News Flash

‘ताण’लेल्या गोष्टी : अँग्री यंग मॅन

काही दशकांपूर्वी बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चननं ‘अँग्री यंग मॅन’ पॉप्युलर केला.

परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं

काही हजार वर्षांपूर्वीचं हे दृश्य! घनदाट जंगल आहे. दोन माणसं एक प्राणी मारून आणतात आणि नंतर खाण्यासाठी एका झाडाखाली ठेवतात. तेवढय़ात तिकडून एक कोल्हा येतो आणि ते मांस खायला लागतो. या माणसांना खूप राग येतो, ते त्याच्यावर धावून जातात आणि त्याला पळवून लावतात. त्यांना राग आला नसता तर? जंगलातल्या हिंस्त्र प्राण्यांसमोर त्यांचा काय पाड लागणार होता? किती आवश्यक होता ना राग त्यांना स्वत:च्या रक्षणासाठी! तो त्यांचं रक्षण करत होता, त्यांना जगायला मदत करत होता. गेल्या हजारो वर्षांपासून आहे हा राग माणसाच्या मेंदूत, आपल्या अगदी बेसिक भावनांपैकी एक. काळ बदलला, माणूस प्रगत झाला. त्याला अनेक नवनवीन भावना समजायला लागल्या. माणसाच्या जगण्याची पद्धतही बदलली. त्यामुळे अगदी मूलभूत जगण्यासाठी रागाची आवश्यकता भासेनाशी झाली. पण इतकी र्वषे मेंदूत रुजलेला तो, असा जाणार थोडाच! बरं आता काही वाघ, सिंह, कोल्हे नाहीत आक्रमण करायला. मग कोणावर काढायचा हा राग? आणि कसा काढायचा? हळूहळू त्याचंही स्वरूप बदललं.

आता रागाची अभिव्यक्ती वेगवेगळी आहे. आता माणसं मारतात एकमेकांना! शाळेत जाऊन स्वैर गोळीबार कर, बॉम्ब टाकून इमारती, गावं, देश उद्ध्वस्त कर, किरकोळ भांडणातून मारामारी कर.. परवाच्या वर्तमानपत्रामध्ये एक ठळक बातमी होती.. एका तरुण मुलाने आपल्या आईवडिलांचा खून केला. त्याला नोकरी नव्हती, दारूचं व्यसन मात्र होतं. व्यवसायासाठी तो सारखा आईवडिलांकडे पैसे मागायचा. त्यांनी दिले नाहीत म्हणून त्याला राग आला आणि त्याने हे कृत्य केलं. इतका राग त्याच्या मनात होता का..? की  ‘हे आपले आईवडील आहेत, आपण त्यांना इजा करतोय, यामुळे आपल्याला ते पुन्हा कधीच भेटणार नाहीत, आपल्याला शिक्षाही होईल,’ यातलं काहीच लक्षात आलं नाही त्याच्या?

काही दशकांपूर्वी बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चननं ‘अँग्री यंग मॅन’ पॉप्युलर केला. सदा चिडलेला हा तरुण सारखा कुणाला तरी चोपून काढत असायचा. का इतका प्रसिद्ध झाला तो?  प्रत्येक माणसाच्या मनात खोल खोल दडलेल्या प्राण्याला हे पाहून बरं वाटत असेल, पडद्यावरचं दृश्य पाहून डोळ्याचं पारणं फिटत असेल, म्हणून? की आपल्या या आदिमानवापासून असलेल्या फँटसीचं समाधान होत असेल म्हणून? बहुतेक दोन्ही! काहीजणांचा हा संताप ज्वालामुखीसारखा उफाळून येतो आणि वाटेतल्या सगळ्या गोष्टी नष्ट करून टाकतो. काहींचा संताप खदखदत राहतो आणि स्वत:ला तरी नष्ट करून टाकतो किंवा नको त्या वेळी, नको त्या प्रकारे व्यक्त होतो. तरुण वयात तर रागाची तीव्रता इतकी तेज असते की इतर सगळ्या भावना झाकोळून टाकायची त्याच्यात क्षमता असते. नुसत्या भावनाच नाही तर व्यवसाय, नाती, आरोग्य हे सगळेच या होमात जळून जाऊ  शकतात.

राग जेव्हा गर्दीमध्ये येतो, तेव्हा तर फार उग्र रूप घेतो. गर्दीची मानसिकता वेगळीच असते, तिला चेहरा नसतो की जबाबदारी. तिथे कोणी आपली सदसद्विवेकबुद्धी वगैरे वापरण्याच्या फंदात पडत नाही. एकमेकांच्या आडून जाळपोळ, तोडफोड केली जाते. काही भित्रे लोकही यात हात धुवून घेतात. वेळोवेळी होणाऱ्या दंगली याची साक्ष आहेत.

गंमत अशी की बऱ्याचदा हा राग नसतोच! कधी आपण दुखावले गेलेलो असतो तर कधी हताश! कधी नाकारल्यासारखं वाटत असतं तर कधी असहाय्य! कधी आपल्यावर अन्याय झालेला असतो तर कधी अपमान! काहीही असलं तरी प्रतिक्रिया एकच, आत्यंतिक संताप! फार कमी वेळा त्या रागाचं खरं कारण, खरं स्वरूप ओळखलं जातं. त्याहूनही कमी वेळा तो नीट चॅनलाइज करून योग्य कारणासाठी वापरला जातो. रागाचा नीट वापर करून काहीतरी जगावेगळं, डोळ्यात भरणारं काम एखादा शिवाजी, एखादी राणी लक्ष्मीबाई, नाहीतर एखादा सीमेवर लढणारा सैनिकच करून दाखवतो.

आणि त्याचे परिणाम? किती भयंकर! ब्लड प्रेशर, हार्ट अ‍ॅटॅक, पॅरालिसीस, व्यसन, अपघात, आत्महत्या, खून, मारामाऱ्या.. फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आणि सामाजिकही! फक्त स्वत:वरच नव्हे तर इतरांवरही! भारताच्या लोकसंखेच्या एकचतुर्थाश इतक्या प्रचंड संख्येनं आहे भारतीय तरुणाई, खरंतर सगळ्या जगाच्या हेव्याचा विषय असणारी! दिसताना तरी हे प्रचंड मनुष्यबळ आहे आपल्या देशात. पण ही मौल्यवान ऊर्जा अशी तणावग्रस्त राहिली, नकारात्मक झाली तर भस्मासुरासारखी स्वत:लाच नष्ट करून टाकेल. इतकं रागाच्या कह्य़ात जावं का? आपलं काहीच नियंत्रण नसणार आहे का त्यावर? एखाद्याच्या रागाची कडू फळं इतरांनी का चाखायची?

‘रिकामं मन सैतानाचं घर’ असं म्हणतात. तसंच रिकामे हातही सैतानाचे होत असतील. या आपल्या मनाला आणि हातांना गुंतवून ठेवायला हवं. खेळ, व्यायाम, शारीरिक कष्ट करून ताणाला आणि रागाला काहीतरी मोकळा मार्ग द्यायला हवा. आपला राग आणि त्याचं कारण, दोन्ही ओळखायला, शिकायला हवीत. त्याची जबाबदारी आपण घ्यायला हवी, त्याला ताब्यात ठेवायला हवं, नीट वळवून या राक्षसाचा आपल्या फायद्यासाठी वापर करायला हवा. तरीही तो आटोक्यात राहत नसेल तर कोणाची तरी, काहीतरी मदत घ्यायला हवी. काऊन्सेलिंग, मानसोपचार, रिलॅक्सेशन, योगासन, मेडीटेशन.. अनेक आयुधं आहेत आपल्याकडे यासाठी. ‘मी रागीटच आहे बुवा!’ असं कारण न देता करायचा का हा प्रयत्न?

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 12:42 am

Web Title: anger issue angry young man stress management
Next Stories
1 ‘सुशी’याना..
2 कपडेही ‘ओएलएक्स’ होतात तेव्हा..
3 ‘डिजिटली’ फॅशन विकणे आहे..
Just Now!
X