्साह कमी होतो. एकाग्रता कमी होते, वर्गात लक्ष लागत नाही. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे सारखी आजारपणं येतात. रक्ताचं प्रमाण फारच कमी झालं तर दम लागायला लागतो. मुलींच्या बाबतीत आणखी एक धोका असतो. काही काळानं जेव्हा त्या प्रेग्नंट होतात तेव्हा होणाऱ्या बाळाच्या वाढीवर याचा परिणाम होऊ  शकतो. ते लहानखुरं जन्माला येतं. कारण त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. म्हणजे फक्त त्या मुलीवरच नव्हे तर चक्क पुढच्या जनरेशनवर परिणाम होतो. तरुणपणातला अ‍ॅनिमिया धोकादायक असतो, असं मी म्हटलं ते यासाठीच.

अ‍ॅनिमिया झाल्यावर लोहाच्या आणि व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्यायला लागतात. जास्त गंभीर असेल तर रक्त चढवायला लागतं. पण तो मुळात होऊ  नये म्हणून आपली लाइफस्टाइल थोडी बदलायला हवी. वेळेवर जेवण, आहारात भरपूर भाज्या, मोडाची कडधान्यं आणि फळांचा समावेश; आणि लोखंडाच्या भांडय़ांचा स्वयंपाकात वापर हे काही अगदी साधे उपाय. नॉनव्हेज अन्नातून भरपूर लोह मिळतं. व्हेज खाणाऱ्यांनी हिरव्या पालेभाज्या, कडधान्यं, ड्रायफ्रूट्स, गूळ, खजूर खायला हवं.

सौम्याच्या अ‍ॅनिमियाचं कारण निघालं तिचा अपुरा आणि अयोग्य आहार. तिला रोज उठायला उशीर व्हायचा म्हणून ती ब्रेकफास्ट न घेता निघायची. दुपारी असंच काही तरी कँटीनमध्ये खायचं. संध्याकाळच्या जेवणात तिची रोजची फर्माईश असायची, पोळीभाजी नको, काही तरी वेगळं हवं म्हणून.

पण आता तिनं ठरवलंय, पुन्हा या सगळ्या त्रासातून, तपासण्यांच्या चक्रातून जायचं नाही. लोहाच्या गोळ्या घेण्याबरोबर तिनं मुकाटय़ानं आपलं डाएटही सुधारलंय. रोज नाश्ता घेतल्याशिवाय ती घराबाहेर पडत नाही. बरोबर डबा घेऊन जाते आणि तिच्या सॅकमध्ये नेहमी एक फळ असतं. आता तीन महिन्यांनी हिमोग्लोबिन तपासलं की कळेल वाढलंय का ते..

viva@expressindia.com