18 November 2017

News Flash

प्राणी ‘दोस्तां’ना सांभाळा..

केसाळ आणि फॉरेन ब्रीड्सच्या बाबतीत वातावरणातील तापमानाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

तेजल चांदगुडे | Updated: June 30, 2017 5:40 AM

पावसाळ्यात आजारी पडू नये आणि पावसाचा आनंदही लुटता यावा यासाठी ढग दाटून येताच सगळ्यांची एकच लगबग सुरू होते. घरातल्या आम जनतेबरोबर लाडक्या प्राणीदोस्तांची काळजी घ्यायची म्हणून हल्ली विशेष तयारी केली जाते. मला आठवतं शाळा सुरू व्हायच्या आधीच गणवेश व्यवस्थित बसतो की नाही, मग त्यावर रेनकोट दप्तरासकट व्यवस्थित बसतो की नाही याची एक छोटेखानी पडताळणी व्हायची. पण तेव्हा केवळ बच्चेकंपनीपुरती असलेली पावसाळी खरेदी आणि काळजी घराघरातील प्राणीमित्रांपर्यंत विस्तारली आहे. त्यांच्यासाठी फक्त पावसाळ्यासाठी म्हणून काही गोष्टी आवर्जून खरेदी केल्या जातात.

पावसाळा जवळ आला की आपल्या या पाळीव दोस्तांसाठीही रेनकोट खरेदी केला जातो. पावसात फिरताना त्यांचं डोकं भिजू नये आणि त्यांना सर्दी, पडसं होऊ नये म्हणून रेनकोट किंवा ‘हेड अंब्रेला’चा उपाय अवलंबला जातो. ते पावसात भिजले तर त्यांना शक्य तितक्या प्रमाणात पुसून कोरडं करणं महत्त्वाचं असतं. घरातले आपले हे छोटे मित्र कितीही लडिवाळपणे फिरण्याचा आग्रह करत असले तरी बाहेरच्या पावसाचा अंदाज घेऊनच त्यांना बाहेर घेऊन जाण्याची खबरदारी आपण घ्यायला हवी.

रेनकोटइतकीच आणखी एक नवीन गोष्ट त्यांच्यासाठी बाजारात आली आहे ती म्हणजे पादत्राणे.. त्यांच्यासाठी ‘पंजात्राण’ म्हणू हवं तर.. चिखल आणि पाण्यातून फिरताना त्यांच्या पंजांमध्ये इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते. त्यापासून बचावासाठी म्हणून ही शक्कल लढवण्यात आली आहे.

पाऊस आणि घरभर माश्या हे अटळ समीकरण असल्याने त्याचा त्रास आपला श्वान, मांजर किं वा इतर पाळीव प्राण्यांना होऊ नये यासाठी घरातली स्वच्छता आवश्यक आहे. त्यांना काही जखम झाली असेल तर ती भरून येण्यासाठी योग्य तो  औषधोपचार करायला हवेत,नाहीतर माश्यांमुळे जखमेतील इन्फेक्शन वाढण्याची शक्यता जास्त असते. शरीराबरोबरच त्यांच्या खाण्यापिण्याचीही पावसात काळजी घ्यावी लागते. त्यांचे अन्न लवकर खराब होऊ नये किंवा माश्या, किटाणूंमुळे ते खराब न होता खाण्यायोग्य नि पौष्टिक राहावे यासाठी उत्तम उपाय म्हणजे अन्न हलकेच गरम असताना त्यांना खायला द्यावे. पाऊस पडत असताना जसं आपल्याला वाफाळलेला चहा नि गरमागरम भजीची प्लेट सुखावते तसंच त्यांनाही हलकं गरम असलेलं अन्न दिलं तर ते त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. वातावरणातही थंडावा असल्याने घरातली फरशी किंवा घराबाहेरच्या मातीत थंडावा असतो. शक्यतो अशा थंड पृष्ठभागांवर प्राण्यांना बसू देऊ नये. म्हणजे आता घरात त्यांच्यासाठी गादी, सोफा किंवा काही तरी बसण्यासाठी अंथरून ठेवणं उत्तम, त्यामुळे त्यांना थोडय़ा प्रमाणात का होईना पण ऊब मिळत राहते.

केसाळ आणि फॉरेन ब्रीड्सच्या बाबतीत वातावरणातील तापमानाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्राण्यांचे केस हा एक मोठा मुद्दा आहे. जसं उन्हाळ्यात त्यांना गरम होऊ नये म्हणून केस कापणं योग्य तसंच पावसाळ्यातही त्यांच्या केसांची विशेष काळजी घेणं योग्य. आपले हे मित्र जितके कोरडे राहतील तितकं चांगलं असतं. मात्र केस जास्त असतील तर ते सुकण्यास अधिक वेळ लागतो आणि त्यातून त्यांना त्रास होऊ शकतो. तसंच स्किन इन्फेक्शन किंवा एखादा स्किन डिसीज झाला असता त्यांच्या केसांमुळे ते कळून येत नाही त्यामुळे वेळोवेळी गरजेनुसार त्यांचे केस कापले पाहिजेत. त्यांच्या शरीराला थंड प्रदेशातील वातावरणाची सवय असल्याने आपण त्यांना आपल्या देशात आणून एका वेगळ्या वातावरणात ठेवतो. त्यामुळे त्यांना साजेसं वातावरण उपलब्ध करून देणं शक्य नसल्याने त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आपण घरातल्या तान्हय़ा बाळाची ज्या पद्धतीने काळजी घेतो त्याच पद्धतीने या मित्रांची काळजी घेतली पाहिजे. ते बोलू शकत नाहीत मात्र त्यांच्या हालचालींवरून आणि आवाजावरून त्यांची गरज काय, त्यांना काय त्रास होतो हे समजून घेतले पाहिजे.

सजना है मुझे!

केसाळ श्वानांचे केस कापणं नि त्यांची व्यवस्थित निगा राखणं गरजेचं आहे. काही लोक हे सोपस्कार घरी करतात मात्र हल्ली ठिकठिकाणी ‘पेट ग्रूिमग पार्लर्स’ सुरू झाली आहेत. तिथे तुमच्या पाळीव प्राण्यांच्या केसांची, त्वचेची निगा राखण्यासाठी एक टीम तयार असते. केसांत जटा होऊ नये म्हणून त्यांना योग्य तो कट देणे, नवीन नवीन हेअर स्टाइल करणे, अपल्याप्रमाणे त्यांचे केस कलर करणे असे एक ना अनेक प्रकार इथे केले जातात.

पावसाळी संगोपनाच्या काही टिप्स :

  • आपल्या पाळीव प्राण्यांना भिजल्यानंतर शक्य तितक्या प्रमाणात कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करावा, जमल्यास ड्रायरचा वापर करावा.
  • त्यांना बसण्यासाठी आणि झोपताना उबदार अंथरुणाची सोय करावी.
  • पिण्याचे पाणी, खाणं यांची स्वच्छता आणि तापमान योग्य असावं.
  • त्यांना आंघोळ घालताना त्यांच्या जखमा तसेच पायांचे तळवे व्यवस्थित साफ करावेत.
  • केसाळ श्वानाच्या/ प्राण्याच्या केसात जटा होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • आजारी प्राण्यांसाठी डॉक्टर्सकडून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन घेणं उपायकारक ठरेल.

कस्टमाईज्ड रेन अक्सेसरीज :

आपल्या पाळीव प्राण्याच्या गळ्यात त्याच्या/तिच्या नावाचं लॉकेट घालणं सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच्यापुढे जाऊन त्यांच्या नावाचा रेन कोट, बूट, टी-शर्ट याबरोबरच अनेक अ‍ॅक्सेसरीज त्यांच्यासाठी खरेदी करता येतात.

First Published on June 30, 2017 5:40 am

Web Title: animal friend pet animals